Showing posts with label JDCC Bank. Show all posts
Showing posts with label JDCC Bank. Show all posts

Saturday, 9 May 2015

नाथाभाऊंचा चेकमेट!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या सर्व पक्षीय ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी १८ जागा जिंकल्या. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून चर्चेचे गुर्‍हाळ तब्बल महिनाभर सुरू होते. शिवसेना नेत्यांनी खडसेंसोबत जाण्याचा ‘तह’ करून टाकला. कॉंग्रेस नेत्यांनी बदलाचे वारे ओळखून लढाईतून ‘माघार’ घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही २/३ जागा देण्याची खडसेंची तयारी होती. मात्र, हट्टी आणि दुराग्रही नेत्यांमुळे निवडणुकीचा ‘फड’ रंगला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्या नेत्याने पक्षश्रेष्ठींचे हवाले देत निवडणूक लादली नंतर ते नेते प्रचारातून बाहेर राहीले. तसा ‘घरचा आहेर’ पक्षाच्या महिला नेत्यांनी जाहीरपणे दिला. अखेर  बँकेच्या राजपटावर सर्व विरोधकांना ‘चेकमेट’ करीत खडसेंचे पॅनेल बहुमताने विजयी झाले. राजकीय बुध्दीबळात सोंगट्या कितीही रंगाच्या असल्या तरी सर्व बाजूंचे राजे एकटे ‘नाथाभाऊ’ असल्याचे या निकालाने सिध्द केले. जिल्ह्यातील सहकाराला नवीदिशा देणारा आणि सत्ता वाटणीचा ‘नवा पटर्न’ निर्माण करणारा हा निकाल आहे. भविष्यात जिल्ह्यातील सहकार मोडीत-विक्रीत निघतो की उर्जितावस्थेत येतो हे काही काळानंतर दिसेल...

जिल्हा बँक अध्यक्षपदी रोहिणी खेवलकरच!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ऍड. रोहिणी खेवलकर यांचीच निवड होणार हे निश्‍चित आहे. या बँकेत एकूण २१ पैकी १८ संचालक हे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनलचे निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्ष कोण होणार ही उत्सूकता असली तरी खडसे यांच्या कन्या आणि सहकार-शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या रोहिणी खेवलकर यांचीच या पदावर निवड होणार हे निश्‍चित आहे.

Monday, 13 April 2015

‘जिल्हा बँकमां काय भेटस रे भौ?’

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकूण २१ पैकी १८ जागांसाठी सुमारे २६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. जवळपास १०० वर उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. यातील काही संभाव्य उमेदवार सहकार विभाग किंवा न्यायालयाकडे जावून अर्ज वैध ठरवावेत म्हणून प्रयत्न करण्याची शक्यता आहे. प्रसंगी निवडणूक प्रक्रिया पुढेही ढकलली जाईल असे दिसते (तशी शक्यता नाहीच). ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्व पक्षीय नेेते गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उडालेली झुंबड पाहाता सर्व सामान्य माणूस पुढार्‍यांना प्रश्‍न विचारतोय की, ‘जिल्हा बँकमां काय भेटसरे भौ?’