जळगाव जिल्ह्यातील काही स्थळांचा रामायण कालीन संदर्भ शोधत असताना प्रथम एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. तो म्हणजे जळगाव जिल्हा हा असिक (ऋषीक) प्रदेशात होता. यात ऋषी म्हणजे, तपस्वी, ध्यान करणारा. ऋषीक म्हणजे तपस्वी - ध्यान करणाऱ्याची निवासाची जागा. जळगाव जिल्हा ही प्राचीन काळी तपोभूमी होती. रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी (वालझिरी (ता. चाळीसगाव), राजा दशरथशी संबंध असलेले ऋषी विश्वामित्र (रामेश्वरम (पळसोद), ता. जळगाव), महाभारत लिहणारे महर्षी व्यास (यावल), राजा दशरथकडून पुत्रकामेष्टी यज्ञ करून घेणारे ऋषि अगस्त्य (अगस्ती) (सिंगत, ता. रावेर), ऋषि लोमश (लुणखेडा, ता. रावेर), ऋषि उद्धालाक (उधळी, ता. रावेर), ऋषि शरभंग (चोपडा तालुका), महर्षी कण्व (कानळदा, ता. जळगाव) यांचे आश्रम वा मठ जळगाव जिल्ह्यात होते. भारतातले पहिले गणिती विद्यापीठ पाटणे (चा. चाळीसगाव) येथे भास्कराचार्य यांनी सुरु केले होते. या तपशिलाचे कोणतेही लिखित संदर्भ उपलब्ध नाहीत. वर्षानुवर्षांच्या मौखिक परंपरेतून ऋषी आणि महर्षींची जळगाव जिल्ह्यातील स्थाने चर्चेत आहेत. या संदर्भांचा उल्लेख काही अभ्यासकांनी त्यांच्या शोध वा संशोधन लेखांमध्ये केलेला आहे. ज्या प्रदेशात ऋषी, मुनी वा महर्षींचा निवास होता, त्या प्रदेशात राजा दशरथ आणि रामाच्या आवागमनाचे संदर्भही मौखिक स्वरुपात समोर येतात. रामायण हे सर्वाधिक मौखिक व नंतर स्थानिक भाषांमध्ये लिहिलेले लोकसाहित्य आहे. ज्या प्रदेशातील लोकांना राम जसा भावला तसा तो लेखनातून प्रकटला आहे. म्हणून राम - सीता - लक्ष्मण यांची विविध रुपे लोकसाहित्यातून समोर येतात. संपूर्ण भारतात रामाच्या संदर्भातील काही कथा आणि स्थाने यांची पुनरुक्ती होताना दिसते. विशिष्ट स्थाने, मंदिरे यांच्याविषयी सारख्याच आशयाच्या कथा चर्चेत असतात. जळगाव जिल्ह्यातील रामाच्या पाऊलखुणांविषयी सुद्धा हाच लोकोपवाद असू शकतो. तरीही रामाचा आणि जळगाव जिल्ह्याची संबंध माहित करून घेणे हे प्रचंड आनंद देणारे ठरते.
