Friday, 25 December 2020

जळगावचे बीभत्स राजकारण ...

 जळगाव जिल्ह्याचे राजकारण २/४ पुढाऱ्यांनी कमरेच्या खाली नेवून ठेवले आहे. जाहीरपणे सांगितले जाते आहे, 'आमच्याकडे सीडी आहे. आमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे.' अर्थातच अशा डिजिटल मीडिया सेव्हरमध्ये भजन-कीर्तनच्या व्हिडिओ क्लिप असणार नाहीत. स्त्री-पुरुषाच्या एकांतातील कमरेखालच्या खेळाच्या व्हिडिओ क्लिप असण्याची शक्यता जास्त आहे. बहुधा तो खेळही संमतीचा मामला असेल. बलात्कार वा ब्लैकमेलचा प्रकार असण्याची शक्यता तशी धूसरच. तरीही 'सीडी वा पेनड्राईव्ह आमच्याकडे आहे' असे सांगून सतत जाहीरपणे धमकावत राहणे म्हणजेच राजकारणाचास्तर कमरेखाली नेणे होय. पुढाऱ्यांच्या अशा कमरेखालच्या राजकारणाचा सामान्य जळगावकरला वीट आला आहे.
 

Saturday, 31 October 2020

या गांडुगिरीचे करायचे काय ?

लेखाचे शिर्षक उद्धटपणाचे
आणि असभ्य आहे. ते ठरवून दिले असून भारतातील उदारमतवादी, पुरोगामी, समाजवादी आणि समानतावादी ढोल बडविणाऱ्यांना उद्देशून आहे. ही मंडळी भारत सरकार, पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि सैन्यदले यांच्याविषयी गैरसमज पसरवणारी 'गांडुगिरी' अधुनमधून करतात. अलिकडे तसा एक भयंकर प्रकार सिद्ध झाला आहे. पुलवामा येथे भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर काही राजकीय पक्षांचे नेते, माध्यमातील बोलभांड प्रवक्ते, एकतर्फी अभ्यासक, ढोंगाळलेले समाजसेवी आणि सुपारीबाज पत्रकार यांनी तोंडसुख घेणाऱ्या भरपूर प्रतिक्रिया दिल्या होत्या. पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच घडवून आणला अशी शंका घेत सर्वसामान्यांचा बुद्धीभ्रम होण्यापर्यंतची सूचक विधाने  या मंडळींनी केली होती. मात्र, या सर्वांच्या कानफटात सणकन आवाज करणारे विधान पकिस्तानातून आले आहे. पाकिस्तानच्या संसदेत विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री फवाद चौधरी याने पुलवामात भारतीय सैन्यदलावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन करीत ते यश म्हणजे पंतप्रधान इम्रान खान सरकारचे हे मोठे यश असल्याचा दावा केला आहे.

Friday, 23 October 2020

कुंडल्या, व्हाया व्हिडिओ कैसेट ते सीडी

जळगाव जिल्ह्यातील राजकारणातला सन १९९२/९४ चा  काळ आठवला. सहकार क्षेत्रातील लढाईत सुरेशदादा विरुद्ध स्व. प्रल्हादराव पाटील गटांमध्ये घामासान लढाई सुरू होती. दादा आणि भाऊ हे दोघे तेव्हा महानेता शरद पवार यांचे समर्थक होते. तरी सुद्धा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढत होते. असे म्हटले जाते की, त्या निवडणुकीत मतदारांची जी कमाई झाली तशी नंतर कधीच झाली नाही. मतदारांनी सुद्धा २२ पैकी दोन्ही गटाला ११/११ असा कौल दिला होता.

Wednesday, 3 June 2020

कर्तव्य भावनेतून सामाजिक दायित्व

कोरोना विषाणूचा सामुहिक स्वरुपातून होणारा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात किमान ७२ दिवसांचा लॉकडाऊन संपला आहे. नव्या संहारक विषाणुंमुळे उद्भवलेल्या महामारीच्या भीतीपोटी देशातील सार्वजनिक अर्थ, उद्योग, व्यापार व त्याअनुषंगाने होणारे व्यवहार बंद झाले. ही स्थिती किती दिवस असेल याची शाश्वथीती नव्हती. पण साथरोग नियंत्र कालावधी साधारणतः ७२/७६ दिवसांचा असेल हा अंदाज होता. पंतप्रधानांनी दि. ३१ मेस पहिला अनलॉकडाऊन घोषीत केला आणि जवळपास ७२ दिवसांची अनिश्चितता संपली. यानंतर अऩेक ठिकाणी गरजुंसाठी सुरु असलेले मदत काय्त थांबविण्यात आले आहे.

Tuesday, 19 May 2020

कोरोनातून बरे झालेल्यांची समाजवापसी ?

कोरोनातून बरे होणाऱ्यांसाठी कोणते आहेत प्रश्न ?
'कोरोना सोबतची जीवन व कार्यशैली' या विषयावर सर्वप्रथम लेखन केले. नंतर अनेकांनी कोरोनाला स्वीकारुन पुढे जायला हवे, असा सल्ला द्यायला प्रारभ केला. कोरोना विषाणू पुढील काही काळ मानव समाजासमोर कर्दनकाळ म्हणून उभा राहणार हे निश्चित आहे. उरलेला आयुष्य लॉकडॉऊनमध्ये काढणे शक्य नाही. त्यामुळेच कोरोना विषाणू आहे, हे स्वीकारुन जीवन व कार्यशैली स्वीकारावी लागेल असे मत काल मांडले. अशा जीवन व कार्यशैलीतील आणखी एक प्रश्न 'आ' वासून समोर उभा ठाकणार आहे. तो म्हणजे, 'कोरोनातून बरे झालेल्यांची समाजवापसी कशी होणार ? समाज त्यांच्याशी कसा वागणार ?' अर्थात हे प्रश्न दोन्हीबाजुंनी आहेत. म्हणजे, कोरोनाशी संबंधित आजारातून बऱ्या झालेल्या (निगेटीव्ह अहवाल असलेल्या) रुग्णाने समाजात कसे वावरावे आणि समाजाने अशा व्यक्तीला कसे स्वीकारावे ?

Sunday, 17 May 2020

कोरोनासोबतची जीवन व कार्यशैली !

संपूर्ण जगाला भयंकर साथीच्या संसर्गातून घोषीत बंदीच्या स्थितीत नेणारा कोरोनाचा विषाणू पुढे किती काळ मानवाला घाबरवत राहील याचा अंदाज लावणे आज शक्य नाही. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गेले ६० दिवस संपूर्ण भारतातील जनजीवन ठप्प करण्यात आले आहे. त्यात आणखी १५ दिवसांचा कालावधी वाढवला आहे. साथरोग रोखण्यासाठी अपेक्षित  ७५/७६ दिवसांची मर्यादा दि. ३१ मे पर्यंत पूर्ण होईल. हे करूनही कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईलच याची शक्यता कमीच. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी वा नष्ट करण्यासाठी मुखावाटे घेण्याचे किंवा इंजेक्शन, सलाईनद्वारे टोचून घेण्याचे औषध सध्या तरी जगभरात कुठेही उपलब्ध नाहीच. म्हणजेच आहे त्या स्थितीत पुढील काळात वा दैनंदिन कामे व जबाबदाऱ्यांकडे प्रत्येकाला जावे लागणार आहे. मरणाच्या भीतीपोटी थबकलेल्या जगाला संभाव्य मृत्यू उरावर धरून धावणे सुरू करावेच लागेल. इच्छा असो वा नसो प्रत्येकाला धावावेच लागेल.

Wednesday, 13 May 2020

नाथाभाऊ, त्या ५५ फाईलींचा विषय काय ?

नाथाभाऊ किती दिवस पक्षांतरासाठी वेळ पाहाणार ?
भाजपमधून नाथाभाऊंनी (एकनाथराव खडसे) स्वतःची गच्छंती घडवून आणावी म्हणून शेवटचा डाव टाकला गेला आहे. भाजपने नाथाभाऊंना काय काय दिले ? याची मोजदाद चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. शिवाय, नाथाभाऊंनी खंजर खुपसला असे धक्कादायक विधान केले आहे. पाटील यांचे समर्थन गिरीशभू महाजन यांनी उघडपणे करीत पक्षाने खडसेंना भरपूर दिले असा प्रहार केला आहे. हाच भाजपचा अंतिम डाव आहे. पक्षातून हकालपट्टी होत नाही पण संघ परिवाराच्या इशाऱ्यानंतर पक्षाने नालायक ठरवलेल्यांची आता 'पत' नाही हे दाखवून द्यायला काही बिनीचे शिलेदार शाब्दीक हल्ले करीतच असतात. नाथाभाऊ विषयी ४ वर्षांपूर्वी सुरू झालेले 'कुजबूज अभियान' आता 'भोंगा अभियान' झाले आहे. पक्षातील ठराविक मंडळी अगोदर कानात सांगत होती, नाथाभाऊ पक्षात संपले. आता संपविण्याची शेवटची अवस्था आहे. पक्षावर हवे तेवढे तोंडसुख घेऊन झाले की, नाथाभाऊंना पक्ष सोडावाच लागेल. नाहीतर आहेच व्यासपिठावर शेवटची रांग. नाहीतर सभागृहात पहिली रांग आणि वारंवार ओरडणारे मूठभर कार्यकर्ते, 'नाथाभाऊ आगेबढो, हम थोडे बहुत आपके साथ है'

भाजपची मोठी गंमत आहे. या पक्षात सेनानिवृत्ती ही गोड बोलून व संभ्रमित ठेऊन दिली जाते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह ही ठराविक उदाहरणे. उत्तर महाराष्ट्रात धरमचंद चोरडीया, डॉ. दौलतराव आहेर, डॉ. विजय गावित ही काही उदाहरणे. भाजपत नेतेपदी असताना स्वतः ठरवून निवृत्ती निश्चित केल्याची केवळ तीन उदाहरणे आहेत. पहिले अटल बिहारी वाजपेयी, दुसरे उत्तमरावनाना पाटील यांचे. या दोघांनी सर्वोच्च पदांवर असताना स्वतःच बाजूला होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांना कोणतीच रांग दाखविण्याचे धारिष्ट्य कोणाचेही झाले नाही. तिसरे उदाहरण सुषमा स्वराज यांचे आहे. पक्षाची सत्ता असताना मंत्रीपद नाकारुन त्या बाजूला झाल्या. ही उदाहरणे सोडली तर बाकीच्यांना बाजूला सारायला अगोदर दुर्लक्ष, नंतर कुजबूज, त्यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणणे, नंतर सभा, बैठकांमधून टाळणे, हळूहळू आरोपांची तीव्रता वाढवणे, दोघा-तिघांनी थेट आरोप करणे, आरोपांना उत्तरे देण्यास बाध्य करणे आणि नंतर स्वतःच स्वतःची गच्छंती घडवून आणणे हे सूत्र वापरले गेले आहे.

भाजपतही सत्तेत कमबैक करता येते अशी उदाहरणे आहेत. त्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर होते. त्यांनाही पक्षाने काही काळ बाजूला सारले. कुजबूज मोहिम सुरू झाली. पण फुंडकर यांनी मौन पाळले. त्यांनी हल्ले-प्रतीहल्ले केले नाही. अखेरीस त्यांना मंत्रीपद मिळाले. फुंडकर मौन राखून कमबैक करु शकले. नाथाभाऊंना मौनाचे महत्त्वच समजले नाही. मंत्रीपदाच्या अवघ्या दीडवर्षांत इतरांकडून किंमत वसूल करीत नाथाभाऊंनी कुटुंबासह सत्तेचा अमर्याद उपभोग घेतला. नाथाभाऊंकडे १४ खात्यांचे मंत्रीपद होते. त्यात सहकार, महसूल, कृषी खाते होते. जळगाव जिल्हा बँक, जळगाव जिल्हा दूध संघात ठाण मांडून बसलेल्या व अनेक घोटाळे केलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या फायली मंत्रालयात होत्या. चौकश्या आणि वेळप्रसंगी कारागृहाची भीती असल्यामुळे अनेक प्रस्थापितांनी नाथाभाऊसमोर शेपट्या घातल्या. फायलींच्या बळावरच नाथाभाऊंना घरात पदे आणता आली.

नाथाभाऊंसारखा अनुभवी नेता फायलींचे महत्त्व जाणतो.  नाथाभाऊंनी मंत्रिपदाच्या काळात केलेल्या काही व्यवहारांच्या ५५ फाईल्स अस्तित्वात आहेत, असे एक कुजबूज अभियान सध्या चर्चेत आहे. भाजपत एवढा अपमान सहन करुनही नाथाभाऊ पक्ष का सोडत नाहीत ? असा प्रश्न चर्चेत येतो तेव्हा या फाईलींची भीती उरावर असते म्हणे. सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांनीही कधी तरी या फायलींचा उल्लेख केला होता. यातील काही विषय केंद्र सरकारमधील मंत्रालयांशी संबंधित आहेत. ईडी सारखी यंत्रणा कधीही मागे लावून उत्पन्नाचे उत्खनन करता येते. बहुधा याच चिंतेतून नाथाभाऊ भाजप सोडू शकत नाहीत. ही आगतिकता ध्यानी असल्यामुळे भाजपतील छुटपूटमंडळीही नाथाभाऊंना टपली मारत आहेत.

नाथाभाऊ भाजपने केलेल्या अन्यायावर भरभरुन बोलतात. दाऊदच्या पत्नीला फोन कॉल या तथ्यहिन प्रकरणात नाथाभाऊंविषयी जनतेत सहानुभूती होती. ती आजही आहे. पण अंबानी, अदानी या उद्योजकांशी का बिनसले ? वक्फ बोर्ड जमीन भानगडी काय ? भोसरीत जागा घ्यायला ४/५ कोटी कुठून आणले ? काही व्यवहारात बोगस कंपनी कोणत्या ? अशी काही माहिती नाथाभाऊंनी स्वतःच सांगून टाकायला हवी. जेणे करुन ज्या ५५ फाईलींची चर्चा आहे, तिला पूर्णविराम मिळेल. चंद्रकांतदादा व गिरीशभू यांनी नाथाभाऊंच्या प्रतिमा भंजनाला थेट हात घातला आहे. अशावेळी नाथाभाऊ कुंपणावरुन किती दिवस बचाव करणार ? एकदा जाहीरपणे त्या ५५ फायली आहेत की नाही, हे सांगून  भाजपसंदर्भातील निर्णय घ्यायलाच हवा. नाथाभाऊंना कोणीही टपली मारावी, हे पाहणे व वारंवार तसे लिहिणे क्लेषकारक आहे.

नाथाभाऊंनी शिवसेनेत जावे

नाथाभाऊंनी भाजप सोडून कोणत्या पक्षात जावे ? याविषयी महासर्वेक्षण घेतले होते. जवळपास १५० वर समर्थकांनी पर्याय सूचविले. यात धक्कादायक बाब हीच की, भाजपने नाथाभाऊला भरपूर दिले. आता त्यांनी गप्प बसावे, असे मत व्यक्य करणारे ७५ आहेत. नाथाभाऊंनी शिवसेनेत जावे असे ३० जणांना वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय २५ जण सूचवतात. उरलेल्या २० मध्ये काँग्रेसहसह इतर पर्याय आहे. याचा निष्कर्ष एवढाच की, नाथाभाऊला पक्षाने भरपूर दिले हे कुजबूज अभियान आता भोंगा अभियान झाल्यानंतर उरलेल्या ७५ मधूनही बहुतांश सहमत होत जातील.

सुरेशदादा खडसेंपेक्षा सरस

सुरेशदादांच्या व नाथाभाऊंच्या राजकीय वाटचालीत अनेक आडवळणे सोबत आली. सुरेशदादांचे राजकारण धाडसाचे राहिले. डंका वाजवून त्यांनी पक्षांतरे केली. नाकावार टिच्चून निवडून येत गेले. जळगाव शहराला विकासाचा चेहरा दिला. अनेक विकास प्रकल्पांच्या फलकावर सुरेशदादांचे नाव आहे. पण नाथाभाऊंनी मंत्रीपदाच्या काळात उभारलेले प्रकल्प कोणते ? ते शोधावे लागतात. भाजप न सोडून आगतिक झालेल्या नाथाभाऊंपेक्षा वारंवार पक्ष बदलून सत्तेत राहिलेल्या सुरेशदादांची कारकिर्द उजवी ठरते. म्हणून आता तरी नाथाभाऊंनी वेळ चुकवू नये, असे समर्थकांना वाटते.

Friday, 8 May 2020

नाथाभाऊ बोलून टाका, 'पक्ष गेला उडत ...'

विधानसभा निवडणुकीत ठरवून उमेदवारी नाकारणे, कन्येला तोंड देखली उमेदवारी देऊन नंतर पराभव घडवून आणणे, लागोपाठ झालेल्या आरोपांची चौकशी करुन एकही अहवाल जाहीर न करणे, पक्षाच्या राज्य व जिल्हा सभांमध्ये सन्मानाने सहभाग न देणे अशा मानभंगांच्या अनेक प्रसंगांचे कडू घोट एकनाथराव खडसे यांनी रिचवले आहेत. तरीही विधान परिषदेवर उमेदवारीची आशा बाळगून खडसे रांगेत उभे होते. अखेर उमेदवारी मिळाली नाही. नाथाभाऊंचा संयमाचा बांध पुन्हा फुटला आणि ते बोलले.

Sunday, 12 April 2020

पारंपरिक माध्यमांची मक्तेदारी मोडीत ...

संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या २३ मार्च पासून सुरु झालेला लॉकडाऊनचा कालावधी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. रेड झोनमध्ये असलेल्या भागात गरजेच्या वस्तू वा सेवेसाठी माणसांना घराबाहेर फिरण्यावर आणखी कडक प्रतिबंध लागण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. बहुधा या भागात प्रतिबंध शिथिल होतील. लॉकडाऊनच्या काळात माणसाला असलेली विविध माध्यमांची गरज वा निकड पूर्णतः मोडीत निघाली आहे. वृत्तपत्र, टीव्ही, एफएम रेडीओ आणि आकाशवाणी अशा सर्वच दृक व श्राव्य माध्यमांना पर्याय म्हणून स्मार्ट फोन वा ॲन्ड्रॉईड ॲपयुक्त मोबाईल हे सर्वाधिक माहिती देणारे व रंजन करणारे साधन (उपकरण) ठरले आहे.

सामुहिक अग्निहोत्रनंतर प्रदुषकांचे प्रमाण कमी

अक्कलकोट येथील विश्व फाऊंडेशनच्या पुढाकाराने जळगाव येथे दि. १५ मार्चला सामुहिक अग्निहोत्रचा विधी ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आला होता. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी अग्निहोत्रचे पारंपरिक आणि विज्ञान विषयक महत्त्व स्पष्ट करताना अग्निहोत्रनंतर हवेतील प्रदुषकांचे प्रमाण कमी होते असा दावा केला होता. या संदर्भात पूर्वी केलेल्या काही प्रयोगांच्या व्हिडिओ क्लिपही माध्यमातून प्रसारित झालेल्या होत्या. त्याप्रमाणे जळगाव येथेही शास्त्रशुद्ध तपासणी करता यावी म्हणून अग्निहोत्र स्थळी मापन यंत्रे लावून अग्निहोत्र पूर्व आणि त्यानंतर हवेतील प्रदुषकांचे मापन केले गेले. मुंबईतील एनव्हायरो केअर लॅब प्रायव्हेट लिमीटेडच्या तज्ञांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने हवेच्या गुणवत्तेचे मापन केले. त्यानंतर हवेतील प्रदुषकांची टक्केवारी कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. विश्व फाऊंडेशन भारतासह जगभरात अग्निहोत्रच्या प्रसाराचे काम करीत असते. आतापर्यंत जवळपास ४५ देशांमध्ये अग्निहोत्रच्या उपयुक्ततेविषयी विविध प्रयोग झालेले आहेत. जळगाव मधील प्रयोगामुळे आणखी विश्वासार्ह आकडेवारी हाती आली आहे.