Friday, 8 November 2019

देवा, थोबाड बंद ठेवा !

सन १९९२/९३ हे वर्ष जळगाव शहरात चर्चेत असलेल्या कथित लैंगिक छळ प्रकरणाचे होते. जळगाव नगर पालिकेतील राजकारणाने मतभेदांचे टोक गाठलेले होते. जळगाव पालिकेतील मनमानी कारभारांचे अनेक ठराव तेव्हाचे जिल्हाधिकारी अजय भुषण पांडे यांनी कलम ३०८ वापरुन व्यपगत केले होते. नगराध्यक्षपदी असलेले तेव्हाचे आमदार सुरेशदादा जैन विरोधात अविश्वासाची जमवाजमव डॉ. अर्जून भंगाळे यांनी केली होती. नगरसेवकांना सहलीला पाठवले होते. तेव्हा विधानसभाध्यक्ष असलेले मधुकरराव चौधरी आणि तेव्हा नगरविकास मंत्री असलेले अरुण गुजराथी जळगाव नगर पालिका बरखास्त करण्याच्या मूडमध्ये होते. स्व. बबन बाहेती, स्व, नरेंद्र पाटील व स्व. उल्हास साबळे नगर पालिकेतील मनमानी कारभाराची प्रकरणे उकरुन काढत होते. याच वादात फैशन कटपीस सेंटर ही टपरी हटविण्यावरुन जैन- बाहेती विवाद झाला. जिल्हाधिकारी पांडे विरोधात जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक स्व. दीपक जोग विरोधात जैन असा संघर्षही सुरु होता. जैन यांनी अटकेच्या निषेधार्थ ७ दिवस पोलीस ठाणे आवारातच उपोषण केले.

अधिकारी विरुध्द पदाधिकारी वादात मलिक आणि पाटील हे दोन जण पोलिसांच्या हाती संशयित म्हणून लागले. मुंबई बॉम्बस्फोटातील एक कथित संशयित शहनावाज हा भुसावळला नईम यांच्याकडे आश्रित असल्याचे आढळले होते. या शहनवाजचे जळगावात काय संबंध असावेत ? या तपासात मलिक पकडला होता. त्याने शहाजोगपणे आरोप नाकारला पण हॉटेल तिरुपतीमध्ये होणाऱ्या लैंगिक प्रकरणांची माहिती तपास अधिकारी तेव्हाचे अप्पर अधीक्षक दिलीप श्रीराव व प्रशिक्षणार्थी बाळासाहेब शेखर यांना दिली. या माहितीतून पुढे जळगावमधील कथित लैंगिक छळ प्रकरणांची चर्चा सुरु झाली.

दिलीप श्रीराव व बाळासाहेब शेखर यांनी लैंगिक छळ प्रकरणात ५०० महिला असू शकतात असा दावा केला. संपूर्ण देशच या दाव्याच्या नंतर हादरला. जळगाव पालिका बरखास्त करायला स्व. चौधरी व गुजराथी यांना कारण मिळाले. त्याचवेळी स्व. जोग यांची बदली झाली. नंतर आले पी. डी. जाधव. तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांचे जाधव विश्वासू होते. त्यांनी लैंगिक छळ प्रकरणाचे धागेदोरे तपासून त्यात गुंतलेल्या मुली वा महिला फक्त २५ असाव्यात असा दावा केला. याला कारणही असेच होते. ज्या मुली व महिलांची नावे होती ती केवळ विशेष नामे होती. बापाचे नाव, आडनाव व पत्तेही नव्हते. स्व. जोग असताना आकडा ५०० चा आणि जाधव आल्यावर आकडा फक्त २५ यावर गदारोळ उठला. सरकार प्रकरण दडपते आहे असा आरोप सुरु झाला. या वातावरणात विशेष तपास अधिकारी म्हणून जळगावला आले तेव्हाचे उपमहासंचालक स्व अरविंद इनामदार. त्यांना मदत करायला होते स्व. जोग आणि आयुक्त असलेल्या मीरा बोरवणकर.

इनामदार हे सुध्दा पवार यांचे विश्वासू होते. जळगाव लैंगिक छळ प्रकरणात पोलिसांनी रोजच्या पत्रकार परिषदा घेऊन जळगावमधील मुली-महिलांना संशयाच्या घेऱ्यात ओढले होते. हे प्रकरण लवकर निपटून गुन्हे दाखल करायची जबाबदारी इनामदार यांच्यावर होती. इनामदार, जोग व बोरवणकर पोलीस मुख्यालयातील आयपीमेसला मुक्कामी होते. तेथे इनामदार पहिल्यांदा पत्रकारांना भेटले. प्रसन्न मुद्रेतील इनामदारांनी सर्वांना 'काय देवा कसे आहात ?' असे वाचारले. त्यानंतर पत्रकार परिषद सुरु झाली. पुन्हा आकडे ५००/२५ भोवती फिरले. तेव्हा इनामदार म्हणाले, 'आज मुली व महिलांची संख्या मोजू नये. आपण तक्रारदार येतील तसे गुन्हे दाखल करु. गुन्हे दाखल होताना तपास योग्य प्रकारे करु. मी एसपी व इतरांना थोबाड बंद ठेवायला सांगितले आहे. थोबाड केल्यानेच ५ चे ५०० आणि ५०० चे २५ झाले. या पत्रकार परिषदेत मी बोललो नाही. कारण मी 'सकाळ' चा बातमीदार होतो आणि इनामदारांचा मला अगोदरच निरोप होता. तुमचा पेपर पवारसाहेबांचा आहे. आपण नंतर बोलू या !

पत्रकार परिषद संपल्यानंतर सायंकाळी इनामदार यांनी मला बोलावले. स्व. जोग, श्रीराव व शेखर यांच्यापैकी कोणी ५०० चा आकडा सांगितला या विषयी विचारणा केली. त्यांना माझा जबाब हवा होता. कारण ५०० च्या आकड्यावरुन विभागांतर्गत चौकशी लागणार होती. अर्थात, मी ५०० च्या आकड्यात नव्हतो. सर्व दैनिकांनी ५०० हा आकडा छापला होता. पण 'सकाळ' मध्ये आकडा ३०० चा होता. तो का आला ? याची स्वतंत्र कथा आहे. इनामदारांनी मला जबाबाचे सांगितले. मी म्हटले, 'सकाळ' मध्ये आकडा ३०० चा आहे. मी कसे काय ५०० सांगणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव घेऊ ? आम्ही आकडा ३०० का केला ? हे इनामदारांना सांगितले. जर ५०० आकडा छळ झालेल्या मुली वा महिलांचा असेल तर त्यांचा छळ करणारे संशयित किमान १००० पुरुष हवेत. तसे दिसत नाही. म्हणून आम्ही ३०० चा मध्य काढला. हे इनामदारांना सांगितले. त्यांनी तेथेच मला त्यांचा पेन भेट दिला. म्हणाले, 'तू पत्रकार असून तुला हे कळले. पण आमच्या अधिकाऱ्यांना हे लॉजिक कसे कळले नाही ?' अखेर माझा जबाब रद्द झाला.

लैंगिक छळ प्रकरणात तेव्हा काही नगरसेवक व इतर पुढारी संशयित होते. ज्यांना मास्टर माईंड म्हटले होते त्यांनी लैंगिक छळ हे मानसिक विकृतीतून केले का ? हा सुध्दा तपासाचा भाग होता. इनामदार मला म्हणाले, 'या दोघा आरोपींची मला मानसिक तपासणी करायची आहे. तुम्ही तशी बातमी तुमच्या दैनिकात देऊन आरोपींची मानसिक तपासणी करायचे सूचवा.' आता इनामदार म्हणताहेत म्हणून मी तशी बातमी केली. त्यात एका संघटनेचे नाव वापरले. मात्र त्या संघटनेला तसे सांगितले नाही. तेथे चूक झाली. दुसऱ्या दिवशी ती संघटना म्हणू लागली, 'दोघा संशयितांनी पूर्णतः शुध्दीवर व मानसिक परिपक्व अवस्थेत लैंगिक छळ केले आहेत. 'सकाळ' ने चुकीची बातमी दिली आहे.'  या संघटनेचे काही पदाधिकारी तेव्हाचे संपादक कांबळेंचे मित्र होते. विषय कांबळेंपर्यंत गेला. कांबळे जळगावला आले. कांबळे व इनामदार मित्र होते. इनामदारांनी जे घडले ते सांगून 'तिवारी यांनी मला तपासात मदत करायला बातमी दिली' हे स्वीकारले. कांबळेंचाही माझ्यावर विश्वास होता. अखेर प्रकरण थांबले.

इनामदार २८ दिवस जळगावला होते. त्यांनी लैंगिक छळ प्रकरणाचे ९ गुन्हे दाखल केले. त्यापैकी केवळ २ तक्रारदार मुली-महिला टिकल्या. इतर पुन्हा आल्याच नाहीत. ५०० चा आकडा २५ वरुन केवळ २ वर आला. जळगाव लैंगिक छळ प्रकरणाला अवास्तव प्रसिध्दी देऊन माध्यमांनी जळगावातील महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. एका कथित प्रकरणामुळे जळगाव बदनाम झाले.


ता.क. - लैंगिक छळ प्रकरणाचे वार्तांकन वास्तववादी केले म्हणून मला 'सकाळ' चा डॉ. ना. भि. परुळेकर पुरस्कार मिळाला. याच प्रकरणासाठी स्व. चौधरी व अरुण गुजराथी यांच्या हस्ते माझा सत्कार होणार होता. तो मी नाकारला. कारण, जळगावची बदनामी करणाऱ्या प्रकरणासाठी सत्कार नको, ही माझी भूमिका होती.

Tuesday, 5 November 2019

बिभिषण, विदूर आणि संजय राऊत

राम-रावण युद्धाचे वर्णन करताना बिभिषण आणि पांडव-कौरव संघर्ष सांगताना विदूर ही पात्रे वगळी जात नाहीत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात भाजप-शिवसेना युतीतील विवादाची प्रकरणे लिहिताना संजय राऊत हे पात्र वगळता येणार नाही. बिभिषण, विदूर आणि संजय राऊत या तीनही पात्रात एक सुक्ष्म समान धागा आहे. तो म्हणजे, हे तिघे ज्या पक्षात असल्यागत वाटत होते, त्यांनी प्रत्यक्षात विरोधी गटांशी फितुरी केली. अर्थात, फितूर होणे हा वाक्प्रचार समर्थकांना चीड आणणारा ठरु शकतो. ते टाळण्यासाठी असेही म्हणता येईल की, रावणाच्या पक्षात राहून बिभिषण याने रामाशी, कौरवांच्या बाजूने असूनही विदूरने पांडवांशी आणि महायुतीत असूनही संजय राऊत यांनी महाआघाडीतील घटक पक्षांशी संधान साधले. संधान साधणे म्हणजे निश्चित केलेले लक्ष्य साधणे. शत्रू पक्षासोबत गुप्तपणे बैठका घेऊन कोणाला तरी बेसावध ठेऊन नवी युती किंवा आघाडी करणे. असे करणे हा कपट नितीचा भाग मानला जातो. कधी कधी कपट हे सकारात्मक कार्यासाठी असते. बहुतेक वेळा ते स्वहित आणि इतरांच्या अहितासाठी असते. संजय राऊत यांनी साधलेले संधान शिवसेनेच्या हितासाठी व महायुतीच्या अहितासाठी आहे.

Wednesday, 16 October 2019

माझ्यावरील सर्व आरोप एकतर्फी - सुरेश भोळे

विधानसभेच्या जळगाव मतदार संघाची सन २०१४ मधील निवडणूक सर्व समाज घटकांच्या पाठबळावर मी जिंकली होती. आता सन २०१९ ची निवडूक सर्वच समाजांच्या भरघोस पाठबळावर जिंकणार. मी केवळ एका समाजाच्या पाठिंब्यावर निवडून येत नाही. विविध समाज घटकातील मित्र, हितचिंतक आणि कार्यकर्ते यांच्या बळावर मी जिंकतो,” शी प्रतिक्रिया जळगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार व निवडणूक रिंगणातील भाजपचे उमेदवार सुरेश दामू भोळे तथा राजूमामा यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आमदार भोळे यांच्या आमदारकीच्या ५ वर्षांच्या आणि त्यांच्या पत्नी तथा महापौर सौ. सीमा भोळे यांच्या १ वर्षांच्या कार्यकाळावर सातत्याने टीका केली आहे. भोळे यांना सोशल मीडियातून ७ प्रश्नही विचारले होते. आरोप आणि त्या प्रश्नांबाबत आमदार भोळे यांचीही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून भोळे यांनी सविस्तर उत्तरे दिली.

Tuesday, 15 October 2019

पांढरा कांदा उत्पादकांचा कुंभमेळा ..

पांढरा कांदा उत्पादकांची गर्दी
जळगावस्थित जैन उद्योग समुहातील भाजीपाला निर्जलीकरण आणि मसाला निर्मिती करणाऱ्या ‘जैन फार्म फ्रेश’ या कंपनीतर्फे देशभरातील १४ शेतकऱ्यांना ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ प्रदान सोहळा ४ हजारावर शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त गर्दीत सोमवारी (दि. १४) झाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर म्हणून नाशिक, मालेगाव, कळवण, सटाणा, पिंपळगाव हा परिसर ओळखला जातो. परंतु, गेल्या २० वर्षांत खानदेशच्या तीन जिल्ह्यांसह गुजरात व मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमधील गावांमध्ये पांढरा कांदा उत्पादकांची चळवळ ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीने उभी केली आहे.

Monday, 14 October 2019

मनपा संकुलातील व्यापाऱ्यांचा “बैल आणि झोप”

विधानसभा निवडणूक प्रचाराची जळगाव शहर मतदार संघात धामधूम सुरु आहे. त्याचवेळी जळगाव मनपा मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील जवळपास २,३८७ व्यापाऱ्यांवर गाळ्यांना सील लावण्याच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. दिवाळी तोंडावर असताना मनपा प्रशासन कारवाईचा फार्स रंगवित आहे. ज्या माजी व आजी सत्ताधाऱ्यांनी व्यापारी वर्गाला कधीही पूर्ण होणार नाहीत अशी आश्वासने देऊन झुलवले ते आता निवडणूक प्रचारात दंग असून मनपा अधिकारी व व्यापारी पोलीस ठाण्यात फेऱ्या मारुन एकमेकाला शिवीगाळ करीत आहेत. पुढाऱ्यांची ही भूमिका गाव जळे आणि हनुमान बोंबी चोळे अशी आहे. अर्थात, यात दोष पूर्णतः व्यापारी वर्गाचा आहे. त्यांच्यातील दुही, राजकारणी लोकांचे पंटर यांनी वेळोवेळी केलेल्या दिशाभूल वर्तनाचा आहे.

Sunday, 13 October 2019

भाजपच्या फितूरांना फूस आणि रसद कोणाची ?


भाजपचे स्टार प्रचारक तथा भाजपचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव येथे रविवारी झालेल्या सभास्थळी जळगाव ग्रामीण मतदार संघातील शिवसेना उमेदवार तथा राज्यमंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे जळगाव जिल्ह्यातील सर्वेसर्वा तथा जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात 'खडाखडी' झाली असे वृत्त आहे. जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण ११ पैकी ७ मतदार संघात युती अंतर्गत भाजपचे आणि ४ मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या चौघांसमोर भाजपचे ४ 'फितूर' उमेदवारांनी प्रचारात आगळीक सुरु केली आहे. भाजपचे भगवे पट्टे गळ्यात घालून व मंत्री महाजन यांचा आशीर्वाद असल्याचे सांगत हे चौघे फितूर प्रचार करीत आहेत. त्यांच्यापैकी एक फितूर उमेदवार गुलाबराव पाटील यांच्यासमोर जळगाव ग्रामीण मतदार संघात आहे. हाच मुद्दा घेऊन गुलाबराव पाटील यांनी मोदींच्या सभास्थानी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे सभेपूर्वी वातावरण थोडे तापले. अर्थात, सभा संयोजक मंत्री महाजन यांनी गुलाबराव पाटील यांना टोलवून लावले.

Monday, 7 October 2019

राष्ट्रवादी'चा मुक्ताईनगरात 'बाय'...

विधानसभेच्या मुक्ताईनगर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांची माघार हा विषय धक्कादायक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने ॲड. रोहिणी खडसेंना दिलेला हा 'बाय' (म्हणजे आम्ही नाही लढत, तुम्ही जा पुढे) आहे. ॲड. पाटील यांनी निवडणूक लढण्याला केलेला हा 'बाय बाय' त्यांचे पिताश्री स्व. प्रल्हादभाऊ पाटील यांच्या कार्यकाळातील काही संदर्भांची आठवण करुन देतो. महाराष्ट्र राज्य शिखर बँकेचे सलग २ टर्म अध्यक्षपद सांभाळण्याची संधी स्व. प्रल्हादभाऊ यांना मिळाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ही किमया साधली गेली. शिखर बँकेच्या मुख्यालयात अध्यक्षाच्या कॅबिनसमोर तेव्हाचे सहकार मंत्री स्व. शंकरराव कोल्हे भेटीची प्रतिक्षा करीत बसलेले असत असे चित्र तेव्हा अनेकांनी पाहिले आहे. स्व. प्रल्हादभाऊ जळगाव जिल्हा बँकेचे व सहकार क्षेत्रातील अनभिषीक्त नेते होते. ते असे पर्यंत एकनाथराव खडसे जिल्हा बँकेत संचालक होऊ शकले नाहीत. दुसरीकडे खडसे यांनीही स्व. प्रल्हादभाऊ यांना विधी मंडळात किंवा संसदेत निवडून जाऊ दिले नाही. स्व. प्रल्हादभाऊंचे हे स्वप्न त्यांचे ॲड. रवींद्र पाटील हे साध्य करु शकले नाहीत.

Thursday, 3 October 2019

नाथाभाऊ - 'शल्य' ते 'शल्यचिकित्सा'

विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये मुक्ताईनगर मतदार संघात एकनाथराव खडसे तथा नाथाभाऊ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शक्यतो असणार नाहीत. बहुधा त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी आमदारकीचा वारसा नक्कीच चालवणार. आज सायंकाळपर्यंत या विषयावर पडदा पडलेला असेल.

Thursday, 26 September 2019

एमएससी बँक घोटाळ्यातील संगनमत ...


मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर राज्य सहकारी शिखर बँकेत (एमएससी बँक) सन २००५ ते २०१० दरम्यान झालेल्या कर्ज वाटप घोळाची तक्रार दाखल आहे. हा घोळ सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा असल्याचा दावा तक्रारीत आहे. तब्बल ४ वर्षे सुनावणी सुरु असलेल्या या तक्रारीत आढळलेल्या तथ्यामुळे उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला संशयित आरोपांच्या विरोधात ५ दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयात मूळ तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांची आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कलम ४२० (फसवणूक – दखलपात्र, अजामीनपात्र), ५०६ (अन्यायाने धमकावणे – अदखलपात्र, जामीनपात्र), ४०९ (सरकारी नोकर आदींनी विश्वासघात करणे), ४६५ (बनावट कागदपत्रे तयार करणे) आणि कलम ४६७ (किमतीचा दस्तऐवज / मृत्युलेख बनावट तयार करणे) नुसार संशयितांच्या विरोधात गुन्हा (एफआयआर) नोंद झाला आहे.

Saturday, 14 September 2019

'एमआरपी' चा घोळ आणि झोल

स्पार्क बूट एमआरपी ९९९ रुपये
बाजारात मंदीची बोंबाबोंब सतत सुरु आहे. याला केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा ओरडा विशिष्ट घटक करतो आहे. कैबिनमध्ये खूर्ची उबवणारे माध्यम संपादक सुध्दा इंग्रजी लेखांवर आधारित अग्रलेख पाडत आहेत. मंदीमागे नेमकी कारणे काय ? हे शोधणारी वृत्तमालिका कुठेही दिसत नाही. व्यक्तिशः अनुभवातून बाजारपेठेत वस्तुंच्या एमआरपी (विक्रीची जास्तीत जास्त किंमत) चा घोळ व झोलचे एक खुपच लहान कारण मला समजले आहे. ते टप्प्याटप्प्याने स्पष्ट करतो. या शिवाय, मंदीची इतरही कारणे असू शकतील.