Sunday 21 January 2024

कान्हदेशात राम - सीता ...

अयोध्येत आज सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ ला श्रीराम लला मूर्ती स्थापना आणि भव्य मंदिराचे लोकार्पण होत आहे. यानिमित्ताने राम - सीता - लक्ष्मण यांच्या जळगाव जिल्ह्यातील पाऊलखुणांचा सविस्तर तपशील देणारा हा लेख...

जळगाव जिल्ह्यातील काही स्थळांचा रामायण कालीन संदर्भ शोधत असताना प्रथम एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. तो म्हणजे जळगाव जिल्हा हा असिक (ऋषीक) प्रदेशात होता. यात ऋषी म्हणजे, तपस्वी, ध्यान करणारा. ऋषीक म्हणजे तपस्वी - ध्यान करणाऱ्याची निवासाची जागा. जळगाव जिल्हा ही प्राचीन काळी तपोभूमी होती. रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी (वालझिरी (ता. चाळीसगाव), राजा दशरथशी संबंध असलेले ऋषी विश्वामित्र (रामेश्वरम (पळसोद), ता. जळगाव), महाभारत लिहणारे महर्षी व्यास (यावल), राजा दशरथकडून पुत्रकामेष्टी यज्ञ करून घेणारे ऋषि अगस्त्य (अगस्ती) (सिंगत, ता. रावेर), ऋषि लोमश (लुणखेडा, ता. रावेर), ऋषि उद्धालाक (उधळी, ता. रावेर), ऋषि शरभंग (चोपडा तालुका), महर्षी कण्व (कानळदा, ता. जळगाव) यांचे आश्रम वा मठ जळगाव जिल्ह्यात होते. भारतातले पहिले गणिती विद्यापीठ पाटणे (चा. चाळीसगाव) येथे भास्कराचार्य यांनी सुरु केले होते. या तपशिलाचे कोणतेही लिखित संदर्भ उपलब्ध नाहीत. वर्षानुवर्षांच्या मौखिक परंपरेतून ऋषी आणि महर्षींची जळगाव जिल्ह्यातील स्थाने चर्चेत आहेत. या संदर्भांचा उल्लेख काही अभ्यासकांनी त्यांच्या शोध वा संशोधन लेखांमध्ये केलेला आहे. ज्या प्रदेशात ऋषी, मुनी वा महर्षींचा निवास होता, त्या प्रदेशात राजा दशरथ आणि रामाच्या आवागमनाचे संदर्भही मौखिक स्वरुपात समोर येतात. रामायण हे सर्वाधिक मौखिक व नंतर स्थानिक भाषांमध्ये लिहिलेले लोकसाहित्य आहे. ज्या प्रदेशातील लोकांना राम जसा भावला तसा तो लेखनातून प्रकटला आहे. म्हणून राम - सीता - लक्ष्मण यांची विविध रुपे लोकसाहित्यातून समोर येतात. संपूर्ण भारतात रामाच्या संदर्भातील काही कथा आणि स्थाने यांची पुनरुक्ती होताना दिसते. विशिष्ट स्थाने, मंदिरे यांच्याविषयी सारख्याच आशयाच्या कथा चर्चेत असतात. जळगाव जिल्ह्यातील रामाच्या पाऊलखुणांविषयी सुद्धा हाच लोकोपवाद असू शकतो. तरीही रामाचा आणि जळगाव जिल्ह्याची संबंध माहित करून घेणे हे प्रचंड आनंद देणारे ठरते.


महर्षी वाल्मिकी यांनी प्रभु श्रीराम यांच्या अस्तित्व आणि कार्याविषयी रचलेले 'रामायण' हे हिंदुस्तानातील प्रत्येक प्रदेशाशी काही ना काही संबंध ठेवून आहे. विविध स्थानांशी संबंध असल्याचे दर्शविणारे ३०० प्रकारचे 'रामायण' सध्या अस्तित्वात आहे. श्रीराम कथा ही सर्वांत प्राचीन मौखिक परंपरा असलेली आणि अनेक भाषा - प्रदेशात कथेला स्थानिक संदर्भ जोडणारी एकमेव महाकथा आहे. जळगाव जिल्ह्यातही श्रीरामाच्या आगमनाचे संदर्भ असलेली काही स्थळे आहेत. श्रीरामाने युवावस्थेत महर्षी विश्वामित्र यांच्या आदेशानुसार केलेला दैत्यांचा बिमोड, नंतर सीता - लक्ष्मण सोबत स्वीकारलेला वनवासाचा मार्ग आणि लंकेहून पुष्पक विमानाने परत जाताना अशा तीन प्रसंगातून जळगाव जिल्ह्याचा रामाशी संबंध जोडलेला आहे. अयोध्या ते जळगाव जिल्हा हे अंतर आज किमान १,३०० किलोमीटर आहे. अयोध्येहून एवढ्या प्रचंड अंतरावर श्रीराम कसे पोहचले ? हा अतार्किक विचार करीत असताना प्राचीन काळातील प्रदेशांची ओळख आणि त्यांना जोडणारे मार्ग समजून घेतले तर श्रीरामाचे जळगाव जिल्ह्यातील आगमन आणि काही काळासाठी वास्तव्य हा तर्क मान्य करता येतो. राम - सीता - लक्ष्मण यांनी १४ वर्षे वनवासात काढली. त्यातील १० वर्षे तिघे दंडकारण्यात होते. इतिहासकार डाॅ. राम अवतार यांनी राम - सीता - लक्ष्मण यांच्या निवासाची २०० ठिकाणे समोर आणली आहेत (*०१). त्यांनी दंडकारण्य विस्तार ३५, ६०० चौरस मैल असल्याचा दावा करीत हे वन छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात होते असे म्हटले आहे. 

रामायण कधी घडले असावे ? या प्रश्नाचे उत्तर त्रेतायुगाचा उत्तरार्ध असे दिले जाते. म्हणजे, तो काळ ८ लाख ६९ हजार वर्षे एवढा अती - अती - अती प्राचीन येतो. रामेश्वरमपासून श्रीलंकेच्या दरम्यान अवकाशातून समुद्रात दिसणाऱ्या कथित सेतूशी संबंधित दगडांचा काळ अत्याधुनिक कार्बन डेटींग पद्धतीने तपासला तर तो १७ लाख ५० हजार वर्षे एवढा जुना येतो. श्रीराम जन्माच्यावेळी अवकाशात असलेल्या ग्रह - नक्षत्र स्थितीचा अंदाज घेऊन संगणकातील आकडेमोडच्या साह्याने काल निश्चितीचा प्रयत्न केला तर रामायणाचा काळ ख्रिस्तपूर्व १२ हजार वर्षांचा येतो. एवढ्या अती - अती प्राचीन काळात प्रदेशांची ओळख कशी होती ? याचे फारसे तपशील समोर येत नाहीत. भारतातील मानवी वसाहतींचा आणि त्यांच्या प्रादेशिक ओळख असण्याचा काळ हा मोहंजोदाडो - हडप्पा या संस्कृतीपासून म्हणजे इसवी सन पूर्व ६ ते ८ हजार वर्षांचा मानला जातो. सिंधू संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व ३५०० वर्षांचा, त्यानंतरच्या वैदिक संस्कृतीचा काळ इसवी सन १००० ते ६०० वर्षांचा मानला आहे. या काळात प्रदेशांची रचना ही महाजनपदे म्हणून होती. तेव्हा १६ महाजनपदे होती. त्यावेळच्या कोसल प्रदेशात अयोध्या हे प्राचीन नगर होते. ते राजधानीचे (अवध) ठिकाण होते. आजचा खान्देश हा प्रदेश असिक (अस्सक) किंवा ऋषीक प्रदेशात समाविष्ट होता असा निष्कर्ष इतिहासाच्या काही अभ्यासकांनी यापूर्वी मांडलेला आहे (*०२). या दोन्ही प्रदेशात तेव्हापासून हजारावर मैलांचे अंतर होते.

भारतात सैन्य, व्यापार - रोजगार व  यात्रा यासाठीचे मार्ग तयार झाल्याचे संदर्भ वैदिक संस्कृतीपासून उपलब्ध आहेत. योद्धे, कारागिर, व्यापारी, कलावंत अशी कामे करणारे समुह एका जनपदाकडून दुसऱ्या जनपदाकडे स्थलांतरित होत असत. चंम्पा, सुवर्णगिरी, पाटलीपुत्र येथून लंकेकडे व्यापार होत असे. काशी, भडोच, सिंहल प्रदेशात होड्या - जहाजातून व्यापार होत असे. जमीनीवरील मार्ग राजगृह, श्रावस्तीपासून प्रतिष्ठान (आजचे पैठण) आणि दक्षिणापथकडे होता. दुसरामार्ग राजगृह, श्रीवस्ती, वाराणसी आणि तक्षशिलाला जोडत होता. त्याला उत्तरापथ म्हणत. दक्षिणापथाकडील व्यापार हा इसवी सन ७८ मध्ये म्हणजे सातवाहन काळात विस्तारला. दक्षिणापथ प्रदेश विंध्य पर्वत, नर्मदा नदी खोरे पासून तर थेट कन्याकुमारी म्हणजे रामेश्वरमपर्यंत ३५,६०० चोरस मैल विस्तारलेला होता (*०३). या दक्षिणापथात मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगाना, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा समावेश होता. प्राचीन काळात अयोध्येच्या जवळ कोणते जंगल - वन - अरण्य होते याचा शोध घेतला तर लक्षात येते की, दक्षिणापथाशी संबंधित प्रदेशात दंडकारण्याचा समावेश होता. हे अरण्य विंध्य पर्वतापासून कृष्णा नदीच्या खोऱ्यापर्यंत होते. असिक वा ऋषीक प्रदेशात आणि सध्याच्या नाशिक भागातही दंडकारण्य विस्तारले होते. अयोध्या संदर्भातील ही माहिती पुढील संदर्भ समजून घेण्यास उपयोगी पडते.

सर्वांत अगोदर रामायणाचे लेखन करणारे महर्षी वाल्मिकी यांचा जळगाव जिल्ह्याशी संबंध येतो. चाळीसगाव परिसरात असलेल्या सातमाळाच्या डोंगरात वाल्या कोळी वाटमारी करीत (*०४). वाटमारीचे कृत्य केल्यानंतर वाल्या हे रांजणात एक खडा टाकत. एकदा देवर्षी नारद या डोंगरातून जात असताना त्यांना वाल्या यांनी अडविले. 'वाटमारीचे कृत्य करून तू पाप करतोस पण या पापात तुझे कुटुंब सहभागी आहे का ?' हा प्रश्न नारद यांनी वाल्यास केला. वाल्या यांनी नारद यांना वृक्षाला बांधले आणि कुटुंबाकडे जाऊन, 'माझ्या पापात सहभागी आहात का?' असे विचारले. तेव्हा कुटुंबातील सर्वांनी 'नाही' म्हटले. वास्तव लक्षात आल्यानंतर वाल्या यांनी वाटमारी बंद केली. नारद यांनी त्यांना उपदेश करून जप करण्यासाठी मंत्र दिली. वाल्या यांनी दीर्घ काळ जप - तप केले. त्यामुळे त्यांचे रुपांतर महर्षी वाल्मिकीत झाले. वालझिरी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे वाल्मिकींचे समाधी मंदिर आहे. या स्थानापासून जवळच्या डोंगरात रांजणगाव आहे. वाल्या यांनी वाटमारीच्या कृत्यानंतर टाकलेल्या खड्यांनी ७ रांजण भरले होते. ते रांजण जेथे होते ते आजचे 'रांजणगाव' मानले जाते.

अयोध्येचा राजा दशरथ याचा जळगाव जिल्ह्याशी पहिला संदर्भ येतो. राजा दशरथ अविवाहित असतानाच्या कथेचा हा संदर्भ आहे. राम - सीता - लक्ष्मण हे वनवासाला रवाना झाल्यानंतर पुत्रवियोगात दुःखी झालेल्या राजा दशरथने ही कथा पत्नी कैकयीला सांगितली आहे. अयोध्येपासून खान्देशपर्यंत दंडकारण्याचा प्रदेश होता. राजे शिकारीसाठी जंगलात - वनात दूरवर जात. राजा दशरथ शब्दवेध घेऊन शिकार करण्यात तरबेज होता. शिकारीच्या निमित्ताने राजा दशरथ एकदा दंडकारण्यात आला. तेव्हा त्याला कुठेही शिकार आढळत नव्हती. शिकारीचा शोध घेत तो खूप दूरवर म्हणजे जळगाव जिल्ह्यात पोहचला (*०५). कोणताही जंगली प्राणी वा श्वापदाचा सुगावा राजा दशरथला लागत नव्हता. तेव्हा एका कमलपुष्पाच्या तळ्याकाठी राजा दशरथ धनुष्याला बाण लावून शिकारीसाठी तयार होता. राजा दशरथच्या आयुष्यात पुढील प्रसंग हा विधी लिखित आणि पुत्र प्रेमात विघ्न आणणारा होता. 

हिमाचल प्रदेशातील ऊना प्रदेशातील श्रावण (बाळ किंवा कुमार) हा युवक अंध पिता शांतनू आणि अंध माता ज्ञानवंती यांना खांद्यावरील कावडमध्ये बसवून तीर्थयात्रा घडवून आणत होता. त्याने माता - पित्यास प्रयागराज, काशीकडील देवांचे दर्शन घडविले. त्याला दंडकारण्य ओलांडून इतर तिर्थ स्थळांकडे जायचे होते. तो जळगाव जिल्ह्याच्या प्रदेशातून जात असताना त्याच्या माता - पित्यास तहान लागली. श्रावणने कावड खाली ठेवली आणि तो भांडे घेऊन पाण्यासाठी तलाव - झरा शोधू लागला. त्याला कमलपुष्प असलेला तलाव दिसला. श्रावणने तलावाजवळील गवतातून भांडे पाण्यात बुडविले. तेव्हा चालण्याचा आणि पाण्याचा आवाज झाला. बाणाने शब्दवेध करणारा राजा दशरथ तलावाजवळ शिकारीसाठी तयार होता. त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला. तो वर्मी लागून श्रावण घायाळ झाला. शिकार पाहण्यासाठी राजा दशरथ तेथे आला. घायाळ श्रावणला पाहून तो दुुःखी झाला. त्याने श्रावणला माता - पित्याजवळ आणून अनावधानाने झालेला प्रकार सांगितला. श्रावणने सुद्धा माता - पित्यांचे आशीर्वाद घेऊन तेथेच प्राण सोडला. यानंतर दुःखी पालकांनी राजा दशरथाला शाप दिला, 'वृद्धावस्थेत तू आम्हास प्रिय पुत्र वियोगाचे दुःख दिले आहेस. तुलाही वृद्धावस्थेत लाडक्या पुत्राचा विरह सहन करावा लागेल.' नंतर त्या दोघांनीही तेथेच प्राण त्यागले. ज्या तळ्याकाठी श्रावणबाळाची हत्या झाली त्याला 'हत्यास्थळ' म्हटले गेले. पुढील काळात त्याचा अपभ्रंश हरताळे (ता मुक्ताईनगर, जि. जळगाव) असा झाला. याच ठिकाणाहून जवळ वरणगाव आहे. त्या वरणगावचे नाव पूर्वी श्रावणगाव होते. अपभ्रंश होत ते नाव वरणगाव झाले, असे सांगतात. (उत्तर प्रदेशातही अशीच कथा आहे. त्या कथेनुसार श्रावण याची बाण लागून हत्या झाली ते ठिकाण उन्नावजवळ सरवन गाव आहे. त्याच्या माता - पित्याने जेथे प्राण त्यागले ते समाधा गाव आहे. राजा दशरथने जेथून बाण मारली ते सरवारा गाव आहे.)

राम - लक्ष्मण यांचा जळगाव जिल्ह्याशी दुसरा संदर्भ ऋषी विश्वामित्र यांच्यासोबतचा आहे. विश्वामित्र यांचा 'सिद्धाश्रम' (आताचे रामेश्वर (पळसोद), ता. व जि. जळगाव)  तापी - गिरणा - अंजनी नद्यांच्या संगमावर होता. तेथे यज्ञ - पूजापाठ - मंत्र तंत्र याचे शिक्षण दिले जात असे. त्यामुळे त्या भागात ऋषी, मुनी यांची मोठी संख्या होती. विश्वामित्र सिद्धाश्रमात गायत्री महायज्ञ करीत होते. तेव्हा त्या भागातील दैत्य मारीच व सुबाहू यांनी आश्रमातील ऋषी, मुनींना त्रास देणे सुरु केले. त्यांच्या त्रासामुळे यज्ञ कार्यात विघ्न निर्माण होत होते. या दैत्यांचा बिमोड करण्यासाठी मदत मागायला विश्वामित्र अयोद्धेत गेले. राजा दशरथला विश्वामित्र यांनी विनंती केली, 'राम - लक्ष्मण यांना दैत्यांचा बिमोड करण्यासाठी सोबत पाठवा.' राम - लक्ष्मणसह इतर दोघा भावंडांचे शस्त्र - अस्त्र व इतर विद्यांचे अध्ययन राजगुरू ऋषी वशिष्ठ यांच्या मनाली (हिमाचल प्रदेश) येथील आश्रमात झाले होते. तो आश्रम अयोध्यापासून जवळपास १,२०० किलोमीटरवर होता. विश्वामित्र यांनी राजा दशरथची भेट घेऊन दोघा पुत्रांना दैत्यांच्या बिमोड करण्यासाठी पाठविण्याची विनंती केली. राजा दशरथ ती टाळू शकले नाही. विश्वामित्रांच्या सोबत राम - लक्ष्मण सिद्धाश्रमाकडे आले. रामाने दोघा दैत्यांवर बाण सोडले. सुबाहू मारला गेला. मारीच जखमी होऊन समुद्रात जाऊ पडला. (नंतर हाच मरीच सोनेरी मृगाचे मायावी रुप घेऊन सीतेच्या समोर आला. सीतेने त्याला पकडून आणण्याचे रामाला सांगितले. राम त्याच्या मागे गेला. तो मायावी दैत्य असल्याचे पाहून रामाने त्याचा वध केला. ती जागा मोर्विस (ता. कोपरगाव, जि. नगर) येथे आहे. त्या स्थळाचा अपभ्रंश मारीच ... मारीस ... मोर्विस झाला.)  लक्ष्मणाने इतर दैत्यांचा वध केला (*०६). विश्वामित्र यांच्यासोबत आल्यामुळे दंडकारण्याचा हा प्रदेश राम -लक्ष्मण यांना परिचित झाला. (बिहारमध्येही अशीच कथा आहे. त्या कथेनुसार विश्वामित्र यांचा आश्रम बक्सर येथे गंगा आणि शरयू नद्याच्या संगमावर होता. अयोध्यापासून बक्सर २७० किलोमीटरवर आहे. तो भाग सुद्धा दंडकारण्यात होता. या ठिकाणी रामाने ताडका या महिला दैत्याचा वध केला. तसेच अहियारी येथे जाऊन ऋषि गौतम यांची शापित पत्नी अहिल्याचा उद्धार केला.)


राम - सीता - लक्ष्मण यांचा जळगाव जिल्ह्याशी तिसरा संदर्भ येतो तो वनवासाला निघाल्यानंतर. अयोध्येतून वनाकडे जायचे म्हणजे शरयू नदी ओलांडून दंडकारण्याकडे प्रस्थान करणे आवश्यक होते. त्यानुसार तिघेही निघाले. दंडकारण्याचा विस्तार उत्तर प्रदेश पासून गुजरात, मध्यप्रदेश महाराष्ट्र असा होता. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सिमेवर वनवासी (मूळनिवासी किंवा आदिवासी) वस्तीचा प्रदेश (आजचा डांग जिल्हा, गुजरात) होता. या प्रदेशात सातपुडा पर्वताच्या सात रांगा आहेत. खान्देशातील आजचे धुळे, नंदुरबार आणि नाशिक हे जिल्हे हा गुजरातला लागून आहेत. तेव्हा हा सर्व प्रदेश असिक म्हणून ओळखला जात असे. या डांग प्रदेशातील एका वनवासी समुह पथकाचा प्रमुख शबर याची कन्या शबरी होती. डांग परिसरातील ऋषी मांतग यांच्याकडे शबरीचे अध्ययन झाले. ऋषींनी तिला रामाची गोष्ट सांगितली. रामाची आणि तुझी येथेच भेट होईल असा आशार्वाद दिला. रामाची प्रतिक्षा करीत शबरी वनातच थांबली. पुढील काही वर्षे ती त्याच भेटीच्या प्रतिक्षेत राहिली. राम - सीता - लक्ष्मण वनवासात जाताना वसंतपंचमीच्या दिवशी शबरीच्या निवासाकडे आले तेव्हा ती आनंदून गेली. रामाला खाण्यासाठी वनातील गोड बोरे द्यावीत असे तिला वाटले. बोरे गोड आहेत, हे पाहण्यासाठी तिने ती उष्टावली. राम जेव्हा शबरीला भेटले तेव्हा तीने उष्टी बोरे त्यांना दिली. रामाने ती आनंदाने खाल्ली (*०७). शबरीने बोरे उष्टावली याविषयी एक संदर्भ असा आहे की, राम कधीतरी भेटतील या आशेेने शबरीने डांग परिसरात गोड बोरे वाढविली होती. ती बोरे तिने रामाला दिली. या भेटी दरम्यान शबरीनेच रामाला पुढील प्रवासातील वनवासी वानर जमातीतीतल हनुमान, वाली, सुग्रीव यांची माहिती दिली. शबरी हीचा थेट संबंध जळगाव जिल्ह्याशी येत नाही. मात्र ती नंदुरबार जिल्ह्यातील आजच्या आदिवासी वस्तीतील होती असे काही जण म्हणतात. (शबरीची अशीच कथा डांग जिल्ह्यात आहे. याच जिल्ह्यात पंपासरोवर जवळ शबरीधाम आहे. तेथे शबरी कुंभ भरतो)

डांग परिसरातून राम - सीता - लक्ष्मण हे खान्देशकडे आले. या मार्गावर तोरणमाळ (ता. धडगाव, जि. नंदुरबार) हा डोगरांचा परिसर लागतो. या परिसरात त्यांचा निवास होता. त्याचेही काही मौखिक संदर्भ आहेत. तोरणमाळ येथे आजही सीता खाई म्हणेज सीतेची दरी आणि सीता गुंफा दाखविली जाते. या विषयी दंतकथी अशी की, राम - सीता रथातून जात असताना रथाचे चाक येथे अडकले. त्यामुळे गुंफा तयार झाली. तेथील काही खुणा या चाक आणि घोड्याच्या खुरांच्या आहेत असे सांगितले जाते. (राम - सीता - लक्ष्मण हे वनवासात पायी आले होते). एक दंतकथा अशीही आहे की, सीतेला तहान लागली आणि रामाने जमीनीत बाण सोडला. त्यातून जल बाहेर येऊन झरा निर्माण झाला. त्याचे पुढे सीताकुंड झाले (*०८).

राम- सीता - लक्ष्मण यांचा जळगाव जिल्ह्याशी चौथा संदर्भ येतो तो उनपदेव (ता. चोपडा) या स्थानाशी. शबरीची भेट झाल्यानंतर राम- सीता - लक्ष्मण वनातील पुढील प्रवासाला लागले. ते चोपडा परिसरातील वनात आले. तेव्हा तेथे ऋषी शरभंग यांचा आश्रम असल्याचे समजले (*०९). शरभंग हे वृद्धावस्थेत होते. त्यांना रक्त व त्वचेशी संबंधित आजार (बहुधा कुष्ठरोग) झालेला होता. तेव्हा परिसरात अशी दंतकथा होती की, शरभंग यांच्या तपाचा एवढा प्रभाव होता की, स्वर्गाचा राजा इंद्र स्वतःचा रथ घेऊन ऋषींना घ्यायला आला होता. मात्र ऋषींनी त्यांना परत पाठवत म्हटले होते, 'मी रामाची भेट घेतल्यानंतर स्वर्गात येईल.' रामाला ही कथा समजली. ते शरभंग यांच्या भेटीसाठी गेले. त्यांनी ऋषींची भेट घेतली. तेव्हा ऋषींच्या त्वचेची झालेली अवस्था पाहून रामाने दोन बाण जमिनीत सोडले. त्या दोन्ही बाणातून उष्ण जल बाहेर येऊन झरे निर्माण झाले. त्यातील एक झाला उनपदेव (ता. चोपडा) आणि दुसरा झाला सुनपदेव. उनपदेवच्या झऱ्यात शरभंग यांनी स्नान केले. त्यामुळे त्यांचा रोग बरा झाला. नंतर शरभंग यांनी अग्नीप्रवेश केला. उनपदेव येथे आजही शरभंग ऋषींच्या ध्यानाची जागा दाखवली जाते. या कथेचा दुसरा मौखिक संदर्भ आहे. तो असा - लंकेहून सीतेला घेऊन राम - लक्ष्मण हे पुष्पक विमानाने अयोध्यकडे जात होते. तेव्हा चोपड्याजवळ खाली राम नामाचा जप ऐकू आला. रामाने पुष्पक विमान खाली घेतले (*१०). तेव्हा तेथे शरभंग ऋषींच्या आश्रमात रामकथा सुरु होती. शरभंग ऋषींच्या त्वचेचा त्रास पाहून रामाने झऱ्यांची निर्मिती केली. (शरभंग ऋषींच्या अशाच दोन - तीन इतर कथा आहे. त्यांच्या आश्रमाचे दुसरे स्थान यवतमाळ जिल्ह्यात अनकेश्वर सांगितले जाते. तिसरे स्थान मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात सांगितले जाते. चौथे स्थान मध्यप्रदेशातील चित्रकुटजवळ मझगवा येथे सांगितले जाते. ) 

राम - सीता - लक्ष्मण यांचा जळगाव जिल्ह्याशी पाचवा संदर्भ येतो तो पाटणे (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या परिसराशी. शरभंग यांच्या भेटीनंतर राम - सीता - लक्ष्मण वनात पुढे निघाले. ते पाटणेकडे आले. हा परिसर वृक्षराजींनी नयनरम्य होता. त्यामुळे तिघे या प्रदेशात थांबले. तेथून ऋषीपंथा (बहाळजवळ, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हे स्थळ होते. तेथे अनेक ऋषींचा निवास होता. तेथील ऋषींनी महायज्ञ आयोजित केला होता. या यज्ञात यजमान म्हणून राम - सीता यांना निमंत्रित केले. यज्ञ पूर्ण केल्यानंतर तिघांनी काही काळ तेथे वास्तव्यास केले. ऋषीपंथा येथे असताना सातमाळा डोंगर परिसरातील वनात तिघे फिरत. याच डोंगरात सीतेच्या स्नानाची एक गुहा होती. तिला 'सीता न्हाणी' म्हणत. पुढील काळात पाटणे परिसरातील डोंगरात पितळखोरे, नागार्जून, शृंगारचावडी या लेण्यांची निर्मिती झाली. याच लेण्यांमध्ये 'सीता न्हाणी' (*११) नावाचीही एक लेणी आहे. या लेणीत आंघोळीचा हौद कोरलेला आहे. बहुधा हा हौद विश्वातला पहिला तरण तलाव वा बाथटब मानला जातो. बाहेरील पावसाचे पाणी आतील हौदात आणि हौदात जादाचे पाणी बाहेर काढण्यासाठी कारागिरांनी कोरीव काम केलेले आहे. (याच कथेशी संबंधित सीता न्हाणी इतर ठिकाणी सुद्धा आहेत. अकोला जिल्ह्यातील जंगलात, वेरूळ येथील लेणीजवळ, लोणार सरोवर परिसर आणि चिखली (ता. बुलढाणा) जिल्ह्यात सीता न्हाणी आहेत.)

ऋषीपंथा परिसरात वास्तव्याला असताना रामाला राजा दशरथ यांच्या मृत्यूचे वृत्त समजले. तेथील ऋषींनी राजा दशरथकडून न कळतपणे झालेल्या श्रावणाच्या हत्येची माहिती दिली. तेव्हा रामाने पिता राजा दशरथसाठी पींडदान करण्याचा निर्णय घेतला. हा विधी नद्यांच्या संगम ठिकाणी करणे आवश्यक होते. म्हणून तिघे पुन्हा विश्वामित्रांच्या सिद्धाश्रमाकडे गेले. तेथे संगमावर विश्वामित्रांच्या उपस्थितीत विधी करीत पींडदान करण्यात आले. राम व लक्ष्मणाने तेथे वाळूपासून दोन शिवलिंग तयार केले (*१२). नंतर ऋषींनी दोन कायम स्वरूपी लिंगांची स्थापना केली. हे स्थान पुढे 'रामेश्वर' झाले. (रामेश्वरम नावाशी संबंधित दुसरी कथा आहे. तामिळनाडूतील रामानथपुरम जिल्ह्यात राममेश्वरम हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे. रामाच्या सोबत असलेल्या वानरसेनेने याच ठिकाणाहून लंकेकडे जाण्यासाठी सेतू उभारला होता.)

राम - सीता - लक्ष्णम हे रामेश्वर परिसरात असताना त्यांचा जळगाव जिल्ह्याशी सहावा संबंध सिंगत (ता. रावेर) येथे आश्रम असलेल्या ऋषि अगस्त्य यांच्याशी आला. अगस्त्य यांनी भोकरी नदीकाठावर ओंकारेश्वर महादेवाची स्थापना केली होती. या मंदिराच्या स्थापनेविषयी अख्यायिका आहे. ती अशी - भगवान सूर्यनारायण नर्मदा परिक्रमा करीत श्री क्षेत्र ओंकारेश्वर मांधाता (मध्यप्रदेश) येथे आले. तेथे मेरू तथा विंध्यांचल या पर्वतरूपी असुराने त्यांच्या मार्गात अडथळा आणला. सूर्यनारायणाचा प्रवास थांबल्यामुळे पृथ्वीवर काळोख पसरला. देवांमध्ये खळबळ उडाली. ही घटना समजल्यानंतर सिंगत आश्रमातून ऋषि हे ओंकारेश्वरकडे निघाले. तेव्हा त्यांना वनात भोकरी नदीकाठावर पांढऱ्या कपिला गायीच्या स्तनांमधून दुग्धाभिषेक होत असल्याचे दिसले. अगस्त्य तेथे गेले. तेव्हा त्यांना तेथे स्वयंभू शिवलिंग दिसले. त्यांनी तेथेच ओंकारेश्वर महादेव म्हणून त्याची स्थापना केली. त्यानंतर ते मध्यप्रदेशातील ओंकारेश्वरकडे गेले. तेथे मेरू तथा विंध्यांचल पर्वत ऋषि अगस्त्य यांना दंडवत करण्यासाठी वाकला. तेव्हा अगस्त्य यांनी त्याला आदेश दिला, 'मी परत येईपर्यंत असाच दंडवत घालून उभा रहा ...' या स्थितीत त्याचे सूर्यनारायणावरील लक्ष विचलित झाले. सूर्यनारायण पुढे निघून गेले. कालांतराने या भागात राम - सीता आले असता अगस्त्य यांच्या सूचनेनुसार त्यांनी ओंकारेश्वर महादेवावर महारूद्राभिषेक केल्याची मौखिक कथा सांगितली जाते (*१३). (अगस्त्य ऋषि यांचा नाशिक, भंडारदरा (जि. अकोला) सह इतरही राज्यात आश्रम असल्याच्या कथा आहेत.) नंतर येथे राम - सीता - लक्ष्मण - भरत - शत्रुघ्न व हनुमान यांचे मंदिर झाले. या मंदिराच्या मागे भस्म टेकडी आहे. हे भस्म ऋषींच्या यज्ञातील हवनाचे असल्याचे सांगतात. आजही तेथे खोदकामात भस्म निघते. येथे रामकुंड व सीता न्हाणी सुद्धा आहे.

पिता राजा दशरथ यांचे पींडदान केल्यानंतर राम, सिता व लक्ष्मण हे नाशिककडील वनाकडे रवाना झाले. त्यांचे पुढील वास्तव्य तेथील पाच वटवृक्षांच्या 'पंचवटी' त होते. रामायणातील मौखिक कथांचे अनेक संदर्भ हे वेगवेगळ्या राज्यातील स्थानांशी जोडलेले आहेत. कथेत आणि पात्रातील नावांमध्ये साम्य असले तरी स्थाने वेगवेगळी आहेत. 'आमच्याच स्थानाशी' संबंधित कथा सत्य असल्याचे दावे - प्रतिदावे तेथील देवस्थानचे संत, महंत करतात. असाच एक प्रयत्न नाशिक येथे दोन वर्षांपूर्वी एका विवादीत धर्म संसदेत झाला. ही धर्म संसद स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी आयोजित केली होती (*१४). रामभक्त हनुमानाचा जन्म हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अंजेनेरी डोंगरावर झाल्याचे नाशिक येथील काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास यांनी सांगितले. आंध्रप्रदेशातील किष्किंधा येथे अंजनाद्री पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला असा दावा महंत गोविंदानंद सरस्वती यांनी केला. कर्नाटकात गोकर्ण येथे हनुमानाचे जन्मस्थान आहे असे शिवमोग्गा मठाचे प्रमुख राघवेश्वर भारती यांनी सांगितले. वाद विकोपाला गेल्याने ती धर्मसंसद रद्द झाली. झारखंड (अंजनधाम, जि. गुमला), हरियाणा (कपिथल - कैथल) आणि गुजरात (अंजनी पर्वत) येथेही हनुमानाचा जन्म झाल्याचे दावे आहेत. असेच मौखिक दावे जळगाव जिल्ह्यातील रामायणकालीन स्थानांच्या बाबतीत इतरही ठिकाणी असू शकतात ...

जळगावसह धुळे, नंदुरबार हा प्रदेश जसा रामाचा तसा तो कृष्णाचाही आहे. खान्देश हे नाव मूलतः कान्हदेश या शब्दाचा अपभ्रंश आहे. याविषयी काही दंतकथा आाहेत. श्रीकृष्ण आणि जरासंध यांच्यात मथुरेच्याजवळ १४ युद्धे झाले. १३ युद्ध जरासंध हरला. १४ व्या युद्धाच्यावेळी जरासंध कालयवनला घेऊन आला. कालयवनचे पिता ऋषी शेशिरायण होते. त्यांनी महादेवाचे कठोर तप करून कालयवन हा पुत्र मागितला होता. त्याला महादेवाचा वर होता, सूर्य वा चंद्रवंशातील कोणताही योद्धा कोणत्याही शस्त्र वा अस्त्राने कालयवनचा वध करू शकणार नाही. जरासंधचा मित्र कालयवन होता. कृष्णाच्या विरोधातील युद्धात जरासंघने कालयवनची मदत घेतली. कालयवन सूदर्शन चक्राने मरणार नाही हे कृष्णाला माहित होते. म्हणून कृष्णाने युद्धातून काढता पाय घेतला. युद्ध सोडून गेला म्हणून कृष्णाचे एक नाव 'रणछोड' पडले. कृष्ण युद्धातून निघून एका गुहेत गेला. त्याचा माग काढत कालयवनही त्या गुहेत गेला. गुहेतील अंधारात कोसल देशाचा राजा मुचकुंद हा इंद्रदेवाच्या आशीर्वादानुसार निद्रा घेत होता. कृष्णाने स्वतःच्या गळ्यातील पंचा झोपलेल्या राजा मुचकुंदच्या अंगावर टाकला आणि अंधारात लपून बसला. कालयवन गुहेत आल्यावर त्याला झोपेल्या व्यक्तिच्या अंगावर पंचा दिसला. त्याने कृष्ण समजून राजा मुचकुंदला जागृत करण्याचा प्रयत्न केला. राजा मुचकुंदने डोळे उघडले आणि समोर कालयवला पाहिले. त्याच्या दृष्टीतील प्रचंड तेजाने कालयवन जळून भस्मसात झाला. दृष्टीचे तेज हे शस्त्र - अस्त्र नव्हते. राजा मुचकुंदला इंद्रदेवाने दृष्टी तेजाचे वरदान दिले होते. 

कृष्णाच्या युद्धातून निघून जाण्याचा संबंध खान्देशशी आहे. कृष्ण मथुरासोडून खांडव वनाकडे (रामायणात असलेले दंडकारण्य) आला. तो भाग म्हणजे सध्याचा नंदुरबार जिल्हा. कृष्णाने सारंग धनुष्याचा जेथे सराव केला त्या गावाचे नाव सारंगखेडा झाले. कृष्णाने नारायणी सेना येथेच तयार केली. कृष्णाच्या सोबत आलेले गवळी जेथे थांबले ते शहर अगोदर 'नंद दरबार' म्हटले गेले. नंतर झाले 'नंदुरबार'. नंदुरबार जिल्ह्यातील काही गावांची नावे कृष्णाच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावांवरून आहेत. जसे - नंदराजाच्या नावावरून नंदाने, धर्माच्या नावावरून धमाने. भीमाच्या नावावरून बामने, बलरामाच्या नावावरून बलसाने (*१५). कृष्ण या भागात राहिला म्हणून या प्रदेशाची ओळख झाली कान्हदेश ... पुढे अपभ्रंश होत गेला खान्देश ...

लेखनातील आशयासाठी वापरलेले पूरक संदर्भ (आशय जसाच्या तसा नाही) - 

*०१) झा प्रिती, आइए जाने, १४ वर्ष के वनवास में राम कहां कहां रहे ? जागरणडाॅट काॅम, २७ फेब्रुवारी २०१६
*०२) सोनवणे पी. एस., खानदेशच्या उपपत्तीचे ऐतिहासिक महत्त्व, गोल्डन रिसर्च थाॅट्स, व्हाल्युम ५, इश्यू ९, मार्च २०१६
*०३) भारती संतोष कुमार, जीके रिचर्स सेंटर, क्युराडाॅ काॅम
*०४) हटकर बापू, देवभूमी कान्हदेश ः रामायणातील खान्देश स्थळ व व्यक्ती, अकलूज वैभव, ३१ आॅगस्ट २०२३
*०५) पाटवदकर दीपाली, कथा श्रावणबाळाची, महाराष्ट्र टाइम्स, १६ जुलै २०२३ 
*०६) बोरसे हेमंत, जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र रामेश्वर, श्री रामेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र, फेसबुकपेज, १९ आॅगस्ट २०२३
*०७)  मिश्रा दीक्षा, जिस जगह पर भगवान रामने खाए थे शबरी के झुठे बेर ..., इंडिया टाइम्स डाॅट काॅम, २३ फेब्रुवारी २०२२
*०८) सिनकर हर्षदा, खान्देशातील एकमेव हिल स्टेशन तोरणमाळ, लेखणीतरंग ब्लाॅग, ३१ डिसेंबर २०१९
*०९) परदेशी निलेश, उनपदेव, विकासपीडिया (महान्यूज), २४ जुलै २०२०
*१०) हटकर बापू, महर्षी वाल्मिकी, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, फेसबुकपेज, २४ आॅक्टबर २०२८
*११) सामंत अमित, कन्हेरगड लेणी, ट्रेकशिट्झ डाॅट काॅम, ३० जुलै २०१५  
*१२) बोरसे हेमंत, कित्ता ....
*१३)वैद्य दिलीप, रामायणकालीन ओंकारेश्वर, आपला रावेर मीडिया, युट्यूब, २१ जानेवारी २०२४
*१४) देशमुख मोहन, महाबली हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला ?, महाराष्ट्र न्यूज,  २ जून २०२२
*१५) अहिराणी प्रांताचा इतिहास, मराठी साहित्य आणि संस्कृती, फेसबुकपेज, २६ सप्टेंबर २०१५


(सर्व वाचकांना विनंती - वरील लेख विविध संदर्भ वाचून - तपासून एकत्र करून लिहिला आहे. ज्यांचे संदर्भ घेतले त्यांची नावे दिली आहेत. त्यामुळे वरील एकत्रित लेख कृपया चोरूणे, लेखकाचे नाव वगळणे, स्वतःच्या नावावर ढापणे असे कृत्य करू नका. तसे केले तर पुढील जन्म शुर्पणखेचा मिळेल. नाक कापले जाईल ... दिलीप तिवारी ) 

2 comments:

  1. खूप माहितीपूर्ण , माहितीच उत्तम विवेचन

    ReplyDelete
  2. छान माहितीपूर्ण लेख सर

    ReplyDelete