भाजप नेता किरीट सोमय्या याचे 'चावट हावभाव' असलेली एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात चर्चेत आहे. सोमय्या स्वतःच कॅमेराकडे पाहून तसले हावभाव करतोय. तूर्त त्या क्लिपमध्ये महिला आहे का ? आणि असेल तर सोमय्याने तिला बळजोरी केली आहे का ? हे समोर यायचे आहे. पण विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे एक पेन ड्राईव्ह देऊन, सोमय्या यांच्या चावट लिलांच्या आठ तासांच्या क्लिप असून काही मराठी महिलांचा सोमय्याने लैंगिक छळ केला असा दावा, सभागृहात केला आहे. या चावटपणाच्या खेळात माध्यमे कशी बेसावध होतात व राजकारणी कसे खेळून घेतात, हे मला स्वानुभवातून सांगायचे आहे.
गेल्या ३० वर्षांत जळगाव जिल्ह्यातील राजकारणात अशा तीन चावट प्रकरणांच्या वार्तांकनाचे अनुभव पत्रकार म्हणून मला आहेत. पहिले प्रकरण होते, १९९३ मधील कथित जळगाव लैंगिक छळ प्रकरणाचे. दुसरे प्रकरण होते एप्रिल २०१७ मध्ये ए. टी. पाटील यांचे एका महिले सोबत लैंगिक क्रिया करतानाचे फोटो सोशल मीडियात प्रसारित होण्याचे. तिसरे प्रकरण होते ऑगस्ट २०२० मध्ये राजकिय नेते एकनाथ खडसे यांनी जामनेर येथील भाजप नेत्याची कथित लैंगिक संबंधांची सीडी हातात असल्याचे सुतोवाच करणारे.
पहिल्या व दुसर्या प्रकरणात हस्ते परहस्ते राजकिय नेते म्हणून खडसे यांचा सहभाग होता. रस्त्यावरची आंबटशौकीनांची 'कालाकौआ' ही व्हिडिओ कॅसेट खडसे यांनी 'जळगाव कॅसेट' म्हणून ६५ वर्षे वय असलेल्या स्व. मधुकरराव चौधरींकडे दिली होती. खरे तर खडसेंनी ती कॅसेट पोलिसांना द्यायला हवी होती. स्व. चौधरी यांनीही ती 'कालाकौआ' कॅसेट पाहिली. मात्र त्यांनी पुन्हा कधीही त्यावर भाष्य केले नाही. कारण, त्या कॅसेटमध्ये ना जळगावच्या मुली होत्या, ना मुले होती. पण खडसेंच्या राजकिय कारस्थानामुळे जळगावची प्रत्येक मुलगी, महिला बदनाम झाली. का झाली ? तर त्या कॅसेटमध्ये जळगावची प्रत्येक मुलगी असावी असा भ्रम वाढला. 'जळगाव कॅसेट' नावाने खोटेपणा केल्याबद्दल खडसेंनी आजवर जळगावकरांची माफी मागितली नाही.
जळगाव लैंगिक छळाचे वास्तव काय होते ? तर पोलिसांनी विशेष तपास पथकाच्या नेतृत्वात ९ गुन्हे दाखल केले. त्यापैकी ७ प्रकरणात तक्रारदार महिला न्यायालयात आल्या नाहीत. त्यामुळे पुरावेच समोर आले नाही. वास्तविक तक्रारदार महिला-मुलीने न्यायाधीशांसमोर सांगितले असते, 'या आरोपीने माझा लैंगिक छळ केला आहे', तरीही त्यांना शिक्षा झाली असती. कारण बलात्कार गुन्हे विरोधातील कायदा पीडितांच्या बाजूने असून तो तेवढाच कडक आहे. इतर दोन प्रकरणात विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली पण उच्च न्यायालयात प्रकरण टिकले नाही.
मुळात जळगावचे कथित लैंगिक छळ प्रकरण राजकिय नेते व पोलिसांनी संगनमत करून रंगविले होते. अशा प्रकारे जळगावची जागतिक बदनामी करण्याच्या कटात स्व. चौधरी, खडसे आणि अरूण गुजराथी सारखेच सहभागी होते. या तिघांनीही आजवर 'जळगाव कॅसेट' चे खोटेनाटे कधीही जाहीरपणे सांगितले नाही. ज्या मुली-महिलांना फिर्यादी केले होते, त्यांचा आरोपींशी लैंगिक संमतीचा मामला होता. जेथे लैंगिक संबध दोन्ही बाजूने मान्य आहेत तेथे कायदा आडवा येत नाही. म्हणूनच अशा व्यवहाराबाबत निकाह लावणारा काझी म्हणतो, 'मियां बिबी राजी तो क्या करे काझी ?'
खडसे गेल्या चार वर्षांपासून जामनेर येथील भाजप नेत्याची आक्षेपार्ह सीडी असल्याचा जाहीर बोलबाला करीत आहेत. 'तुम्ही माझ्या मागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेल' अशी बोलबच्चन गिरी खडसेंनी अनेकवेळा केली आहे. खरे तर एखाद्या पुरूषाने एखाद्या महिलेचा लैंगिक छळ मांडला असेल तर तिने तक्रार पोलिसात करायला हवी. जामनेर प्रकरणात आंबट शौकिन सीडी नसेल तर त्या पीडितेला खडसेंनी समोर आणायला हवे. जर कोणी समोर येत नसेल तर खडसेंनी 'सीडी आहे ... सीडी ...आहे ...' म्हणून विनाकारण भुई बडवून नये. अर्थात, अलिकडे खडसेंनी मान्य केले आहे, 'माझ्याकडे सीडी आलेली नाही.'
लोकसभेच्या जळगाव मतदार संघातून ए. टी. पाटील आणि रावेर मतदार संघातून स्व. हरिभाऊ जावळे हे तिसऱ्यांदा खासदार झाले असते. दोघांपैकी एकाला केंद्रात मंत्रीपद मिळाले असते. रावेर मतदार संघातून ऐनवेळी स्व. जावळे यांची उमेदवारी बदलली गेली. तेथे खडसेंच्या सूनबाई रिंगणात आल्या आणि खासदार झाल्या. जळगावमधून ए. टी. पाटील यांचाही बळी 'चावट' आरोपातच घेतला गेला. २०१९ च्या निवडणुकीच्या अगोदर २०१७ मध्ये पाटील यांच्या लैंगिक संबंधाचे काही फोटो सोशल मीडियात प्रसारित झाले. त्यानंतर पाटील यांची तिसऱ्यांदाची उमेदवारी कापली गेली. ज्येष्ठ खासदार होण्याच्या रांगेतून अगोदर जावळे व नंतर पाटील वगळले गेले. पाटील यांचे चावट फोटो बाहेर येण्याला खडसेंची मूक संमती होती असे अनेकजण सांगतात. सूनबाई दुसर्यांदा खासदार झाल्या पण त्या केंद्रीय मंत्रीपदासाठी रांगेत कधीही नव्हत्या. आणि नाहीत. आता तर तिसऱ्यांदा भाजपची उमेदवारीही मिळणे शक्य नाही.
आता माझा पत्रकारितेचा अनुभव सांगतो, जळगाव लैंगिक छळ प्रकरण, जामनेर सीडी चर्चा आणि पाटील फोटो प्रकरण या तीनही प्रकरणात कोणतीही मुलगी वा महिला तक्रारदार कधीही पुढे आली नाही. कारण या तीनही प्रकरणात लैंगिक छळाचे कथित आरोप माध्यमांमधील पत्रकारांनी उगाळले. कधी पोलीस अधिकाऱ्यांनी 'तशी तोंडी' माहिती देऊन वा कधी नेत्यांनी 'तोंडाची हवा' देऊन. स्पर्धक दैनिक वा माध्यमांपेक्षा आम्ही कशा खास बातम्या देतो या स्पर्धेने वास्तव शोधण्याचा पत्रकारांचा विवेकच हरवून टाकला आहे. अधिकारी म्हणतो म्हणून वा नेता सांगतो म्हणून चावट आरोप उगाळले गेले. पुरावे आहेत का ? हे कोणीही ठणकावून विचारले नाही. जळगाव लैंगिक छळ प्रकरणात हा विवेक मी व्यक्तिशः पाळला होता ... जळगाव लैंगिक छळ प्रकरणात ५०० महिला पीडित आहेत असा तोंडी अंदाज पोलिसांनी दिला होता. त्यावर जळगावच्या लोकमत, जनशक्ती, जळगाव टाईम्स वगैरे दैनिकांत बातम्या छापून आल्या होत्या. हा आकडा दैनिक सकाळमध्ये आम्ही छापला नाही. जळगाव लैंगिक छळ प्रकरणात 'वासना' नव्हतीच. म्हणून ते 'कांड' आहे असेही आम्ही छापले नाही ...
चावटपणाच्या मर्यादा पत्रकाराला समजत नसतील ...
पण संपादकाला तरी त्याच्या गांभीर्याची जाणीव हवीच ...
No comments:
Post a Comment