कोरोना विषाणू संसर्गामुळे फुफ्फुसे निकामी होऊन किंवा इतर पेशींना आॕक्सिजन युक्त रक्ताच्या अतिरिक्त पुरवठ्याचा ताण पडून हृदय बंद पडणे किंवा रक्त प्रवाहाचा वेग मंदावणे अशा मोजक्या कारणांनी अनेकांचे मृत्यू होत आहेत. कोरोना संसर्गजन्य रूग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची कडक बंधने आहेत. उपचाराच्या दरम्यान कुटुंबिय, आप्त, नातेवाईक दगावला तर त्याचे मुख दर्शनही होत नाही. कापड बंद मृतदेह हॉस्पिटलमधून शववाहिकेत टाकून थेट स्मशानभूमित नेले जात आहेत. एखाद-दुसरा नातेवाईक सोबत असलाच तर त्याला पीपीई किट घालून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाण्याची सक्ती आहे. शक्यतो ही जोखीम घ्यायला कोणीही तयार नाही. शववाहिका चालक स्मशानभूमीत मृतदेह नेऊन देत आहेत. तेथे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते पीपीई किट घालून धाडसाने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. अशाच प्रकारे सर्वत्र अंत्यसंस्कार होत आहेत.
मृताचे नाते पिता-माता, बहिण-भाऊ-काका-मामा असे जवळचे असेल तर इतर नातेवाईकांना अंत्यसंस्कार व नंतरचे विधी करण्यासंदर्भात अडचणी होत आहेत. अशा कर्मकांडावर काहींची श्रद्धा नाही पण ज्यांची श्रद्धा आहे त्यांची अडचण आहे. मृतांच्या वाढत्या संख्येने १३ दिवसांचा दुखवटा पाळण्याची परंपरा बाजूला सारली जाते आहे. सामाजिक सुधारणेसाठी ही इष्टापत्ती म्हणता येईल. तरीही बहुसंख्य समाजावर मृत्यू नंतरच्या कर्मकांडाचा पगडा कायम आहे. कोरोना संसर्गित मृतावर अंत्यसंस्काराचे प्रतिबंधित नियम आहेत. कर्मकांडावर श्रद्धा असलेल्या कुटुंबियांनाही फारसे काही करता येत नाही. मृताच्या आत्म्याच्या मुक्ती वा मोक्ष प्राप्तीसाठी काहीही केले नाही हा सल बहुतेकांच्या मनांत कायम असतो. मृताच्या इच्छा-अपेक्षा निदान कर्मकांडातून पूर्ण करून टाकाव्यात अशी पूर्वापार परंपरागत श्रद्धा असते. ते करायचे टाळले तर मृताचा आत्मा अतृप्त राहील अशी अनामिक भीती नातेवाईकांच्या मनात असते. पुढे काही अघटीत घडू शकेल अशा शंकेचा ताण सतत मनावर असतो.
मानवाचा मृत्यू होतो म्हणजे त्याचे शरीर, अवयव व पेशी नियमित कार्य करणे बंद करतात. श्वास घेणे थांबते. म्हणजे फुफ्फुसांचे कार्य बंद होते. रक्त प्रवाह थांबतो. हृदय कार्य करणे थांबवते. दिसणे बंद होते. डोळ्यांचे कार्य थांबते. ऐकू येणे बंद होते. कानांचे कार्य थांबते. खाणे-बोलणे थांबते. मुखाचे कार्य बंद होते. मृताला स्पर्श ज्ञान होत नाही. त्वचा अचेतन होते. अशा एकूणच अवस्थेला विज्ञान वा वैद्यकशास्त्र मृत्यू म्हणते. मृताच्या शरीरातून आत्मा जातो असे वैद्यकशास्त्राने मान्य केलेले नाही.
पृथ्वीवर विविध प्रकारच्या ७ समुह घटकांचे ८४ लाख प्रकारात अस्तित्व आहे. यात पशू, पक्षी, प्राणी, किटक, जीव, जंतू असे जमीन, आकाश व पाण्यातील घटक आहेत. या घटकांचे जीव व प्राणीशास्त्रात वर्गिकरण ७ प्रकारात केले आहे. ते असे - सृष्टी (किंग्डम), प्रभाग (डिव्हिजन), वर्ग (क्लास), गण (ऑर्डर), कूळ (फॅमिली), प्रजाती (जीनस) आणि जाती (स्पिसीज्). यातील सृष्टी म्हणजे प्राणी आणि वनस्पती मिळून तयार झालेले पर्यावरण. पृथ्वीवरील पर्यावरणात मानवासह सर्व जीव-जंतू आहेत.
धर्म आणि अध्यात्मिक तत्वज्ञानानुसार मानले आहे की, आत्मा हा सृष्टीतील प्रत्येक जीव-जंतू रूपात जन्म घेतो. अशा जीव-जंतूची संख्या ८४ लाख प्रकारात (यालाच योनी म्हणतात) आहे. त्या योनीतला १ जन्म मानवाचा आहे. मानवाचे शरीर धारण करून जन्मलेला आत्मा मृत्यूनंतर पुन्हा ८४ लाख प्रकारात फिरून परत मानव देहात येतो. पती-पत्नीचे दाम्पती जीवन ७ जन्मांचे मानले जाते. जर ७ वेळा मानवाचा जन्म हवा असेल तर प्रत्येक मानवी मृत्यूच्यावेळी देह सोडून जाणाऱ्या आत्म्याच्या मुक्तीचे तत्वज्ञान धर्म व अध्यात्मातशास्त्रात मांडले आहे. इतर योनीतील जन्म-मृत्यू पूर्ण करून नंतरच मानव जन्म मिळतो या पारंपरिक मान्यता वा समजातून मानवी आत्म्याची संकल्पना समाज पूर्वापार रूजलेली आहे. मानवाचा पुढील जन्म पुन्हा मानव समुह घटकात व्हावा असे वाटत असेल तर देह सोडून बाहेर पडलेल्या आत्म्याच्या मुक्ती वा मोक्षासाठी कर्मकांड रचले गेले आहे. मृतदेहात आत्म्याचा जीव वा आत्मा अडकू नये म्हणून अचेतन देह दहन करणे आणि अस्थी विसर्जन हा या कर्मकांडाचा मुख्य विधी आहे.
मानवी शरीराच्या सर्व क्रिया वा चलवनवलाच्या मागील चेतना ही शरीरातील जीव वा आत्मा आहे. धार्मिक-अध्यात्मिक तत्वज्ञान हेच सांगते. हिंदू वैदिकसह मुस्लिम, ख्रिश्चन पारशी, ज्यू आदी धर्मात आत्मा अमर असल्याचे मानले जाते. या मागील एक कारण हे सुद्धा आहे की, मानवी शरीर हे नष्ट होणारे आहे. पण त्याचे चलनवलन घडवून आणणारी चेतना ही आत्मा वा जीव आहे. अशा आत्म्याच्या मुक्तीचा वा मोक्ष प्राप्तीचा विचार माणसाला कर्मकांडाकडे घेऊन जातो. हा विचार अलिकडचा नाही. तो माणासाच्या उत्पत्तीपासून आहे. मुक्ती वा मोक्ष या सोबतच काही धर्मांच्या तत्वज्ञानात आत्म्याच्या पुनर्जन्मावरही विश्वास आहे. जेथे पुनर्जन्म आहे तेथे आत्मा वा जीव मुक्तीसाठी कर्मकांड आहे. हा विचार कोणीही लादलेला नाही. तो पिढीजात चालतो आहे.
कोरोना संसर्गामुळे मृत होणाऱ्यांच्या आत्मा मुक्तीसाठीचे सर्व विधी व कर्मकांड बंद आहेत. तीर्थस्थळावरील नदीत अस्थी विसर्जनाला बंदी आहे. या शिवाय मृताच्या अस्थी मिळणेही दुरापास्त झाले आहे. मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी अस्थी वा राख गोळा करणे, दहावे, बारावे, तेरावे करणे हे सुद्धा बंद झाले आहे. अशा स्थितीत काही जणांनी 'चला बोलू या ...' हेल्पलाईनवर विचारले की, जर अस्थी विसर्जन नाही केले तर मृताच्या आत्म्याला मुक्ती वा मोक्ष मिळणार नाही का ? आमच्या आयुष्यात काही आपत्ती वा संकटे तर येणार नाही ना ? हे प्रश्न परंपरांचा प्रभाव दर्शवतात. त्यामुळे असे प्रश्न करणाऱ्या नातेवाईकांना विज्ञानवादी उत्तर देऊन भागत नाही. त्यांच्यासाठी त्र्यंबकेश्वर व काशी येथे कर्मकांड विधी करणाऱ्या दोघा पंडीतांना विचारणा केली. अस्थी मिळालेल्या नाहीत अशा मृतांसाठी पुढील विधी कसे करावेत ? याचे शंका निरसन केले. त्यावर दोघांनी खालील पर्याय सांगितला.
ज्या मृताच्या अस्थी नाहीत अशा व्यक्तीचे विधी पुढील प्रमाणे करावेत. गावाजवळ नदी, ओढा, तलाव, नाला याच्या काठावर कुटुंबाने तिसऱ्या दिवशी जमावे. पुरोहिताच्या सल्ल्याने मृताचा कणकेचा पुतळा तयार करावा. या पुतळ्याला विधीवत चितेवर अग्नीडाग द्यावा. चिता थंडावली की, तेथील एखादा लहान दगड हा मृताचा आत्मा वा जीव समजून लहान मडक्यात टाकून त्याला जीव वा आत्मा संबोधावे. रक्तातील नातेवाईकांनी सुतक पाळावे. अग्नी डाग देणाऱ्या व्यक्तिने पुढील ९ दिवस त्या मडक्यातील जीव-आत्म्याला सकाळ संध्याकाळी अंगठ्याने पाणी द्यावे. दहाव्या दिवशी पाणी असलेल्या स्थळी आत्म्याचे विसर्जन करावे. त्यानंतर अकरावे, तेराव्याचे नियमित विधी करावेत. अस्थी विसर्जन हा आत्म्याचा मुक्ती वा मोक्षप्राप्तीचा अंतिम विधी मानला जातो. अस्थी विसर्जन गंगेत केले जावे असे संकेत होते. राजा भगीरथच्या तपश्चर्येनंतर गंगाही पृथ्वीवर अवतीर्ण होत असताना भगवान शंकराने तीला जटेत धारण केले. त्यामुळे ती कायम पवित्र झाली. अशा पवित्र जलात अस्थी विसर्जन म्हणजे मृताच्या आत्म्याची मुक्ती हा समज पूर्वापार आहे. गंगेला म्हणूनच मोक्ष दायिनी म्हणतात.
गंगेत वा नदीच्या वाहत्या पाण्यात अस्थी विसार्जनाच्या मागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. नद्यांतील पाण्यात पारा आढळतो. या पाऱ्यामुळे हाडांमध्ये आढळणारे कॅल्शियम आणि फॉस्फोरस पाण्यात विरघळून जाते. हे पाणी जलचरांसाठी पौष्टिक आहाराचे काम करते. हाडांमध्ये आढळणारे सल्फर पाऱ्यामध्ये मिसळून पाण्याला स्वच्छ ठेवण्याचे काम करते. मानवी देहातील चैतन्य म्हणजेच आत्मा असे विज्ञान मानत नाही. मानवाच्या शरीरात आत्मा आहे का ? असेल तर त्याचे अस्तित्व कसे आहे ? मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो ? अशाप्रश्नांची उत्तरे अद्याप विज्ञानाला देता आलेली नाही. याचे कारण पडताळणी शिवाय विज्ञान निष्कर्ष काढत नाही. आत्म्याबाबत अशी पडताळणी होऊ शकलेली नाही.
परंतु या संदर्भात चीनमधील डॉक्टर डंकन यांनी केलेला एक प्रयोग आत्म्याचे वजन २१ ग्रॕमच्या आसपास असल्याचे सिद्ध करतो. डंकन यांनी प्रयोग केला. मृतावस्थेत शेवटची घटका मोजणाऱ्या व्यक्तिचे त्यांनी वजन केले. त्याच व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर देहाचे पुन्हा वजन केले. नंरचे वजन २१ ग्रॕम कमी भरले. याचा अर्थ त्यांनी काढला की आत्म्याचे वजन मानवी शरीरित असते.
अस्थी विसर्जनाचे महत्त्व संत चोखामेळा यांच्या चरित्रातही आहे. जातीपाती- शिवाशीव यावर प्रहार करणारे अभंग चोखामेळा यांनी लिहिले. चोखामेळा कुटुंबासोबत चंद्रभागेच्या पलीकडे राहत असत. इसवी सन १३३८ मध्ये मंगळवेढ्यातील किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम सुरू असताना तेथील काम अचानक कोसळले. यात चोखामेळांसमवेत अनेक मजूर मृत्यूमुखी पडले. या घटनेचे अतोनात दुःख संत नामदेव यांना झाले. त्यांनी घटनास्थळी जाऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली अस्थी शोधणे सुरु केले. असे सांगितले जाते की ते तेथली प्रत्येक अस्थी उचलून नामदेव कानाला लावत. ज्या अस्थीतून विठ्ठलाचा जयघोष ऐकू येत असे ती संत चोखामेळा यांची अस्थी होती असे नामदेवांनी मानले. अशा प्रकारे चोखामेळा यांच्या सर्व अस्थी नामदेवांनी गोळा केल्या. पंढरपूरला विठोबाच्या महाद्वारात संत चोखामेळाची समाधी बांधली.
(या लेखाचा हेतू अंधश्रद्धेला वाढविणे हा नाहीच. जे श्रद्धाळू निकटवर्तीयांच्या कोरोना संसर्गामुळे निधन झाल्यानंतर सध्या चिंतेत आहेत, त्यांच्यासाठी हा लेख आहे.)
GOD IS GREAT
ReplyDeleteदिलीप तिवारी सर
ReplyDeleteअप्रतिम असे आपण लिखाण केले आहे आणि सध्या सुरू असलेल्या कोरोनामुळे अनेकांची कुटुंबातील प्रमुखासह सर्व कुटूंबच उध्वस्त झाले आहे.आणि आपण जो विषयावर वास्तवता मांडली आहे.आपले लेख मी नेहमी वाचतो सर
नरेश बागडे जळगाव 8788632712
तिरडी चे खांदेकरी यांच्या साठी पुढे काय विधी आहे ? त्यांच्या खांद्यानला तेल लाऊन "खांदे उतरवणे" वैगेरे ?
ReplyDelete