Tuesday 23 February 2021

बदअलमी कारभाऱ्यांचे संरक्षणकर्ते राज्य सरकार ...

महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या आघाडी राज्य सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या विचारधारांचे कारभारी आहेत. या कारभाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र व स्वराज्य उभारणीच्या कार्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. आघाडी राज्य सरकार टीकविण्याची सर्वाधिक जबाबदारी निभावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवचरित्राची नव्याने संपूर्ण मांडणी करायची आहे. राज्य सरकारमध्ये आपसूक दुय्यम भूमिकेत असलेल्या शिवसेनेला शिवचरित्रातील जुन्या-नव्या संदर्भात फारसा रस नाही. त्यांचा दृष्टिकोन पक्षाच्या विचारधारेशी संबंधित हिंदू, हिंदवी स्वराज्य या शब्दांचा गरजेनुसार खेळ करण्यात आहे. सरकारी दिनांक की तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी ? याविषयी शिवसेना आजही निर्णय घेऊ शकलेली नाही. शिवसेना कार्यकर्त्यांना आता दोन वेळा शिवजयंती साजरी करावी लागते. मुख्यमंत्री आपले असल्यामुळे सरकारी दिनांकला आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार तिथीला. राज्य सरकारमधील काँग्रेसला शिवचरित्रात पूर्वीपासून सर्व धर्म समभाव दिसतो. यवनांच्या पाच शाहींना आव्हान देत शिवाजी महाराजांनी विस्तारलेले स्वराज्य हे कोणत्याही धर्माचे नव्हते, हा विचारही इतिहासाचे नवे अभ्यासक नवा सिद्धांत म्हणून मांडतात. अशा प्रकारे परस्पर टोकांचे विचार असणाऱ्या तीन पक्षांचे कारभारी जनतेसमोर उठता-बसता शिवचरित्रातील सोयीची उदाहरणे मांडत असतात.

कंगणा राणावत-संजय राऊत

कोणाला शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम लढवय्ये दिसतात, कोणाला मावळ्यांमधील १८ पगड जाती-जमाती दिसतात, कोणाला शिवरायांचे खरे शत्रू कोण दिसतात, कोणाला अष्ट प्रधानातील ब्राह्मण जातीचे कारभारी दिसतात, कोणाला महाराजांचे विरोधक झालेले स्वकिय दिसतात. सोयीने संदर्भ घेऊन, त्याचा हवा तसा अर्थ लावून शिवचरित्राची मांडणी केली जाते. शिवाजी महाराजांचा जन्म आताच्या कोण्या पुढाऱ्याच्या मतदार संघात झाला, अशी ओळख करून देण्यापर्यंत भविष्यात मजल गेली तर आश्चर्य वाटणार नाही. अहिल्याबाई होळकर यांची अशी ओळख करुन दिली गेली आहे.

शिवचरित्रातील सोयीची उदाहरणे इतरांना सांगणारे राज्य सरकारमधील कारभारी स्त्रियांविषयक तेव्हा घडलेल्या अन्यायकारक घटना आणि त्यावर शिवाजी महाराजांनी दिलेले कठोर निर्णय यावर फारशी चर्चा करीत नाहीत. राज्य सरकारमधील कारभाऱ्यांवर स्त्रियांच्या संदर्भातील आक्षेपार्ह दोषारोप होत असताना त्याची तटस्थपणे चौकशी करण्याचे धारिष्ट्य सुद्धा तीनही पक्षांच्या कोणत्याही नेत्यात नाही. उलटपक्षी राजकारणातील किंवा अन्य क्षेत्रातील स्त्रियांविषयी बोलभांडपणा करणाऱ्यांना प्रवक्ते केले जात आहे.

शिवचरित्रात रांझे गाव पाटलाचे (गावात पाटीलकीचा अधिकार होता या अर्थाने) उदाहरण आहे. या गाव पाटलाने एका तरुणीसोबत अन्यायकारक कृत्य केले. त्यानंतर त्या तरुणीने आत्महत्या केली. ही घटना शिवाजी महाराजांपर्यंत पोहचली. राजमाता जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी घटनेची चौकशी करुन दोषी आढळलेल्या गाव पाटलाचा हात-पाय तोडून चौरंगकरण्याची शिक्षा फर्मावली होती. या संदर्भातील कागदपत्रात ‘बदअमल’ हा शब्द वापरला आहे. शिवाजी महाराजांनी या आशयाचे पत्र दि. २८ जानेवारी १६४६ ला दिलेले आहे. (संदर्भ १)

या पत्रातील बदअमल शब्दाचा अर्थ होतो वाईट कृत्य. बदलम (बदअलम) या शब्दाचा अर्थ रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला मध्ये शिंदळकी, छिनाली, जारकर्म, व्यभिचार, रांडबाजी, बदकर्म, बहिर्द्वार, बहिर्व्यसन, बाहेरख्याल असा दिला आहे. (संदर्भ २) म्हणजेच बदअलम या शब्दाचा अर्थ व्यवहारात ‘व्यभिचार’ असा होतो. व्यभिचाराचा दोष सिद्ध झालेल्या कारभाऱ्याचे हात-पाय तोडण्याची शिक्षा शिवाजी महाराजांनी तेव्हा दिलेली आहे. बलात्कारासारख्या अपराधासाठी शिवाजी महाराजांनी काय शिक्षा दिली असती ? याची कल्पना करता येत नाही. बदलमच्या इतर अर्थांमध्ये स्त्रियांशी अन्यायकारक पद्धतीने  केल्या जाणाऱ्या कृत्यांचा समावेश आहे.

रेणु शर्मा-धनंजय मुंडे
सध्याचे आघाडी राज्य सरकार स्त्रियांच्या बाबत कसे काम 
करीत आहे ? याची तीन ठळक उदाहरणे समोर आहेत. यात आघाडी राज्य सरकारमधील तीन पक्षांमध्ये समन्वयाची भूमिका पार पाडणारे मध्यस्थ पत्रकार-संपादक संजय राऊत (शिवसेना), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि वन विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड (शिवसेना) यांच्याशी संबंधित उदाहरणे आहेत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात संजय राऊत व अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात टोकाचे शाब्दीक युद्ध भडकले होते. स्त्री दाक्षिणात्य वगैरे बाजूला ठेऊन संजय राऊत यांनी कंगनाला उद्देशून हरामखोर (नॉटी गर्ल) शब्द वापरल्याची तक्रार समोर आली होती. (संदर्भ ३) या प्रकरणी सध्या न्यायालयातही लढाई सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणात संजय राऊत यांनी स्त्री विषयी वापरलेल्या भाषेविषयी आघाडी राज्य सरकारमधील कोण्याही कारभाऱ्याने शिवचरित्राला अनुसरुन भूमिका घेतली नाही. कंगनाने मुंबई विषयी वापरलेल्या भाषेचा सोयीने अर्थ लावत उलटपक्षी तिला महाराष्ट्र द्रोही ठरवून विषयांतर केले गेले. कंगनाला महाराष्ट्र द्रोही ठरविताना स्वराज्याच्या विरोधात लढलेल्या स्त्रियांविषयी शिवाजी महाराजांचा दृष्टीकोन काय होता ? याचा संदर्भ घेऊन कोणीही बोलले नाही.

शिवचरित्रात स्वराज्याच्या सैन्याविरोधात लढलेल्या स्त्रियांची काही उदाहरणे आहेत. मात्र, त्यांच्या संदर्भातील गैरार्थी उल्लेख कोणत्याही कागदपत्रात आढळत नाही. स्वराज्याच्या सैन्याच्या विरोधात मोगलांच्या सैन्यात असलेली रायबाघीण देशमुख ही उमरखिंडीत लढली होती. ती ब्राह्मण कुटुंबातील होती पण तिच्या कुटुंबाला देशमुखी मिळालेली होती, असे नवे अभ्यासक म्हणतात. तिचा पराभव करुन स्वराज्याच्या सैनिकांनी तिला पकडले. तेव्हा शिवाजी महाराजांनी तिला तिच्या हुद्यानुसार सन्मानाची वागणूक दिली. तिचा आदर-सत्कार करून तिला तिच्या छावणीत सुखरूप पोचविले. नवे अभ्यासक असेही म्हणतात की, रायबाघीणचा पती उदाराम देशमुख हा देखील मोगलांचा सरदार होता. त्याच्या अकाली निधनानंतर रायबाघीणीला मोगलांनी सरदारकी बहाल केली होती. म्हणूनच रायबाघीण मोगलांची मर्जी राखण्यासाठी शिवाजी महाराजांना विरोध करीत कारतलबखानाच्या खांद्याला खांदा लावून लढली. ही रायबाघीण शाहिस्तेखानाची हितचिंतक होती. (संदर्भ ४)

कंगनाला महाराष्ट्र द्रोही ठरविणाऱ्यांनी वरील उदाहरणाचा कधीही विचार केलेला नसावा. असेच दुसरे उदाहरण आहे. सन १६७८ च्या सुमारास दक्षिणेत दिग्विजय मिळवून शिवाजी महाराज स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार मल्लाबाई देसाई यांनी स्वराज्याच्या सैनिकांना विरोध केला. स्वराज्याच्या सैनिकांनी मल्लाबाईंच्या गढीचे बैल ताब्यात घेतले होते. याचा राग येऊन मल्लाबाईने स्त्रियांचे लढवय्ये पथक उभारुन स्वराज्याच्या सैन्याशी लढाई आरंभली होती. अर्थातच त्या हरल्या. शिवाजी महाराजांनी मल्लाबाईला तिचे राज्य मुलांच्या दुधभातासाठी म्हणून परत दिले. त्याचबरोबर स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मल्लाबाईला सावित्री म्हणून गौरवले. ही आठवण कायमस्वरुपी लक्षात राहावी म्हणून मल्लाबाईने शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प घडविले. धारवाडच्या उत्तरेस यादवाड या छोट्या गावात एका मंदिरात काळा पाषाणातील हे शिल्प आहे. (संदर्भ ५ व ६) या प्रसंगाचा उल्लेख तत्कालीन इंग्रजी पत्रात, जेधे शकावली, आणि उत्तरकालीन बखरींमध्येही आहे.

पूजा चव्हाण-संजय राठोड

याच घटनेच्या संदर्भात एक उल्लेख असाही मिळतो की, मल्लाबाई जेव्हा शरण आली तेव्हा तिच्या स्त्री सैन्याशी किंवा मल्लाबाईशी गैरवर्तन करणाऱ्या शकूजी (सखूजी, सखोजी) याचे डोळे काढण्याचे आदेश शिवाजी महाराजांनी दिले होते. पत्रात उल्लेख आहे की शकूजी गायकवाड (सखूजी, सखोजी) याची परद्वारावर नजर याजकरिता त्याचे डोळे काढिले.. असा उल्लेख ९१ कलमी बखरीच्या एका प्रतीत आहे. परद्वारावर म्हणजे परस्त्रीवर. सखोजीने देसाईणीशी किंवा तिथल्या कोणा स्त्रीशी गैरवर्तन केले आणि म्हणून महाराजांनी त्याचे डोळे काढले, असा या उल्लेखाचा अर्थ आहे. उल्लेख बखरीतला असला तरी त्यात तथ्य असावे. कारण कर्नाटक स्वारीत महाराजांच्या सैन्यात हा सखोजी होता, असा उल्लेख १७१९ मध्ये लिहिलेल्या खटाव परगण्याच्या एका हकिकतीतही आहे. गुंजण मावळच्या देशमुखाला १६७१ मध्ये पाठविलेल्या कौलनाम्यात दादाजी यशवंतराऊ सिवतरकर याणे कितीयेक बेसंगपणाची वर्तणूक केली, याबद्दल साहेबी (म्हणजे महाराजांनी) त्यावरी निकट करून डोले काढून गडावरी अदबखाना (तुरुंगात) घातले,’ असा उल्लेख आहे. बेसंगपणा म्हणजे निर्लज्जपणा, बेशरमपणा. हा निर्लज्जपणा स्त्रीविषयक असावा असे शिक्षेच्या कठोरपणावरून वाटते. (संदर्भ ७) हा सकुजी (सखूजी) गायकवाड शिवाजी महाराजांचा सख्खा मेहुणा होता. तरीही त्यचे डोळे काढण्याची शिक्षा देऊन त्याला कायमचे कैदेत ठेवण्यात आले. (संदर्भ ८)

शिवचरित्रात कल्याणच्या सुभेदाराच्या सुनबाईची एक कथा आहे. अर्थात, ती खरी नसल्याचा दावा आता नवीन अभ्यासक करतात. तरीही जुन्या संदर्भानुसार कथन होणारी घटना अशी -  कल्याणचा सुभेदार विजापूरच्या शाहीचा मुलाणा हयाती होता. शिवाजी महाराजांनी कल्याण ताब्यात घेण्याची मोहिम केली. या मोहिमेत सुभेदाराकडील मोठा खजिना हाती लागला. शिवाजी महाराजांनी आबाजी सोनदेव हे याला कल्याण प्रांताचा सुभेदार केले. आबाजी यांनी कल्याणचा खजिना सादर करताना मुलाणा हयाती याची सुनबाई शिवाजी महाराजांच्यासमोर हजर केली. या कृत्यावर शिवाजी महाराजांनी आबजी यांना खडेबोल सुनावले. यापुढे कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत असे वर्तन होता कामा नये असा सज्जड दम भरला. त्या सुनेची खण-नारळाची ओटी भरून तिला पालखीत बसवून मोगल छावणीत पाठवले. (संदर्भ ९)

वरील उदाहरणे लक्षात घेतली तर संयज राऊत, धनंजय मुंडे व संजय राठोड यांच्या संदर्भातील स्त्रियांच्या प्रकरणात आघाडी राज्य सरकारमधील कारभारी कसे वागत आहेत ? याचे चित्र समोर येते. कंगना विरोधात संजय राऊत यांच्या अक्राळास्तपणाला कोणीही आवर घातला नाही. धनंजय मुंडे यांच्यावर दुसरी पत्नी करुणा शर्मा हिने आणि तिची बहिण रेणु शर्मा हिने केलेल्या आरोपांबाबत आघाडी राज्य सरकारने कोणताही संवेदना दर्शविली नाही. रेणु शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर बलाकत्काराचा आरोप केला होता. उलटपक्षी तिच्याच चारित्र्यावर संशय घेणारे इतर लोक उभे केले गेले. अखेर तीने आरोप मागे घेतले. नंतर करुणा शर्मा हिनेही आरोप केला की, तिच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवले आहे. यात १४ वर्षांच्या मुलीचाही समावेश असून, ती सुरक्षित नाही. (संदर्भ १० व ११) या सर्व आरोपांच्या धुराळ्यात धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेणे, त्यांना खुलासा विचारणे असे काहीही केले गेले नाही. उलटपक्षी धनंजय मुंडे यांनी द्विभार्या प्रतिबंधक कायदा मोडूनही त्यांना सामाजिक प्रतिष्ठा लाभली.  

असाच दुसरा प्रकार संजय राठोड यांच्याबाबत होत आहे. परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचे संशयास्पद प्रकरण सध्या चर्चेत आहे. पूजा ही पुण्यात इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी होती. तिचा इमारतीवरुन पडून मृत्यू झालेला आहे. तिच्या मृत्यूचा संबंध संजय राठोड यांच्याशी जोडला जातो आहे. राठोड यांनी पूजा संबंधी केलेल्या मोबाईलवरील संभाषणाच्या १२ ध्वनीफिती समाजमाध्यमात ऐकल्या जात आहेत. असे असतानाही राठोड यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याविषयी आघाडीताल राज्य सरकारमधील कोणताही कारभारी बोललेला नाही. (संदर्भ १२) उलटपक्षी संजय राठोड यांनी पोहरादेवी येथील देवस्थानाजवळ आपल्या समर्थकांची गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन केले. यावर नाराजी म्हणून शरद पवार, बाळासाहेब थोरात व संयज राऊत यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. पण मंत्रीपदावरुन त्यांना घालविण्याविषयी कोणीही जाहीरपणे बोलले नाही.

या लेखाचा हेतू छत्रपती शिवाजी महाराज शत्रू असलेल्या स्त्रियांशी कसे वागले ? आणि आताच्या तीन पक्षांच्या आघाडी राज्य सरकारमधील संशयित हरकतींशी संबंधीत कारभाऱ्यांच्या बाबत सरकारचे नेते कसे वागत आहेत ?  हे दाखविणे एवढाच आहे. आरोप झाल्यानंतर निर्दोषत्त्व सिद्ध होईपर्यंत किमान संबंधिताला सत्तेच्या वर्तुळातून दूर सारणे, त्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेणे अशी कार्यवाही अपेक्षित होती. परंतु धनंजय मुंडे व संजय राठोड यांना तसे कोणताही कृत्य करावे लागले नाही. राज्य सरकारच्या कारभाऱ्यांनी त्यांना अभय दिले आहे.

-------------------------------------------------------

संदर्भ १

पटवर्धन अजित  आणि डॉ. कुलकर्णी अनुराधा, दोघे भारत इतिहास संशोधक मंडळातील अभ्यासक, शिवाजीराजांचे पहिले सामाजिक पत्र, लोकरंग पुरवणी, लोकसत्ता, दि. २३ डिसेंबर २०१२

संदर्भ २

बदलम, शब्दार्थ, रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला, दि. १२ सप्टेंबर २०२०

संदर्भ ३

बातमी, 'हरामखोर' म्हणजे 'नॉटी गर्ल'; संजय राऊतांची सारवासारव, महाराष्ट्र टाइम्स.कॉम, दि. ७ सप्टेंबर २०२०

संदर्भ ४

कोकाटे श्रीमंत, साहित्यिक व शिवचरित्राची नव्याने मांडणी करणारे अभ्यासक, शिवरायाविरुद्ध लढणारी रायबाघीण देशमुख, शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?, संस्कृती प्रकाशन

संदर्भ ५

कोकाटे श्रीमंत, साहित्यिक व शिवचरित्राची नव्याने मांडणी करणारे अभ्यासक, महिलांचा आदर करणारे शिवराय, सप्तरंग पुरवणी, दै. सकाळ, दि. १९ फेब्रुवारी २०१९

संदर्भ ६

बातमी, यादवाडमध्ये शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प, झी चोवीस तास, zeenews.india.com, दि. १२ आगस्ट २०१५

संदर्भ ७

पटवर्धन अजित  आणि डॉ. कुलकर्णी अनुराधा, दोघे भारत इतिहास संशोधक मंडळातील अभ्यासक, शिवाजीराजांचे पहिले सामाजिक पत्र, लोकरंग पुरवणी, लोकसत्ता, दि. २३ डिसेंबर २०१२

संदर्भ ८

परघरमोल भिमराव, व्याख्याता तथा अभ्यासक फुले आंबेडकरी विचारधारा, आजची तरुणाई आणि छत्रपती शिवाजी महाराज!, पुरोगामी संदेश दि. २० फेब्रुवारी २०२१

संदर्भ ९

लेख, कल्याणच्या सुभेदाराची सून, ब्लाग, शोध इतिहासाचा, दि. १० मार्च २०२०

संदर्भ १०

कदम गणेश पांडुरंग, बातमी, धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे, महाराष्ट्र टाईम्स, दि. २२ जानेवारी २०२१

संदर्भ ११

बातमी, धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; आता करुणा यांनी केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार, लोकमत, दि. ३ फेब्रुवारी २०२१

संदर्भ १२

बातमी,  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे झालेले राजकारण घाणेरडे, चौकशीतून सत्य समोर येईल : संजय राठोड, मराठी एबीपी लाईव्ह डॉट कॉम, दि. २३ फेब्रुवारी २०२१

No comments:

Post a Comment