![]() |
फोटो १ भीमबेटका गुहाचित्रे |
विषय सुरू झाला एल्गार परिषद आयोजनातून. परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी त्या मुस्लिम मुलाच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे की, 'शरजीलने 'हिंदू' शब्द न वापरता ब्राह्मणवाद किंवा मनुवाद हा शब्द वापरायला हवा होता. शरजीलच्या वक्तव्याचा मी निषेध करतो.' न्या. कोळसे पाटील पुढे असेही म्हणाले, 'उत्तर प्रदेशातील लोकांना फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांची चळवळ माहिती नाही म्हणून ते 'हिंदू' शब्द वापरतात. एल्गार परिषदेचे वाकडे करू शकत नाही म्हणून शरजीलने चुकून वापरलेल्या 'हिंदू' शब्दाला घेऊन मला आणि एल्गार परिषदेला बदनाम करण्याची ही मोहीम आहे.' (संदर्भ १)
वरील विवेचनावरून एक गोष्ट नक्की झाली. एल्गार परिषद ही १३० कोटींच्या अती विशाल अशा लोकसंख्येतील केवळ साडेतीन टक्के संख्येतील विशिष्ट समुह गटाच्या विरोधात आहे. उरलेला भारतीय समाज हा मनुस्मृतीला मानणारा किंवा कर्मकांडाचा प्रभाव असलेला आहे, त्यामुळे तो वैदिक समाज आहे. काही अभ्यासकांच्या मते वैदिक समाज म्हणजे देव पूजणारा, कर्मकांड करणारा समाज होय. अशा विधी संस्कारांचा संबंध पुरोहित किंवा ब्राह्मणांशी येतो म्हणून भारतीय समाज हा हिंदू नसून तो वैदिकांच्या प्रभावाखाली असलेला समाज आहे, अशी या अभ्यासकांची वैचारिक मांडणी आहे. हिंदू हा समाज आहे की धर्म आहे वा समुहाने जगण्याची जीवन प्रणाली आहे हे नीटपणे माहित नसलेले शरजील सारखे माथेफिरू सरसकट भारतीयांना हिंदू म्हणतात. हाच हिंदू समाज सडला असा दावा करतात.
दोष शरजीलचा नाही. मानव वंश उत्पत्ती आणि मानव गट स्थलांतराचे संशोधन जसे-जसे पुढे सरकते आहे तसे तसे समाज निर्मितीचे नवे संदर्भ समोर येत आहेत. फार पूर्वी मूळ भारतीय माणसाला द्राविड वंशाचे ठरवून त्यांच्या समुहावर आर्य वंशाच्या समुहाने आक्रमण केले, आर्यांनी वैदिक संस्कृती आणली, नंतर द्राविड वंश नष्ट झाला अशी मांडणी केली जात होती. राखीगड (हरियाणा) येथील उत्खननाच्या नव्या जागा आणि तेथे आढळलेल्या मानवी सांगाड्यांचे संभाव्य वय लक्षात घेता पर्शिया वा इजिप्तमधील आणि भारतात एकाच कालखंडात मानव वंशाची उत्पत्ती झाली असावी असा शास्त्रशुद्ध तर्क सध्या मांडला जातोय. म्हणजेच भारतीय समाजालाही कोट्यवधी वर्षांचा अती-अती प्राचीन इतिहास असून आर्य आक्रमण व मानवी गटांच्या स्थलांतराचे यापूर्वीचे सिद्धांत मोडित निघालेले आहेत. याचाच अर्थ असा की भारतात नद्यांच्या काठी उत्पत्ती झालेला मानवी समुह हा मूल निवासीच आहे. तो स्थलांतरित नाही. म्हणजेच हडप्पा, मोहेंजोदाडो वा अगदी अलिकडचे राखीगड येथील प्रागैतिहासिक कालीन मानवी वसाहती या मूळ भारतीयांच्या आहेत. या सर्व ठिकाणी उत्खननात सापडणारी देवादिकांची प्रतिके ही वैदिक परंपरांचे पुरावे आहेत. (संदर्भ २ व ३)
![]() |
फोटो २ राखीगड येथील मानवी सांगाडा |
सम्राट अशोक हा जैन संस्कारातील होता. नंतर त्याने बौद्ध धम्म स्वीकारला. राजे शिवाजी यांच्या काळात नेताजी पालकर सारखी मंडळी पुन्हा वैदिक समाजात परत आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हिंदू जीवन प्रणाली सोडून बौद्ध धम्म स्वीकारला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी नवा धर्म नाही पण सत्य शोधक समाज स्थापन केला. दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला. अगदी अलिकडे शिव धर्म स्थापन केल्याची चर्चा खूप झाली. या सर्व धर्म-समाज स्थानांतरणात वैदिक परंपरा मोडीत काढलेल्या आहेत. वैदिक परंपरा पाळणाऱ्यांना कोणीही मोडीत काढलेले नाही वा दोष लावलेला नाही. अगदी शाहू महाराज यांच्या काळात मंत्रपठणाचा अधिकार वेदोक्त की पुराणोक्त असा वाद उद्भवला. पण शाहू महाराजांनी मंत्र उच्चारण करणाऱ्यांच्या गटाचा दुस्वास केलेला नाही.
प्राचीन इतिहासातील संदर्भ तपासले तर भारतात वैदिक परंपरा (वैदिक धर्म नाही), जैन धर्म, बौद्ध धम्म हे राजाश्रयाच्या आडून कधी प्रभावी किंवा कधी निस्तेज झाल्याचे दिसतात. वाहन वापर करायचा नाही असा नियम स्वीकारलेला जैन धर्म भारतीय सिमेपलिकडे विस्तारला नाही. सम्राट अशोकची कन्या संघमित्रा आणि पूत्र महेंद्र यांनी धम्माला भारताबाहेर घेऊन गेले. नंतर भारतात धम्म संकुचित झाला. भारतात वैदिकपरंपरा पाळणाऱ्यांचा विस्तार वाढला. तो समुह हिंदू समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. मुस्लिम आक्रमणे आणि ब्रिटीशांचा अंमल यामुळे हिंदू समाज काही अशी संघटीत राहिला. मुस्लिमांचा कर्मठ धर्मवाद आणि ख्रिस्तांचा विस्तारवाद यामुळे हिंदू समाजात वैदिक परंपरा आणि कर्मकांडाचे प्राबल्य कायम राहिले.
सुमारे ७ हजार वर्षांपूर्वीचे वसाहतींचे संदर्भ भारतात उपलब्ध आहे. एवढ्या प्राचीन वैदिक परंपरा असतील तर त्या कालबाह्य होणारच. त्या बदलाव्या लागणारच. अर्थात, अशा बदलाचे अनेक प्रवाह भारतीय समाजाने अनुभवले. काही स्वीकारले. काही संपले. सम्राट अशोकच्या काळात इसवी सन पूर्व २७० मध्ये वैदिक परंपरांचा प्रभाव वाढला होता. लोक त्या परंपरेच पिळवटून जात होते. अशोक स्वतः जैन धर्मी होता. कलिंग युद्ध झाल्यानंतर त्यात झालेली मनुष्यहानी पाहून अशोकला अहिंसेचा स्वीकार करण्याची तीव्रतेने जाणीव झाली. त्याने बुद्धाचा धम्म स्वीकारून वैदिक परंपरा नको असलेल्यांना नव्या जीवन शैलीचा पर्याय दिला. हिंदू समाजातील बुरसटलेल्या, सडलेल्या परंपरांचा त्याग करण्याचे हे पहिले उदाहरण असावे. (संदर्भ ४ व ५)
हिंदू समाजातील वैदिक परंपरांमुळे होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून, गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे या हेतूने महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८७३ मध्ये 'सत्यशोधक समाज' ची स्थापना केली. देवाच्या ऐवजी 'निर्मिक' (निर्मिती करणारा) हा शब्द वापरला. अर्थात, हा समाज मर्यादित राहिला. यानंतर हिंदू समाजातील रुढी-परंपरा बदलून त्यात काळानुरूप बदल करण्याच्या हेतूने दयानंद सरस्वती यांनी सन १८७४ मध्ये 'आर्य समाज' ची स्थापना केली. हिंदू परंपरा, तत्वज्ञान हे सुद्धा श्रेष्ठ असून कालबाह्य सोडायचे आणि नवे ते स्वीकारायचे या हेतूने आर्य समाज कार्यरत झाला. पण त्याचा विस्तार झाला नाही.
भारतात स्वातंत्र्यपूर्व काळातही तेव्हाच्या हिंदू समाजातील वैदिक परंपरा, कर्मकांड याचा समाज विभागणी करणारा प्रचंड प्रभाव पाहून डॉ. आंबेडकर यांनी इसवी सन १९५६ मध्ये बुद्धाचा धम्म स्वीकारला. याविषय आपले मत मांडताना डॉ. आंबेडकर म्हणाले, 'अस्पृश्यातील जातिभेद व अस्पृश्यता नाहीशी करावयाची असेल तर धर्मांतर करणे हा एकमेव रामबाण उपाय आहे. हिंदू समाजातील सुधारणा करणे हे आता आमचे ध्येय नाही, हे आमचे आता कार्य नाही. आमचे स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. हिंदू धर्मात राहून समता मिळवणे केवळ अशक्य असल्याने धर्मांतर करून समता मिळविण्याचा साधा सोपा मार्ग अवलंबिता येणे शक्य आहे. धर्मांतराचा मार्ग पळपुटेपणाचा किंवा भेकडपणाचा नसून तो एक शहाणपणाचा मार्ग आहे.' माणूस असूनही समानतेची वागणूक मिळत नाही म्हणून हिंदू समाजाचा त्याग केल्याचे हे पहिले उदाहरण असावे. (संदर्भ ६)
वैदिकांच्या परंपरांमुळे एक कुख्यात प्रकरण छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातही घडले आहे. सन १९०१ मध्ये दीपावली निमित्त स्नानासाठी राजवाड्यात महाराजांचे स्नान आणि इतर विधी होते. तेव्हा नेहमीचे पुरोहित आजारी असल्यामुळे उपस्थित नव्हते. पुजेसाठी दुसरे पुरोहित आले. ते स्नान न करता आले. नंतर महाराजांचे स्नान सुरू असताना या पुरोहिताने मंत्रोच्चार 'पुराणोक्त' केला. महाराज स्वतः 'वेदोक्त' मंत्राविषयी जाणकार होते. त्यांनी पुरोहिताला मंत्रोच्चार ‘वेदोक्त’ म्हणून करा असे सांगितले. पण पुरोहित राजेंना क्षुद्र मानत होता. त्याने नकार दिला. महाराजांनी त्याला चाबकाचे फटके देण्याची शिक्षा दिली. अर्थात, या प्रकरणाची तेव्हा खूप चर्चा झाली. बाळ गंगाधर टिळक हे सुद्धा वादात ओढले गेले. पण या प्रकरणामुळे वैदिक परंपरेतील कर्मकांडातही वेदोक्त व पुराणोक्त हा भेदाभेद असल्याचे समोर आले. या वादात शाहू महाराज हे वैदिक परंपरा मानणारे आहेत की सत्यशोधक आहेत ? यावरही चर्चा झाली. मात्र महाराजांनी स्वतः सांगितले की, 'हुबळीस ब्राह्मणेतर समाजाची बैठक झाली तेव्हा तेथील सत्यशोधक समाजाने मला पानसुपारीस बोलावले असता, मी इतर संस्थांना जसा पाहुणा म्हणून जातो तसा येईन असे सांगितले. मग मला सत्यशोधक का म्हणवले जाते ? मला वेद मान्य असून, मी वेदांस चिकटून रहाणारा आहे, असे असता माझ्यावर हल्ला का? (संदर्भ ७)'
शाहू महाराज यांना सत्यशोधक ठरविण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी तो नाकारला. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्यशोधक समाजाची अवस्था काय झाली याविषयी अभ्यासकांनी टीपणी केलेल्या आहेत. त्यातील एक लक्ष वेधणारी टीपणी प्रा. डॉ. वामनराव जगताप यांनी लिहिली आहे. ते म्हणतात, 'ज्योतिबांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाच्या कार्यात सहभागी झालेल्या राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर आणि केशवराव विचारे यांचा अपवाद वगळता बाकीच्या ब्राह्मणेतर नेत्या-कार्यकर्त्यांनी भरीव असे काहीच केले नाही. उलट ब्राह्मणी छळ-जाचातून, ब्राह्मणेतर वर्गाला मुक्त करण्याच्या ज्योतिबांच्या स्वप्नाला तिलांजली देऊन अखेरपर्यंत केवळ ब्राह्मणद्वेष करण्यातच धन्यता मानली. सन १८८५ साली राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला आणि सत्यशोधक मंडळींना समाजकारणाऐवजी राजकारण आणि सत्ता यांची स्वप्ने पडू लागली. सन १९३६च्या फैजपूर (खान्देश) येथील काँग्रेसच्या ५० व्या राष्ट्रीय अधिवेशनात सत्यशोधक समाजातील सर्व मंडळीनी जोतिबांच्या कार्याकडे पाठ करून सत्यशोधक समाजाला पूर्णपणे राष्ट्रीय कॉग्रेसमध्ये विलीन करून त्याच्या दावणीला बांधून टाकले.' (संदर्भ ८)
वैदिक परंपरा पिढीजात पुढे नेणाऱ्या ब्राह्मण आणि भिक्षुकी करणाऱ्या समुह गटावर केशव सीताराम ठाकरे तथा प्रबोधनकार ठाकरे यांनीही अनेक शाब्दीक प्रहार केले आहेत. लेखक बॅरिस्टर एस. सी. मुकर्जी यांच्या THE DECLINE & FALL OF THE HINDOOS या पुस्तकाचा अनुवाद 'हिंदुजनांचा –हास आणि अधःपात' या नावाने ठाकरे यांनी केला. अनुवादात ठाकरे म्हणतात, 'हिंदुसमाजाच्या काळजाला झोंबलेल्या भिक्षुकशाही ब्राह्मणांच्या मुर्दाड स्वभाव-प्रवृत्तीची या ग्रंथात दिलेली इतिहास प्रसिद्ध चित्रे अत्यंत मननीय आहेत. हिंदुजनांच्या आत्मोद्धाराच्या प्रत्येक सुधारक चळवळीला जमीनदोस्त करण्याच्य कामी भिक्षुकशाही कधी नमते, कधी वाकते, तर कधी जुळते घेऊन, जरा थोडी संधी सापडताच, एकदम उचल खाऊन, एक दात पाडल्याचा सूड बत्तिशी ठेचून कसा उगविते, हेही अनेक उदाहरणांवरून स्पष्ट दिसून येते.' (संदर्भ ९)
हिंदू समाजावर टीकेचा विषय हा नेहमी वैदिक परंपरांचे इतरांनी केलेले अनुसरण हाच राहिला आहे. हिंदू समाजातील चालीरीती, परंपरा, कर्मकांड, वर्णभेद यामागे 'मनुस्मृती' या ग्रंथातील विचारधारा असल्याचा दावा अनेक अभ्यासक करतात. अशांपैकी अभ्यासक प्रा. मा. म. देशमुख आहेत. 'सडलेला मनुवाद गाडलेला बरा' या सविस्तर लेखात देशमुख लिहितात, 'मनुवाद पक्का करण्यासाठी बामण पंडितांनी अनेक ग्रंथांचे, व्यक्तींचे, विचारांचे आणि विषयांचे बामणीकरण केले आहे. यासाठी त्यांनी बुद्धाला दशावतारात समाविष्ट केले. तर शिवरायांना गो-ब्राह्मण प्रतिपालक बनवून टाकले. वेद, रामायण, महाभारत, पुराणे, स्मृती वगैरे ग्रंथांचेही त्यांनी ब्राह्मणीकरण केलेले आहे. भारतातील अनेक राजांचे एवढे बामणीकरण झाले होते की, धर्मग्रंथातील कायद्यांना विरोध करण्याची हिंमत कोणताही राजा दाखवित नसे. बुद्धासारखे राजे याला अपवाद होते.' या लेखाचे शिर्षक जरी 'सडलेला मनुवाद गाडलेला बरा' असे असले तरी त्यातून हिंदू समाज वैदिक परंपरांच्या अनुसणामुळे सडाला हाच अर्थ ध्वनीत होतो. (संदर्भ १०)
वैदिक परंपरा आणि हिंदू समाज भिन्न असल्याचे प्रतिपादन करणाऱ्यांमध्ये लेखक संजय सोनवणी हे सुद्धा आहेत. त्यांच्या लेखानातून वैदिक परंपरा या भारतीय समाजावर लादल्या गेल्या असा तर्काधारित निष्कर्ष मांडला जातो. 'शंकराचार्य आणि हिंदू धर्म' या लेखात सोनवणी विचारतात, 'शंकराचार्य हिंदू आहेत हे कोणी ठरवलं? ते हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करतात ते कोणत्या अधिकाराने? खरं तर आदि शंकराचार्यांनंतरची पीठं ही वैदिक धर्माचं प्रतिनिधित्व करत आली आहेत. या पीठांचं नियंत्रण हिंदू नव्हे तर काशीची विद्वत परिषद आणि भारत धर्म महासंघ करत असतात. या दोन्ही संस्था वैदिक धर्माश्रयी आहेत. त्यामुळे वैदिक धर्मियांच्या धर्मभावनांचं तुष्टीकरण करणं हाच शंकराचार्य पीठांचा ध्यास राहिलेला आहे. सर्वसामान्य मूर्तिपूजक हिंदुंना या पीठांशी सामान्यतः काहीही घेणंदेणं नसतं ही बाब इतिहासानेच सिद्ध करून दाखवली आहे. कारण त्यांच्या धर्माचा शंकराचार्यांच्या धर्माशी काहीही संबंध नाही.' सोनवणी यांचे हे प्रतिपादन आणि देशमुख यांचे मनुवादाविषयीचे विवेचन हिंदू समातील सडलेल्या परंपरा म्हणजेच वैदिक परंपरांकडे घेऊन जाते. शरजील उस्मानीचे वक्तव्य 'सडलेला हिंदू समाज' हे अशाच विचारांच्या प्रभावातून आले आहे. (संदर्भ ११)
वैदिक परंपरांवर प्रहाराचा हाच कित्ता सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनीही गिरवला. त्यांनी प्रदीर्घ काळ वेळ घेऊन 'हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी लिहिली. या कादंबरीतील पात्रांचे संवाद हे वैदिक काळातील भेदाभेदवर विषयी असंतोष व्यक्त करणारे आहेत. नमुना दाखल सूत्रधार खंडेरावचा एक संवाद असा, 'साले हे ब्राह्मण लोकच गावोगावी अशी जातीभेदाची लफ़डी सुरु करतात....कशावरून ? .. एवढा मोठा जातिभेद मोडणारा आपला वारकरी पंथ ह्या ब्राह्मणांनी नासवला. पुन्हा ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथावाटे लादला हो आपल्यावर. पेशवाईपासून स्वराज्य तर बुडवलंच, आता चालले एकेक इंग्रजी शिकून नोकऱ्या धरायला शहरात, शहरी होत चालले ब्राह्मण.' (संदर्भ १२)
वरील सर्व विवेचन शांतपणे वाचले तर निष्कर्ष निघतो की, शरजील उस्मानीने पुण्यातील एल्गार परिषदेत केलेले 'हिंधू धर्म सडिलेला’ हे वक्तव्य जाणून बुजून केले आहे. अर्थात, या मागील कारणांचा उहापोह वरील उदाहरणांमध्ये आहे. शरजीलकडून बहुधा अती उत्साहात हिंदू धर्म हे शब्द अनावधानाने वापरले गेले असावेत. त्याला वैदिक किंवा ब्राह्मणहा शब्द वापरायचा सल्ला दिला गेला असेल. हा तर्क एल्गार परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी शब्दांची केलेली सारवासारव यातून समोर येतो.
आता शेवटचा मुद्दा, वैदिक परंपरे आडून केवळ तीन टक्के समुह गटाला लक्ष्य का केले जात असावे ? हा प्रश्न पडतो. तीन वेळा तलाक उच्चारण बंदीचा कायदा, जम्मू काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द, नागरिकतेसाठी सीएए कायद्याचा मसुदा, समान नागरी कायद्याची तयारी आणि अयोद्धेत राम मंदिर उभारणीस प्रारंभ अशा कार्यवाहीच्या बळावर सन २०२४ मधील लोकसभेची निवडणूक भाजप लढवणार. तेव्हा विरोधकांकडे शानबागचे आंदोलन, शेतकऱ्यांचे आंदोलन या शिवाय कोणते विषय असणार आहेत ? राम मंदिर हा मुद्दा भाजपच्या विजयासाठीचा अजेंडा होऊ नये असे वातावरण तयार करायचे असेल तर वैदिक परंपरेवर हल्लाबोल केल्याशिवाय पर्याय नाही, हे मोदी, भाजप व आरएसएस विरोधकांच्या लक्षात आलेले आहे.
लेखासोबतचे फोटो १ – शिर्षकाला लागून वर - भीमबेटका (भोपाळजवळ, मध्यप्रदेश) येथे भारतातील अती प्राचीन म्हणजे किमान २५-३० हजारवर्षे अगोदर अस्तित्वात असलेल्या आदिमानवाच्या निवासाच्या १८ गुहांचा समुह आढळलेला आहे. त्यात पांढऱ्या , लाल रंगातरेषा चित्रे आहेत. जगभरात अशी गुहा चित्रे स्पेन आणि फ्रान्स मध्ये आहेत. (संदर्भ १३)
फोटो २ - मजकुरात – राखीगड (हरियाना) येथे उत्खननात आढळलेले सुमारे ५ हजार वर्षापूर्वीच्या मानवाचे सांगाडे (संदर्भ १४)
संदर्भ
१. बीबीसी न्यूज-मराठी, शरजील उस्मानी कोण आहे ? एल्गार परिषदेनंही त्याचा निषेध का केला आहे ?, दि. ३ फेब्रुवारी २०२१
https://www.bbc.com/marathi/india-55915294
२. प्रहार, देश, आर्य व वैदिक संस्कृती अस्सल भारतीयच, दि.१५ जून २०१८
३. इनमराठी टीम, आर्य खरंच बाहेरून आले होते का? संशोधनानंतर शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा, दि. ५ जानेवारी २०२१
https://www.inmarathi.com/43382/research-by-scientist-about-aryan-invension/
४. शिरगावकर शरावती (मराठी अनुवाद), अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास, महाराष्ट्र साहित्य संकृती मंडळ, मुंबई, आवृत्ती सन२००७ (मूळ पुस्तक - थापर रोमिला, अशोका ॲण्ड डिक्लाईन अॉफ मौर्या)
५. ब्लॉग, आत्मपरिक्षण, सम्राट अशोक मौर्य महान
https://aatmaparikshan.blogspot.com/2015/10/blog-post_86.html
६. विकिपिडीया, बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
७. विकिपीडिया, वेदोक्त, https://bit.ly/3roZmNC
८. प्रा. डॉ. जगताप वामनराव, फुलेंच्या सत्यशोधक समाजाची केलेली वाताहत, लोकमत न्यूज नेटवर्क, दि. २३ सप्टेंबर २०१६
https://m.lokmat.com/editorial/carnation-true-satyashodhak-samaj-flowers/
९. ठाकरे केशव तथा ठाकरे प्रबोधनकार, तो महात्मा ब्लॉग, हिंदू धर्म रसातळास जाण्याची कारणे, दि.,३० जानेवारी, २०१७ (मूळ पुस्तक - बॅरिस्टर मुकर्जी एस. सी. THE DECLINE & FALL OF THE HINDOOS )
http://tomahatma.blogspot.com/2017/01/blog-post_64.html?m=1
१०. प्रा. देशमुख मा. म., प्रजासत्ताक जनता, वेबपेज, दि. ३१ डिसेंबार २०२०
https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_273.html?m=1
११. सोनवणी संजय, ब्लॉग, शंकराचार्य आणि हिंदू धर्म, दि. ७ सप्टेंबर २०१४
https://sanjaysonawani.blogspot.com/2014/09/blog-post.html?m=1
१२. नेमाडे भालचंद्र, हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ, पॉप्युलर प्रकाशन, आवृत्ती सन २०२०
१३. कुळकर्णी महेंद्र, काय वाटेल ते..., ब्लॉग, भिमबेटका च्या २५ हजार वर्ष जुन्या गुहा, आणि गुहा चित्रं, दि. ८ जुलै २०१२
१४. विवेक विजय सुजाता, निवडक ... प्रेरक, ब्लॉग, राखीगड संशोधनाचा नवा निष्कर्ष : सिंधू संस्कृती आर्य नव्हे, द्रविड होती का ? , दि. ४ आक्टोबर २०१८
No comments:
Post a Comment