Sunday, 3 January 2021

नाथाभाऊ हे अवलक्षण कशासाठी ?

मुक्ताईनगरचे लढवय्ये नेते एकनाथराव खडसे तथा नाथाभाऊ यांची विरोधकांवर आरोप करणारी तोफ थंडावली आहे. नाथाभाऊंना कोरोना त्रास देतोय. त्यांना खरोखर कोरोनाची लागण झाली किंवा नाही ? याची लक्षणे सध्या तरी समोर नाहीत. मात्र 'ईडी' (Enforcement Directorate तथा अंमलबजावणी संचालनालय) ची नोटीस आल्यानंतर मुंबईकडे गेलेल्या नाथाभाऊंचे कोणतेही वक्तव्य आलेले नाही. त्यातच नाथाभाऊंना झालेल्या (बहुतेक दुसऱ्यांदा) कोरोना संसर्गाविषयी जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित करून नाथाभाऊंची 'हात दाखवून अवलक्षण' अशी अवस्था निर्माण केली आहे. यातील अवलक्षण हा शब्द नाथाभाऊंच्या २/४ समर्थक, पंटर व तथाकथित समर्थकांच्या डोक्यावरून जाईल.

अवलक्षण म्हणजे काय ? तर कोणतेही कारण नसताना एखाद्या कुडमुड्या ज्योतिष्यासमोर बसून आपला उजवा तळ हात दाखवणे. हातांवरील रेषांवरून भविष्य जाणून घेणे. अर्थात, भविष्यात चांगले आणि वाईट काय घडू शकते ? याचा अंदाज घेणे. पण त्या ज्योतिष्याने वाईट काय घडू शकते हेच वारंवार सांगितल्यानंतर चेहऱ्यावर चिंता येते आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते. त्या अवस्थेला म्हणतात अवलक्षण. म्हणजे हात आपला, भविष्य आपले आणि उद्भवलेली चिंताही आपलीच. कुडमुड्या ज्योतिष फक्त अंदाज सांगतो. 

आता नाथाभाऊंसाठी अवलक्षण कसे होते आहे ? ते पाहू. 'त्यांच्याकडे ईडी आहे तर माझ्याकडे सीडी आहे' अशी दर्पोक्ती (बोलताना शब्दांमधून जाणवणारा दर्प या अर्थाने) नाथाभाऊंच्या मुखातून बाहेर पडली आणि महाराष्ट्रासह जगभरात पोहचली. या वाक्याचा सरळ अर्थ असा होती की 'तुम्ही मला ईडी वगैरेची नोटीस देऊ नका. मी तुमची सीडी दाखवणार नाही!' याच वाक्याचा वाकडा अर्थ असा की, 'तुम्ही मला ईडीची नोटीस दिली तर तुम्ही बंद खोलीत केलेल्या पलंगावरील लिला सीडीतून मी बाहेर आणेन' नाथाभाऊंनी अशा प्रकारे सीडीचा विषय काढल्यानंतर लोकांचा समज झाला की नाथाभाऊंच्या विरोधकांचे पलंगलिलांचे चलतचित्रण त्या सीडीत असावे. बरे ही करामतखोर सीडी कोणाकडून आली असावी अशी शंका असताना जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांचे पूर्वी कधी तरी केलेले वक्तव्य समोर येते. लोढा जाहिरपणे म्हणाले होते, 'त्यांची फाईल व सीडी माझ्याकडे आहे' लोढा यांच्या या दाव्यामुळे संशयास्पद नेत्यांच्या पलंगलिलांचे आभासी चित्र लोकांच्या मनात निर्माण झाले होते.

नाथाभाऊंचा बहुधा कयास असावा की, लोढांच्या हाती असलेली  सीडी कधीतरी आपण मिळवू शकू. ईडीची संभाव्य कारवाई झाली तर तीच सीडी पुढे विरोधात वापरता येईल. पण लोढा यांनी सीडी संदर्भात वेगळेच वक्तव्य अलिकडे केले. 'नाथाभाऊंनी माझ्याकडील सीडी मिळवायला पोलिसांकडून माझ्या भावाच्या व मित्राच्या घराची झडती करवून घेतली,' असा आरोप पत्रकार परिषदेत करताना लोढा यांनी नाथाभाऊंविषयी शेलक्या भाषेचा वापर केला. त्याला उत्तर नाथाभाऊंनी स्वतः दिले नाही. किंवा त्यांचे समर्थक, पंटर व तथाकथित समर्थक यांनीही सोशल मीडियात लोढांना उत्तर दिले नाही. नाथाभाऊंची आरोपांची तोफ तेव्हापासून गपगार झाली. दरम्यान नाथाभाऊंना भोसरी (पुणे) येथील भूखंड खरेदी प्रकरणी ईडीची बहुप्रतिक्षित नोटीस आलीच. लोकांना वाटले, आता नाथाभाऊंकडून चौकाचौकात त्या सीडीचे लोकार्पण व समुह दर्शन होईल. आंबट शौकिन मिटक्या मारत त्या सीडीतील पलंगलिलांचा आनंद घेतील. पण तसे काहीच अजूनही घडलेले नाही.

उलटपक्षी नाथाभाऊ ईडीला उत्तर द्यायला मुंबईकडे दि. २७ डिसेंबरला रवाना झाले. भोसरी येथील भूखंड सौ. मंदाताई एकनाथराव खडसे यांनी खरेदी केला आहे. त्याच्याशी नाथाभाऊंचा संबंध नाही, असे एकूण चित्र आहे. रेडीरेकनर नुसार त्या भूखंडाची किंमत किती ? मंदाताईंनी तो कितीला खरेदी केला ? पण त्यावरील मुद्रांक शुल्क जास्त कशासाठी भरले ? मंदाताईंचे व्यक्तिगत उत्पन्नाचे स्त्रोत काय ? हे प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकता नाही. कारण, शंका नाथाभाऊंच्या व्यवहारांची आहे. मंदाताईंविषयी नाही. गंमत असते ना ? मोठ्या नेत्यांच्या घरात प्रत्येकाचे आर्थिक व्यवहार कोट्यवधी रुपयांचेच असतात आणि ते व्यवहार स्वतंत्रही असतात. 

असेच दुसरे उदाहरण मुंबईतील 'सामना' दैनिकाचे संपादक संजय राऊत यांचे. त्यांच्या पत्नी सौ. वर्षा यांनीही मैत्रिणीच्या माध्यमातून ५० लाखांचे कर्ज घेतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी यांनीही कोट्यवधी रुपयांचे ९ भूखंड खरेदीची मालिका रचली आहे. त्या भूखंडांचे ७/१२ भाजपनेते किरीट सोमय्या यांनी समोर आणले आहेत. सौ. मंदाताई, सौ. वर्षा, सौ. रश्मी यांनी खरेदी केलेल्या मालमत्तांशी अनुक्रमे नाथाभाऊ, संजयभाऊ आणि उद्धवभाऊ यांचा संबंध कसा असू शकतो ? विरोधकांनी असे प्रश्नच विचारु नयेत. ईडीला सुद्धा असे प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीच. ईडीने नाथाभाऊ वा राऊत यांना दिलेली नोटीस ही म्हणूनच अन्यायकारक आहे.

जाऊ दे, नाथाभाऊ ईडीला पुरून उरतील. सोबतीला संजयभाऊ आहेतच. पण नाथाभाऊंनी कोरोनाचा संशयास्पद संसर्ग विनाकारण स्वतःवर ओढवून घेतला. नाथाभाऊ दि. २७ ला मुंबईकडे रवाना झाले. नाथाभाऊ ईडीला भेटणार असे वृत्त आले. नंतर नाथाभाऊ दि. २९ ला मुख्यमंत्र्यांना भेटले असेही वृत्त आले. याच्या मागोमाग नाथाभाऊंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचेही वृत्त आले. पण हा सर्व प्रचार करताना नाथाभाऊंच्या कोरोना चाचणी विषयी मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात आणि जळगाव जिल्हा रुग्णालयात दि. २८ व दि. २९ ला पेशंट म्हणून नाथाभाऊंच्या नावे केसपेपर कसे तयार झाले ? असे प्रश्न शिवराम पाटील यांनी उपस्थित केले आहेत. शिवराम पाटील यांची शंका खरी आहे. नाथाभाऊ दि. २७ ला मुंबईकडे रवाना झाले. दि. २९ ला मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत होते तर दि. २८, दि. २९ ला ते मुक्ताईनगर व जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीचा स्वॅब द्यायला आले कसे ? नाथाभाऊंनी हात दाखवून अवलक्षण या ठिकाणी केले आहे. 'एक नाथाभाऊ, एकही समय पर तीन जगह कैसे हो सकता है. दया कुछ तो गडबड है ?'

ईडीची यंत्रणा केंद्रिय अर्थ मंत्रालयाच्या नियंत्रणात पण स्वायत्तपणे काम करते असे मानले जाते. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपशी युतीचा घरोबा तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत घरोबा केला आहे. अशावेळी महाराष्ट्रातील कोणाही विरोधी पुढाऱ्याला ईडीची नोटीस आली तर यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा कांगावा करण्याची संधी आहे. ईडीने त्यांच्या कार्यालयात बोलावण्यापूर्वी तेथे धडकण्याचे धाडस केवळ ज्येष्ठनेते शरद पवार यांच्यात आहे. बाकी उरलेल्या पुढाऱ्यांमध्ये तशी हिंमत नाही. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा या ईडीच्या चौकशीला जाणार नाहीत अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हाच नाथाभाऊ सुद्धा सामोरे जाणार नाहीत हा अंदाज होताच. पण त्याच्यासाठी कोरोना संसर्गाचा अनावश्यक फार्स करायची गरज नव्हती. 'नको तेव्हा नको ते बोलून' नाथाभाऊ आपल्या स्वतःसाठी अवलक्षण करून घेत आहेत. प्रअफुल्ल लोढा, शिवराम पाटील अशा मंडळींना विरोधात बोलायची संधी देत आहेत. समर्थ रामदासांच्या दासबोधात अशा स्थितीचे वर्णन 'मूर्ख लक्षण' या समासात केले आहे. ते कोणाला लागू होते असे म्हणण्याचा लेखकाचा उद्देश नाही.

(वैधानिक इशारा - नाथाभाऊ समर्थकांनी आपले मत नोंदविण्यापूर्वी प्रफुल्ल लोढा व शिवराम पाटील यांच्या आरोपांवर काय उखाडून (हा शब्द कंगना राणावत आणि संजय राऊत यांनी सुप्रसिद्ध केला आहे) घेतले ? यावरही बोलावे.)

1 comment: