Friday 25 December 2020

जळगावचे बीभत्स राजकारण ...

 जळगाव जिल्ह्याचे राजकारण २/४ पुढाऱ्यांनी कमरेच्या खाली नेवून ठेवले आहे. जाहीरपणे सांगितले जाते आहे, 'आमच्याकडे सीडी आहे. आमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे.' अर्थातच अशा डिजिटल मीडिया सेव्हरमध्ये भजन-कीर्तनच्या व्हिडिओ क्लिप असणार नाहीत. स्त्री-पुरुषाच्या एकांतातील कमरेखालच्या खेळाच्या व्हिडिओ क्लिप असण्याची शक्यता जास्त आहे. बहुधा तो खेळही संमतीचा मामला असेल. बलात्कार वा ब्लैकमेलचा प्रकार असण्याची शक्यता तशी धूसरच. तरीही 'सीडी वा पेनड्राईव्ह आमच्याकडे आहे' असे सांगून सतत जाहीरपणे धमकावत राहणे म्हणजेच राजकारणाचास्तर कमरेखाली नेणे होय. पुढाऱ्यांच्या अशा कमरेखालच्या राजकारणाचा सामान्य जळगावकरला वीट आला आहे.
 
पूर्वीच्या काळी मोजक्या आंबट शौकिनांना चित्रपटगृहात दुपारच्या मैटीनी शोचे आकर्षण असे. 'चढती जवानी', 'गरम राते' वगैरे नाव असलेल्या चित्रपटांना गर्दी करणारा मूठभर प्रेक्षक होता. अशा चित्रपटात स्त्री-पुरुष लैंगिक संबंधाची काही रिळे घुसडलेली असत. २/४ मिनिटांचा तो कमरेखालचा खेळ पाहायला लाळघोटा प्रेक्षक एकमेकांना चुकवून येत असे. नंतरच्या काळात व्हीडीओ थिएटरचा जमाना आला. अंधाऱ्या खोलीत टीव्हीला जोडून व्हीसीआर ठेवत. त्यात 'ट्रीपल एक्स' नावाने स्त्री-पुरुष किंवा अनेक स्त्रिया-पुरुषांच्या लैंगिक संबंधांचे बीभत्स चित्रण असे. दुसऱ्यांच्या लैंगिक संबंधाचे अशा प्रकारचे चित्रण मिटक्या मारत पाहाणे ही सुद्धा मानसिक विकृतीच आहे. त्यापुढे जाऊन अशा कृत्याचे चित्रण माझ्याकडे आहे असे सार्वत्रिक धमकावणे हे विकृती विकोपाला गेल्याचे अंतिम लक्षण.

खरे तर राजकारण हे स्वच्छ धुतलेल्या लोकांचे नाहीच. राजकारणात जी मंडळी सक्रिय आहेत, ती खूप स्वच्छ, सभ्य आणि सच्छिल आहेत असे आज तरी म्हणता येत नाही. बायाबापड्यांच्या विषयी राजकारणी मंडळींचे पाय घसरतील अशीच शक्यता आहे. राजकारणात येणाऱ्या बहुतांश स्त्रियांचे हेतू शुद्ध असतील. पण एखाद-दोन महिला आडमार्गानेही पुढे जाऊन इच्छित ते साध्य करायचा प्रयत्न करतात. अशा आडमार्गात संमतीने कमरेखालचे खेळ शिष्ट संमत असतात. पुढारी मजा करतोय, हे पाहून जवळची मंडळी डोळे व तोंड बंद ठेवतात. भविष्यात पुढाऱ्याशी काही बिनसले तर तोंड उघडले जाते. कोणी तरी उघडायला लावते. आज अशा बिनसलेल्या प्रवृत्तींनी जळगावच्या राजकारणाचास्तर कमरेखाली आणला आहे. स्त्रीसोबत बळजोरीचा मामला असेल तर तिने पोलिसात तक्रार करायला हवी. दोघांमधील खेळ संमतीचा असेल तर दुपारचा मैटीनी शो पाहणारे आंबट शौकिन व सीडी आहे, पेनड्राईव्ह आहे असे धमकावणाऱ्यांच्या मानसिकतेत फार फरक नाही.

जळगावच्या राजकारणाला आज बीभत्स म्हणण्यामागे गेल्या ३०/३५ वर्षांचा इतिहास आहे. निश्चित पार्श्वभूमी आहे. ओंगळवाणे आणि गलिच्छ संदर्भ आहेत. बीभत्स या शब्दाला सुद्धा सुस्पष्ट अर्थ आहे. बीभत्स हा नवरसांपैकी एक रस आहे. तो किळस उत्पन्न करतो. ही किळस कशी आहे हे पुढील वाक्यातून दर्शवले आहे.

कावळे प्रीतीनें खाताती शेंबूड ।
विष्टा वाटे गोड डूकरांशीं ।

वरील वाक्ये वाचली की किळसवाणे, ओंगळ, घाणेरडे, अभद्र वाटते. सभ्य माणसाला ओकाऱ्या येतील. तरीही याच प्रवृत्तीने राजकारणातही कृती करताना वा धमकावताना पुढाऱ्यांना काहीही वाटत नाही. कमरेखालच्या अशा राजकारणाची काही उदाहरणे समोर असूनही पुढारी मंडळी आपापले दुर्गूण सोडायला तयार नाहीत. दुसऱ्याचे वाकून वाकून पाहातांना आपले झाकलेले कसे राहिल ? याचा सारासार विचारही केला जात नाही. कमरेखालच्या  राजकारणामुळे जिल्हा बदनाम होतो याचे भानही नाही.

सन १९९४ च्या सुमारास जळगावमध्ये राजकारणी व प्रतिष्ठित  लोकांच्या कथित सेक्स स्कैण्डलचा अध्याय कुटीलतेने रचला गेला. जळगाव नगरपालिका आणि शहरावरील राजकारणात विरोधकांना नामोहरम करण्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, वकील आणि डॉक्टर अशांची नावे गोवली गेली. सेक्स स्कैण्डलमध्ये ५०० स्त्रिया-मुली गुंतलेल्या आहेत असे पोलीस म्हणाले. तेव्हाच्या दैनिकांनी (सकाळ सोडून) सर्रास आकडेच छापले. या घाणेरड्या आरोपांच्या रचनेत 'काला कौआ' नावाच्या ब्लू फिल्म व्हीडीओ कैसेटची स्टोरी विधी मंडळातून रचली गेली. या कैसेटला 'जळगाव कैसेट' असे संबोधन देण्याचा नीचपणा केला गेला. वास्तविक ही 'काला कौआ' कैसेट तेव्हा बाजारात सर्रास उपलब्ध होती. आंबट शौकिनांना त्यातील एकूण एक चित्रण पाहिले होते. तरीही राजकारणी मंडळींनी त्या व्हीडीओ कैसेटवर घाणेरडा फार्स रचला. जळगाव नगरपालिका बरखास्त केली. ३०/३२ जण आरोपी झाले. राजकारणातील एक सूड नाट्य संपले. पोलीसात ९ प्रकरणे दाखल झाली. न्यायालयात ५ प्रकरणे गेली. १ प्रकरणात शिक्षा झाली. पुढे उच्च न्यायालयात सबळ पुराव्या अभावी तेथेही आरोपी सुटले.

तेव्हा कुप्रसिद्ध झालेल्या सेक्स स्कैण्डलने जळगावकरांना बीभत्स बदनामी दिली. इतर ठिकाणच्या लोकांना जळगावच्या पोरीबाळींकडे पाहण्याची दुषित नजर दिली. मात्र ज्यांचे राजकारण संपविण्यासाठी सेक्स स्कैण्डल रचले, ती मंडळी जळगाव शहराच्या सत्तेत टीकून राहिली. एवढेच नव्हे तर 'काला कौआ' कैसेटचा बाजार मांडणारे पुढारी नंतर जळगाव नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या बंगल्यावर विधान परिषद निवडणुकीत मुलासाठी मत मागायला पोहचले. बराच काळ दोघांचे गळ्यात गळे होते. असा हा कुटील व कडवट इतिहास आहे.

कमरेखालचा असाच खेळ अमळनेरच्या डॉक्टर असलेल्या आमदार विरोधात खेळला गेला. सलग दोनवेळा निवडून मतदार संघावर घट्ट पकड मिळवणाऱ्या या आमदाराच्या पत्नी व कारचालकाचे लफडे तेव्हा बुजूर्ग पुढाऱ्यांनी बीभत्स रुपात चर्चेत आणले. तेव्हा फोटोंचा वापर झाला. निवडणुकीच्या मैदानात पराभव न करू शकणाऱ्यांनी लफड्याचा विषय बदनामीसाठी वापरला. पुढील काळात तो आमदार पराभूत झाला. राजकारणातून काही काळ बाद झाला. कमरेखालच्या बीभत्स खेळीचा हा दुसरा फटका होता.

एका खासदाराच्या राजकारणाला पूर्णविराम देण्यासाठी कमरेखालील व्हीडीओ क्लिपचा प्रसार सोशल माध्यमातून अलिकडे करण्यात आला. दोघांमधील शरीर संबंधाचा बंद खोलीतील मामला आंबट शौकिनांनी गाव चव्हाट्यावर आणला. लोकसभा निवडणुकीपूर्वी व्हीडीओ आणि फोटो समाज माध्यमात प्रसारित झाले. याचा व्हायचा तो परिणाम झाला. त्या खासदाराची उमेदवारी कापली गेली. घाणेरड्या प्रवृत्तींचा कुटील हेतू साध्य झाला. कमरेखालची बीभत्सता पुन्हा एकदा जिंकली.

जळगाव शहरात अलिकडे हनिट्रैपची चर्चा दोन पत्रकार परिषदांमधून झाली. राजकारणात फारसे कर्तृत्व नसलेल्या आणि फारसा परिचय नसलेल्या मंडळींनी हनिट्रैपचे कुभांड माध्यमांच्या समोर मांडले. हनिट्रैप म्हणजे एखाद्या तरुणीला वा बाईला पुढाऱ्याकडे पाठवून संमतीने वा बळजोरीने लैंगिक संबंधासाठी प्रवृत्त करायचे. त्याचे व्हीडीओ, फोटो काढायचे. नंतर ब्लैकमेल करायचे. हा असा अगदी निर्बुद्ध सापळा रचायचा. हनिट्रैपची ही चर्चा करताना राजकीय पक्षातील काही स्त्रियाच अशा खेळासाठी कुंटणखाना बाळगून असल्याचीही चर्चा सोशल मीडियात झाली. नव्या वसाहतीतील कुंटनखानेही पोलिसांनी उध्वस्त केले. तेव्हा एका राजकीय पक्षाचे नाव घेतले गेले. खरे तर अशी चर्चा दुर्दैवी आहेत. राजकारणात काम करणाऱ्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी आहे.

राजकारण कमरेखाली घसरत असताना पुढाऱ्यांची भाषा स्त्रियांप्रती असभ्य होत गेली. स्वतःची पत्नी राजकारणात आहे, ती आपल्यासोबत व्यासपिठावर बसते हे विसरून कमरेखालचे आणि वरचेही विनोद पुढाऱ्यांनी सुरू केले. कोणी म्हणाले, 'आमचे आंबे अमक्या बाईपेक्षा मोठे आहेत.' कोणी म्हणाले, 'दारूला बाईचे नाव द्या. ती जास्त खपते.' हे असले विनोद करणारे आज सीडी व पेनड्राईव्हच्या गोष्टी करीत आहेत. अशा पुढाऱ्यांना घरातील पोरीबाळींनी जर विचारले, 'त्या सीडीत वा पेनड्राईव्हत काय आहे ?' तर काय उत्तर दिले जात असेल ?

विषय राजकारणाचास्तर कमरेखाली नेण्याचा आहे. एकाने दुसऱ्याच्या काचेच्या घरावर दगड फेकला की दुसराही दगड फेकायला टपून बसला आहे. स्त्री-पुरूष लैंगिक संबंध ही जशी खासगी बाब आहे तशीच पत्नीने पतीला किडनी दान करणे ही खासगी बाब आहे. कारण नसताना विरोधक अशाही मुद्द्यांची चर्चा उकरून काढत आहेत. हा धोका आहे. पुढाऱ्यांच्या गलिच्छ खेळात स्त्रियांच्या बदनामीचे हे धोक्याचे वळण आहे. जळगावचे राजकारण अजून किती बीभत्स करायचे ? याचा सारासार विचार पुढाऱ्यांनी करावा. बाकी त्या सीडीत वा पेनड्राईव्हत काय आहे ? हे जनतेला खुलेपणाने दाखवायची हिंमत कोणत्याही 'माईच्या लाल' मध्ये नाही ....

(लेखक जळगावचे असून वरील आशयातील सर्व घटनांचे वृत्तांकन पूर्वी केलेले आहे.)


5 comments:

 1. अतिशय सुंदर मांडणी... 👍

  ReplyDelete
 2. साहेब आपण तपशीलवार सर्व नोंदी मांडलेल्या आहेत. खरच शरमेची बाब आहे ही जिल्ह्यासाठी. अख्खा महाराष्ट्र हसत असेल आपल्या जिल्ह्याच्या राजकारणावर. जो तो एकमेकांच्या CD असल्याच्या धमक्या जाहीरपणे देतो, अक्षरशः दारूच्या नशेत लोक पत्रकार परिषदा घेतात. यापुढे ना या जिल्ह्याला मोठं मंत्रिपद मिळेल ना भरघोस निधी मिळेल. असल्या गलिच्छ राजकारणामुळे जिल्ह्यातील जनतेचं अतोनात नुकसान होतंय याचं मात्र यापैकी कुणालाच सोयरसुतक नाही, दुर्दैव.

  ReplyDelete
 3. दिलीपजी अगदी सत्य कथन केले आहे तसे पाहता गेल्या 20 वर्षा नंतर राजकरण हे सभ्य माणसाचे क्षेत्र नाही .हे म्हणणे जळगाव तिल राजकारण्यानी सिद्ध करुंन ददाखविले आहे.कपड़े के भीतर सारे नंगे कोई भी दूध का धुला नहीं ही वास्तुस्थिति आहे.जळगाव कर नागरिक आपल्या दैनंदिन समस्यानी ग्रस्त आहे 4 गुंडप्रवृति च्या तथकथित लोकप्रतिनिधि च्या भोवती राजकरण फिरत असुन जनतेला वेठीस धरून जनसेवा हा मुख्यविषय कधीचाच बाजूला सारला आहे सर्वसामान्य जनतेला यांच्या CD विषयी काही एक कुतूहल नाही खड्डे मुक्त जळगाव व्हावे पाणी वेळेवर मिळावे हिच रास्त अपेक्षा बाकी राजकारणी असे कोणी नाही की ज्याचे आदर्श घ्यावे सर्व प्रतिष्ठा,सुड़बुद्धि चे राजकरण आहे सत्ताबदल झाले की पुन्हा गळा भेट

  ReplyDelete
 4. सगळे एका माळेतील मणी

  ReplyDelete
 5. जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण गलिच्छ तर आहेच,पण सर्व सामान्य माणसाला देखील यांचे चटके सहन करावे लागले आहेत. स्वार्थि राजकीय डावपेचांचा वापर करून सहकाराचा स्वाहाकार झाला आहे. पहिला बळी वनकुठ्याचा वसंत, नंतर बेलगंगा, नगरदेवळा सुतगिरणी, आहे काय शिल्लक,सर्व सामान्य माणसाला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या साधनांचा बळी दिला.हजारो कामगार बेकार झाले, संसार उद्धवस्त झाले, कारखाने बंद होवून अवसायनात गेले. पर्यायाने ऊस बागायती संपुष्टात आली, शेतकरी उद्धस्त झाला,शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे शेअर्स बुडीत झाले, युवकांना रोजगार नाही, पण तरी आमचे सुज्ञ, तज्ञ्न ......त्यांनाच ....मानत आहेत हेही दुर्दैव.

  ReplyDelete