Friday 23 October 2020

कुंडल्या, व्हाया व्हिडिओ कैसेट ते सीडी

जळगाव जिल्ह्यातील राजकारणातला सन १९९२/९४ चा  काळ आठवला. सहकार क्षेत्रातील लढाईत सुरेशदादा विरुद्ध स्व. प्रल्हादराव पाटील गटांमध्ये घामासान लढाई सुरू होती. दादा आणि भाऊ हे दोघे तेव्हा महानेता शरद पवार यांचे समर्थक होते. तरी सुद्धा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढत होते. असे म्हटले जाते की, त्या निवडणुकीत मतदारांची जी कमाई झाली तशी नंतर कधीच झाली नाही. मतदारांनी सुद्धा २२ पैकी दोन्ही गटाला ११/११ असा कौल दिला होता.
जिल्हा बँक ताब्यात घेण्याच्या त्या लढाईत दादा आणि भाऊ एकमेकांविषयी जाहीर सभांभध्ये सांगत, 'त्यांची कुंडली आमच्या ताब्यात आहे.' दोघांच्या कुंडल्या एकमेकांकडे होत्या. सामान्य लोकांना वाटायचे कधी तरी दादा किंवा भाऊ कुंडल्या दाखवतील. पण दोघांनीही जाहीरपणे एकमेकांची कुंडली समोर आणलीच नाही. कुंडल्यांचे भय एकमेकांना दाखवून या नेत्यांनी स्वतःची सोय तेव्हा लावून घेतली. दादा गटातून एक जण फुटून भाऊ गटाला गुप्त मतदान करणार असेही ठरले होते. पण भाऊंनी माघार घेत पुत्राच्या भावी राजकारणाची सोय लावली.

जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्व. प्रल्हादभाऊंनी सोडले, तेथे सुरेशदादा अध्यक्ष झाले. 'मराठ्यांची बँक मारवाड्याच्या हातात देण्याचे पातक भाऊंनी केले,' असे त्यावेळी म्हटले गेले. या बदल्यात स्व. प्रल्हादभाऊ यांचे तेव्हा युवावस्थेतील पुत्र ॲड. रवींद्र पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्षाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा होता. नंतर शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्यानंतर सुरेशदादांनी जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांवर अविश्वास ठरावही दाखल केले. राजकारणातील दावे आणि हेवे हे केवळ आणि केवळ नेत्यांच्या लाभासाठीच असतात. त्यातून कधीही सामान्य माणसाला पद, पैसा मिळत नाही. हे तेव्हाही होते तसे आजही आहेच.

भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर करताना एकनाथराव खडसे यांनी इशारा दिला आहे, तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन. अर्थात, नाथाभाऊ व कुटुंबियांचे मालमत्ता व गुंतवणूक विषयी व्यवहार पारदर्शी असतीलच तर ईडीच काय पण इतर कोणाच्या बापालाही घाबरायचे कारण नाही. महानेता शरद पवार यांचा आदर्श घेऊन स्वतःच ईडीवर धाऊन जायचे धाडसही भाऊंनी दाखवावे.

खडसे यांनी ईडीचे यमक सीडीशी जुळवले आहे. याचा अर्थ असाच की, खडसेंकडे भाजपतील कोणातरी नेत्याची वा नेत्यांची अनैतिक वा अश्लिल सीडी असावी. त्या सीडीचे भांडवल खडसेंना स्वतःच्या बचावासाठी करायचे आहे. जामनेर येथील एका राजकीय नेत्याने अश्लिल क्लिपचे भांडवल अगोदरच करणे सुरू केले आहे. अश्लिल खेळ करतानाची कोणाची तरी क्लिप आहे, हे पद्धतशीर लोकांच्या मनावर बिंबवले आहे. आता तोच धागा धरून खडसेंनी इशारा दिला, 'तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन'. खडसेंनी स्वतःवर ईडी आली तर सीडी लावायाची भाषा करू नये. उलट ती सीडी सर्वांना अगोदर दाखवावी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर जळगावी पोहचल्यावर काही पत्रकार, मान्यवर नागरिक यांच्या उपस्थितीत सीडी प्रदर्शन करावे. तसे आजच केले तर जिल्ह्यातील भाजपची अवस्था मेल्याहून मेल्यागत होईल. (खडसेंनी किमान मला व्यक्तिगत ती सीडी दाखवावी. त्या नेत्याला राजकारणातून उठवणारे लेखन करण्यासाठी कायम बांधिल असेन.)

नाहीतरी खडसे यांना अशा प्रकारच्या व्हिडिओ कैसेट मिळवून विधानसभेत सादर करण्याचा अनुभव आहे. जळगावमधील लैंगिक छळ प्रकरणाचा गाजावाजा दैनिके करीत असताना खडसे यांनी 'जळगाव कैसेट' म्हणून एक व्हिडिओ कैसेट तेव्हाचे विधानसभाध्यक्ष स्व. मधुकरराव चौधरी यांना दिली होती. जळगावच्या मुलींची अश्लिल कैसेट बाजारात आहे, हा संदेश अप्रत्यक्षपणे तेव्हा दिला गेला. वास्तविक ती व्हिडिऔ कैसेट 'कालाकौआ' नावाने आंबट शौकिनांच्या बाजारात सहज उपलब्ध होती. त्या कैसेटचा आणि जळगावचा काडीचा संबंध नव्हता. विधानसभाध्यक्ष स्व. चौधरी आणि नंतर खडसेही त्यावर कधी बोलले नाहीत. जळगाववर मात्र लैंगिक बाजाराचा शिक्का तेव्हापासून बसला.

अश्लिल कृत्यांची प्रत्येक चित्रफित अनैतिक असतेच असे नाही. स्त्री-पुरुषातील संमतीचा मामला कोणीही चोरून रेकॉर्ड करीत असेल आणि नंतर त्याचे भांडवल करीत असेल तर त्याला ब्लैकमेलर म्हटले जाते. संमतीचा मामला जर बळजोरीचा असेल, कुठल्या धाक दडपशाहीचा असेल तर अत्याचार पीडित महिला इन कैमेरा तक्रार करू शकते. अशा प्रकारच्या एका खोट्या प्रकरणाचा अनुभव माजी आमदार दिलीप वाघ यांनी घेतला आहे. त्या प्रकरणाला हवा विरोधकांनी दिली होती. वाघ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. संमतीचा मामला असूनही माजी खासदार ए. टी. पाटील यांच्या विरोधात कुभांड रचले गेले. हा प्रकार केवळ आणि केवळ पाटील यांची लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी कापण्यासाठी घडला. तो सुद्धा भाजपतील लोकांनीच घडवला. सामान्य मतदाराला यामुळे काहीही फरक पडला नाही.

खडसे यांनी राजकारणाचा नवा सारीपाट मांडताना सीडी प्रकरण असेच समोर आणले आहे. हे फार बरे झाले. आता खडसेंकडे कोणाची तरी अश्लिल वा अनैतिक सीडी आहे हे नक्की. फक्त तिचा वापर जनसेवेसाठी होतो की वैयक्तिक लाभासाठी होतो, हे काळच दाखवेल. जळगाव जिल्ह्यात यापुढे अशा सीडींचे पेव येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील यांनी याच गलिच्छ विषयाची हनी ट्रैप म्हणत तक्रार केली आहे. विनोद देशमुख हे अशाच विषयामुळे त्रस्त झालेले होते. जळगावच्या राजकारणात भयावह पर्व सुरू झाल्याची ही नांदी मानावी का ??

(टीप - दादा व भाऊ हे दोघे एकमेकांची कुंडली हाती असल्याचे भासवत होते. काय होते ते प्रकरण ? जामनेरजवळ सहकारातून स्टार्च प्रकल्प उभारला जात होता. त्याची मशिनरी खरेदीचा ठेका कंपनीला द्यायचा होता. कमिशन होते जवळपास एक कोटी रुपये. जो अॉर्डर देईल त्याच्या खिशात ते जाणार होते. हा विवाद वरिष्ठ नेत्यांकडे गेला. मशीन आले आणि लागले. पण कमिशन कुठे गेले ? हा ना दादांनी सांगितले ना स्व. भाऊ सांगून गेले.)

No comments:

Post a Comment