Wednesday 3 June 2020

कर्तव्य भावनेतून सामाजिक दायित्व

कोरोना विषाणूचा सामुहिक स्वरुपातून होणारा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात किमान ७२ दिवसांचा लॉकडाऊन संपला आहे. नव्या संहारक विषाणुंमुळे उद्भवलेल्या महामारीच्या भीतीपोटी देशातील सार्वजनिक अर्थ, उद्योग, व्यापार व त्याअनुषंगाने होणारे व्यवहार बंद झाले. ही स्थिती किती दिवस असेल याची शाश्वथीती नव्हती. पण साथरोग नियंत्र कालावधी साधारणतः ७२/७६ दिवसांचा असेल हा अंदाज होता. पंतप्रधानांनी दि. ३१ मेस पहिला अनलॉकडाऊन घोषीत केला आणि जवळपास ७२ दिवसांची अनिश्चितता संपली. यानंतर अऩेक ठिकाणी गरजुंसाठी सुरु असलेले मदत काय्त थांबविण्यात आले आहे.

या आपत्तीजनक लॉकडाऊनच्या स्थितीत समाजातील सामान्य, कामगार, दुर्बल, गरजवंत, रोजंदार, नोकरदार अशा घटकांच्या पोषण-भरण, आरोग्य, संरक्षण आणि सुरक्षा याचे अनेक प्रश्न उद्भवले. काम नाही, रोजगार नाही तर हाती पैसा नाही. पैसा नाही तर घरात किराणा नाही. किराणा नाही तर दोनवेळ खाण्याची भ्रांत. अशा विवंचनेतील घटक हजारोच्या संख्येत. शेवटी गरजवंताला दोनवेळचे भोजन वा शिधा द्यायाला विविध संस्था, संघटना समोर आल्या. समाजसेवेची ही अनोखी चळवळ उभी राहीली. दातृत्वाला कर्तव्य आणि दायित्वाचे संवेदनशील पांगारे फुटले. सामुहिक रुपात समुहांच्या सौहार्द आणि औदार्याचे नवे कार्य उभे राहिले.  जळगावसारख्या निम्न महानगरात रोज हजारो दुर्बल व गरजवंतांना शक्य ती मदत शेकडो अनामिकांच्या परिश्रमातून उपलब्ध झाली. यात जैन उद्योग समुहाने समाजाप्रति कर्तव्याची कृती करीत आपले मूठभराचे दायित्व निभावले. 

जैन उद्योग समूह अंतर्गत जैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमीटेड, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरातील गरजवंतांसाठी ६० दिवसांची भोजन पाकिटे पुरविण्याची सेवा दिली गेली. या सेवेसाठी शहरातील सामाजिक व स्वयंसेवी संस्था यांच्या २००/२२५ पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी वेळ, श्रम आणि गरजेएवढे वित्त खर्च केले. येथे एक मुद्दा फारच महत्त्वाचा आहे. तो म्हणजे, कोरोना संसर्गाची भीती असतानाही सामाजिक कार्यकर्ते गल्लीबोळात जाऊन, उन्हातान्हात  भोजन पाकिटे गरजुंना रोज वेळेवर देत होते. कोणत्याही कारणामुळे हे काम रेंगाळले नाही. रोजच्या सेवेतील कोणीही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह झाली नाही.

जळगावमधील सामायिक कर्तव्य आणि दायित्व निभावण्याचे हे आशादायक चित्र मानायला हवे. आपत्तीवर मात करीत गरजुंना मदतीसाठी एकत्र येणे, सहकार्य करणे, एकाच दिशेने व हेतुने कृती करणे व लक्ष साध्य करणे यासाठी समाज संघटन उत्तमपणे होऊ शकते हे सिद्ध झाले. असेच संघटन आम्ही जळगावकर, आमचे जळगाव, जळगावसाठी नियोजन आणि नियोजनात सहभाग यासाठी करता येईल का ? यावर स्वतंत्रपणे विचार व्हायला हवा. अर्थातच विधायक आणि विकासक विचारांच्या मंडळींनी यासाठी वेळ दिला पाहिजे.



लॉकडाऊन  दि. २३ मार्च पासून सुरु झाले. त्याचा परिणाम आठवडाभरात दिसू लागला. शहरातील गरजवंतांना हाताला काम नाही, रोजगार नाही, पैसा नाहीआणि घरात शिधा नाही अशा स्थितीत उपवासाची वेळ आली. ही बाब लक्षात घेऊन दि. २ एप्रिलपासून जैन उद्योग समुहाने आपापल्या क्षमतेनुसार शहरातील विविध घटकांसाठी सेवा, मदत देणे सुरु केले. ७ वेगवेगळ्या सेवांमधून जैन उद्योग समुहाने कर्तव्यातून दायित्व निभावले.

सर्वांत अगोदर जळगाव मनपाला विषाणू प्रतिबंधासाठी रसायन फवारणी करता यावी म्हणून कंपनीच्या अग्नीशमन बंबावर फवारणी तंत्र लावावे लागले. या बंबामुळे शहरात सर्वत्र फवारणी तर झालीच पण रुग्ण आढळलेला भाग प्रतिबंधित करताना तेथेही फवारणी झाली. यानंतर जैन उद्योग समुहाने कोवीड १९ विषयी सर्वंकष माहिती देणारी पुस्तिका प्रसिध्द केली. या पुस्तिकेचे वाटप जवळपास लाखभर घरांमध्ये केले गेले. 

जैन उद्योग समुहाने शहरातील गरजुंना रोज सकाळी ६ हजार व सायंकाळी ३,५००  भोजन पाकिटे वाटप केली. नंतर सरासरी रोज ११००० भोजन पाकिटे देण्यात येऊ लागली, यात कंपनीतील किचन सेवेतील, जैन स्पोर्ट ॲकेडमीतील, चेअरमन अॉफीसमधील जवळपास १००/१५० जण परिश्रम घेत होते. या सेवेत दिवसाचा खंड पडला नाही. व जेवणही उशीरा पोहचले असे घडले नाही. दिवसाला माणशी कमाल ४ पोळ्या, भाजी व चटणी सायंकाळी  ४०० ग्रॅम खिचडी दिली जात होती. हातमजुरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या आदिवासी भागातील कुटुंबासाठी गरजेनुसार शिधा वाटप केला जात होते. ३ वेळा आमरस, १ वेळी चुर्मा लाडू, १ वेळा पावभाजी, १ वेळा शिरा व १ वेळा वडापाव दिला. अर्थात भोजन तयार करणे, पॅकींग व पोहचविणे यात सर्व नियम, अटींचे पालन केले गेले. 

जैन उद्योग समुहाने लॉकडाऊन काळात जिल्हा रुग्णालय, पालिका रुग्णालय या ठिकाणी आरोग्य सेवेत अथक व्यस्त असलेले डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी, वाहतूक व सुरक्षा सेवेत कार्यरत पोलीस आणि होमगार्ड, सफाई करणारे कामगार, कार्यालयांमधील कर्मचारी तथा माध्यम क्षेत्रातील पत्रकार अशा जवळपास १ हजारावर लोकांना रोज जैन फार्म फ्रेशचे 'फ्रुट टू गो' चे वाटप केले. हा आंबा रसाचा प्रक्रिया केलेला प्रकार असून शरीरातील ऊर्जा व उत्साह टिकवून ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरते. याबरोबरच गरजुंना किराणा मालाच्या रुपात शिधा वाटप केला गेला. त्यात गहू, तांदूळ, तेल, डाळ, फार्म फ्रेश मसाले, साबण आदी साहित्य दिले. 

जिल्हा रुग्णालय येथे रुग्ण, नातेवाईक यांचेसह इतरांचा वावर असतो. तेथे उपचार होत असला तरी तेथेच विषाणुच्या संसर्गाची शक्यता असते. असाच प्रकार जिल्हा कारागृहाजवळ असतो. तेथेही वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन जैन उद्योग समुहाने जिल्हा रुग्णालय व जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझर फवारा कक्ष उभारला. यातून जाणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर विषाणू प्रतिबंधक रसायनमिश्रीत पाणी फवारले गेले.  

शहरातील कायदा व सुरक्षा यासाठी विविध भागात जोखीम घेऊन शिरणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित व्हॅनमध्ये निर्जंतुकीकरण उपकरण लावण्यात आले आहे. जैन इरिगेशनच्या २अग्निशमन बंबावर रसायन फवारणीची विशेष यंत्रणा बसवून जळगाव शहरातील वसाहती, रस्ते, गल्ली-बोळमध्ये फवारणी केली गेली. या यंत्रणेद्वारे असलेल्या १०० फुटापर्यंत रसायन फवारणी केली गेली. त्यामुळे कमी कालावधीत अधिक भागात  निर्जंतुकीकरण करणे शक्य झाले. यासाठी महापौर, आमदार व मनपा प्रशासनाचे सहकार्य लाभले आहे.

जैन उद्योग समुहाच्या या कर्तव्य परायणतेचा वसा उद्योगाचे संस्थापक, प्रणेते श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संस्कार, विचार व कृतीतून पुढील पिढ्यांनी स्वीकारला आहे. श्रद्धेय मोठेभाऊ म्हणत, दान हे भावनेतून दिले जाते. त्याबदल्यात प्राप्तीची अपेक्षा आहे. पण कर्तव्य हे जबाबदारीतून आणि दायित्व हे कृतीतून निभावले जाते. हाच विचार अंगिकारुन अशोक जैन व त्यांचे बंधू अजीत, अनिल व अतुल यांनी बहुतांशवेळा अनुकूल आणि अपवादाने प्रतिकूल स्थितीत समाजाप्रति सेवा कार्य सुरुच ठेवले आहे. जैन उद्योग समुहासमोरील आर्थिक अडचणींचे पर्व संपलेले नाही. कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊनमुळे आणखी अडचणी व त्यातून सावरण्याचा काळ वाढेल. हे वास्तव आहे. त्याची झळ जैन कुटुंबासह कर्मचारी, कामगारांनाही बसते आहे. मात्र परीक्षा पाहाणाऱ्या या स्थितीतही जैन उद्योग समुहाचे संचालक, कर्मचारी आपला कर्तव्य आणि दायित्वाचा वसा जपून आहेत. 

जैन उद्योग समुहाने कोरोना कहरच्या पहिल्या टप्प्यात निभावलेली कर्तव्यासह दायित्वाची जबाबदारी जिल्ह्याच्या इतिहासात निश्चितपणे नोंदली गेली आहे. अशा प्रकारच्या नोंदी जळगावच्या भावी पिढीत दातृत्वाचा सजग, सामंजस्यपूर्ण आणि सक्रिय संस्कार रुजवणे, वाढविणे आणि जोपासणे यासाठी प्रेरणा देत राहिल. अर्थात सोबत श्रद्धेय भवरलाल जैन यांची भावी पिढी असणार याविषयी शंका नाही.

No comments:

Post a Comment