Tuesday 19 May 2020

कोरोनातून बरे झालेल्यांची समाजवापसी ?

कोरोनातून बरे होणाऱ्यांसाठी कोणते आहेत प्रश्न ?
'कोरोना सोबतची जीवन व कार्यशैली' या विषयावर सर्वप्रथम लेखन केले. नंतर अनेकांनी कोरोनाला स्वीकारुन पुढे जायला हवे, असा सल्ला द्यायला प्रारभ केला. कोरोना विषाणू पुढील काही काळ मानव समाजासमोर कर्दनकाळ म्हणून उभा राहणार हे निश्चित आहे. उरलेला आयुष्य लॉकडॉऊनमध्ये काढणे शक्य नाही. त्यामुळेच कोरोना विषाणू आहे, हे स्वीकारुन जीवन व कार्यशैली स्वीकारावी लागेल असे मत काल मांडले. अशा जीवन व कार्यशैलीतील आणखी एक प्रश्न 'आ' वासून समोर उभा ठाकणार आहे. तो म्हणजे, 'कोरोनातून बरे झालेल्यांची समाजवापसी कशी होणार ? समाज त्यांच्याशी कसा वागणार ?' अर्थात हे प्रश्न दोन्हीबाजुंनी आहेत. म्हणजे, कोरोनाशी संबंधित आजारातून बऱ्या झालेल्या (निगेटीव्ह अहवाल असलेल्या) रुग्णाने समाजात कसे वावरावे आणि समाजाने अशा व्यक्तीला कसे स्वीकारावे ?

कोरोनाच्या रुग्णांची जगभरातील वाढती संख्या आणि रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण लक्षात घेता आता तीन वेगवेगळ्या गटात समाज विभागला जाणे निश्चित आहे. या तीन गटात जात, कूळ, धर्म, पंथ आणि लिंग हा भेद गळून पडेल. मग समाजाची विभागणी कशी असेल ? तर पहिला गट ज्यांना कोरोनाची बाधा झालेली (निगेटीव्ह) नाही. दुसरा गट कोरोनाची बाधा झालेल्यांचा (पॉझिटीव्ह) आणि तिसरा गट कोरोना बाधा होऊन बरे झालेल्यांचा (कोरोना कॅरियर बट निगेटीव्ह).

या तीन गटांपैकी कोरोना निगेटीव्ह राहण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी सरकारी पातळीवरुन, समाज माध्यमातून सतत प्रचार-प्रसार सुरु आहे. दुसऱ्या गटातील पॉझिटीव्ह रुग्णांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय  सुविधांच्या उभारणीवर प्रचंड खर्च होतो आहे. स्वतंत्र विमा सुरु झाला आहे. सुदैवाने कोरोना बाधेतून मुक्त होऊन (पॉझिटीव्ह नंतर निगेटीव्ह झालेले रुग्ण) माणसांमध्ये, कुटुंबात परतणाऱ्यांची संख्या वाढते आहे. हा नवा गट समाजात तयार होतो आहे. या गटातील लोकांना स्वीकारावे कसे आणि त्यांच्याशी वागावे कसे ? हा नवा आणि कळीचा प्रश्न जगभरासमोर आहे.

कोरोना आजार जीवघेणा असल्याचा प्रचार-प्रसार जगभर होतो आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा रतीब माध्यमे घालत आहेत. त्यातुलनेत कोरोनातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांच्या बातम्यांना अजून जागा (स्पेस) मिळालेली नाही. कोरोना आजारात 'आयसीयू'मध्ये मृत्यूच्या भयाकडे नेणारा एकांत भोगावा लागतो असे सत्य कथन राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीरपणे केले आहे. अर्थात, याच अवस्थेतून प्रत्येक रुग्णाला जावे लागते. मानसिकदृष्ट्या खचलेपणाची शंका मनात निर्माण होत असताना पुन्हा नव्याने उभे राहण्याचा निर्धार करुन बाहेर यावे लागते. अशाप्रकारे बाहेर येणारे शेकडो, हजार व नंतर लाखो असतील. त्यातले काही कुटुंबात, नातेवाईकात, मित्र परिवारात, गल्ली, मोहल्ला, कॉलनी, शहर, राज्य व देशात असतील. अशा बरे झालेल्यांशी वागावे कसे ? व्यवहार करावा कसा ? असे प्रश्न समाजमनाला अस्वस्थ करीत राहणार.

कोरोना मुक्त होण्याचा वैद्यकीय उपचारांचा कालावधी किमान १५ दिवसांच्या एकांतवासाचा आहे. या कालावधीत किमान दोन वेळा कोरोना टेस्ट केली जाते. जर तपासणी अहवाल निगेटीव्ह आले तर रुग्णालयातून घरी परतायला परवानगी मिळते. मात्र, घरी आल्यानंतरही ५ ते १४ दिवसांचा एकांतवास पाळायचा आहे. या काळात २ वेळा वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणी अहवाल निगेटीव्ह असला तरी बरा झालेला रुग्ण किमान ५ दिवस काही प्रमाणात कोरोना विषाणूचा वाहक (कॅरीयर) असतो. अर्थात, या संबंधी अजूनही केस स्टडी सुरु असून निश्चित निष्कर्ष समोर आलेले नाहीत. म्हणूनच रुग्णालयातील १५ दिवस आणि घरातील माणसांसोबतही एकांतात १५ दिवस असा महिनाभराचा हा कालावधी आहे. परंतु श्वसनाचा त्रास, कफ, थकवा यातून सावरायला आणखी वेळ लागू शकतो. आंतरराष्ट्रीयस्तरावर कोरोनाग्रस्ताला पूर्णः बरे होण्यासाठी कमाल ६० ते ७५ दिवस लागत असल्याचे अहवाल आहेत.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना कुटुंबातील लोकांनी अगोदर स्वीकारावे लागेल. एक तर नाते आहे म्हणून किंवा लोक लाजे खातर. परंतु समस्या त्यापुढील आहे. अशा बऱ्या झालेल्या व्यक्तीला शेजार, मित्र आणि सेवा-कार्याच्या स्थळी कसे स्वीकारले जाईल ? अलिकडे बरे झालेल्या काही रुग्णांनी स्वतःचे अनुभव कथन करताना मानहानी, अवमान व अपमानाचे काही विषय समोर मांडले आहे. यापूर्वी टीबी वा एड्सग्रस्तांच्या अशा कहाण्या आपण ऐकल्या आहेत. परंतु टीबी व एड्स हे स्पर्श, सोबत अशातून संक्रमित होत नाही हे काही दशकांनी लोकांना समजले. परंतु कोरोना हा तर पूर्णतः संपर्कातून संक्रमित होतो हे नक्की झालेले आहे. शिवाय कोरोनाचे विषाणू मरत नाहीत तर त्यांच्यावर पांढऱ्या लढाऊ पेशी मात करतात. त्यानंतर कोरोना विषाणू सुप्त, अशक्त, निष्क्रिय वा निरुपद्रवी अवस्थेत राहतो. ती अवस्था निगेटीव्ह अहवालात येते. याचा साधा सोपा सरळ अर्थ हाच की, रुग्णाची प्रातिकारशक्ती बळावली की कोरोना विषाणू हतबल होतो.

भारतीय समाजाला दुसऱ्याला दोष लावणे, दुसऱ्याकडे बोट दाखविणे याची सवय आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले त्या भागाला कोरोना गल्ली, कोरोना सुसाईड बॉम्ब, कोरोना कॉलनी, कोरोना हाऊस असे उल्लेख करीत टोमणे मारणारा मोठा वर्ग समाजात आहे. फेसबुक सारख्या समाज माध्यमात अशा वर्गाला ट्रोलर म्हणजे शब्दांनी धक्काबुक्की करणारे गुंड मानले जाते. हे गुंड फेसबुक वॉलवर असतात तसे ते गल्लीत, चौकात व नाक्यावर असतात. अशा लोकांकडून अवहेलना मिळत असल्याच्या प्रतिक्रिया कोरोनातून बरे झालेले रुग्ण सध्या व्यक्त करीत आहेत. सध्या ही मंडळी घरीच आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर ते जेव्हा कामावर, कर्तव्याच्या ठिकाणी जातील तेव्हा नवे भयंकर प्रश्न निर्माण होतील. अशा प्रकारच्या समस्येतून आत्महत्येचा पर्यायही वाढू शकेल. कुटुंबात दबलेल्या स्थितीत आणि घराबाहेर उघडपणे अवमान, संशय घेऊन जगणे असह्य होऊ शकेल. भीती आहे ती अशा संभाव्य निष्कर्षाची.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची समाजवापसी हा विषय आता जागतिक अजेंड्यावर आहे. कारण जगाचे व्यवहार पुन्हा वाहने, मोटार, रेल्वे, जहाज व विमानातून सुरु झाले की, कोरोनाग्रस्त, कोरोनामुक्त आणि कोरोनापासून लांब अशा साऱ्यांची गुंतागुंत सुरु होणार आहे. बहुधा जगाच्या पातळीवर कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना स्वतंत्र ओळखपत्र वा प्रमाणपत्र जवळ बाळगावे लागेल. यासाठी इम्युनिटी पासपोर्ट वा रिस्क फ्री सर्टिफिकेट शब्द चर्चेत आहेत. सामाजिकस्तरावर अशा रुग्णांसाठी कामाची जागा, प्रवास, हॉटेल, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर, वस्तुंचा वापर आणि एकत्रित वावर याविषयी काही सक्तीचे नियम केले जातील. याविषयी आंतराष्ट्रीय समुदाय सध्या विचार करीत आहे. एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर जर रुण्ग बरा होऊन त्याचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला तर तो दुसऱ्यांदा पुन्हा कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता आहे का ? याविषयी सध्या संशोधन सुरु आहे. काही ढोबळ निष्कर्ष समोर आहेत पण त्याचा विचार केला तर आता विनाकारण घबराट निर्माण होऊ शकते.

सध्या सर्वच प्रकारची व्यवस्थापने आणि व्यवस्था यांनी कोरोनाग्रस्ताला बाजूला काढून एकांतात पाठवायचा सक्तीचा प्रस्ताव दिला आहे. पण कोरोनातून बरे झालेल्या रुण्णाला पुन्हा सोबत घेण्याविषय अजूनही सरकारीस्तरावर विचार नाही. कोरोना पलटी मारतो का ? तो पुन्हा संक्रमित होऊ शकतो का ? या दोन समस्यांचा अंदाज संशोधन पातळ्यांवर घेणे सुरु आहे. अशा वेळी कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांनीच रुग्णाला सर्व प्रकारचे मानसिक, शारीरिक व व्यवस्थेच्या अनुकूलतेचे पाठबळ द्यायला हवे.

यावर घाबरून नव्हे तर स्वीकार्ह पर्यायांचा विचार करावा लागेल. कारण कोरोना कोणाला सुपात ठेवेल आणि कोणाला केव्हा जात्यात घालेल ? हे सांगता येत नाही.

(आरोग्यासाठी इशारा - हा मजकूर कॉपी पेस्ट करू नये. यातील कोरोना या शब्दात व्हायरस सोडलेला आहे. कॉपी पेस्ट करताना तो ॲक्टीव्हेट होतो.)

No comments:

Post a Comment