Sunday 17 May 2020

कोरोनासोबतची जीवन व कार्यशैली !

संपूर्ण जगाला भयंकर साथीच्या संसर्गातून घोषीत बंदीच्या स्थितीत नेणारा कोरोनाचा विषाणू पुढे किती काळ मानवाला घाबरवत राहील याचा अंदाज लावणे आज शक्य नाही. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गेले ६० दिवस संपूर्ण भारतातील जनजीवन ठप्प करण्यात आले आहे. त्यात आणखी १५ दिवसांचा कालावधी वाढवला आहे. साथरोग रोखण्यासाठी अपेक्षित  ७५/७६ दिवसांची मर्यादा दि. ३१ मे पर्यंत पूर्ण होईल. हे करूनही कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईलच याची शक्यता कमीच. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी वा नष्ट करण्यासाठी मुखावाटे घेण्याचे किंवा इंजेक्शन, सलाईनद्वारे टोचून घेण्याचे औषध सध्या तरी जगभरात कुठेही उपलब्ध नाहीच. म्हणजेच आहे त्या स्थितीत पुढील काळात वा दैनंदिन कामे व जबाबदाऱ्यांकडे प्रत्येकाला जावे लागणार आहे. मरणाच्या भीतीपोटी थबकलेल्या जगाला संभाव्य मृत्यू उरावर धरून धावणे सुरू करावेच लागेल. इच्छा असो वा नसो प्रत्येकाला धावावेच लागेल.


निर्माण झालेल्या या अपरिहार्य स्थितीत कोरोनाला घाबरुन न जाता त्याच्यासोबत जगण्याचे सावध व आरोग्य संरक्षित कौशल्य प्रत्येकाला आत्मसात करावे लागेल. 'कोरोनापासून लांब' हेच बचावाचे सूत्र पुढील काळातील सर्वच ठिकाणच्या कार्यशैलीचे असणार आहे. विविध क्षेत्रातील संभाव्य आणि जीवनशैली बदलाची चर्चा अनेक मान्यवरांनी केली. पण कोरोना सोबत कसे जगावे लागेल याविषयी फार कोणी अजून बोललेले नाही. ते समजावण्याचा प्रयत्न या लेखात आहे.

काय आहे कोरोना विषाणू ?

कोरोनाचा विषाणू हा जैविक आहे की अजैविक आहे, हे सुद्धा शास्त्रज्ञ निश्चित करू शकलेले नाहीत. हा विषाणू जीवशास्त्रच्या भाषेत अती सुक्ष्म जीव आहे की भौतिकशास्त्रानुसार एखादा अती सुक्ष्म घटक आहे ? हे अद्याप नक्की झालेले नाही. कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. यापैकी सहा प्रकारचे विषाणू मानवाला बाधा करु शकतात. या सहा बरोबर आता सातव्या विषाणूचा शोध लागला आहे. चारही बाजुने खुट्यांसारखे आवरण असलेला हा विषाणू मानवी शरीरात नाक, मुखावाटे प्रवेश करतो. तो फुफ्फुसात पोहचला की तेथे विस्तारतो. फुफ्फुसाचे श्वास घेणे आणि सोडणे हे कार्य विषाणूमुळे मंदावू लागते. श्वास कमी कमी होऊ लागला की रुग्णाची तडफड होते आणि तो मृत्यूकडे सरकत असतो.

काय आहेत आजाराची लक्षणे ?

नाक व तोंडावाटे श्वसनाच्या त्रासासोबत रुग्णाला ज्वर वा ताप चढतो. माणसाचे सरासरी तापमान ३८ अंश सेंटीग्रेड वा ९८ अंश सेल्सिअस असते. त्यापेक्षा ते वाढते. सोबत थंडी वाजते, थकवा येतो वा कमजोरी वाटते, सर्दीसह खोकला बळावतो. हा खोकला बहुतेकवेळा कोरडा असतो. तो दिवसभर किंवा ठराविक वेळेला ऊबळ आल्यासारखा येतो. कोरोनामुळे उद्भवणाऱ्या आजाराची लक्षणे ही नेहमीच्या थंडी-ताप आजारासारखी आहे. मुदतीचा ताप, हिवताप, अतिसार अशा आजारांची प्राथमिक लक्षणेही थंडी, ताप, खोकला अशीच असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग ओळखायचा तर श्वासाचा घसा आणि नाकातील कापसावर घेतलेला नमुना किंवा नळीद्वारे फुफ्फुसातील घटकांचा घेतलेला नमुना यासह थुंकी, कफ याची तपासणी गरजेची असते. सरकारी प्रयोगशाळांमध्ये ही तपासणी सध्या मोफत आहे. खासगी प्रयोगशाळांमध्ये ती महागडी (सरासरी ३ हजार रुपये) आहे. सरकारी प्रयोगशाळेतून तपासणी अहवाल ५/६ दिवसांनी उपलब्ध होतो. हा प्रतिक्षेचा काळ धोक्याचा असतो. कोरोनोचा आजार ७ ते १४ दिवसात बळावतो. पण रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी असेल तर हा कालावधी कमी होऊ शकतो. अशावेळी रुग्णाने काय काळजी घ्यावी ? याच गोष्टी महत्वाच्या आहेत.

कोणती औषधे सुरूच ठेवावीत ?

कोरोना विषाणूला थेट नष्ट करेल असे कोणतेही औषध सध्यातरी नाही. पण कोरोनाबाधेमुळे उद्भवलेली लक्षणे पाहून त्या आजाराचा प्रादुर्भाव कमी करणारी औषधे रुग्णाने घेत राहावीत असा सल्ला अनेक आरोग्य संघटनांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णात श्वसनातील अडथळ्यांसह ताप किंवा थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे अशी लक्षणे दिसतात. अशा आजारांच्या प्रतिबंधासाठी जी नियमित औषधे रुग्ण घेतात तीच औषधे घेत राहावीत असे वैद्यकीय तज्ञ म्हणतात. पाश्चात्य देशात कोरोना रुग्णांवर केलेल्या बहुविध उपचारातून हिवतापावरील औषधे हायड्रोक्लोरोक्विन व क्लोरोक्विन गुणकारी असल्याचे म्हटले आहे. याशिवाय वेदनाशामक आयब्रुफेन वा ॲसेटामिनोफेन औषध, कफ सायरप, ताप कमी करणारी औषधे रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हवीत. याबरोबर पुरेसा आराम, गरजेचा व्यायाम केला तर कोरोना मुक्त होण्याची खात्री आहे. यासाठी रुग्णाचा तपासणी अहवाल लवकर मिळायला हवा. अहवाल मिळण्याच्या प्रतिक्षेच्या काळात आजार बळावण्याची शक्यता असते. काळजी घेण्याचा हा काळ असतो. याबरोबर एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. तो म्हणजे, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण बाधीत रुग्णांच्या तुलनेत अवघे १ ते २ टक्के आहे. दुर्लक्ष केले म्हणून गंभीर अवस्थेत पोहचणारे रुग्ण ६ ते ७ टक्के आहेत. या आकडेवारीची तुलना बाधित वा संशयित रुग्णांशी केली तर मृत्यूचे भय नक्कीच कमी होते. माणसाने खंबीर मानसिकता ठेऊन व संरक्षित आरोग्य सेवांचा लाभ घेत स्वतःला सावरले तर कोरोना हा सक्रिय अवस्थेतून निष्क्रियावस्थेत जातो. ही रोग मुक्त होण्याची स्थिती नसली तरी विषाणूला निष्क्रिय करणारी अवस्था आहे. कोरोना विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी दैनंदिन कार्यशैलीत सक्तीने काही बदल करावेच लागतील.

घराबाहेर घ्यायची काळजी

घरातील सर्व सदस्य कोरोना संरक्षित असतील तर घराबाहेर वावरताना प्रत्येकाला काळजी घ्यावी लागेल. त्यानुसार प्रत्येकाला नाक आणि मुख संरक्षणासाठी चांगल्या दर्जाचे मास्क घालावे लागेल. घराबाहेर शक्यतो हातमोजे वापरावेत. ते सुध्दा कोपरापर्यंत लांबीचे. कोणत्याही ठिकाणी तळहात वा शरीराचा कोणताही भाग टेकवण्याची वा इतरांना थेट स्पर्श करण्याची गरज नाही. वस्तू खरेदी वा देवाण घेवाण करताना हातात मोजे असावेत. वस्तू, भाजीपाला घरात आणण्यापूर्वी सैनिटाईज करावी किंवा धुवून स्वच्छ करावी. घरात परत आल्यानंतर सैनिटायझरने तळ हात व कोपरापर्यंत धुवावेत. मास्क जर पुनर्वापराचे असतील तर ते सुद्धा स्वच्छ धुवावेत. कार्यालय, दुकाने, मॉल, घर अशा कोणत्याही ठिकाणी प्रवेश करताना व बाहेर पडताना सैनिटायझरने हात धुवावेत. या पुढील काळात घराबाहेरील कोण्याही व्यक्तीशी संवाद करताना दोघांमधील अंतर किमान सहा फूट असावे किंवा दोन हातांचे अंतर असावे. हाच नियम दोन पेक्षा जास्त माणसांच्या संपर्कावेळीही हवा. याबरोबरच प्रवासाचे वाहन प्रवासापूर्वी व नंतर सैनिटाईझ करणे आवश्यक असेलच. अनोळखी ठिकाणी खाणे, पीणे, बसणे टाळावेच लागेल.

कोरोनाचा विषाणू बाधीत व्यक्तितून दुसऱ्या व्यक्तीत किती वेळेत संक्रमित होतो ? हे लक्षात घ्यावे. तज्ञ मंडळींनी हा काळ ३० मिनिटांचा दिला आहे. अपवादाने हा काळ दहा मिनिटांचा आहे. म्हणजेच आपण इतरांशी बोलत असताना कमीत कमी ९ तर जास्तीत जास्त २९ मिनीटात भेट, चर्चा वा संवाद आटोपावा. यासाठी मोबाईलवर टाईमरचा वापर करावा. यापुढील काळात व्यक्तीगत जीवनशैलीत हा बदल खूप महत्त्वाचा असेल.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा व सरकार ज्या अटी घालते त्याचे पालन करावेच लागेल. कोरोना संशयित रुग्णांच्या संपर्कात थांबू नका. कोरोना रुग्णाच्या मृत्यू वा अंत्यविधी ठिकाणी नात्यातील गडद स्नेहबंध तपासूनच हजेरी लावा, हे कणखरपणे अंगिकारावे लागेल. या पुढील काळात 'लोक काय म्हणतील ?' या चिंतेपेक्षा 'माझे काय होईल' हाच विचार सतत करा.

नव्या जीवनशैलीचा नवा मंत्र आहे, 'जन्मलेल्या पासून, जीवंतपासून आणि मृतापासून दोन हात लांब'

(आरोग्यासाठी इशारा - हा मजकूर कॉपी पेस्ट करू नये. यातील कोरोना या शब्दात व्हायरस सोडलेला आहे. कॉपी पेस्ट करताना तो ॲक्टीव्हेट होतो.)

2 comments:

  1. आदणीय सर आपण सुचविलेले उपाय उपयुक्त आहेत

    ReplyDelete
  2. खुप छान लेख

    ReplyDelete