Wednesday 13 May 2020

नाथाभाऊ, त्या ५५ फाईलींचा विषय काय ?

नाथाभाऊ किती दिवस पक्षांतरासाठी वेळ पाहाणार ?
भाजपमधून नाथाभाऊंनी (एकनाथराव खडसे) स्वतःची गच्छंती घडवून आणावी म्हणून शेवटचा डाव टाकला गेला आहे. भाजपने नाथाभाऊंना काय काय दिले ? याची मोजदाद चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. शिवाय, नाथाभाऊंनी खंजर खुपसला असे धक्कादायक विधान केले आहे. पाटील यांचे समर्थन गिरीशभू महाजन यांनी उघडपणे करीत पक्षाने खडसेंना भरपूर दिले असा प्रहार केला आहे. हाच भाजपचा अंतिम डाव आहे. पक्षातून हकालपट्टी होत नाही पण संघ परिवाराच्या इशाऱ्यानंतर पक्षाने नालायक ठरवलेल्यांची आता 'पत' नाही हे दाखवून द्यायला काही बिनीचे शिलेदार शाब्दीक हल्ले करीतच असतात. नाथाभाऊ विषयी ४ वर्षांपूर्वी सुरू झालेले 'कुजबूज अभियान' आता 'भोंगा अभियान' झाले आहे. पक्षातील ठराविक मंडळी अगोदर कानात सांगत होती, नाथाभाऊ पक्षात संपले. आता संपविण्याची शेवटची अवस्था आहे. पक्षावर हवे तेवढे तोंडसुख घेऊन झाले की, नाथाभाऊंना पक्ष सोडावाच लागेल. नाहीतर आहेच व्यासपिठावर शेवटची रांग. नाहीतर सभागृहात पहिली रांग आणि वारंवार ओरडणारे मूठभर कार्यकर्ते, 'नाथाभाऊ आगेबढो, हम थोडे बहुत आपके साथ है'

भाजपची मोठी गंमत आहे. या पक्षात सेनानिवृत्ती ही गोड बोलून व संभ्रमित ठेऊन दिली जाते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह ही ठराविक उदाहरणे. उत्तर महाराष्ट्रात धरमचंद चोरडीया, डॉ. दौलतराव आहेर, डॉ. विजय गावित ही काही उदाहरणे. भाजपत नेतेपदी असताना स्वतः ठरवून निवृत्ती निश्चित केल्याची केवळ तीन उदाहरणे आहेत. पहिले अटल बिहारी वाजपेयी, दुसरे उत्तमरावनाना पाटील यांचे. या दोघांनी सर्वोच्च पदांवर असताना स्वतःच बाजूला होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांना कोणतीच रांग दाखविण्याचे धारिष्ट्य कोणाचेही झाले नाही. तिसरे उदाहरण सुषमा स्वराज यांचे आहे. पक्षाची सत्ता असताना मंत्रीपद नाकारुन त्या बाजूला झाल्या. ही उदाहरणे सोडली तर बाकीच्यांना बाजूला सारायला अगोदर दुर्लक्ष, नंतर कुजबूज, त्यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणणे, नंतर सभा, बैठकांमधून टाळणे, हळूहळू आरोपांची तीव्रता वाढवणे, दोघा-तिघांनी थेट आरोप करणे, आरोपांना उत्तरे देण्यास बाध्य करणे आणि नंतर स्वतःच स्वतःची गच्छंती घडवून आणणे हे सूत्र वापरले गेले आहे.

भाजपतही सत्तेत कमबैक करता येते अशी उदाहरणे आहेत. त्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर होते. त्यांनाही पक्षाने काही काळ बाजूला सारले. कुजबूज मोहिम सुरू झाली. पण फुंडकर यांनी मौन पाळले. त्यांनी हल्ले-प्रतीहल्ले केले नाही. अखेरीस त्यांना मंत्रीपद मिळाले. फुंडकर मौन राखून कमबैक करु शकले. नाथाभाऊंना मौनाचे महत्त्वच समजले नाही. मंत्रीपदाच्या अवघ्या दीडवर्षांत इतरांकडून किंमत वसूल करीत नाथाभाऊंनी कुटुंबासह सत्तेचा अमर्याद उपभोग घेतला. नाथाभाऊंकडे १४ खात्यांचे मंत्रीपद होते. त्यात सहकार, महसूल, कृषी खाते होते. जळगाव जिल्हा बँक, जळगाव जिल्हा दूध संघात ठाण मांडून बसलेल्या व अनेक घोटाळे केलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या फायली मंत्रालयात होत्या. चौकश्या आणि वेळप्रसंगी कारागृहाची भीती असल्यामुळे अनेक प्रस्थापितांनी नाथाभाऊसमोर शेपट्या घातल्या. फायलींच्या बळावरच नाथाभाऊंना घरात पदे आणता आली.

नाथाभाऊंसारखा अनुभवी नेता फायलींचे महत्त्व जाणतो.  नाथाभाऊंनी मंत्रिपदाच्या काळात केलेल्या काही व्यवहारांच्या ५५ फाईल्स अस्तित्वात आहेत, असे एक कुजबूज अभियान सध्या चर्चेत आहे. भाजपत एवढा अपमान सहन करुनही नाथाभाऊ पक्ष का सोडत नाहीत ? असा प्रश्न चर्चेत येतो तेव्हा या फाईलींची भीती उरावर असते म्हणे. सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांनीही कधी तरी या फायलींचा उल्लेख केला होता. यातील काही विषय केंद्र सरकारमधील मंत्रालयांशी संबंधित आहेत. ईडी सारखी यंत्रणा कधीही मागे लावून उत्पन्नाचे उत्खनन करता येते. बहुधा याच चिंतेतून नाथाभाऊ भाजप सोडू शकत नाहीत. ही आगतिकता ध्यानी असल्यामुळे भाजपतील छुटपूटमंडळीही नाथाभाऊंना टपली मारत आहेत.

नाथाभाऊ भाजपने केलेल्या अन्यायावर भरभरुन बोलतात. दाऊदच्या पत्नीला फोन कॉल या तथ्यहिन प्रकरणात नाथाभाऊंविषयी जनतेत सहानुभूती होती. ती आजही आहे. पण अंबानी, अदानी या उद्योजकांशी का बिनसले ? वक्फ बोर्ड जमीन भानगडी काय ? भोसरीत जागा घ्यायला ४/५ कोटी कुठून आणले ? काही व्यवहारात बोगस कंपनी कोणत्या ? अशी काही माहिती नाथाभाऊंनी स्वतःच सांगून टाकायला हवी. जेणे करुन ज्या ५५ फाईलींची चर्चा आहे, तिला पूर्णविराम मिळेल. चंद्रकांतदादा व गिरीशभू यांनी नाथाभाऊंच्या प्रतिमा भंजनाला थेट हात घातला आहे. अशावेळी नाथाभाऊ कुंपणावरुन किती दिवस बचाव करणार ? एकदा जाहीरपणे त्या ५५ फायली आहेत की नाही, हे सांगून  भाजपसंदर्भातील निर्णय घ्यायलाच हवा. नाथाभाऊंना कोणीही टपली मारावी, हे पाहणे व वारंवार तसे लिहिणे क्लेषकारक आहे.

नाथाभाऊंनी शिवसेनेत जावे

नाथाभाऊंनी भाजप सोडून कोणत्या पक्षात जावे ? याविषयी महासर्वेक्षण घेतले होते. जवळपास १५० वर समर्थकांनी पर्याय सूचविले. यात धक्कादायक बाब हीच की, भाजपने नाथाभाऊला भरपूर दिले. आता त्यांनी गप्प बसावे, असे मत व्यक्य करणारे ७५ आहेत. नाथाभाऊंनी शिवसेनेत जावे असे ३० जणांना वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय २५ जण सूचवतात. उरलेल्या २० मध्ये काँग्रेसहसह इतर पर्याय आहे. याचा निष्कर्ष एवढाच की, नाथाभाऊला पक्षाने भरपूर दिले हे कुजबूज अभियान आता भोंगा अभियान झाल्यानंतर उरलेल्या ७५ मधूनही बहुतांश सहमत होत जातील.

सुरेशदादा खडसेंपेक्षा सरस

सुरेशदादांच्या व नाथाभाऊंच्या राजकीय वाटचालीत अनेक आडवळणे सोबत आली. सुरेशदादांचे राजकारण धाडसाचे राहिले. डंका वाजवून त्यांनी पक्षांतरे केली. नाकावार टिच्चून निवडून येत गेले. जळगाव शहराला विकासाचा चेहरा दिला. अनेक विकास प्रकल्पांच्या फलकावर सुरेशदादांचे नाव आहे. पण नाथाभाऊंनी मंत्रीपदाच्या काळात उभारलेले प्रकल्प कोणते ? ते शोधावे लागतात. भाजप न सोडून आगतिक झालेल्या नाथाभाऊंपेक्षा वारंवार पक्ष बदलून सत्तेत राहिलेल्या सुरेशदादांची कारकिर्द उजवी ठरते. म्हणून आता तरी नाथाभाऊंनी वेळ चुकवू नये, असे समर्थकांना वाटते.

8 comments:

  1. यथार्थ... पक्ष नेतृत्व व नाथाभाऊ यांच्यात अपेक्षित बंदद्वार संवाद आपल्यामुळे जाहिर घडून आला.

    ReplyDelete
  2. 55 फायलींविषयी जाहीर बोलावे म्हणजे पक्ष पक्षनिष्ठा कुणाची कुणासाठी हे समजेल

    ReplyDelete
  3. अभ्यासपूर्ण लेखन

    ReplyDelete
  4. सेनेत गेले तर अभ्यासू,अनुभवी म्हणून पद ही मिळेल व भाजप वर हल्ला कारायला सेनेला आयता बब्बर शेर ही

    ReplyDelete
  5. स्वतः वारकरी आहेत तरी मोह कुठे सोडावं हे समजू नये. मध्यन्त तब्येतच कारण सांगून विराम घेता आला असता.मेंडकीबाबा नेहमी म्हणायचे पक्षला डोळे असतात तो पाहत असतो.आपण जे पेरत गेले त्यामुळे आता तेच उगवत आहे.पक्षाचे किती नुकसान झाले त्यावेळी हे करणाऱ्याला थोडी समजलं.किती लोकांचे इमानदारीने हक्क असतांना त्यांना थपी लावले ज्यांना गल्लीत कुत्रं सुंगत नव्हतं त्यानं विरोध असतांना स्व साठी मोठे केले ते वेळे सोडुन गेले.कोणीच सोबत नाही. ह्या जिल्हयात दोन उदाहरण छान मिळाले एक सुरेशकुमार जैन जे आरोपात तुरुंगात गेले त्यांच्यामुळे त्रास झाला तरी आज ही त्यानं काही मतलबी सोडले तरी मानणार एक मोठा वर्ग मागे आजही उभा आहे. दुसऱ्या भ्रष्टाचाराचे जीवन भर लढले जिंकले पण मागे साधे 100 लोकही नाहीत भरवश्याचे.असो आजही वेळ गेली नाही कोणाच्या नांदी लागुन उगाच उद्रेक करू नये आजवर ह्यामुळेच नुकसान झाले आहे.शांतपणे मार्गदर्शन करावे.नाही तर सरळ आपले वारकरी पंथाचे सेवा भाव करावा तेव्हढेच पाठबळ वाढेल.जे ह्यांना बोलवता आहेत त्यांचं दुकान अतिक्रमण मध्ये आहे केव्हा तुटेल हे त्यांना पण नाही माहिती.. त्यामुळे सेवा परमोच्च धर्म.. स्वीकारत शांतपणे पाहणेच महत्वाचे .. शेवटी येणार काळ काय आहे हे कुणालाच माहिती नाही .. शुभम भवतु

    ReplyDelete
    Replies
    1. बोरसेजी तुम्ही मांडलेले मत योग्य आहे. नाथाभाऊंनी शांत बसावे हा पर्याय आहेच. पण तो त्यांना मान्य होणार नाही.

      Delete
  6. सर, खूप छान विश्लॆषण. नाथाभाऊंच्या पूर्वीच्या ताकदीबद्दल, जनाधाराबद्दल आणि तॆ कसॆ व कुठॆ चुकत गॆलॆ, याबद्दल वाचायला आवडॆल. आपल्या परखड व अभ्यासू लिखाणाची प्रतीक्षा...

    ReplyDelete
    Replies
    1. याच ब्लॉगवर ती माहिती इतर लेखात आहे.

      Delete