Friday, 8 May 2020

नाथाभाऊ बोलून टाका, 'पक्ष गेला उडत ...'

विधानसभा निवडणुकीत ठरवून उमेदवारी नाकारणे, कन्येला तोंड देखली उमेदवारी देऊन नंतर पराभव घडवून आणणे, लागोपाठ झालेल्या आरोपांची चौकशी करुन एकही अहवाल जाहीर न करणे, पक्षाच्या राज्य व जिल्हा सभांमध्ये सन्मानाने सहभाग न देणे अशा मानभंगांच्या अनेक प्रसंगांचे कडू घोट एकनाथराव खडसे यांनी रिचवले आहेत. तरीही विधान परिषदेवर उमेदवारीची आशा बाळगून खडसे रांगेत उभे होते. अखेर उमेदवारी मिळाली नाही. नाथाभाऊंचा संयमाचा बांध पुन्हा फुटला आणि ते बोलले.

सध्या दारुच्या रांगेत उभे राहणारे दारुडे, बुंगारी वा मद्यपी नाथाभाऊंपेक्षा जास्त नशिबवान आहेत. घरातल्यांचे शिव्याशाप, समाजाची कुचेष्टा आणि पोलिसांचे दंडुके खाऊन रांगेतल्या मंडळींना एखाद-दुसरी बाटली मिळून जात आहे. गेल्या ३/४ दिवसात बाटली मिळाली नाही म्हणून कोणाला त्रागा करताना पाहिलेले नाही. परंतू पक्षाच्या रांगेत निष्ठेने उभे राहून पक्षाकडून सन्मान मिळत नसल्याबद्दल गेल्या ४ वर्षांत अनेकवेळा नाथाभाऊंना आगतिक होताना पाहिले आहे. हे क्लेषकारक आहे.

विधान परिषदेसाठी भाजपने जे चार उमेदवार दिले आहेत त्यांची पक्षाविषयी निष्ठा आणि एकूणच कार्य यावर नाथाभाऊंनी जाहीरपणे भाष्य केले आहे. नाथाभाऊ असेही म्हणाले की, 'संभाव्य उमेदवार म्हणून माझी व इतर तिघांची शिफारस दिल्लीकडे गेली होती.' पण तेथून भलतीच नावे आली. अर्थात हे अपेक्षित होतेच. विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील ज्यांनी खडसेंचे नाव कापले त्यांनीच विधान परिषदेसाठी उमेदवार दिले आहेत. मग नाथाभाऊंना कशाचा आधारावर उमेदवारी मिळणार होती ? राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत असताना नाथाभाऊ फुलांचे बुके घेऊन कुठे कुठे फिरत होते ? नाथाभाऊंची वक्तव्ये काय होती ? याचा काही तरी लेखाजोखा दिल्लीत असेल ना ? अशा स्थितीत नाथाभाऊंनी दिल्लीतील यादीत स्वतःचे नाव येण्याची अपेक्षा करणे हा गैरसमजाचाच भाग होता.

विधानसभा निवडणूक रणधुमाळीत थेट खडसेंनी नाही मात्र त्यांच्या कट्टर समर्थकांनी खामगाव, अमळनेर, यावल अशा काही मतदार संघात भाजप विरोधात काम केल्याचे अहवाल गेले आहेत. मुक्ताईनगर मतदार संघात भाजपच्या कोणी कोणी विरोधात काम केले याचा अहवाल खडसेंनी दिला आहे. निवडणूक निकालानंतरही खडसे यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या सलग भेटी घेतल्या. तेव्हाच काही तरी धडाकेबाज निर्णय घेऊन खडसेंनी पवार यांचे घड्याळ हातावर बांधायला होते. पण अशा भेटींबाबत खडसेंनी माध्यमांसमोर कच खाऊ भूमिका घेतली. पवार यांची भेट झाली नाही असा पवित्रा खडसेंनी घेतला. जेव्हा पवार म्हणाले, 'एकनाथ खडसे हे मला भेटले होते. त्यांच्याशी माझी चर्चाही झाली. पण त्यांचे समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडे नाही.' तेव्हा खडसेंची गोची झाली. याशिवाय स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी परळी येथे गोपीनाथ गडावर झालेल्या जाहीर मेळाव्यात खडसेंनी राज्यातील नेतृत्वावर तोफ डागली होती. तेव्हा खडसे म्हणाले होते, 'पंकजांचे सांगत नाही पण माझा भरवसा नाही.' अशा प्रकारच्या घटना-घडामोडींचे पाणी गेल्या काही महिन्यात वाहून गेले आहे.

पक्षविरोधी कारवायांचे अहवाल नेहमी तयार होत असतात. सर्वांचेच अहवाल पक्षनेते स्वीकारतात. पण कार्यवाही कशावर करायची ? हे दिल्लीतील पक्षनेतेच ठरवतात. याचे उत्तम उदाहरण शरद पवार यांच्याबाबतीत घडले आहे. लोकसभेची सन १९९८ मध्ये मध्यावधी निवडणूक झाली. निकालानंतर पवार लोकसभेत काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते झाले. पण जेव्हा सत्तेच्या नेतृत्वाची म्हणजे पंतप्रधानपदाची संधी काँग्रेसकडे चालून आली तेव्हा पवार यांना डावलून पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी पुढे सरसावल्या. पवार यांच्या विरोधात दिल्लीत होणाऱ्या कानाफुसीमुळे संधी हिरावली गेली. महाराष्ट्राचे नुकसान झाले. खडसेंचेही असेच झाले. भाजपने विरोधी पक्षनेतापद दिले पण सन २०१४ मुख्यमंत्रीपद मिळायची संधी आली तेव्हा खडसेंना डावलले गेले. प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली. संधी हुकल्यानंतर पवार, संगमा व अन्वर यांनी नंतर सोनिया यांचे विदेशीपण हुडकून काढले. संधी हुकल्यानंतर खडसे यांनीही फडणवीस यांचे 'बच्चापण' वारंवारा शोधले. पवार आजही नियोजित पंतप्रधान आहेत. खडसेही नियोजित मुख्यमंत्री राहिले.

खडसेंची सध्या भाजपत असलेली स्थिती वाईटच आहे. शत्रूवर सुद्धा ही वेळ येऊ नये. 'जेथे फुले वेचली तेथे गोवरी थापायची वेळ' येऊ नये. अजून किती बेआबरू व्हायचे ? एक तरी घरी बसून निवृत्ती स्वीकारावी किंवा ठणकाऊन सांगावे, 'पक्ष गेला उडत.' शायर गालिबसाहेब यांच्या एका शेर मधून खडसेंची अवस्था चपखलपणे समोर येते ...

हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि, हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले l
डरे क्यों मेरा क़ातिल, क्या रहेगा उसकी गर्दन पर
वो ख़ूँ, जो चश्मे-तर से उम्र यूँ दम-ब-दम निकले l
निकलना ख़ुल्द से आदम का सुनते आये थे लेकिन
बहुत बेआबरू हो कर तेरे कूचे से हम निकलेl

संदर्भ

१) पवारांच्या भेटीनंतर 'मातोश्री'वर थेट; एकनाथ खडसे घेणार उद्धव ठाकरेंची भेट
https://m.lokmat.com/maharashtra/bjp-leader-eknath-khadse-meet-cm-uddhav-thackeray-after-meeting-ncp-chief-sharad-pawar/

२) एकनाथ खडसेंबाबत शरद पवारांचे मोठे विधान
https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/sharad-pawar-talk-on-eknath-khadase-in-aurangabad-update-mhsp-425202.html

No comments:

Post a Comment