Sunday 12 April 2020

पारंपरिक माध्यमांची मक्तेदारी मोडीत ...

संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या २३ मार्च पासून सुरु झालेला लॉकडाऊनचा कालावधी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. रेड झोनमध्ये असलेल्या भागात गरजेच्या वस्तू वा सेवेसाठी माणसांना घराबाहेर फिरण्यावर आणखी कडक प्रतिबंध लागण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. बहुधा या भागात प्रतिबंध शिथिल होतील. लॉकडाऊनच्या काळात माणसाला असलेली विविध माध्यमांची गरज वा निकड पूर्णतः मोडीत निघाली आहे. वृत्तपत्र, टीव्ही, एफएम रेडीओ आणि आकाशवाणी अशा सर्वच दृक व श्राव्य माध्यमांना पर्याय म्हणून स्मार्ट फोन वा ॲन्ड्रॉईड ॲपयुक्त मोबाईल हे सर्वाधिक माहिती देणारे व रंजन करणारे साधन (उपकरण) ठरले आहे.

वृत्तपत्र, टीव्ही आणि रेडीओ या माध्यमांची गरज आशय जाणून घेणे किंवा माहित करुन घेण्यासाठी असते. आपल्या भागात, शहरात, जिल्ह्यात, राज्यात, देशात, जगात आणि ब्रह्मांडात काय घडते आहे ? हे बातमी, चित्र, फोटो, व्हिडिओ वा ऑडिओ स्वरुपात जाणून घेण्यासाठी माध्यमे हवी असतात. म्हणून घरात वृत्तपत्र घेतले जाते. टिव्हिसाठी सेटटाॅप बाॅक्स घेतले जाते. एफएम आणले जाते. मात्र आजच्या स्थितीत प्रश्न हा आहे की, या सर्व माध्यमांची खरोखर किती गरज  आहे ? ही पारंपरिक माध्यमे अडचणीच्या काळात कितपत उपयुक्त आहेत ? लॉकडाऊन संपत असताना प्रत्येक जण यावर उत्तर शोधून ठेवणार हे नक्की. याच्या अगदीच पुढचे बोलायचे तर ऑनलाईन मीडिया वा लाईव्ह मीडिया यांची सुद्धा गरज पुढील काळात कमी झालेली असेल. कोणताही आशय निर्मितीचे ॲप व त्यासाठी गरजेचे कौशल्य सर्व सामान्य माणसाला या लाॅकडाऊनच्या काळात समजले आहे व त्याने ते वापरले आहे. आशय शेअर करण्याचा त्याचा सराव सुद्धा होतो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल जर्नालिझम किंवा सिटिझन जर्नालिझम हा प्रकार नेहमीच्या पारंपरिक माध्यमांच्या किती तरी पुढे गेला आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे प्रयोग ऑनलाईन मीडियाला कॅरी फॉर्वर्ड करावे लागत आहेत.

लॉकडाऊन काळात वृत्तपत्रे काही दिवस बंद होती. अशावेळी सोशल मीडियाचा वापर वाढणे सहाजिक आहे. या संदर्भातील आकडेवारी पुढील प्रमाणे मिळाली आहे. भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. भारतात ११७ कोटी टेलिफोन व मोबाईलधारक आहेत. यात ११५ कोटी वायरलेस (साधा ते स्मार्ट) फोनधारक आणि २ कोटी टेलिफोनधारक आहेत. ११५ वायरलेस फोन धारकात ३० कोटी स्मार्ट वा ॲण्ड्रॉईड फोन वापरतात. ३० कोटी पर्सनल कम्प्युटर वा लॅपटाॅप वापरणारे आहेत. कम्प्युटर व मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेट वापरणारे ६० कोटी आहेत. याचा दुसरा अर्थ असा की, भारतात अजुनही इंटरनेट ग्राहक वाढायला संधी ७० कोटींची आहे. भारतात इंटरनेटचा सर्वाधिक वापर मोबाईलवर होतो. जवळपास ९० टक्के मोबाईलधारक विविध ॲपसाठी इंटरनेट वापरतात. भारतात मोबाईल ॲप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या काही हजार कोटींच्या घरात आहे हे लक्षात घ्यावे.

भारतात मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर इंटरनेटचा वापर करुन सोशल मीडिया हाताळणारे ४४ कोटींवर आहेत. यात ३४ कोटी फेसबुक, ४० कोटी व्हाट्सॲप, २६ कोटी युट्यूब वापरकर्ते आहेत. भारतात मोबाईल वापरणाऱ्यांनी सन २०१९ मध्ये जवळपास १९०० कोटी ॲप विविध स्टोअर्सवरुन डाऊनलोड केले. ही संख्या मोबाईलधारक स्मार्ट होत असल्याचे दर्शवते. या तुलनेत भारतात वृत्तपत्रांची वेब आवृत्ती पाहणारे जवळपास ६ कोटी आहेत. सोशल मीडियाच्या तुलनेत ही संख्या एक चतुर्थांश आहे. शिवाय, सर्वच वेब मीडिया त्यांच्या बातम्यांच्या लिंक सोशल मीडियात शेअर करतात. त्यामुळे केवळ इन्फो वाचून पूर्ण बातमी वाचायची की नाही ? हा चाॅईस मोबाईल वापरणारा निवडतो. लाॅकडाऊन काळात इ पेपरच्या लिंक ऐवजी थेट पिडिएफ पाने शेअर करणे सुरु झाले. काही दिवसांनी वृत्तपत्र वाटप सुरु झाले तेव्हा बहुतांश वाचकांनी घरी वृत्तपत्र घेणे टाळले आहे, याची नोंद घेणे आवश्यक आहे.

लॉकडाऊन काळात भारतातील लोकांचा सोशल मीडियाचा वापर तब्बल ८७ टक्क्यांनी वाढला आहे. याची आकडेवारी एका सर्वेक्षणात समोर आली आहे. लॉकडाऊनच्या आधी एक व्यक्ती आठवड्याला १५० मिनिटे सोशल मीडियावर घालवत होती. तोच वेळ आता आठवड्याला २८० मिनिटे इतका झाला आहे. म्हणजे दिवसभरात लोक तब्बल चार तास सोशल मीडियावर वावरू लागले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेळ घालविणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ७१ टक्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. या सर्वांमुळे डेटाच्या वापरातही तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ओटीटी म्हणजे Over The Top. या प्लैटफॉर्मवर इंटरनेटद्वारा  व्हिडिओ वा अन्य आशय २४ तास उपलब्ध असतो.

माध्यमांची मक्तेदारी सोशल जर्नालिझम वा सोशल इन्फॉर्मेशन शेअरींगमुळे संपली आहे. वृत्तपत्र छपाईचा १२ तासांचा कालावधी, टीव्ही वा आकाशवाणी, एमएम माध्यमात प्रसारणासाठी लागणारा किमान अर्धा तासांचा कालावधी हा सुद्धा सोशल मेसेज शेअरींगमुळे आता वेळ काढू ठरत आहे. मोबाईल वा स्मार्ट फोन वापरणारी प्रत्येक व्यक्ती दृक व श्राव्य आशय कुठेही निर्माण, रेकॉर्ड करु शकत असून पुढच्या सेकंदाला त्याचे मल्टि ॲपमधून प्रसारण होत आहे. म्हणूनच नेट मीडिया किंवा लाईव्ह मीडियाची सुद्धा पिछेहाट होते आहे. याच गरजेतून विविध ॲप डाऊनलोड करणे वाढत असल्याचे ध्यानात घ्यावे.

यासाठी सर्वांत चांगले उदाहरण म्हणजे, लॉकडाऊन काळात येस बँक व डीएचएफएल घोटाळ्यातील संशयित वाधवान कुटुंबिय गृह सचिवांचे पत्र घेऊन महाबळेश्वर सहलीवर गेल्याचे उघडकीस आले. इतर लोक घरात बंद असताना आर्थिक घोटाळ्यातील आरोपी सहल करीत होते. या भंयकर प्रकरणात गृह सचिवाने वाधवान कुटुंबाला दिलेले पत्र सोशल मीडियात शेअर झाले. त्यानंतर गृहमंत्र्यांनी तसे घडल्याचे सोशल मीडियातच मान्य केले. संबंधित गृह सचिवाच्या निलंबन वृत्त सोशल मीडियातच आले. सोशल मीडियाने पारंपरिक व नेट मीडियाची मक्तेदारी मोडल्याचे हे भन्नाट उदाहरण आहे. ही बातमी प्रथम दिल्याचा दावा कोणतेही मीडिया हाऊस करु शकत नाही.

नेट मीडियातील अनेक ॲपचा वापर सर्व सामान्य माणूस उत्तमपणे करु लागल्याची अनुकरणीय उदाहरणे समोर आली आहेत. फेसबुकवर अलिकडे शेअर झालेल्या व्हिडिओत लॉकडाऊन काळात घरी बसलेले लोक काय करीत आहेत याचे प्रतिबिंब दिसते आहे. काय करताहेत लोक हे पाहिले तर दिसते कोणी 'कराओके'वर गाणी म्हणायला लागले. स्त्री-पुरुष घरगुती कुकींगचे व्हिडिओ तयार करायला लागले. 'टिक टॉक' व्हिडिओ वा म्युझिकचा वापर वाढला. आयपॉडकडे श्रोतावर्ग वळला. फेसबुकवरील लाईव्ह  व्हिडिओ व ऑडिओचा वापर वाढला. काही उदाहरणे अधिक ठळकपणे द्यायला हवीत.

मल्टि मिडिया फिचर्सची जनता कर्फ्यूची जाहिरात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २२ मार्चला एक दिवसाचा भारतबंद (जनता कर्फ्यू) घोषित केला होता. त्यादिवशी तुम्ही काय करणार आहात ? याचे व्हिडिओ, ऑडिओ व टेक्स्ट मेसेज पाठवायचे आवाहन जळगाव येथील मल्टि मीडिया फिचर्स प्रायव्हेट लिमीटेड या संस्थेने केले होते. या आवाहनावर प्रतिसाद म्हणून ७०० वर व्हिडिओ व २००० वर ऑडिओ व इतर मेसेज आले. सामान्य माणूस आशय निर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय झाल्याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. या दिवशी सर्व सामान्य लोकांनी बंदचे फोटो काढून सोशल मीडियात टाकले. टीव्ही व ऑनलाईन मीडियापेक्षा हा आशय प्रवाह जोरात सुरु होता.

याच काळात काही माध्यमांनी ड्रोनच्या माध्यमातून शहरातील बंदचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला. विविध भागातून ड्रोन फिरवून कशा प्रकारे वातावरण आहे, हे दर्शविण्यात आले. परंतु या ड्रोनच्या वेगापेक्षा नागरिकांनी स्वतःच बंदचे फोटो झपाट्याने शेअर केले. असाच काहीसा प्रकार सायंकाळी टाळ्या व घंटा वाजविण्यासंदर्भात घडला. लोकांनी त्याचे फोटो, व्हिडिओ शेअर केले. मोदी, पवार, ठाकरे, फडणवीस अशा नेत्यांचे फोटो व व्हिडिओ लगेच शेअर झाले. हाच प्रकार दिवे, मेणबत्ती व मोबाईल टाॅर्चचा वापर या दिवशीही घडला. अशा प्रकारच्या शेअरिंगमध्ये फटाके फुटल्याचे काही  प्रकार घडले. फटाके फोडणाऱ्यांवर टीकेची झोडही सोशल मीडियातून उठली. कारण फटाके फोडण्याविषयी कोणताही संदेश दिलेला नव्हता. तरीही उत्साही लोकांनी पटाके फोडले. त्यांना कठोर भाषेत समज देणारे संदेशही व्हायरल झाले. एखाद्या दैनिकाचा अग्रलेख किंवा संपादकिय लेख जे काम करु शकत नाही ते सोशल मीडियातील संदेशांनी केले. 
 
डी. जे शिवा यांचा लॉकडाऊन रेडीओ
जळगाव येथील किशोर पाटील तथा डी. जे. शिवा यांनी यापूर्वी फोर व्हिलरने भारत परिक्रमा करताना फेसबुक लाईव्ह हे माध्यम उत्कृष्टपणे वापरले होते. आताच्या लॉकडाऊन काळात किशोर पाटील यांनी फेसबुकचे लाईव्ह आडीओ हे ॲप वापरुन स्वतः एफएम प्रमाणे जुन्या गितांचा कार्यक्रम सादर करणे सुरु केले. त्याला नावही साजेसे 'लॉकडाऊन रेडीओ' दिले. किशोर पाटील यांचा हा लाईव्ह शो वेब मीडियालाही फॉलो करावा लागला. शेवटी संकल्पना महत्त्वाची असते हे यातून लक्षात येते.

लॉकडाऊनला प्रारंभ झाला तेव्हा वृत्तपत्र वितरण सुध्दा बंद झाले. या काळात वृत्तपत्रांनी 'पीडीएफ' पाने सोशल मीडियात टाकणे सुरु केले. 'लोकमत' ने यात बाजी मारली. इतर दैनिके ई आवृत्तीची लिंक पाठवून वाचकांना बोलावत होते. अर्थात पीडीएफ प्रकारात संपूर्ण पेपर मिळत असताना लिंकवर क्लिक करुन कोण, कशाला डाटा खर्च करेल ? ई आवृत्तीवर जाणाऱ्यांची संख्या वाढली. वृत्तपत्र वितरण सुरु झाले तरी वाचकांनी घरात वृत्तपत्र घेणे बंद केले.

परिवर्तन जळगावचे आयपाॅडवर आगमन
जळगाव येथील नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रात राज्यभर नावलौकिक असलेली संस्था 'परिवर्तन जळगाव' ने लॉकडाऊन काळात व्हिडिओ व आयपॉडचा सुरेख वापर केला. परिवर्तन जळगावने ॲनी बेझंट व चार्ल्स बैडलौक यांच्या प्रेमकहाणीला नाट्यवाचन स्वरुपात आयपॉडवर आणले. यासाठी ॲन्कर, सॉफ्टी व ॲपल आयपॉडचा वापर केला. याशिवाय ज्येष्ट रंगकर्मी शंभुअण्णा यांनी पुणे आकाशवाणीसाठी ज्ञानपिठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' या कादंबरीचे वाचन केलेले १ ते २५ भाग ॲन्करवर उपलब्ध झाले. परिवर्तनने आपले इतर कार्यक्रमही आता फेसबुक लाईव्हसह यु ट्युबर आणले आहेत.

सोशल मीडियात नागरी प्रश्नावर १० भागांची वृत्तमालिका मी स्वतः लिहिली. सोशल मीडियाचा असाही वापर होऊ शकतो हे लक्षात आले. या वृत्तमालिकेस रोज किमान ५ हजारावर वाचकांची पसंती मिळाली. फेसबुक, व्हाट्स ॲप हे प्रसाराचे प्रभावी ॲप ठरले. अशीच पसंती 'सुदामाचे पोहे' या मदत वाटप करणाऱ्याविषयीच्या वृत्तमालिकेस मिळाली. यातील एक मालिका नंतर एका वेब मीडियावरून पुन्हा वाचकांपर्यंत पोहचली.

गिरीश कुळकर्णी यांचा सर्वे
लॉकडाऊन काळात गिरीश कुळकर्णी यांनी 'गुगल सर्वे' या ॲपचा वापर करुन नागरिकांच्या विचारांचा, सहमती व नकाराचा उत्तम सर्वे केला. त्यांना राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. जवळपास ४५० लोकांनी आपले मत मांडले. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर लोकांच्या प्रतिक्रियांचे छान विश्लेषण करणे शक्य झाले.अशाच प्रकारे जळगाव येथील भारत विकास परिषदेने लाॅकडाऊन काळात लोकांच्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे.

लॉकडाऊन काळात फळे, भाजी विक्रीचे नवे पर्याय सोशल मीडियाने दिले. शैलेंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया वापरुन ढोबाळी मिरची विकली. विवेक चव्हाण, स्वप्निल पवार, सुनील पाटील यांनी निफाड तालुक्यातील द्राक्षे जळगावात विकली. सोशल मीडियातील प्रचारामुळे रोटरी वेस्टची सुरक्षित फळे व भाजीपाला बाजार संकल्पना साकारली. जळगाव शहरात तीन ठिकाणी अशा प्रकारे बाजार सुरु झाला. शिवाय, गल्लीबोळात विक्रेते भाजी वाहनावर टाकून विक्रीस नेऊ लागले. काही विक्रेत्यांनी व्हाटस  प गृप सुरु केले. त्यात त्यांनी कोणती भाजी विक्रीला आहे व केव्हा येणार या वेळा शेअर केल्या. त्यामुळे महिला वर्गही सतर्क झाला. विक्रेते दारात पोहचत आहे हा बदल लक्षात घेता पुढील काळात ग्राहकांनी सेंट्रल फुले मार्केटमधील अनधिकृत विक्रेत्यांचा आडमुठेपणा बदलण्यासाठी तेथे गर्दी  करणे टाळायला हवे. तेथे अतिक्रमण करणारा विक्रेता हा पुढील काळात इतर ठिकाणी स्थलांतरित व्हायला हवा.

फेसबुकवर जुने फोटो शेअरिंग, महिलांनी एकमेकींना चैलेंज देऊन परिधान केलेले पोषाख वा साड्या याचाही ट्रेंड निर्माण झाला. याबरोबरच काही जणांनी मित्रांना आवाहन करुन आपल्या पहिल्या भेटीच्या आठवणी रंगविल्या. या संदर्भातील सोशल मेसेजिंग रंजक आणि लक्षवेधी झालेले आहे.

महाराष्ट्र टाईम्सच्या ॲपवर रंगलेली मैफल
महाराष्ट्र टाईम्सचे नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी मोबाईलमधील टाईम्स ॲपवर मैफल साजरी केली. यात एकाच वेळी अनेक सहकारी जोडले. कथा, कविता, गप्पा, किस्से अशी धमाल सर्वांनी केली. लॉकडाऊन काळात काही मित्रांनी चित्रकलेच्या छंदावरील धूळ झटकली. मनोहर पाटील (जळगाव), प्रदीप रस्से (जळगाव), बाळू देशपांडे (औरंगाबाद), गोविंद गोंडेपाटील (औरंगाबाद) यांनी पेन्सिल ड्राईंग, लैण्डस्केप सादर केले. या कलेला सोशल मीडियाने मित्रांपर्यंत पोहचविले.

भुसावळ येथील डॉ. आशुतोष व डॉ. सौ. सुजाता केळकर हे फेसबुक लाईव्ह, युट्युबचा नेहमी वापर करतात. कोरोना लॉकडाऊन काळात डॉक्टर दाम्पत्याने रोगाच्या संसर्ग व बचावाविषयी तीन व्हिडिओ शेअर केले. त्यांनी आपल्या डॉक्टर मित्रांशीही गप्पांमधून माहिती दिली.

सोशल मीडियात काही खोट्या व दिशाभूल करणारा आशय प्रसारित झाला. अर्थात त्यातील सत्यता सुद्धा सोशल मीडियानेच तपासली. दिशाभूल आशयाची पोलखोल सोशल मीडियातून झाली. याचे एक उदाहरण 'साम' वाहिनीवरुन प्रसारित चीनमधून आयात अंडीमुळे बर्डफ्लू पसरणे शक्य या बातमीचे होते. नाशिकच्या संदर्भातून आलेल्या या बातमीला कोणताही आगापिछा नसल्याचे लक्षात आहे. असेच पांचट वृत्त एबीपी माझाने दिले. या वाहिनीने दावा केला आहे की, लॉकडाऊन काळात कंडोम विक्री वाढली आहे. शिवाय पुढे असेही ठोकून दिले की, भविष्यात जन्मदर वाढेल. या वाहिनीने चित्र असे निर्माण केले की, भारतीय माणूस घरी थांबून सतत लैंगिक संबंधात व्यस्त आहे. वास्तविक अख्खे कुटुंब घरात असताना कोण लैंगिक संबंधासाठी खोल्यांची दारे बंद करेल ? असा प्रश्न वाहिनीच्या बातमीदारांना पडला नसावा. म्हणूनच ती सुध्दा तद्दन पोरकट बातमी होती. वाहिनीच्या कॅमेरासमोर येऊन कोणीही असे सांगितले नाही, की हो मी रोज २-३ वेळा लैंगिक संबंध करीत आहे. स्टुडिओ बाहेर लोकांच्या प्रतिक्रिया मिळणे शक्य नव्हते. तेव्हा  तर्काला पुष्ठी म्हणून वाहिनीच्या स्टुडिओतील कर्मचाऱ्यांच्या किमान प्रतिक्रीया घेता आल्या असत्या. जर वाहिनीचे काही बातमीदार होय मी गोमांस खातो, होय मी पोर्न साईट पाहतो असे कबूल करु शकतात तर हो आम्ही दिवसातून २-३ वेळा लेंगिक संबंध करतो असे कबूल करु शकले असते. बातमी जास्त विश्वासार्ह झाली असती.

वरील सर्व उदाहरणे ही सोशल मीडियात विषय, आशय निर्मितीसह प्रसारणाची आहेत. सामान्य वापरकर्ता जर अशा प्रकारे मोबाईल व नेटचा वापर करु लागला तर लॉकडाऊन नंतर पारंपरिक मीडियाला इतर आव्हानांना सामोरे जावे लागेल हे निश्चित.

एक रंजक आकडेवारी ...

सोशल मीडियावर आठवड्याला घालवण्यात येणारा वेळ
लॉकडाऊनपूर्वी १५० मिनिटे
लॉकडाऊननंतर २८० मिनिटे
८९ टक्क्यांनी घटला म्युझिक ॲपचा वापर.
७१ टक्के लोकांनी स्वीकारला ओटीटी प्लॅटफॉर्म.
रात्री ७ ते १० हा ठरला ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्राइम टाइम.
७६ टक्के लोकांची सकाळी ८ ते ९ या वेळेत टीव्हीला पसंती.
७२ टक्के लोक करोना व्हायरसबाबतच्या माहितीसाठी सतत इंटरनेट ब्राऊझिंग करतात.

(टीप - लेखात वापरलेली आकडेवारी इंटरनेटवर उपलब्ध आहे)

2 comments:

  1. दिलीपराव अतिशय, विस्तृत व माहितीपूर्ण लेख. लॉक डाऊन पश्चात माणसाचे जीवन कसे असेल याची कल्पना यावी. हे लेख केवळ वाचून उपयोग नाही त्याप्रमाणे आपण आपली व्यवसायाची धोरणे ठरवावी लागतील. माध्यमांसाठी हि धोक्याची घंटा असे मी म्हणणार नाही पण संधी आहे आपण आपले उत्पादन कसे प्रस्तुत करणार त्यासाठी या अभ्यासाचा वापर कसा करणार ? याचा प्रकारे सर्वच क्षेत्रांचा धांडोळा घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. संपूर्ण जीवनच एक वेगळ्या धाटणीतून पुढे येणार हे निश्चित !

    ReplyDelete
  2. सर हैट्स ऑफ टू यु, अप्रतिम विश्लेषण 💐💐👌👍

    ReplyDelete