Thursday 2 April 2020

निविदा ५ आणि शिफारशी अनेक !- भाग ७

स्वच्छ शहर अभियानांतर्गत संपूर्ण जळगाव शहरातील सफाई व स्वच्छतेचा एकमुस्त ठेका देण्याची निविदा मराठीत तयार झाली. नंतर ती अॉनलाईन प्रसिध्द झाली. ५ वर्षांत सुमारे ७५ कोटी रुपये खर्च होणार हे निश्चित होते. हा लोण्याचा गोळा पदरात पडावा म्हणून ५ कंपन्यांच्या निविदा आल्या. याचवेळी मनपातील काही पदाधिकाऱ्यांनी विशिष्ट कंपनीसाठी शिफारशी करणे सुरु केले. कोण होते ते ? आणि काय होता त्यांचा हेतू ? हे सुद्धा समजून घ्यायला हवे.

मनपातर्फे प्रसिद्ध अॉनलाईन निविदेनुसार ५ कंपन्यांनी प्रतिसाद दिला. अर्थात, यापूर्वी काही कंपन्यांनी मनपातील पदाधिकाऱ्यांशी ओळखी पाळखी काढून स्वतःसाठी शिफारशी मिळविणे सुरु केले होते. नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीसाठी माजी महापौर, ३/४ नगरसेवकसह प्रयत्न करीत होते. पुण्यातील बीव्हीजीसाठी शहरातील काही नागरिकांचे प्रयत्न होते. देशभरात इंदूरला स्वच्छतेचा पहिला पुरस्कार मिळवून देणाऱ्या कंपनीसाठी काही प्रयत्न करीत होते. इतरांसाठीही काहींच्या शिफारशी होत्या. मनपाकडे ज्या ५ निविदा आल्या त्यात वॉटरग्रेस नाशिक, बीव्हीजी पुणे, अमृत एन्टरप्राईजेस खामगाव, ए जी इनव्हायरो लिमीटेड नवी मुंबई आणि ए के ॲन्टोनी मुंबई यांचा समावेश होता.

यापूर्वी उल्लेख केल्यानुसार बीव्हीजीचे संचालक हणमंतराव गायकवाड हे रोटरी क्लबच्या एका कार्यक्रमासाठी जळगावला आले होते. तेव्हा शहरातील काही मान्यवरांनी त्यांच्या सोबत सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी चर्चा केली. त्या बैठकीला भाजपचे एक-दोन पदाधिकारी सुद्धा होते. या बैठकीनंतर बीव्हीजीचे ४ प्रतिनिधी जळगाव शहरात थांबून सर्वेक्षण करुन गेले. उघडपणे सांगायचे तर श्रीराम खटोड हे सुद्धा या प्रतिनिधींना सहकार्य करीत होते. व्यक्तिशः मी सुद्धा यात सहभागी होतो. दुसरीकडे नंदुभाऊ अडवाणी यांनी इंदूरच्या कंपनीला जळगावचा ठेका मिळावा म्हणून प्रयत्न सुरु केले होते. बीव्हीजीसाठी जसे नागरिक पुढे आले तसेच चित्र निर्माण व्हावे म्हणून नंदुभाऊंनी संघ परिवाराशी संबंधित प्रकल्प प्रमुखांना सोबत घेतले. काही निवडक मान्यवरांना बोलावून प्रकल्प प्रमुखांकडे अनौपचारिक चर्चा सुद्धा झाली. खरे तर जळगावच्या सकारात्मक विकासाकरिता हे प्रकल्प प्रमुख आपले राजकीय व संघांतर्गत असलेले संबंध उत्तमपणे वापरु शकले असते. तसे काहीही झाले नाही. इंदूरच्या कंपनीने जळगावला यायचे नाकारले. मग तो विषयच थांबला.

या घडामोडींच्या काळात पालकमंत्री गिरीश महाजन होते. त्यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे सफाईचा ठेका हवा त्याला देता येईल असा अंदाज अनेकांचा होता. कारण मनपा निवडणुकीत ७५ पैकी ५७ भाजपचे नगरसेवक निवडून आणण्याचे एक हाती श्रेय महाजन यांचे आहे. त्यामुळेच महाजन जसे सांगतील तसे होईल हे आजुबाजूच्या मंडळींना माहित होते. नाशिक येथील वॉटरग्रेसचे संचालक हे सर्व जाणून होते. त्यांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्याशी संपर्क केला. वॉटरग्रेससाठी लॉबिंग सुरु केले. 'वॉटरग्रेसची शिफारस करा. तो अनुभवी आहे', हा मुद्दा मांडला गेला. कोल्हे यांनी अतुल हाडा, तायडे, काळे, भगत बालाणी यांनाही सोबत घेतले. वॉटरग्रेससाठी एक भक्कम फळी तयार झाली. एवढ्या लोकांचा आग्रह महाजन हे सुद्धा मोडू शकणार नव्हते. दुसरीकडे अमृत एन्टर प्राईजेसने शिफारशीसाठी प्रयत्न केले. त्यांचे प्रतिनिधी डॉ. अश्विन सोनवणे यांच्या संपर्कात आले. अशा प्रकारे निविदेतील ३ जणांसाठी शिफारशी तयार झाल्या. ए जी इनव्हायरो आणि ए के ॲन्टोनी यांच्यासाठी कोणीही समोर आले नाही. वॉटरग्रेसच्या शिफारस प्रकरणात आमदार सुरेश भोळे व तेव्हाच्या महापौर सिमा भोळे यांना फारसे सक्रिय होता आले नाही. कारण मंत्री महाजन काय करतात ? हा प्रश्न होता. महापौरपद महाजनांमुळे मिळाले होते.

निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी एखाद्या कंपनीसाठी शिफारस करणे वा त्या कंपनीची बाजू मांडणे गैर नव्हते. पण आपण ज्यांची शिफारस करीत आहोत त्या कंपनीचे इतर ठिकाणी कसे काम सुरु आहे ? याचाही होमवर्क संबंधितांनी करायला हवा होता. वॉटरग्रेससंदर्भात तो झाला नाही. वॉटरग्रेस कंपनी मूळची नाशिकची होती. तेथील मनपाने वॉटरग्रेसला काळ्या यादीत टाकलेले होते. नाशिक मनपाने सिंहस्थ काळातील काम वॉटरग्रेला दिले नाही. तेव्हा नाशिकचे पालकमंत्री व सिंहस्थासाठी विशेष मंत्री म्हणून महाजनांकडे सूत्रे होती. वॉटरग्रेसचे कनेक्शन तेथून होते. औरंगाबाद मनपातही वैद्यकिय कचरा संकलनाबाबत वॉटरग्रेस विषयी तक्रारी होत्या. मालेगावसह धुळे मनपातही वॉटररग्रेस विरोधी तक्रारींमुळे सभा गाजल्या होत्या. या सर्व विषयांकडे दुर्लक्ष करुन वॉटरग्रेसचे लॉबिंग पक्के होत गेले.

जळगाव मनपा स्वच्छतेसाठी निविदा उघडल्यानंतर सर्वांत कमी दराची म्हणजे एल १ (लोएस्ट वन) निविदा वॉटरग्रेसची ठरली. वॉटरग्रेससाठी लॉबिंग करणाऱ्यांना आता पुढचे ठोकताळे बांधायची संधी मिळाली. सर्वांत कमी दराची निविदा स्वीकृत करून वॉटरग्रेस सोबत करारनामा करण्याची घाई सुरु झाली. एवढेच नव्हे तर सुरक्षा अनामत रक्कम भरणा करण्याबाबतचे पत्र घाईघाईने वॉटरग्रेसला देण्यात आले.

या घडामोडींपूर्वी आणखी एक उपकथानक घडले. वॉटरग्रेससाठी करायच्या लॉबिंगमध्ये भाजपसोबत शिवसेनेला घेण्याचा प्रयत्न झाला. अर्थात, मंत्री महाजन यांचे नाव वापरुन सर्व सहमतीने होते आहे, असे दाखवायचे होते. वॉटरग्रेससाठीचे संभाषण विरोधी पक्षनेते संजय महाजन यांच्याशी झाले. इतरांशी म्हणजे नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, नितीन बर्डे, बंटी जोशी यांच्याशी बोलतो असे ते म्हणाले. दरम्यान वॉटरग्रेसने नाशिक, औरंगाबाद, मालेगाव व धुळे येथे केलेल्या कामांचा व तेथील तक्रारींचा फिडबैक विरोधकांना मिळाला. मंत्री महाजन यांच्या नावे जो सर्व संमतीने ठेका द्यायचे घाटत होते, त्यातून शिवसेना बाजूला झाली. कारण तोवर वॉटरग्रेसशी हिस्सेदारीचा विषय चर्चेत आला. मग भाजपच्या काही नगरसेवकांनीही वॉटरग्रेसला सभागृहात विरोध दाखवला. पण प्रत्यक्षात पत्नी विरोधात आणि पती महोदय वॉटरग्रेससाठी पायघड्या घालत होते. वॉटरग्रेस नावाचे एक बेशिस्त वावटळ जळगाव मनपात घुसायला सज्ज झाले होते.

क्रमशः

भाग ८ - वॉटरग्रेससाठी कशी आणि का झाली घाई ??

3 comments: