Wednesday, 1 April 2020

सुस्पष्ट मराठीत निविदा, अटी व शर्ती ! - भाग ६

स्वच्छ शहर अभियानात जळगावचा झालेला समावेश, त्या अंतर्गत करायची कामे, वाहने खरेदी वगळून इतर ठप्प कामे आदी विषयांचा उहापोह मागील काही भागात झाला. आता सफाई व स्वच्छतेचा एकमुस्त ठेका देण्यासंदर्भात काय घडले ? हे समजून घेऊ. या ठेक्याची निविदा सुस्पष्ट मराठी भाषेत होती. त्यातील अटी, शर्ती मराठीत आहेत. तरी सुद्धाशहरातील स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला. तो कसा आणि का ? हे समजून घ्यायला हवे.

कचरा संकलन निविदेत दैनंदिन कामाविषयी उल्लेख होता की, कचरा म्हणजे घराघरातला, रस्त्यावरील, उपहारगृहे, दुकाने, संकुले, उद्याने आदी ठिकाणचा ओला व सूका कचरा. तो वेगवेगळा संकलित करुन ट्रान्सफर कलेक्शन सेंटर पर्यंत वाहतूक करुन आणणे. त्यातील सूका कचरा तेथेच उतरवणे. उरलेला ओला कचरा घन कचरा प्रक्रिया प्रकल्पावर पाठविणे. शिवाय रस्ते, गटारी सफाईसाठी ४०० कामगार पुरवणे.

ओला व सुका कचरा संकलनाचा दर ५ वर्षांसाठी प्रतीटन ९४९ रुपये होता. मनपाच्या अहवालानुसार शहरात रोज २२०.४५ टन कचरा गोळा होतो. या टनाचा गुणाकार भागाकार करुन टाका. मनपाला रोज ४०० कामगारही हवेत. त्यासाठी एका कामगाराचे वेतन रोज ५४३ रुपये निश्चित केलेले. या ५४३ रुपयात ४८९ रुपये कामगाराला देऊन ५४ रुपये ठेकेदाराच्या खिशात सेवा शुल्क म्हणून जाणार होते. कामगार संख्या व वेतनाचा गुणाकार व भागाकार करुन टाका. या दोन वेगवेगळ्या कामांसाठी ठेकेदार कोणीही नेमला तरी कामगारांचे मनुष्यबळ किमान ८०० तरी लागणार होते. याचा अर्थ कोणाला प्रती टन ९४९ रुपयात आणि कोणाला कामगार संख्येत असणार हे निश्चित होते.

आता या कामाची निविदा क्रमांक १२३९ निघाली. इतर महापालिकांच्या निविदा इंग्रजीत होत्या. त्यामुळे त्याचा भाषांतरित अर्थ काढताना ठेकेदाराला चलाखी करता येणे शक्य होते. त्यामुळे जळगाव मनपाचे तत्कालिन आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी शुद्ध मराठीत निविदा तयार केली. मात्र निविदेनुसार करार न करुन घेता, तो घाईत अमलात आणताना आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील होते. बहुधा यामुळेच मनपाने निश्चित कालावधीत करायाची पूर्तता व ठेकेदाराने ३ महिन्यात करायची कार्यवाही याला फाटा दिला गेला. मनपाने जे करायला हवे ते केले नाही. मग ठेकेदाराला पळवाटा तयार झाल्या.

निविदेत अगदी प्राथमिक ३ अटी मराठीत होत्या. पहिली ठेकेदाराला दरवर्षी ५ टक्के वाढदिली जाईल. दुसरी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे लागेल. तिसरी ठेका देण्यापूर्वी एकूण कामाच्या रकमेपोटी २ टक्के सुरक्षा रक्कम भरावी लागेल. या मराठीतील दुसऱ्या व तिसऱ्या अटीला फाटा दिला गेला. बाकी इतर अटींपर्यंत आपण अजून पोहचलेलो नाही. निविदा, करारा, अटी-शर्ती शुद्ध मराठीत होत्या हा मुद्दा अगोदर स्पष्ट करण्याचे कारण एवढेच की पढतमूर्ख यंत्रणेने तरीही एका सेवेचा बट्ट्याबोळ केला.


क्रमशः

भाग ७ - निविदेसाठी कोण होते स्पर्धक ?


No comments:

Post a Comment