Thursday, 5 March 2020

'जैन है ... तो मुमकिन है ...

संपूर्ण जगभरात व्याप आणि जळगाव शहरात मुख्यालय असलेला 'जैन उद्योग समुह' परिस्थितीतून निर्माण झालेल्या काही तात्कालिक कारणांमुळे अडचणीत आहे. समुहाच्या संचालकांनी ही बाब भागभांडवलदार सभासदांच्या सभेत यापूर्वी प्रांजळपणे स्पष्ट केली आहे. जवळपास साडेसहा हजारावर कामगार-कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. तरीही सर्वजण रोज कामावर येत असून दैनंदिन जबाबदारी निभावत आहेत. कर्ज आणि व्याजाचे रोजचे देणे सुरु असल्यामुळे इतर आर्थिक व्यवहार प्रलंबित आहेत. अशा स्थितीत उद्योग समुहात पुरेशी गुंतवणूक करु शकणारे भागीदार शोधणे किंवा गरज भागवता येईल एवढ्या रकमेचा विदेशातील एखादा प्रकल्प विक्रीत काढणे या पर्यायांवर समुहाचे संचालक अथक परिश्रम घेत आहेत.

जैन उद्योग समुह अडचणीत असण्याचा परिणाम जळगावच्या स्थानिक बाजारावर निश्चित जाणवतोय. रोख खरेदीचा ग्राहक कमी झाला आहे.  समुहाच्या कामगार-कर्मचारी वर्गांत भविष्याची काळजी आहे पण अस्वस्थता नाही. वेतन थकलेला कामगार-कर्मचारी जेवणाचा डबा घेऊन रोज कामावर येतोय. कुठेही असंतोषाचे वर्तन नाही की तक्रार नाही. औद्योगिक क्षेत्रातील अशा आपत्तीत कामगार-कर्मचाऱ्यांनी राखलेला संयम आणि शांततेमागील कारण आहे, 'जैन है ... तो मुमकिन है ...'

जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रध्देय भवरलाल जैन तथा मोठेभाऊ यांनी समुहाविषयी दिलेला विचारांचा 'वसा आणि वारसा' या मागे आहे. 'हा उद्योग समुह माझा आहे. मी येथे काम करतो. मग समुह अडचणीत असताना मी काम न थांबवता अधिक जोमाने व जबाबदारीने काम करायला हवे. कारण, मी सुध्दा समुहाचा मालक आहे'. मोठेभाऊ यांनी हा विचार कामगार-कर्मचाऱ्यांत रुजवला. त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्यांनी तो जोपासला.

जैन उद्योग समुहातील जवळपास १२ हजारावर कर्मचाऱ्यांशी समुहाच्या संचालकांनी १२ जानेवारीस हितगुज केले. प्रारंभी उद्योग समुहाच्या सन १९६३ पासूनच्या वाटचालीचा आणि समुहाच्या उत्तरोत्तर प्रगतीचा लेखाजोखा मांडला. अवघ्या ७ हजार रुपयांच्या भागभांडवलावर सुरु केलेला हा समुह आज ८ हजार ६०० कोटींवर नेण्यामागे सर्वांचेच सहकार्य, पाठबळ मिळाले. प्रत्येक कर्मचारी-कामगार यांचा यात सहभाग राहिला याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. त्यानंतर आपला उद्योग समुह आज अडचणीत आहे, तो का आहे ? त्यातून बाहेर निघायला आपण काय करीत आहोत ? त्यातून कसे बाहेर निघणार ? पुढे काय होईल ? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे संचालकांनी दिली.  घरातील अडचण कुटुंबातील प्रत्येकाला समजून सांगावी आणि प्रत्येकाने त्या अडचणीचा सामना करायचा निश्चय व कृतीचा निर्धार करावा, अशा चर्चेचा, कौटुंबिक एकजुटीचा आगळावेगळा, भावनिक परंतु जबाबदारींची जाणीव करुन देणारा हा हितगुज कार्यक्रम सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरला. आपल्यातील आत्मविश्वास, परस्परांवरील विश्वास आणि कृतीचा दृढ निर्धार यावर टाळ्या वाजवून कामगार-कर्मचाऱ्यांनी पुन्हा सिध्द केले की, 'जैन है ... तो मुमकिन है ...
कर्मचाऱ्यांशी सुसंवादाचा व्हिडिओ
 
उद्योग समुहाचा आजचा लेखाजोखा समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, उपाध्यक्ष तथा वित्त पुरवठासंदर्भातील मुख्य कार्य सांभाळणारे अनिलभाऊ जैन, कार्यकारी संचालक अजितभाऊ जैन आणि अतुलभाऊ जैन यांनी तब्बल पाच तास मांडला. उद्योग समुहाचा प्रारंभ श्रध्देय मोठेभाऊ यांनी सन १९६३ मध्ये क्रूड तेलाच्या एजन्सी माध्यमातून केला. त्यानंतर बंद पडलेला केळी पावडरचा प्रकल्प सन १९७८ मध्ये खरेदी करुन तेथे पपईचे चिक (पपेन) संकलन केंद्र सुरु केले. त्यानंतर शेतीशी संबंधित विविध ६५ एजन्सीमार्फत शेतकऱ्यांना गरजेच्या सेवा दिल्या. त्यानंतर पाईप, नंतर ठिबक, नंतर टिश्युकल्चर, नंतर सौरऊर्जा, नंतर फळ-भाजीपाला निर्जलीकरण, नंतर फळ प्रक्रिया आणि अलिकडे मसाले अशा उत्पादन क्षेत्रात समुह कसा विस्तारला याची ऊजळणी अतुलभाऊ यांनी केली. या प्रवासात दोनवेळा समुह अडचणीत आला. तेव्हा श्रध्देय मोठेभाऊ यांनी चुका मान्य करीत दिशा व धोरणात सुधारणा केली. झालेल्या चुकीबद्दल वृत्तपत्रातून जाहिरात स्वरुपात स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. नंतर प्रत्येकाने जबाबदारी पार पाडली आणि समुह अडचणीतून सावरत-विस्तारत गेला, याचे कथन अजीतभाऊंनी केले. हरएक अडचणीतून सावरताना नेहमी एकच विचार सर्वांनी केला. तो म्हणजे, 'जैन है ... तो मुमकिन है ...'

हितगुज करताना सर्वाधिक उत्कंठा वाढविणारा संवाद अनिलभाऊ यांचा ठरला. समुहासमोर गेल्या ३ वर्षांत अडचणी कशा निर्माण झाल्या आणि गेल्या काही महिन्यांत त्याची झळ कशी वाढली हे त्यांनी सहज व सोप्याभाषेत सांगितले. गेल्या ३ वर्षांत बँकाचे नियम व धोरण बदलले. काही उद्योजक बँका बुडवून पळाले. त्यामुळे बँकांनी कर्ज पुरवठ्याचे नियम कठोर केले. कर्ज परताव्यासाठी मिळणारी ९० दिवसांची सवलत मर्यादित झाली. उद्योगासमोरील अडचणीपेक्षा नियमाला महत्त्व आले. शेतकरी व शेती यांना केंद्रस्थानी मानून जैन उद्योग समुह शेतकऱ्यांसाठी उत्पादने निर्माण करतो व सेवा देतो.  त्यामुळे या उत्पादनांचा पुरवठा बहुतेकवेळा उधारीवर होतो. सरकारी अनुदानावर होतो. तेथे पैसा थांबला. समुहाला इतर प्रकल्पांसाठी रोखीने कच्चामाल घ्यावा लागतो. जसे कांदा, केळी, आंबा. त्यासाठी शेतकऱ्याला आगोदर उचल द्यावी लागते. शिवाय, शेतकऱ्यांच्या हिताच्या सरकारी मोठ्या योजनांमध्ये समुहाने पाऊल टाकले. अशा योजना राजस्थान, आंध्र, मध्यप्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक या राज्यात पूर्ण केल्या. तेथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या. राज्य सरकार बदलले. नव्या सरकारने धोरणे बदलली. नंतर लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी जवळपास ६ महिने इतर विभागांचे काम रेंगाळले. अशा एकामागील एक कारणांमुळे समुहाचे सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवल कुठे ना कुठे ठप्प झाले. त्याचा परिणाम नियमित कर्जफेड होण्यावर झाला. कर्जावरील व्याज अगोदर चुकवायचे होते म्हणून कामगार-कर्मचारी यांचे वेतन थांबले. शेतकऱ्यांची देणी रेंगाळली. विविध प्रकल्पांसाठीच्या पुरवठादारांचे व्यवहार ठप्प झाले. यातून खेळते भांडवल जेवढे अडकले तेवढेच कर्ज वाढले. हे सारे टप्पे अनिलभाऊ सांगत असताना कामगार-कर्मचारी लक्ष देऊन ऐकत होते.

अनिलभाऊ यांनी सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणीतून समुह कसा बाहेर येईल ? हे सुध्दा आकडेवारी व कालबध्द पध्दतीने स्पष्ट केले. त्यांनी एकच मुद्दा प्रभावीपणे मांडला. तो म्हणजे, उद्योग समुहाला आज देणी जवळपास ५ हजार कोटींची आहे. समुहाची सर्व प्रकारची भांडवली गुंतवणूक जसे जागा, प्रकल्प, इमारती, यंत्रे, उपलब्ध कच्चा माल, उत्पादीत तयार माल याचे भांडवली मूल्य (नेटवर्थ व्हॅल्यू) ११ हजार कोटींचे आहे. जर जैन उद्योग समुहाने मालमत्ता विकून सर्व देणी चुकती केली तरी समुहाकडे ६ हजार कोटी रुपये हाती राहतील. अशावेळी उपलब्ध मालमत्तेच्या हमीवर आपण ३ हजार कोटी रुपयांचा भागीदार मिळवू शकतो किंवा सरकारी यंत्रणांसह इतरांकडे असलेली घेणी, जसे जैन इरिगेशन आणि जैन फूड या २ प्रकल्पांचे ग्राहकांकडून येणे ३ हजार कोटी वसूल करुन किंवा काही प्रकल्पात निर्गुंतवणूक करुन म्हणजे आपले भांगवल काढून आपण पुढची घोडदौड सुरु ठेऊ शकतो, हे सुद्धा अनिलभाऊंनी सांगितले.

अनिलभाऊ यांनी अजून महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला. गेल्या ३ वर्षांत समुहाने अनेक अडचणी पाहिल्या. गेल्या १० वर्षांत विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजाचे निव्वळ ५ हजार कोटी वेळेत चुकते केले. असे व्यवहार करुनही आज बँकांचे नियम अडचणीचे ठरत आहेत. मधल्या काळात समुहातील काही प्रकल्पांच्या उत्पादन विक्रीचे व्यवहार ६५ ते ७० टक्के घसरले. उत्पादन निर्मितीचे काम ३० ते ३५ टक्केच राहिले. अशावेळी समुहाने वेतन कपात करणे किंवा मनुष्यबळ कमी करणे असे कटू निर्णय घेतले नाहीत. उलट या काळात चांगले काम करणाऱ्या कामगार-कर्मचारी यांची वेतनवाढ केली.  शेवटी या ओढताणमुळे आज कर्मचाऱ्याचे वेतन विलंबाने होत आहे.  यातून सावरण्यासाठी रोखीने उत्पादन विक्री, थकबाकी वसुली यास प्राधान्य देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करीत आहोत.

जैन उद्योग समुह मोठा आहे, समुहाकडे खूप पैसा आहे, तरीही समुहाचा पैसा गेला कुठे ? अशी शंका मनात येऊ शकते. याचेही स्पष्टीकरण देताना अनिलभाऊ म्हणाले, 'आपण प्रकल्प विस्तारले. त्यासाठी कर्ज घेतले. कर्जावर नियमित व्याज दिले जात आहे. एक गोष्ट नक्की, आपण आपला पैसा भारतातच आणि आपल्याच प्रकल्पात लावला. आपण आजचा, उद्याचा व भविष्याचा विचार करुनच प्रकल्प उभारले. ते पुढील ७०-८० वर्षे काम करतील'. आपले हितगुज संपवताना अनिलभाऊ म्हणाले, 'विविध बँका व वित्त संस्थांशी मी बोलतो आहे. आपण अडचणीतून बाहेर येणार हा विश्वास आहे. आपण सारे १२ हजार कामगार-कर्मचारी माझ्या सोबत उभे राहा. समुह संकटातून बाहेर पडेल आणि पुन्हा संकटात येणार नाही. मी हा शब्द देतो. तुम्ही सहकार्याचा हात द्या !' या आवाहनानंतर उपस्थित सर्वांनी एकीची वज्रमूठ वर करुन परिस्थितीशी निपटण्याचा एल्गार केला.

या हितगुज कार्यक्रमात भावनिक ओलाव्याचे आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे आवाहन अशोकभाऊ यांनी केले. ते म्हणाले, 'जैन उद्योग समुहाचा प्रारंभ जैन ब्रदर्स म्हणून झाला होता. त्यावेळी जी मंडळी सोबत होती ती आज ३५-४० वर्षे सोबत आहे. खरे तर कामगार-कर्मचारी यांच्यासोबत सतत हितगुज व्हायला हवे. यापूर्वी सन १९९४ मध्ये मोठ्याभाऊंनी सर्वांशी संवाद केला. नंतर २०१५ मध्ये आपण असेच एकत्र आलो. तेव्हा निमित्त मोठेभाऊंवरील चित्रपटाचे होते.  मोठेभाऊ आपणाशी संवाद साधताना भावविवश झाले होते. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. त्यानंतर आपण आज भेटत आहोत. ते सुध्दा एकीची वज्रमूठ करुन. जैन उद्योग समुह हा पहिल्यांदा अडचण अनुभवत नाही. यापूर्वी सन १९८६-८७ मध्ये आपण अडचणीत होतो. तेव्हा १२०० कामगार व सहकारी होते. दुसऱ्यांदा सन १९९६-२००३ मध्येही आपण अडचणीला सामोरे गेलो. तेव्हा ४५०० कर्मचारी होतो. आज अडचणीत आहोत. आपण सर्व मिळून आज १२ हजार आहोत. उलट आव्हान पेलू शकतील असे तीनपट संख्याबळ आहे. सन २००६ ते २०१९ अशा १३ वर्षांत समुहाने एकूण आर्थिक भरारी ६०० कोटीवरुन साडेआठ हजार कोटीवर घेतली. यामागे या १२ हजार सहकाऱ्यांचे सहकार्य, परिश्रम, निष्ठा व जबाबदारी आहे'.

जैन उद्योग समुह अडचणीत असल्याचे कळल्यानंतर अनेक हितचिंतकांनी मदतीचा हात पुढे केल्याचे सांगून अशोकभाऊ म्हणाले, 'एक सामान्य व्यक्ती १० लाखांचा धनादेश घेऊन आला व म्हणाला मी एवढे देऊ शकतो. तुम्ही ते कधीही परत करा.' दुसरा एक शेतकरी आला. तो आपला ग्राहक व हितचिंतक होता. त्याने १/१ कोटीचे २ धनादेश देऊ केले. म्हणाला, 'ही रक्कम घ्या. मला व्याज नको. कोणतीही सिक्युरीटी नको. तुम्ही कधीही रक्कम परत करा'. ही उदाहरणे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 'समुहावर असे अव्यक्त आणि विनालाभाचे प्रेम करणारे हजारो लोक आहेत', असे अशोकभाऊ आवर्जून म्हणाले.

मोठेभाऊ यांच्या सहवासातील अनेक प्रसंगांचा उल्लेख करुन अशोकभाऊ म्हणाले, 'मोठेभाऊ म्हणत संकटे एकत्र येतात. झुंडीने धक्के मारतात. तेव्हा परिश्रम दुप्पट करा. नवा मार्ग शोधा. प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे इतरांची मदत मागा. तेव्हा सकारात्मक प्रतिसाद मिळेल'. तसा प्रतिसाद आज आपल्या उपस्थितीतून व एकीच्या वज्रमुठीतून मिळाला आहे.

समारोप करताना अशोकभाऊ म्हणाले, 'मोठेभाऊ असताना आम्ही काल येथे होतो. मोठेभाऊंच्या सोबत आजपर्यंत येथे आहोत आणि मोठेभाऊंच्या पश्चात आम्ही येथेच असणार आहोत. कारण मोठेभाऊ जाताना पैशांच्या ठिकाणी कामाचा,  संपत्तीच्या ठिकाणी परिश्रमाचा आणि वैभवाच्या ठिकाणी जबाबदारीचा वसा व वारस सोडून गेले आहेत'. अखेरीस अशोकभाऊ यांनीही एकीची वज्रमूठ उंचावून सर्वांना पाठिंब्याचा एल्गार करण्याचे आवाहन केले. पहिल्यांदा सर्वांनी बसलेल्या स्थितीत हात उचांवून एल्गार केला. नंतर सर्व उपस्थितांनी उभे राहून पुन्हा हात उंचावून एल्गार केला. हे दृश्य भावनिक तर होतेच मात्र एकमेकांवरील विश्वासाला घट्ट करणारे होते.  विशेष म्हणजे, समुहाच्या वाटचालीतील हा सर्वांत भावविभोर प्रसंग समुहाच्या संस्थापक सदस्यांपैकी असलेले दलिचंद जैन, गिरधारीलाल ओसवाल आणि श्रद्धेय मोठेभाऊ यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असलेले एस. व्ही. पाटील, आर. स्वामीनाथन यांनीही गहिवरुन अनुभवला.

तब्बल पाच तासांच्या या हितगुजमध्ये ६ हजारांवर कर्मचाऱ्यांनी शांतपणे ऐकून घेतले. काही वेळा अनेकांचे डोळे ओलावले. अनेक जण हसले. बहुतेकांनी दाद देत टाळ्या वाजवल्या. या हितगुजसाठी समुहातील सर्वच कर्मचारी हजर राहिले. बैठक व्यवस्था मुख्य सभागृहासह इतर २ ठिकाणी होती. तेथे मोठे स्क्रिन लावलेले होते. तब्बल साडेचार तास सारेच स्थानबध्द होते. व्यासपिठावर समुहात गेली ३४ वर्षे कार्यरत सहकारी, काही महिला प्रतिनिधी होते. समारोप नंतर उपस्थितांना अवघ्या १० मिनिटांत जेवण मिळाले. संचालक, मान्यवरांनी व्यासपिठावरच जेवण घेतले. समाधान, विश्वास, निष्ठा याची ऊर्जा घेऊन दुपटीने व जबाबदारीने प्रयत्न करण्याचा निर्धार करुन प्रत्येकजण बाहेर पडला ... अर्थात, 'जैन है ... तो मुमकिन है ...' हा विश्वास त्यांच्याही हृदयात आहेच ...

No comments:

Post a Comment