Saturday 4 January 2020

जळगाव मनपात कोण आहेत हे निर्लज्ज ?

जळगाव महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. कारभारी आमदार मामा आणि महापौर मामी आहेत. यांचे नेते माजी पालकमंत्री गिरीशभू आहेत. बाकी उरलेले भाजपचे नगरसेवक म्हणजे किस गली मे खसखस आहेत. जमेल तेथे शहराचे वाट्टोळे करणे आणि सरकारी निधीतून पैसा खाणे असा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. पैसा खाण्यात संघ परिवाराशी संबंधित चेहरे आणि त्यांचे नातेवाईकही आघाडीवर आहेत.


जळगावमधील खड्डेमय रस्त्यांवर लेखन करताना महापौर मामींवर कठोरपणे टीका केली तर आमदार मामा म्हणाले, 'भाऊ महिलेवर टीका करु नका.' यावर आमदार मामाला म्हटले, 'खरे आहे मामा तुमची पत्नी ती महिला आहे पण जळगावमधील सर्व सामान्यांची आई, बहिण, पत्नी या महिला नाहीत का ? फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमध्ये पाथवेवर अतिक्रमीत हॉकर्स दुकाने लावून बसतात. तेव्हा सामान्य घरातील महिला विना धक्के खात फिरू शकत नाही. तेव्हा तुम्हाला महिलेचा आदर करावा असे वाटत नाही का ?' अर्थात आमदार मामाने यावर उत्तर दिले, 'अप्पर आयुक्तांना १० वेळा सांगितले तरी ते अतिक्रमण हटवायची कारवाई करीत नाहीत.'  मनपातील भाजप पदाधिकाऱ्यांची ही लायकी आहे. यांना अधिकारी जुमानत नाहीत. मग हे सारे निर्लज्ज तेथे काय करीत आहेत ? असा प्रश्न पडतो.

आमदार मामाच्या स्थानिक विकास निधीतून जळगाव शहरात १०० सिमेंट बाके लावली जाणार आहेत. यासाठी १८ लाखांचा निधी आहे. सिमेंट बाकाची किंमत १० हजार ८०० रुपये दाखविली आहे. हे सिमेंट बाक खरेदी करणे हा एक छोटा घोटाळा आहे. सिमेंट बाकाची सरकारी किंमत १० हजार ८०० रुपये ठरली असून त्यात जीएसटी आहे असे आमदार मामांचे हस्तक सांगतात. या बाकांचा पुरवठादार संघ परिवाराशी संबंधित आहे. माजी पालकमंत्र्यांची तेथे उठ बस होती.

आता सिमेंट बाके खरेदीत घोटाळा कसा आहे ? ते पाहू. सिमेंट बाक अगदी चांगल्यात चांगल्या क्वालीटीचा ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयात उपलब्ध आहे. त्यावर १८ टक्के जीएसटी धरला तरी त्याची किंमत ६ हजार रुपयांपर्यंत जाते. असे असताना सरकारी दर म्हणून एका सिमेंट बाकाला १० हजार ८०० रुपये दिले जाणार आहेत. आता वरील रकमेत म्हणजे ४ हजार ८०० रुपयात कोणा कोणाची हिस्सेदारी असेल ? सिमेंट बाक खरेदी ही टेंडर काढून झालेली नाही. कोणी तरी ठेकेदार आहे. त्याच्याशी करार केला आहे. हा ठेकेदार पुरवठादाराकडून सिमेंट बाक देणार आहे. 'कोयले की दलाली में हात काले' ही म्हण येथे लागू होते. जर टेंडर काढून खरेदी झाली असती तर सिमेंट बाकाचा दर ४ हजार ६०० पेक्षाही खाली आला असता.

आता या सिमेंट बाक खरेदीचा क्लायमैक्स असा की, जो सिमेंट बाक संघ परिवाराशी संबंधित पुरवठादार देणार आहे, तोच सिमेंट बाक अवघ्या ४ हजार ६०० रुपयात उपलब्ध करुन देण्याचे कोटेशन मी स्वतः ठेकेदाराकडे दिले आहे. म्हणजेच शहरासाठी आलेल्या १८ लाखांच्या निधीत किमान २०० सिमेंट बाक खरेदी होतील. पण यावर चर्चा नाही. हा विषय आमदार मामाला किमान १० वेळा सांगितला आहे.

शहरासाठीचा निधी लुटण्यासाठी आमदार मामांच्या सोबत मित्र परिवारातील ठेकेदार आणि संघ परिवारातील मंडळींचे नातेवाईक यांनी कसे कोंडाळे केले आहे, याचे हे एक किरकोळ उदाहरण आहे. मनपाने १०० कोटी रुपयांची कामे एकात एक जोडून (क्लब करुन) काढलेल्या ४० कोटींच्या कामांची निविदा जर अभ्यासली तर कोण कोणाचे बगल बच्चे पोसतो आहे हे लक्षात येईल. सामाजिक व्यासपिठांवर सार्वत्रिक प्रामाणिकपणावर भाषण ठोकणारी मंडळी सुध्दा मातीचेच पाय बाळगून असतात हे जळगावकरांनी लक्षात घ्यावे. सबका साथ असे म्हणायचे आणि बगलबच्च्यांचा विकास करायचा हेच तर सूत्र आहे.

(टीप - या विषयावर संघ परिवार किंवा आमदार मामांचे हितचिंतक यांनी काही तरी खुलासा करणे अपेक्षित आहे.)

No comments:

Post a Comment