Friday 24 January 2020

‘शिल्पकवडा मूर्तीकार’ किशोर सोनवणे

आयुष्यात घडणाऱ्या ‘दैवी योगायोगांवर’ फारसा विश्वास दाखवला जात नाही. तशा योगाचा अनुभव आल्यानंतर त्याची चर्चा सोशल मीडियात करणे हे अलिकडे विवादाचे कारण होते. ‘दैवी’ या शब्दाला विरोध करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनवाले, देव न मानणारे निधर्मी, देवादिकांच्या स्तोमाला विरोध करणारे बि ग्रेडी आणि देवादिकांशी संबंधित ब्रह्मवृंदाला सतत शिव्याशाप मोजणारे नव्या पिढीतील संशोधक हे चेकाळल्यागत प्रतिक्रिया (कमेंट) नोंदविण्यासाठी सरसावतात. अनुभव सांगणाऱ्यास अभिव्यक्त होण्याचा अधिकार नाकारत स्वतःच्या प्रतिक्रियांना अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मानत, नको त्या ठिकाणी प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या टोळ्या समाजमाध्यमात सक्रिय आहेत. अशा ‘ट्रोलर’ मंडळींच्या भाऊगर्दीत आपण अनुभवलेल्या दैवीयोगाचा किस्सा ‘वाजवून’ सांगणे आवश्यक असते. माझ्याबाबतीत तसाच एक अनुभव काल शुक्रवारी आला. तो यावेळी सांगतो.
खानदेशच्या इतिहासाचे संकलन करताना जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांची माहिती संकलित करीत आहे. प्राचीन काळात खानदेशचा परिसर हा गुजरात, मध्यप्रदेश यांना लागून होता. मोगलांची व मराठ्यांची या भागावर सत्ता होती. यात नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा (जुने नाव बागलाण) हा भागही इसवी सन १६३८ पासून खानदेशमध्ये समाविष्ट होता. इसवी सन १८७० पर्यंत ही स्थिती होती. अहिराणी बोलीमुळे या भागाचा भाषिक संबंध आजही खानदेशशी कायम आहे. प्राचीन काळात खानदेशात जी मंदिरे निर्माण झाली त्यात देवळाणे (ता. सटाणा) येथील जोगेश्वरी महादेव मंदिराचाही समावेश होतो. या मंदिराची माहिती घेण्यासाठी मालेगावमार्गे देवळाणेकडे निघालो. मालेगाव फाट्यापासून विचारत-विचारत देवळाणेकडे वाहन पळवित होतो. सोबत गुगल मैप सुरु होता. नेहमीप्रमाणे देवळाणे बसस्टाप हा फलक दिसल्यानंतरही गुगल मैप अजूनही एक किलोमीटर पुढे देवळाणे गाव दाखवित होता. आम्ही वाहन पुढे नेले. परंतु चालक म्हणाला, ‘एखाद्याला विचारु या’. तेव्हा समोरुन महिला दुचाकीवर येताना दिसली.

हात दाखवून थांबवले आणि ‘देवळाणे गाव कुठे आहे, तेथील प्राचीन मंदिरावर जायचे आहे’ असे सांगितले. दैवी योगायोग येथून सुरु झाला. त्या महिलेने सांगितले, ‘तुम्ही गावापासून पुढे आला आहात. चला, मी तुम्हाला मंदिराजवळ नेते’. पुन्हा मागे वळून गावाकडे निघालो. मंदिराजवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबविली आणि समोर असलेले मंदिर दाखविले. एवढेच नव्हेतर त्यांनी मोबाईलवर माहितगाराशी संपर्क साधून आम्हाला मंदिराची माहिती देण्याची व्यवस्था केली. या गडबडीत त्यांना नाव विचारले. त्या म्हणाल्या, ‘मी श्रीमती मोरे असून, कृषी विभागात सर्वेक्षक आहे’. तेवढ्यावेळात माहितगार मदन पवार हे मंदिराजवळ पोहचले. नंतर मी व फोटोग्राफर सहकारी जवळपास दोन तास मंदिरात फोटोग्राफी करीत होतो. मंदिराच्या बाहेरील व आतील शिल्पकामांचे फोटो काढले. मंदिराविषयी आंतरजाल माध्यमात उपलब्ध माहितीवरुन थोडेफार काही समजत होते. सविस्तर माहिती नंतर मिळवू या अपेक्षेने काम पूर्ण केले. ‘मंदिराच्या सविस्तर माहितीसाठी अजमेर सौंदाणे येथील मूर्तीकार यांची भेट घ्या’, असे मदन पवार म्हणाले. त्यांना मूर्तीकाराचे नाव माहित नव्हते आणि मोबाईल क्रमांकही नव्हता.

त्याचवेळी शेजारील अजमेर सौंदाणे येथील सरदारसिंग पवार जोगेश्वराच्या दर्शनासाठी आले. आम्ही फोटोग्राफी करीत असल्याचे पाहून त्यांनी चौकशी केली. आमच्या कामाचा हेतू त्यांना सांगितला. मंदिराची माहिती कुठे मिळेल हे विचारले. त्यावर त्यांनी अजमेर सौंदाणे येथील मूर्तीकार किशोर सोनवणे यांचे नाव आणि त्यांच्या शिल्पकामाच्या जागेचा पत्ता दिला. दुसरा दैवीयोग हा होता. सरदारसिंग भेटले नसते तर बहुधा आम्ही मंदिरातील काम आटोपून जळगावकडे परत निघालो असतो. आता मूर्तीकाराचे नाव व पत्ता मिळाला होता. सरदारसिंग म्हणाले, ‘किशोर सोनवणे यांना भेटल्याशिवाय परत जाऊ नका’. त्यांचा हा सल्ला मनावर घेऊन अजमेर सौंदाणेकडे निघालो. अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर पुढे ते गाव होते. गावाच्या बाजुलाच किशोर सोनवणे यांच्या शिल्पकामाजी जागा आहे. बाहेरच्या बाजुला शिवाजी महाराजांचे एक-दोन पुतळे आहे. तेच लॅण्डमार्क होते.

किशोर सोनवणे तेथे नव्हते. त्यांच्या सहकाऱ्याने आमची विचारपूस करुन त्यांना निरोप दिला. मंदिराची माहिती घ्यायला जळगावहून कोणी आले आहे, हे ऐकून अवघ्या १० मिनिटात किशोर सोनवणे समोर आले. जुजबी चर्चा करीत खानदेश इतिहास संकलन विषयी माहिती देताच ते म्हणाले, ‘चला आपण घरी जाऊ या. तेथे चहा घेऊ आणि बोलू’. आम्ही त्यांच्या घरी गेलो. कडीपाट्याचे जुन्या पद्धतीचे घर होते. चहापान झाल्यानंतर किशोर सोनवणे यांनी मंदिरावर बोलायला सुरुवात केली. ते मला म्हणाले, ‘तुम्ही मंदिरावर जाऊन आला असाल तरी तेथे पुन्हा जाऊन तुम्हाला मी माहिती समजून देतो.’ अर्थात, तेथे अगोदर दोन तास फोटोग्राफी केलेली होती. त्यामुळे पुन्हा मंदिरावर जायला मी उत्सुक नव्हतो. सोनवणे यांनी परत आग्रह न करता, माहिती द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘जोगेश्वरी मंदिराच्या गाभाऱ्यापासून सांगतो. तेथे पार्वतीची मूर्ती जोगेश्वरीच्या रुपात आहे’. हे पहिलेच वाक्य मी ऐकले आणि पटकन म्हणालो, ‘किशोरजी आपण मंदिरातच जाऊ या’. ते हसेल आणि म्हणाले, ‘चला मी तुम्हाला हवा तो तेवढा वेळ देतो’. माझ्यासाठी हा तिसरा दैवीयोग होता. मी मात्र ओशाळलो. कारण, वेळ देण्याची तयारी माझी हवी होती. मी त्याच कामासाठी गेलो होतो.

मंदिराकडे जाण्यापूर्वी किशोर सोनवणे यांनी स्वतःच्या चित्रकारी विषयी सांगितले. ते म्हणाले, ‘मी खामगाव येथील कला महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. अजिंठा हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. तेथील लेण्यांमध्ये तासंतास बसून तेथील मूर्तीकाम व चित्रकामाचे निरीक्षण करीत गेलो. माझ्या लक्षात आले की, तेथील चित्रात वापरलेले रंग हे वनस्पतींपासून तयार केलेले नाहीत. त्यासाठी इतर घटक वापरले आहेत. कारण, वनस्पतीपासून तयार केलेले रंग काळपटतात. अजिंठा येथील रंग आजही ताजे व मूळ स्वरुपात आहेत. मी शोधून काढलेल्या घटकांचे रंग वापरून मी स्वतः अजिंठ्यांच्या चित्रांची प्रकिकृती तयार करीत आहे. त्यांनी ते रंग व चित्रे दाखविली.’

तेथून आम्ही मंदिराकडे परत गेलो. दैवी योगायोगाचा खरा आनंद तेथे आला. किशोर सोनवणे यांनी मंदिराच्या इतिहासाची संपूर्ण मांडणी नव्याने केली. आंतरजालवर सध्या फिरणाऱ्या कटपेस्ट माहितीला छेद देत त्यांनी मंदिरातील एक-एक दगडाची कहीणी उलगडून सांगायला प्रारंभ केला. ‘सन २००४ पासून या मंदिरात मी येतो. वडील स्व. जीभाऊ हे सुद्धा मूर्तिकार होते. त्यांच्या सोबत मंदिरात येत होतो. तेव्हा पासून आजपर्यंत या मंदिरातील प्रत्येक दगड, प्रत्येक मूर्ती, नक्षी ही माझ्याशी बोलली आहे. तीची निर्मिती व त्यामागील उद्देश मला समजला आहे’ हे नम्रतेने सांगत देवळाणे येथील जोगश्वरी मंदिर किमान एक हजार वर्षांपूर्वीचे म्हणजे, इसवी सन ११०० ते १२०० च्या काळातील असावे असे संगितले. म्हजेच, हा काळ यादवकाळाच्या पूर्वी ४०० वर्षांचा असावा. यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. त्यांनी जोगेश्वरी मंदिर हे कलचुरींच्या काळात सुरु झाले असावे आणि यादव काळात ते घाईने पूर्ण झाले असावे असा तर्क मांडला. त्यासाठीचे शिल्पकामातील अनेक तपशिल थेट दाखविले. ते स्मरणात आहेत. त्याचा उल्लेख येथे देत नाही. कारण, ते स्वतः देवळाणे मंदिरावर सविस्तर पुस्तक लिहीत आहेत.

माणसाच्या आयुष्यातील पुरुषार्थ आणि त्याची मंदिरातील जागा, माणसाच्या मनातील विकार, माणसाच्या आयुष्यातील कार्य, मानवाच्या दाम्पती जिवनात आनंद, संगीत, काम याचे महत्त्व अशा नानाविध विषयांची माहिती आणि प्रत्येक मूर्तीचा असलेला संबंध यावर तब्बल तीन तास किशोर सोनवणे बोलत होते. मी केवळ ऐकून घेत पुन्हा फोटो काढत होतो. भारतीय शिल्पकामातील अनोख्या परंपरा, प्रतिके, देवादिके, सुरा-सुंदरी, अवतार, चिन्ह याची उत्कंठावर्धक माहिती उलगडत गेली. खरेतर हा मुख्य दैवी योगायोग होता. खरे सांगतो, किशोर सोनवणे यांच्या रुपात मंदिरच माझ्याशी बोलत होते.

मंदिराच्या उभारणीसाठी दगड कोठून आणला, त्यावरचे शिल्पकाम कुठे झाले, मंदिराचा प्राथमिक आराखडा काय असावा, तो कशा पद्धतीने दुय्यम कारागिरांकडे पोहचला, मंदिराचा मूळ आराखडा आणि त्याची ब्लूप्रिंट कशी दिली गेली याची कहाणी किशोर सोनवणे यांनी दुंधेच्या डोंगराजवळ नेऊन कथन केली. तेथील जुन्या शिळा, त्याला दिलेले प्राथमिक आकार वगैरे यावर ते भरभरून बोलत होते.

योगेश्वरी मंदिराच्या मूळ आराखड्यात झालेले बदल, कारगिरांच्या पिढी किंवा शैली बदलामुळे झालेले बदल, मंदिराचे स्तंभ लावताना झालेली गल्लत, गाभाऱ्याचे काम पूर्ण करुन वरील घुमटाचे काम करण्यास झालेली घाई, वाढीव कामातील तफावत अशा अनेक बाबींविषयी किशोर सोनवणे भरभरुन बोलत होते. मला आनंदून ऐकण्याशिवाय दुसरे काम नव्हते. किशोर सोनवणे यांनी मंदिराच्या उभारणीतील एक मुद्दा स्पष्ट केला.

हेमाडपंथी मंदिरांचे दगड एकावर एक रचून ते खोबणीत घट्ट केले असावेत असा आजपर्यंतचा समज होता. त्याला छेद देत त्यांनी मंदिराच्या दगडांच्या घट्ट पकडसाठी आत वापरलेल्या लोखंडाच्या पट्ट्या दाखविल्या. तेथे आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे, हजार वर्षापूर्वी भारतीय कलावंतांना लोखंडाचा वापर गरजुसार करता येत होता. त्याचे थेट पुरावेच त्यांनी दाखविले. अशा अनेक गोष्टी किशोर सोनवणे यांच्या मुखातून निघत गेल्या. तब्बल तीन तास त्यांच्यासोबत मी मंदिर अनुभवत होतो. हे काय दैवी योगायोगाशिवाय कमी घडले होते ? जरा फ्लैशबैकमध्ये जाऊ ... जर त्या महिला भेटल्या नसत्या, जर सरदारसिंग भेटले नसते, त्यांनी सल्ला दिला नसता आणि किशोर सोनवणे इतर कामात व्यस्त असते ... तर मी हे सारे काही अनुभवू शकलो नसतो. लिहू शकलो नसतो. अशा गोष्टी योगायोगाने घडतात असे इतर लोक म्हणतील, पण हे सारे योगश्वरी महादेव मंदिराच्या ठिकाणी घडले. ते देवाच्या ठिकाणी घडले म्हणून याला दैवी योगायोग म्हणायचे ... किशोर सोनवणे हा माणूस शिल्पकडवा आहे. मनातले ओळखणाऱ्याला आपण ‘मनकवडा’ म्हणतो. जो शिल्पाच्या मनांतील ओळखतो ... तो ‘शिल्पकवडा’ ...

No comments:

Post a Comment