Thursday 16 January 2020

वंशावळीचा वाद - गागाभट्ट ते संजय राऊत!

महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत घाणेरड्या पातळीवर नेण्याचे पातक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरूषांच्या प्रतिमांची तुलना आणि विडंबन सोबत जात, समाज अशा विषयांवर उखळ्यापाखळ्या काढल्या जात आहेत. संपूर्ण भारतभूमीचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची इतर नेत्यांशी तुलना करण्याच्या अपराधात छत्रपतींच्या सातार गादीच्या वंशाकडे पुरावे मागण्याचा प्रमाद संजय राऊत या पत्रकाराकडून घडला आहे. अर्थात, राऊत विरोधात अश्लाघ्य भाषेतील टीका टीपणी समाज माध्यमात सुरु झाली आहे. हा प्रसंग लक्षात घेता इतिहासातील दुसऱ्या  प्रसंगाची प्रकर्षाने आठवण होते. तो प्रसंग म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी महाराजांच्या कुळाला  शुद्र ठरवून मंगल विधी करण्यास ब्रह्मवृंदाने नकार दिला होता. तेव्हा खुद्द महाराजांनाही आपल्या क्षत्रिय कुळाची वंशावळ शोधावी लागली होती.

महाराष्ट्रातील ब्रह्मवृंदावर कथितपणे 'लादलेल्या' या प्रमादाचे फटके आज ४०० वर्षानंतचा ब्राह्मण समाज भोगतो आहे. इतिहासातील अनेक कथित प्रसंगांसाठी आज प्रश्न उपस्थित करणारे विचारवंत द्वेषाचे वातावरण वाढवत आहेत. अशा अनुभवातून प्रश्न समोर उभा ठाकतो की, सातारच्या छत्रपतींकडे वंशाचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत यांच्या जात व समाजाचा शोध अजून कोणी कसा घेतला नाही ? आणि एका राऊतमुळे त्याचा समाजही पुढे वेठीस धरला जाईल का ?

इतिहासाच्या पानांमध्ये छत्रपतींच्या राज्याभिषेक प्रसंगाचे चित्रण जुन्या व नव्या संशोधकांनी आपापल्या परीने केले आहे. इतिहासाची नव्याने मांडणी करणारे शिवचरित्राचे अभ्यासक व संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी 'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?' या पुस्तकात राज्याभिषेकप्रसंगी हिंदू धर्माने शिवरायांचा कसा छळ केला याचे रसभरीत वर्णन केले आहे. लेखनात हिंदू धर्माचा उल्लेख असला तरी तेथे थेट ब्राह्मणांचाच संबंध जोडलेला आहे. कोकाटे म्हणतात, "राज्याभिषेकाला एकही पुरोहित मिळू द्यायचा नाही. असा चंग देशातील सर्व ब्राह्मणांनी बांधला. याप्रसंगी कायस्थ प्रभू असणारे बाळाजी आवजी यांनी पुरोहिताचा शोध सुरु केला. ब्राह्मण-कायस्थांचे हाडवैर असल्यामुळे कायस्थ राजांच्या बाजुला होते. बाळाजी आवजीने महाराष्ट्रातील सर्व भटजींना पौरोहित्यासाठी विचारले, सर्वांनी शिवाजी शूद्र आहे. आम्ही येणार नाही असे कळविले. तेव्हा बाळाजी आवजीने गागाभट्टाला बोलाविण्यासाठी केशवभट, भालचंद्रभट आणि सोमनाथ या तीन ब्राह्मणांना काशीला पाठविले. गागाभट्टाने या तिघांजवळ शिवाजी शूद्र असल्यामुळे मी येणार नाही, असे स्पष्ट कळविले. मित्रहो, ब्राह्मण आपल्या देशात येण्यापूर्वी कोणीही हलके नव्हते, कोणीही सवर्ण नव्हते, सर्वजण समान होते. पण आपल्यावर राज्य करण्यासाठी ब्राह्मणांनी वर्ण, जाती निर्माण केल्या व स्वत:कडे श्रेष्ठत्व घेतले. याचा प्रसार करण्यासाठी ब्राह्मणांनी ग्रंथ लिहिले. त्यालाच हिंदू धर्माचे ग्रंथ म्हणतात."

कोकाटे यांनी पुढे तपशील दिला आहे की, "केशवभट, भालचंद्रभट, सोमनाथभट आणि गागाभट या चार भटात गुप्त कट झाला असल्यामुळे बाळाजी आवजीने आपल्या विश्वासातील कायस्थ असणाऱ्या निळो येसाजीला पुन्हा गागाभट्टाकडे पाठविले. याप्रसंगी शिवरायांचे मूळ घराणे उदयपूरचे असल्याची बनावट कागदपत्रे बाळाजीने गागाभट्टाकडे पाठवली. शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा राजस्थानाशी कसलाही संबंध नसून भोसले घराणे मुळचे महाराष्ट्रातील वेरुळचेच आहे, हे बाळाजीला आणि गागाभट्टाला चांगले माहित होते. बाळाजीने पैशाचे आमिष दाखविताच गागाभट्ट सर्व ग्रंथ गुंडाळून रायगडाच्या पायथ्याजवळील पाचाडात आला. ब्राह्मण हे ग्रंथांचे व देवांचे बाप (निर्माते) असल्यामुळे गागाभट्टाला ग्रंथप्रामाण्यापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटला. गागाभट्ट पाचाडात आल्याबरोबर मोरोपंत पिंगळेने गागाभट्टाची भेट घेतली व राज्याभिषेक झाला तर ब्राह्मणांचे वर्चस्व संपेल व शिवाजी श्रेष्ठ ठरेल, त्यामुळे राज्याभिषेक करु नये.  असा सल्ला गागाभट्टाला दिला. गागाभट्टाने लगेच सरड्यासारखा रंग बदलला. शिवरायांना राज्यभिषेक करण्यास नकार दिला."

वरील सर्व तपशील खरा की खोटा याचा येथे ऊहापोह करायाचा नाही. या तपशिलातील एकच धागा पकडायचा तो म्हणजे, गागाभट्ट या पात्राने छत्रपतींच्या क्षत्रिय वंशावळीचे पुरावे मागितले. आज राऊत आडनावाचा पत्रकार छत्रपतींच्या सातारच्या गादीच्या वारसाकडे पुरावे मागतोय. छत्रपतींच्या राज्याभिषेक प्रसंगी कुळ आणि वंशावळीचा वाद उभा करताना ब्रह्मवृंदाला जो दोष आजही लावला जातो, त्याच्या विषयी दुसरी बाजुही समोर येते. ती लक्षात घ्यायला हवी.

फेसबुकच्या 'छत्रपती शासन संघटना महाराष्ट्र राज्य' या वॉलवर तन्मय देशपांडे यांचा "शिवराज्याभिषेक आणि ब्राह्मण विरोध - एक सत्यशोधन" हा लेख आहे. त्यात ते म्हणतात, "परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यामुळे कलियुगात क्षत्रिय उरलेले नाहीत. त्यामुळे ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण उरले. शिवाजी महाराज हे शुद्र आहेत आणि शूद्राला राज्याभिषेकाचा अधिकार नाही, असा दावा करून छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला. शिवरायांनी काशीहून गागाभट्टला आणून राज्याभिषेक करवून घेतला. हा खोडसाळ दावा आजपर्यंत प्रत्येकाने ऐकलेला-वाचलेला आहे, किंबहुना त्यावरून कितीतरी काळ ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यात वादंग निर्माण झालेला आहे. परंतु असा वाद घालणारे ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर या दोघांनी या दाव्यात किती खरे आणि किती खोटे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही". (याच लेखात छत्रपतींच्या क्षत्रियत्वाचे इतर तपशिल सुध्दा आहेत.)

या लेखाचा हेतू हाच की, छत्रपती शिवाजी महाराजांकडे वंशाचे पुरावा मागितल्याचे कथित कारण पुढे करुन जवळपास ४०० वर्षे ब्रह्मवृंदाला छळले जाते आहे. आता सातारच्या गादीचे वंशज यांना वंशावळीचे पुरावे मागणाऱ्या राऊत आणि त्यांच्या जात किंवा समाजाचा छळ कधी पासून व कधी पर्यंत करायचा ?


संदर्भ -
१) श्रीमंत कोकाटे (शिवचरित्राचे अभ्यासक, संशोधक) - राज्याभिषेकप्रसंगी हिंदू धर्माने शिवरायांचा केलेला छळ, दि. ११ डिसेंबर २०१३

http://anita-patil.blogspot.com/2013/12/blog-post_2403.html?m=1

२) तन्मय देशपांडे - शिवराज्याभिषेक आणि ब्राह्मण विरोध - एक सत्यशोधन, दि. ३० अॉगस्ट २०१४

https://m.facebook.com/marathasevak01Az.g/posts/1499315553647022