Thursday, 2 January 2020

बस्स झाले लवंगी फटाके ...

नाथाभाऊ यांना पत्रकार मित्राने लिहिलेले खुले पत्र 

आ. नाथाभाऊ गेल्या दोन दिवसात तुम्ही केलेल्या आरोपाच्या बातम्या सोशल मीडियातून वेगात व्हायरल झाल्या. तुम्ही म्हटले की, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तुमची उमेदवारी कापली. गेल्या ३ वर्षांत हा विषय वारंवार चावून चोथा झाला आहे. त्यामुळे या बातमीला नाथाभाऊंचा गौप्यस्फोट किंवा नाथाभाऊंचा बाॅम्बगोळा असा शब्दही आता वापरला जात नाही. तुम्ही केलेल्या आरोपाचे गांभीर्य नंतर तुमच्याच कृतीने संपवून टाकले. भाजपच्या एका बैठकीत तुम्ही आणि गिरीश महाजन एकत्र आले. या बैठकीत तुम्ही दोघे जवळ बसले. शिवाय, हास्य विनोदात एकमेकांच्या टाळ्याही घेतल्या. तुमच्या या कृतीला माध्यमांनी लगेच मनोमिलन म्हणून टाकले. नाथाभाऊ तुम्ही असे करुन काय मिळवित आहात ? आता तुमचे बोलणे हे गौप्यस्फोट किंवा बाॅम्बगोळेही राहिले नाहीत. ते फुसके लवंगी फटाके ठरताहेत. वाटू दे तुम्हाला व तुमच्या काही समर्थकांना वाईट, पण जे खरे ते लिहायला हवे.

मागच्या महिन्यात तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुरावे दिले म्हणे. कशाचे ? तर विधानसभा निवडणुकीत कन्या रोहिणीताई खडसे-खेवलकर यांना पक्षातील विरोधकांनी पराभूत करण्यासाठी कसे प्रयत्न केले. तेव्हा माध्यमांनी त्यातील नावे विचारली तर तुम्ही पक्षशिस्त हा मुद्दा मांडून नावे सांगायचे टाळले. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी तुम्ही, फडणवीस व महाजन यांचे नाव घेता आहात. नाथाभाऊ, दुसरीकडे तुम्हीही अमळनेर, मलकापूर-खामगाव मतदार संघात पक्षविरोधी कारवाया केल्याचा अहवाल पक्षाकडे गेला आहे, असे सांगण्यात येते.

रोहिणीताई यांच्या पराभवामागील षडयंत्र सांगायला तुम्ही दिल्लीतही गेला होतात. तेथे पक्षाच्या कोणत्याही नेत्यांशी तुमची भेट झाली नाही. पण, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटून तुम्ही आलात. विधानसभा निवडणुकीच्या माघारीच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फाॅर्म तुमच्या नावाने आला होता. हे आता लपून राहिलेले नाही. पवार यांनी तुम्हाला थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याची संधी दिली होती. ती तुम्ही गमावली. वास्तविक पवार सतत म्हणत होते, खडसे आमच्या संपर्कात. तुम्ही ते नाकारत राहिलात.

नाथाभाऊ, तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटलात. पण, त्यांनी कधी असे म्हटले नाही की, खडसे आमच्या संपर्कात. परंतु काल मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, नाथाभाऊ आमच्या संपर्कात. गंमत आहे, पक्षाचे कार्याध्यक्षांनी जे सांगायला हवे ते, गुलाबभू सांगत आहेत. याच गुलाबभू आणि तुमच्यातून ३-४ वर्षांपूर्वी विस्तव जात नव्हता. तेव्हाची भाषणे आजही स्मरणात आहेत. यापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनीही आवाहन करुन टाकले की, नाथाभाऊंनी काँग्रेसमध्ये यावे. हे सारे प्रकार पाहात नाथाभाऊ, आता असे वाटते की केवळ बहुजन वंचित आघाडीसाठी अजून आपले नाव घेतले गेलेले नाही. यापूर्वी आरपीआयचे रामदास आठवले यांचेही निमंत्रण तुमच्यासाठी येऊन गेलेले आहे. तुमच्या सारखा महाराष्ट्र हादरविणारा नेता आज भाजपत आगतिक होऊन इतर राजकिय पक्षांच्या दारोदार कशासाठी फिरतोय ? हे अस्वस्थ करणारे आहे.

यात तुमचीही चूक आहे, असे गंभीरपणे म्हणावे लागेल. भाजपत जर आपली कोंडी होते आहे आणि पक्षातील वरिष्ठ मंडळी आपली कुचंबणा करीत असतील तर तुम्ही तेथे थांबला कशासाठी आहात ? आता याच एका प्रश्नाचे उत्तर देऊन टाका. कारण फडणवीस, महाजन ही मंडळी तुमच्या वाईटावर होती, हे आता पुन्हा-पुन्हा सांगून काहीही उपयोग नाही. ते हास्यास्पद वाटायला लागले आहे. शिवाय, आरोप केल्यानंतर तुम्ही कुठेतरी समोरासमोर भेटल्यानंतर आपापसात टाळ्यावाजून हसून फोटो काढायचे आणि कार्यकर्त्यांनी मात्र सोशल मीडियात दोघांवर गलिच्छ कमेंट करायच्या हे जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची व राजकिय नेत्यांची पातळी घसरविणारे आहे. माध्यमे, कार्यकर्ते व जनता यांची मजा घेण्याची ही प्रवृत्ती राजकिय नेत्यांसाठी घातकच आहे. 

इतर माध्यमातील मंडळी जेव्हा आम्हाला विचारतात, तुमचे नाथाभाऊ काय करतील ?’ या प्रश्नावर सांगावे लागते, त्यांचा काहीही भरवसा नाही. कारण, दिल्लीत तुम्ही कोणाला भेटता, मुंबईत कोणाला भेटता, खडसे फार्मवर कोणाला भेटता आणि सभांमधून जाहिरपणे काय बोलता ? याचा आता नेम राहिलेला नाही. मी यापूर्वी लढवय्ये, खमके आणि खंबीर नाथाभाऊ पाहिले आहेत. पण आता तुमची अवस्था सिंहासारखी असली तरी ती अरण्यरुदन करण्याच्या अवस्थेतील आहे. कधीकधी सिंह अरण्यात वाट विसरतो. कोणत्या दिशेला जावे ? हे त्याचे त्याला कळत नाही. तेव्हा तो ओरडतो. ती डरकाळी नसते. तो असतो रडण्याचा आवाज. आगतिक होऊन केलेला ओरडा. नाथाभाऊ, आपणास या अवस्थेत पाहण्याची इच्छा नाही. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून टाका. तुमच्या थांबण्यासाठी भाजप ही आता जागा नाही, हे लक्षात घ्या. शेकडो-हजारो कार्यकर्ते तुमच्या कठोर व खंबीर भूमिकेची वाट पाहात आहेत. त्यांचा अधिक संभ्रम करु नका. एकदाचा निर्णय घेऊन मोकळे व्हा. आरोप-फेऱ्या-भेटी-संशय आणि ते नकली हास्य व पांचट टाळ्या आता नकोतच !

(विधायक आवाहन - नाथाभाऊंची समर्थक मंडळी, हे पत्र नाथाभाऊंना थेट लिहिले आहे. ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. उत्तर तेच देतील, नाहीतर या पत्राची दखल घेणार नाहीत. पण तुम्ही उगाच अंगावर घेऊ नका.)


संदर्भ –  
 




2 comments:

  1. नाथाभाऊंच्या खऱ्या, सच्च्या समर्थकांच्या मनातील भावनेला आपण लेखणीतून योग्य मांडणी केली. काही समर्थक अदबीमुळे, तसेच लहान तोंडी मोठा घास होईल म्हणून आपल्या सारखे मत स्पष्टपणे मांडू शकत नाही भावना पोहचवू शकत नव्हता. आपल्या माध्यमातून त्या नक्की पोहचतीलच ही आशा. धन्यवाद....

    ReplyDelete