Friday, 13 December 2019

पित्याचे 'आहेर' आणि कन्येला 'माहेर'

महायुती मोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत सरकार सुरु केले. भाजप सत्तेपासून लांब गेली. भाजप अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंड सुख घ्यायची संधी काहींना मिळाली आहे. या मंडळींमध्ये एकनाथराव खडसे हे सध्या आक्रमक आहेत. फडणवीस यांना घालून पाडून बोलायची एकही संधी खडसे सध्या सोडत नसल्याचे दिसते आहे. अर्थात, गेल्या साडेतीन-चार वर्षांत खडसेंचा अजेंडा हाच होता. सार्वजनिक ठिकाणी जेव्हाही बोलाल तेव्हा फडणवीसांवर टीका करा आणि भाजप नेतृत्वातील युती सरकारला घरचे आहेर द्या ! खडसेंनी सन २०१७ पासून केलेली जाहीर वक्तव्ये आज क्रमाने वाचली तर लक्षात येते की, भाजपत राहून खडसे विरोधी पक्षाचे काम करीत होते. फडणवीस यांचे वस्त्रहरण करीत होते. खडसेंनी फडणवीस सरकारवर जेवढे आरोप केले तेवढे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही केले नाहीत.

मुंडे असते तर मी मुख्यमंत्री झालो असतो, ज्याला मी प्रदेशाध्यक्ष केले त्यानेच पाठीत खंजीर खुपसला, पक्षाने माझ्या भरवशावर राहू नये. वगैरे-वगैरे वक्तव्ये खडसेंनी गोपीनाथ गडावर केली. अर्थात, खडसेंच्या मनांतील ही खदखद गेली चार वर्ष कुठेना कुठे व्यक्त होतच आहे. खडसे नवे काही बोलत नाही पण आपल्या दुर्दशेचा व कन्येच्या पराभवाचा ठपका थेट फडणवीसवर ठेवू लागले आहे. येथेच खरी मेख आहे. ती म्हणजे, मंत्रीपद भाजपने काढून घेतल्यानंतर खडसे यांनी पडणवीस सरकारला जाहिरपणे 'घरचे आहेर' देण्याचा सपाटा लावला. माध्यमांनी खडसेंच्या या कृतीला कधी खदखद म्हटले तर कधी टीका म्हटले. यातून एक झाले ते म्हणजे, फडणवीस व भाजपविषयी खडसेंनी नकारात्मक वातावरण तयार केले. त्यातून काय घडले तर, खडसे सरकारला देत गेले घरचा आहेर आणि भाजपवर नाराज मतदारांनी रोहिणीताई खडसे खेवलकर यांना पराभूत करुन दाखवले माहेर. म्हणजे मुंबईच्या विधी मंडळात जाण्याऐवजी रोहिणीताई मुक्ताईनगरातच थांबल्या.

खडसेंचे भक्त, समर्थक, कार्यकर्ते आणि केवळ खडसे निष्ठावंत यांना 'आहेर व माहेर' हा संबंध स्वीकारता येणार नाही. त्याच्या स्पष्टीकरणासाठी सन २०१७ ते सन २०१९ या तीन वर्षांत खडसेंनी केलेल्या वक्तव्यांची जंत्रीच समोर ठेवावी लागेल. या जंत्रीत खडसेंचा घरचा आहेर व खडसेंची खदखद असे शब्द त्या-त्या वेळी माध्यमांनी वापरले आहेत. ज्या पक्षाची व त्याच्या नेतृत्वातील सरकारची तुम्ही सतत बदनामी केली, त्याच पक्षाच्या उमेदवाराला मुक्ताईनगर व बोदवडवासीयांनी नाकारले. असे झाले तर खडसेंनी खूश व्हायला हवे. उलट अशा १०/१२ जागा पडल्या किंवा पाडल्या म्हणूनच फडणवीस हे पुन्हा परत आले नाहीत. नाकर्ता माणूस मुख्यमंत्री झाला नाही. एक प्रकारे मतदारांनी खडसेसाहेबांचे ऐकले ना ? बघू या खडसे केव्हा काय-काय म्हणाले,

३० मार्च २०१७ - मुंबई - उद्योग विभागाकडून औद्योगिक वापरासाठी दिलेल्या जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफिरी केली जाते. त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधानसभेत केला. राज्यात आपले सरकार येऊन अडीच वर्षे होत आली, तरी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याचा घरचा आहेर खडसे यांनी सरकारला दिला.

८ एप्रिल २०१७ - मुंबई - शालेय पोषण आहार वितरण घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची शिफारस एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याकडे करतो, या प्रकाराबद्दल विधानसभेत जाहीर नाराजी प्रकट करतानाच हे कसले सरकार? अशा संतप्त शब्दात टीकेची झोड उठवून राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला घरचा आहेर दिला.

अॉगस्ट २०१७ - मुंबई - माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय. सरकारकडे माहिती मागितली तरी मिळत नसल्याचे खडसेंचे म्हणणे आहे.

११ जानेवारी २०१८ - जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या भरोशावर राहू नये, स्वतःच्या पायावर उभे रहावे असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. जळगावातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना हा सल्ला दिला असून यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही भरभरून कौतुक केले आहे. मी नेहमीच त्यांचे खुल्या मनाने कौतुक केले आहे. त्यांनी बारामती येथे कृषिक्षेत्रात संशोधन करून नवी मुहूर्तमेढ रोवली आहे. माझ्या मनात अनेकदा विचार आले कि आपण बारामती येथे जाऊन राहावे, असेही खडसे म्हणाले.

२७ जानेवारी २०१८ - जळगाव - भाजप सरकावर ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा जोरदार टीका केली. मी गैरव्यवहार केला असेल तर सरकारने जनतेला दाखवावा, असेही खडसे यावेळी म्हणाले.

१६ फेब्रुवारी २०१८ - धुळे - यापुढे दुसऱ्या धर्मा पाटीलला न्यायासाठी जीव द्यावा लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते धुळे शहरात भाजप कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते.

१६ मार्च १९ - जळगाव - 'माणसाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे, मात्र स्वप्न असे पाहिले पाहिजे की चांगल्या चांगल्यांच्या झोपा या मोडल्या पाहिजे, जसे मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि अनेकांच्या झोप उडाल्या होत्या', असे विद्यार्थ्यांना उदाहरण देत पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली.

मार्च २०१८ - मुंबई राजकिय हेतूने प्रेरित होवून तथ्यहिन आरोप केले जातात. त्याची चौकशी होते. त्यात काहीच तथ्य निघाले नसल्याने आरोप तथ्यहिन निघाल्यावर आरोप करणाऱ्यांवर काय कार्यवाही होणार ? असा संतप्त सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला विचारला. सरकारला घरचा आहेर देत एकनाथ खडसे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायावरही भाष्य केले.

१८ जुलै २०१८ - नागपूर - एकनाथ खडसे यांचा सरकारला घरचा आहेर. सरकारचे धोरण बाजार समित्यांच्या विरोधात आहे. बाजार समित्यांकडे उत्पन्नाचे साधन नाही. बाजार समित्या बंद पडल्या तर स्पर्धा संपेल आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.

२८ नोव्हेंबर २०१८ - मुंबई - पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. गावेच्या गावे स्थलांतरित होण्याची भीती आहे. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे पाण्याचा प्रश्न वेळेत सोडवण्यात अपयश येत असून तोंड लपवून पळायची वेळ आमच्यावर येत आहे. पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे. सरकारने आमच्या लोकांचा जीव वाचवावा, अशा हताशपणे गाऱ्हाणे मांडत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.

१६ जून २०१९ - मुंबई - राज्य मंत्रिमंडळात जायला मला आता पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही. पक्षाने आयात केलेल्या नेत्यांना संधी देणे सुरु केले आहे. पक्षाच्या वाढीसाठी आयात नेत्यांची गरज पक्षाला वाटू लागली आहे, असा घरचा आहेर देत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.

१९ जून २०१९ - मुंबई - सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीच केली जात नाही. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात झाले आहेत, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

जुलै २०१९ - मुंबई - ४० वर्षांत मी एकही निवडणूक हरलेलो नाही. २८८ आमदारांपैकी एक सगळ्यांत भ्रष्ट आमदार म्हणून मी इथे उभा आहे. एकाही आमदाराने माझ्यावर आरोप केलेला नव्हता. एका बाहेरच्या माणसाने आरोप केला, असा घणाघाती हल्ला खडसे यांनी आपल्या भाषणातून चढवला. शिवसेना-भाजप सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने खडसे कुणावर निशाणा साधतील, याची उत्सुकता सर्वांना होती. खडसे यांनी भाजपला घरचा आहेर देताना त्यांच्यावरील आरोपांची जंत्रीच सभागृहापुढे वाचली.

२१ अॉगस्ट २०१९ - जळगाव - शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र, त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्ट मत माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त करीत सरकारला घरचा आहेर दिला.

सप्टेंबर २०१९ - जळगाव - मुख्यमंत्र्यांकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी वॉशिंग पावडर आहे. त्या वॉशिंग पावडरने नव्याने आलेल्यांना स्वच्छ धुवून घेतले जाते. मग भाजपात आल्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते आणि ते लोक कामाला लागतात”, अशा शब्दात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे.

१६ सप्टेंबर २०१९ - रावेर - काँग्रेसच्या काळात दणका मारताच कामे व्हायची. आता आपलेच सरकार असूनही कामे होत नाहीत. रस्ते खराब झाले असून जनता आमच्याकडे विचारणा करते. सरकार काही करत नसेल तर आता आपण श्रमदानाने कामे करू. यासाठी मी हाती घमेले घेतो. हरिभाऊ आपण फावडे घ्यावे. आपण श्रमदान करून रस्ते सुधारू, अशा मार्मिक शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजप सरकारला घरचा आहेर दिला.

खडसे यांच्या वक्तव्याचे वरील सर्व संदर्भ वाचले व त्यामागील आशय समजून घेतला तर लक्षात येते की, गेल्या ५ वर्षांत फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार नालायक व नाकर्ते होते. असा माणूस पुन्हा मुख्यमंत्री व्हायला नको यासाठी भाजपचा पराभव आवश्यक होता. म्हणून काही उमेदवार मलकापूर, रावेर-यावल, अमळनेर मतदार संघात पाडले गेले. असेही दिसते की, मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवडकरांनी ठरवून भाजप उमेदवारास पाडले. योगायोग एवढाच की, या मतदार संघात खडसे यांच्या कन्या रोहिणीताई या उमेदवार होत्या.

रोहिणीताई यांची उमेदवारी कोरी पाटी होती. त्या पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढल्या. खडसेंची पुण्याई त्यांना तारुन नेऊ शकली असती. पण खडसेंनी वारंवार पक्ष आणि फडणवीस विरोधात वक्तव्ये करुन मुक्ताईनगर व बोदवडमध्ये भाजप विरोधात वातावरण तयार केले, असे आता म्हणता येईल. स्वतःच रचत गेलेल्या सापळ्यात खडसे अडकले.

खडसे एकदा असेही म्हणाले आहेत, मला बारामतीत जाऊन राहावेसे वाटते. खडसेंनी बारामतीचे केलेले कौतुकही मुक्ताईनगर मतदार संघातील मतदारांनी मनावर घेतले. बारामतीचे शिल्पकार शरद पवार यांनी मुक्ताईनगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांची उमेदवारी माघारी घेतली. तेव्हा वाटले होते, खडसे यांच्या कन्येला विरोध नको म्हणून तसे केले गेले असेल. कारण खडसे उघडपणे बारामतीला जायचे म्हणत होते. पण पवार यांनी ऐनवेळी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत केले. बहुधा मतदार संघ सोडला अशी टीका नको म्हणून पक्षाच्या नावाने उमेदवार पुरस्कृत केला होता. पण झाले भलतेच. रोहिणीताई पराभूत झाल्या. पवार यांचीही तशी इच्छा नसावी. कारण पावर वारंवार म्हणाले होते, खडसे आमच्या संपर्कात. नंतर खडसे म्हणाले होते, मी कोणाच्याही संपर्कात नाही. नंतर पुन्हा खडसे म्हणाले, हो मला विरोधापक्षनेता होण्याची अफर होती. नंतर असेही चर्चेत आले की, पवार यांनी खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवा व्हावे म्हणून पक्षाचा अधिकृत एबी फर्म पाठवला होता. जिल्हा बँकेचे एक ज्येष्ठ संचालक हा फर्म घेऊन आले होते. आता हे सर्व संदर्भ लक्षात घेतले आणि खडसे यांनी अलिकडे पवार यांच्या घेतलेल्या भेटी पाहिल्या की, खडसेंच्या कन्येचा पराभव भाजप अंतर्गत विरोधकांनी केला की, पवार यांनी जाणून बुजून घडवून आणला ? खडसेंनी पवारांचे कौतुक केले. बोदवडच्या मतदारांनी पवार यांनी पुरस्कृत केलेल्या चंद्रकांत पाटील यांना निवडून दिले. खरे सांगतो, हा सर्व गुंता सोडवताना डोक्याचा पार भुगा होतो.

जुनी आकडेवारी पाहिली तर खडसे यांच्या मतदार संघातील प्रभावावर प्रश्नचिन्ह लागते. सन २०१९ च्या पूर्वी झालेल्या २ निवडणुकांमध्ये मुक्ताईनगर व बोदवड मतदार संघातून खडसे कधीही विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले नाहीत. हे दोन अनुभव लक्षात घेता स्वतः खडसे व त्यांच्या समर्थकांनी सन २०१९ च्या निवडणुकीत काळजी घ्यायला हवी होती. इतिहास काय म्हणतो, सन २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड. रवींद्र पाटील यांच्या विरोधात खडसेंना १८ हजार ३८९ चे मताधिक्य होते. म्हणजेच निसटता विजय मिळाला होता.  सन २०१४ मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत पाटील विरोधात खडसे यांना ९ हजार ७०८ मताधिक्य होते. हा विजय सुध्दा काठावर होता. सन २०१९ मध्ये खडसेंच्या कन्या सौ. रोहिणी खडसे खेवलकर या चंद्रकांत पाटील यांचेकडून १ हजार ९८७ मतांनी पराभूत झाल्या. बहुधा खडसेंनी भाजप व फडणवीसवर वारंवार केलेल्या टीकेमुळे भाजप निष्ठावंत, वा कट्टर आरएसएसच्या मंडळींनी खडसेंच्या टीकेचा उलटा अर्थ घेत भाजप उमेदवाराला मतदानच केले नसावे. शिवाय, खडसेंना बारामती आवडते म्हणून चंद्रकांत पाटील यांनाही मतदान केले असावे. हा युक्तिवाद खोडून काढायचा तर पंटर मंडळींनी बोदवडमधील बुथ निहाय मतदानाची टक्केवारी तपासावी. जेथे संघ परिवारवाले काळी टोपी घालून फिरतात तेथेच रोहिणीताई खडसे खेवलकर मागे पडल्या आहेत. स्वपक्षावर टीका करणाऱ्यांना खरे तर मुक्ताईनगर व बोदवडचा निकाल धडा शिकवणारा आहे. तुम्हीच पक्ष व माणसांविषयी नकारात्मक बोलाल तर तुम्हीच नाकारले जाल. खडसेंनी भाजपला घरचे आहेर दिले. मग मतदारांनी उमेदवाराला माहेर दाखवले. एकदा या वास्तवावरही पराभवाचे मंथन व्हायला नको का ?

(भक्त, समर्थक, कार्यकर्ते व पंटर यांच्यासाठी खडसेंच्या आहेरांच्या पुराव्याची जंत्री खाली दिली आहे.)

१) सकाळ -
२) झी २४ तास -
३) महाराष्ट्र टाईम्स -
४) महाराष्ट्र टाईम्स -
५) दिव्य मराठी -
६) सकाळ ॲग्रोवन -
७) लोकसत्ता -
८) विदर्भ सन्मान टीव्ही -
९) साम टीव्ही -
१०) टीव्ही ९ मराठी -
११) चेकमेट टाईम्स
१२) महापॉलिटिक्स -
१३) मैक्स महाराष्ट्र -
१४) झी २४ तास -
१५) पीसीबी टुडे -
१६) टीव्ही ९ न्यूज प्लस -

1 comment:

  1. अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण !! नाथाभाऊंनी एवढा त्रास करून घेण्यापेक्षा अपक्ष उमेदवारी लढवली असती तर !!!!

    ReplyDelete