गंमत म्हणजे, ज्या कन्येचा पराभव झाला म्हणून खडसेंनी स्वपक्षीयांवर आरोपांचे रान उठवले आहे, त्या कन्येच्या विरोधात विजयी चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व बंडखोर उमेदवार होते. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेले होते. खडसे यांना आज पवार यांची संगत सोबत हवीहवीशी वाटत आहे पण, खडसे यांच्यावर 'तोडीपानी करणारा विरोधी पक्षनेता' हा शिक्का पवार यांनीच मारल्याचे आठवते. सन २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युती मोडल्याचे श्रेय खडसे यांनी घेतले होते. ती पत्रकार परिषदही आठवते. नंतर ठाकरे यांनी मुक्ताईनगर येथे खडसे विरोधात दिलेले भाषण आठवते. असे सारे घडत असले तरी खडसे 'पक्षांतराचे धाडस' करुच शकत नाही, असे जुने जाणते व अनुभवी लोक म्हणतात. कारण तसे केले तर खडसेंच्या सुनबाई व दोन्ही कन्यांच्या राजकीय भवितव्याला प्रश्नचिन्ह लागेल हे नक्की. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा शिवसेनेत खडसेंचा क्रम कुठे असेल हे सुध्दा आज सांगता येत नाही.
भाजपच्या दिल्ली दरबाराने सन २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खडसेंना उमेदवारी नाकारली. हे करण्यापूर्वी पक्षाने खडसे हे भाजप सोबत राहून पक्षाचे काय नुकसान करु शकतात आणि खडसे पक्ष सोडून गेले तर काय नुकसान होऊ शकते ? याचा अंदाज घेऊन ठेवला आहे. खडसे हे लेवा पाटील समाजाचे आहेत. हा समाज जळगाव जिल्ह्यात आणि लगतच्या इतर जिल्ह्यांच्या काही भागात बहुजन आहे. लोकसभा मतदार संघाचा विचार केला तर रावेर मतदार संघातील मुक्ताईनगर, भुसावळ, यावल-रावेर आणि मलकापूर विधानसभा क्षेत्रात आणि जळगाव शहर विधानसभा क्षेत्रात लेवा पाटील समाज बहुजन आहे. या अनुषंगाने खडसे सोबत नसल्यास काय होईल याचा अंदाज पक्षाने बांधून ठेवला होता आणि आजही आहे. अर्थात, पक्षात राहून मी पक्षाचे कसे नुकसान करु शकतो, हे खडसेंनी दाखवून दिले आहे. म्हणूनच पक्ष पातळीवर कोणताही नेता खडसेंच्या आरोपांना दुजोरा देत नाही किंवा समर्थन करीत नाही. खडसे सतत एकाकी पडलेले दिसतात. पंकजा मुंडे या खडसेंच्या दारी दुःख मांडायला कधीही येत नाहीत, मात्र खडसेंना पंकजा यांची बाजू मांडत असल्याचे दाखवावे लागते. पंकजा यांच्या रॅलीत जाणार असे सांगावे लागते.
सन २०१९ मधील निवडणूक निकाल समोर घेतला तर लक्षात येते की, खडसेंच्या समाजाचे बहुजन मतदार असलेल्या मुक्ताईनगरसह रावेर-यावल, मलकापूर येथील जागा भाजपने गमावल्या आहेत. शिवाय अमळनेर येथील जागा पराभवाकडे नेण्यातही खडसे समर्थकांनी हातभार लावला आहे. खडसे यांनी कन्येच्या पराभवाचा ठपका पक्षांतर्गत कारवायांवर जसा ठेवला तसेच रावेर-यावल, मलकापूर व अमळनेर मतदार संघातील भाजपचे पराभूत उघडपणे आता खडसेंकडे बोट दाखवत आहेत. जळघाव शहरातही भाजप उमेदवाराच्या विरोधात खडसे यांच्या समर्थकांनी काम केल्याचे सांगितले जाते.
रावेर- यावल मतदार संघात हरिभाऊ जावळे यांच्या पराभवावर चर्चा का नाही ? असा उघड प्रश्न करुन या विषयाला चर्चेत आणल्यानंतर मलकापूर आणि अमळनेर मतदार संघातील भाजपच्या पराभुतांनी संशयाचे एक बोट लेवा पाटील बहुल मतदान केंद्राकडे दाखवले आहे. मलकापूर मतदार संघात धरणगाव-नरवेल भागात लेवा पाटील मतदान जास्त आहे. तेथे भाजपचा पारंपरिक मतदार आहे. मात्र सन २०१९ च्या निवडणुकीत या भागात भाजप उमेदवार चैनसुख संचेती यांना फारसे मतदान झालेले नाही. उलट काँग्रेसचे उमेदवार राजेश एकटे यांना भरभरुन मतदान झाले आहे. लेवा पाटील बहुल भागात खडसेंवरील अन्यायाची कहाणी पोहचून (तसे पत्रक वाटले गेले) 'भाजप उमेदवाराला पाडा' असा संदेश दिला गेला असे आता उघडपणे बोलले जाते आहे. मलकापूर येथील संचेती हे संघ परिवार व भाजपतील जुने निष्ठावंत आहेत. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संचेती यांनी खडसेंची सून रक्षाताई खडसे यांच्या विजयासाठी प्रयत्नच केले नाही तर पदरचे पैसेही खर्च केले. याच संचेतींचा पराभव करायला लेवा पाटीदार समाजाने उलटा कौल दिला. खडसेंनी मलकापूर मतदार संघात भाजप विरोधात काम केले हे अनेक जण थेट बोलतात. खडसेंच्या सोबत स्व. पांडुरंग पुंडकर व बुलडाणा मतदार संघातील भाजप आमदार संजय कुटे यांच्या समर्थकांनी विरोधात काम केले असेही बोलले जाते.
चैनसुख संचेती यांच्या काही समर्थकांचे म्हणणे असेही आहे की, खडसे यांनी विरोधी पक्षनेतेपद व मंत्रीपद वापरुन ज्या पद्धतीने सुरेशदादा जैन यांनी कोर्ट कज्जात व नंतर कारागृहात अडकविले अगदी त्याच पद्दतीने संचेती यांच्यावरही हस्तकांच्या मार्फत न्यायालयात खटले दाखल केले गेले होते. पण तेथे डाळ शिजली नाही.
रावेर-यावल, मलकापूरनंतर अमळनेरमधील पराभवाकडेही संशयाने पाहिले जाते. भाजपचे पराभूत उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी यांनी उघडपणे भाष्य केलेले नाही. पण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. उदय वाघ आणि खडसे समर्थकांकडे ते एक बोट दाखवतात. असेही शिरीष चौधरी हे मतदार संघाबाहेरुन आलेले उमेदवार असल्याचा प्रचार सन २०१४ पासून होता. सन २०१९ मध्ये बाहेरचे पार्सल परत पाठवा, हा संदेश देत भाजपच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील यांना मदत केली.
जळगाव जिल्ह्यात भाजपचे नेते म्हणून गिरीश महाजन विधानसभेची जबाबदारी निभावत होते. त्यांच्या नेतृत्वात भाजपची पिछेहाट होते आहे, हे दर्शविण्यासाठी खडसे समर्थकांनी भाजप विरोधात काम केले असे आता बरेच जण बोलत आहेत. हा तर्क मांडताना खडसे हे लेवा पाटील समाजाच्या संख्याबळावर स्वतःला 'बहुजन' म्हणवून घेत 'अल्पसंख्याक' विरोधी राजकारण कसे करतात ? याची उदाहरणे चर्चेत आहेत. खडसे यांनी व्यक्ती द्वेषातून सुरेशदादा जैन यांना राजकारणातून दूर लोटले. ईश्वरलाल जैन यांनाही अडचणीत आणायला सर्व प्रकारची सरकारी यंत्रणा वापरली. खडसे यांनी मलकापूरमधील चैनसुख संचेती (जैन) यांचा काटा काढला. खडसे यांनी तेली समाजातील शिरीष चौधरींना पराभूत केले. यापूर्वी खडसेंनी भुसावळमधील तेली समाजातील संतोष चौधरी, अनिल चौधरी यांना टोकाचा विरोध केला. जळगावमधील सुरेशदादा समर्थक माहेश्वरी समाजातील कार्यकर्त्यांचे तडीपारी प्रस्ताव तयार केले. मुक्ताईनगर तालुक्यातील खडसे समर्थक व कोळी समाजातील अशोक कांडेलकर यांनाही आमदारकीच्या उमेदवारीपासून डावलले गेले. अशी अनेक उदाहरणे आता चर्चेत आली आहेत. खान्देशातील भाजप उमेदवारांच्या पाडापाडी मागे साधे गणित होते. जळगाव, धुळे व नंदुरबारमधून भाजपचे जेवढे उमेदवार पडतील, तेवढ्या नुकसानीचा ठपका गिरीश महाजनांवर ठेवता येईल. जर भाजप-शिवसेना युतीचे सरकार आलेच तर कन्येला किमान राज्यमंत्री पद मिळण्याची संधी निर्माण होईल.
भाजपमध्ये गेल्या ३५/४० वर्षांत आपण निष्ठावंत राहिलो असे सांगत, मी पक्ष वाढवला असा दावा खडसे वारंवार करतात. मात्र, या कालावधीत जेव्हा जेव्हा पक्ष सत्तेत आला किंवा विरोधात राहिला तेव्हा पदांचे फळही खडसेंनी चाखले असे सांगितले जाते. मनोहर जोशी व नारायण राणे युतीचे मुख्यमंत्री असताना खडसे मंत्रीमंडळात होते. युतीची सत्ता गेल्यानंतर खडसे विरोधी पक्षनेता होते. देवेंद्र फडणावीस मुख्यमंत्री झाले तेव्हा खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. पक्ष वाढवला तर पक्षामुळे सत्तेची फळे खडसेंनी व्यक्तीशः चाखली आहेत. तरीही भाजपत 'बहुजनावर' अन्याय असे खडसे का म्हणतात हे कोडे आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील, रक्षाताई खडसे, आमदार गिरीश महाजन, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, विधान परिषद आमदार चंदूभाई पटेल, स्मिताताई वाघ हे सर्वजण अल्पसंख्याक किंवा उच्चवर्णातील आहेत का ? असा प्रश्न आता विचारला जातोय.
No comments:
Post a Comment