Saturday, 14 December 2019

आरोपांच्या पिंजऱ्यात खडसेच कशासाठी ?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपत आरोप प्रत्यारोपांची सुदोपसुंदी सुरु आहे. एकनाथराव खडसे व पंकजा मुंडे पालवे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टार्गेट करुन व्यक्तिगत असंतोष प्रकट केला आहे. याच अनुषंगाने खडसे व मुंडे पालवे यांच्या विषयी सलग तीन लेख लिहिले. अडचणीत वापरले जाणारे बहुजन कार्ड, पराभवाच्या मागील वास्तव कारणे आणि गेल्या चार वर्षांत पक्ष व नेत्यांविषयी केलेली कृती याविषयी लेखांमध्ये परखड भाष्य होते. खडसे यांच्या समर्थक, हितचिंतक आणि व्यक्तीनिष्ठावंतांनी त्यावर फारशा प्रतिक्रिया दिल्या नाहीत. मात्र, 'पित्याचे आहेर आणि कन्येला माहेर' या लेखानंतर खडसे यांच्या दोन-तीन समर्थकांनी संपर्क करुन काही मुद्दे मांडले. माझ्या लेखांमधील एक बाजू बरोबर असली तरी त्याची दुसरी बाजू सुध्दा समोर यायला हवी असा आग्रह त्यांनी केला. राजकारणाचे निरीक्षण करताना व त्यामागील कारणांची मिमांसा करताना तटस्थता व निरपेक्षता जपायला हवी म्हणून खडसेंची दुसरी बाजू मांडणेही गरजेचे आहे हे मलाही जाणवले. अर्थात, या दुसऱ्या बाजूशी मी सहमत आहे असे मुळीच नाही.

Friday, 13 December 2019

पित्याचे 'आहेर' आणि कन्येला 'माहेर'

महायुती मोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत सरकार सुरु केले. भाजप सत्तेपासून लांब गेली. भाजप अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंड सुख घ्यायची संधी काहींना मिळाली आहे. या मंडळींमध्ये एकनाथराव खडसे हे सध्या आक्रमक आहेत. फडणवीस यांना घालून पाडून बोलायची एकही संधी खडसे सध्या सोडत नसल्याचे दिसते आहे. अर्थात, गेल्या साडेतीन-चार वर्षांत खडसेंचा अजेंडा हाच होता. सार्वजनिक ठिकाणी जेव्हाही बोलाल तेव्हा फडणवीसांवर टीका करा आणि भाजप नेतृत्वातील युती सरकारला घरचे आहेर द्या ! खडसेंनी सन २०१७ पासून केलेली जाहीर वक्तव्ये आज क्रमाने वाचली तर लक्षात येते की, भाजपत राहून खडसे विरोधी पक्षाचे काम करीत होते. फडणवीस यांचे वस्त्रहरण करीत होते. खडसेंनी फडणवीस सरकारवर जेवढे आरोप केले तेवढे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही केले नाहीत.

Tuesday, 10 December 2019

अल्पसंख्यांक उमेदवारांचा पराभव कोणी घडवला ?

जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी कन्या रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या पराभवाचे निमित्त पुढे करुन बंडाळीची स्थिती निर्माण केली आहे. कन्येचा पराभव पक्षांतर्गत मंडळींनीच घडवला असा दावा करीत थेट दिल्लीत पक्षाध्यक्ष, प्रभारी यांच्या भेटीचा प्रयत्न केला. संबंधित पदाधिकारी व इतर नेते कामात व्यस्त असल्यामुळे खडसेंना कोणीही भेटले नाही. अखेर ज्येष्ठनेते शरद पवार यांना खडसे भेटले. तेथून मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खडसे भेटले. खडसे-पवार आणि खडसे-ठाकरे भेटीनंतर खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार किंवा शिवसेनेत जाणार अशा बातम्या अवतरल्या आहेत. शिवाय, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी खडसेंना काँग्रेसमध्ये येण्याचे 'आवतण' दिले आहे. खडसेंच्या भोवती पक्षांतराचा चक्रव्युह त्यांनी स्वतःच अशा प्रकारे रचला आहे.

Saturday, 7 December 2019

हरिभाऊ जावळेंच्या पराभवावर चर्चा का नाही ?

जळगाव जिल्हा भाजपमध्ये सध्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कन्या रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या पराभवाचा मुद्दा चर्चेत आणून पक्षांतर्गत विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला आहे. 'खडसेंनी पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांची थेट नावे जाहीर करावीत', असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिल्यानंतर उत्तराची अपेक्षा खडसेंकडून आहे. मात्र यावर खडसे म्हणाले, 'मी पक्ष शिस्त पाळतो. पक्षांतर्गत विषय माध्यमात कसा सांगू ? त्यासाठी मला प्रदेशाध्यक्षांची परवानगी हवी.' खडसे पुढे असेही म्हणाले, 'आता पुरावे पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देणार !' म्हणजेच तूर्त खडसेंकडून पक्षांतर्गत कारवाया करणाऱ्यांची नावे बाहेर येण्याची शक्यता नाही. परंतु पक्षशिस्त पाळणाऱ्या खडसेंनी गेल्या ५ वर्षांत थेट माध्यमांच्यासमोर पक्षनेतृत्वाला व पक्षाला कित्तेकदा टीकेचा आहेर दिला आहे, हे सुध्दा यावेळी आठवते.

रोहिणी खडसे खेवलकर यांच्या पराभवाची चर्चा ठरवून घडवून आणली जात असताना 'हरिभाऊ जावळे यांचा पराभव कोणी घडवून आणला ?' या विषयी कसे कोणी बोलत नाही, असेही मेसेज कालपासून मला येत आहेत. हरिभाऊ हे सुध्दा लेवा पाटीदार समाजाचे आहेत. खडसे यांनी बहुजन नेते याची जी व्याख्या स्वतःसाठी केली तीच व्याख्या हरिभाऊ जावळे यांना लागू होते. रोहिणी खडसे खेवलकर यांच्याप्रमाणे जावळे सुध्दा पराभूत झाले आहेत. रोहिणी खडसे खेवलकर यांच्या पराभवाचा अहवाल जसा पक्षांतर्गत विरोधकांकडे बोट दाखवतो तसा हरिभाऊंचाही मौखिक अहवाल कोणाचे नाव सांगतो ? या प्रश्नाचीही उघड चर्चा आता सुरु आहे.

हरिभाऊ जावळे यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर झाली होती. ती ऐनवेळी रद्द करण्यापासून हरिभाऊंच्या बहुजन असण्यावर अन्याय सुरु झाला.  पक्षांतर्गत दादागिरी असणाऱ्या नेत्यांमुळे हरिभाऊची उमेदवारी व बहुजन असणे हरवून गेले.  सन २०१४ मध्ये हरिभाऊ जावळे आमदार झाले. भाजपत मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अंतर्गत घडामोडी घडत असताना लेवा पाटीदार समाजाचा मंत्री असावा म्हणून हरिभाऊंचा एक-दोनवेळा विचार झाला. पण हरिभाऊंना ही संधी मिळू नये म्हणून कोणी प्रयत्न केले ? यावरही काही मंडळी चर्चा करतात.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालाचा कौल युतीच्या बाजूने जाणार हे विविध सर्वेक्षण व एक्झीट पोलच्या आकडेवारीनुसार समोर आले होते. यात जशी मुक्ताईनगरची जागा विजयी म्हणून गृहीत होती तशीच रावेर-यावलची जागाही गृहीत होती. हा कौल पक्षांतर्गत मंत्रीपदाच्या लाभाला छेद देणारा होता. भाजपत ३ लेवा आमदार होणार असे गृहीत धरलेले होते. जळगावसह मुक्ताईनगर व रावेर-यावलच्या जागा त्यात होत्या. यातील जळगावच्या आमदाराचे मंत्रीपद कापणे सोपे होते. दारु व्यावसायिक हे बिरुद वापरुन कधीही पत्ता कट करता येत होता. पण  हरिभाऊ पुन्हा आमदार झाले आणि युतीचे सरकार आले तर दोनदा खासदार व तिसऱ्यांदा आमदार झालेल्या हरिभाऊंना किमान राज्यमंत्रीपद सहज मिळाले असते. अर्थात, अनुभवी, चाणाक्ष नेत्यांनी हरिभाऊंच्या मंत्रीपदाचा होरा बांधून यावल, रावेर, बामणोद, सावदा, फैजपूर भागात हरिभाऊ ऐवजी काँग्रेसच्या उमेदवाराला रसद पुरविली. कोण होते ते रसद पुरवणारे ?

हरिभाऊंचे समर्थक म्हणतात, बामणोद येथे पक्षाची जाहीरसभा होती. किमान १० हजारांवर श्रोते होते. या सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले, 'तो काँग्रेसवाला उमेदवार पण चांगला आहे. पण तुम्ही हरिभाऊला मते द्या !' हरिभाऊच्या सभेत विरोधकाला चांगुलपणा बहाल करणे ही पक्ष विरोधी कार्यवाही होत नसावी ? हरिभाऊंचे समर्थक भुसावळच्या सभेचे सुद्धा उदाहरण देतात. भुसावळला झालेल्या सभेत बुजूर्ग नेते म्हणाले, 'तुमच्या मतदार संघाच्या बगलवाला माझ्याकडे आला नाही. त्याला मी चालत नाही. सावकारे चांगला आहे. त्याला निवडून द्या.' अर्थात, बगलवाला म्हणजे कोण ? हे शोधले तर भुसावळच्या बगलवाले जळगावकर आणि रावेर-यावलकर येतात. यात हरिभाऊ होतेच. हरिभाऊंचे समर्थक असेही म्हणतात की भुसावळमधील भाजपच्या नगरसेवकांनी उघडपणे मतदार संघात येऊन विरोधात काम केले. शिवाय, भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत हरिभाऊंचे नाव आले, त्यादिवशी हरिभाऊ मुक्ताईनगरात नेत्यांकडे बसून होते.

सन २०१९ च्या निवडणुकीत लेवा भोर पंचायतने घाऊक स्वरुपात पाठिंबा देणे, उमेदवारीसाठी इशारा देणे असे काम केले. लेवा भोर पंचायतने कोणासाठी, कसे मेळावे घेतले ? हे अनेकांनी यापूर्वी सांगितले आहे. लेवा भोर पंचायतने जळगावमध्ये सुरेश भोळे व मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे खेवलकर यांना पाठिंबा दिला. पण रावेर-यावलमध्ये हरिभाऊंना दिला नाही. कुटुंब नायकांचे पुत्र काँग्रेसच्या व्यासपिठावर बसून प्रचारात सक्रिय होते. त्यांचे बोलविते धनी कोण ? हे लेवा समाजाला माहिती आहे. हरिभाऊंचे समर्थक म्हणतात, लेवा भोर पंचायतची फरपट पूर्वी कधीही स्व. वाय. एस. महाजन, स्व. मधुकरराव, स्व. जे. टी. महाजन वा स्व. गुणवंतराव सरोदे यांनी राजकीय स्वार्थासाठी केली नाही. आता तर समाज दावणीलाच बांधला आहे.

हरिभाऊंच्या समर्थकांना कळीचा प्रश्न विचारला. अनिल चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका हरिभाऊंना बसला नाही का ? यावर ते म्हणतात, 'चौधरी यांचा मतदार वर्ग निश्चित होता. असाही तो भाजपच्या विरोधात होता. चौधरी हे कधीही विजयाच्या जवळ नव्हते. काँग्रेस वा बहुजन वंचितसाठी ते पर्याय होते.' हरिभाऊंचे समर्थकही एक एक कडी जोडून पराभव कसा घडवून आणला याचे विवेचन करतात. मधुकर सहकारी कारखाना हरिभाऊंच्या ताब्यात होता. जिल्हा सहकारी बँक भाजप नेतृत्वाच्या ताब्यात होती. पण बँकेकडून कर्ज वाटपात विलंब केला गेला. शेतकऱ्यांची देणी थकली. हरिभाऊ विषयी रोष निर्माण होत गेला. अखेर कारखानाही हरिभाऊच्या हातून गेला.

भाजपत बहुजनांवर अन्याय अशी भूमिका घेत जेव्हा कोणीही (विशिष्ट व्यक्ती नाही) ढोंग करते तेव्हा हरिभाऊ जावळे हे बहुजन नसतात का ? असा प्रश्न समर्थक विचारतात. हरिभाऊ जावळे यांच्या पराभवाचा इतिहासही आता उगाळला जात आहे. पण हरिभाऊ भाजपत एवढे लहान बहुजन नेते आहेत की, ते प्रदेशाध्यक्षाला खरे सांगू शकत नाही व पक्षाध्यक्षाला अहवाल देणे तर दूरच ...

तो फोटो कशाचा पुरावा ?

हरिभाऊचे समर्थक म्हणतात, ज्यादिवशी भाऊंनी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी शिवसेना- भाजप युती होती. त्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील भाऊ व गिरीशभाऊ सोबत अर्ज भरायला आले. पहिल्या यादीत खडसेंचे नावा नव्हते म्हणून दुसऱ्यादिवशी चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. नंतर त्यांनी जिल्हा प्रमुखपद सोडून बंडखौरी केली.'