Friday, 8 November 2019

देवा, थोबाड बंद ठेवा !

सन १९९२/९३ हे वर्ष जळगाव शहरात चर्चेत असलेल्या कथित लैंगिक छळ प्रकरणाचे होते. जळगाव नगर पालिकेतील राजकारणाने मतभेदांचे टोक गाठलेले होते. जळगाव पालिकेतील मनमानी कारभारांचे अनेक ठराव तेव्हाचे जिल्हाधिकारी अजय भुषण पांडे यांनी कलम ३०८ वापरुन व्यपगत केले होते. नगराध्यक्षपदी असलेले तेव्हाचे आमदार सुरेशदादा जैन विरोधात अविश्वासाची जमवाजमव डॉ. अर्जून भंगाळे यांनी केली होती. नगरसेवकांना सहलीला पाठवले होते. तेव्हा विधानसभाध्यक्ष असलेले मधुकरराव चौधरी आणि तेव्हा नगरविकास मंत्री असलेले अरुण गुजराथी जळगाव नगर पालिका बरखास्त करण्याच्या मूडमध्ये होते. स्व. बबन बाहेती, स्व, नरेंद्र पाटील व स्व. उल्हास साबळे नगर पालिकेतील मनमानी कारभाराची प्रकरणे उकरुन काढत होते. याच वादात फैशन कटपीस सेंटर ही टपरी हटविण्यावरुन जैन- बाहेती विवाद झाला. जिल्हाधिकारी पांडे विरोधात जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक स्व. दीपक जोग विरोधात जैन असा संघर्षही सुरु होता. जैन यांनी अटकेच्या निषेधार्थ ७ दिवस पोलीस ठाणे आवारातच उपोषण केले.

अधिकारी विरुध्द पदाधिकारी वादात मलिक आणि पाटील हे दोन जण पोलिसांच्या हाती संशयित म्हणून लागले. मुंबई बॉम्बस्फोटातील एक कथित संशयित शहनावाज हा भुसावळला नईम यांच्याकडे आश्रित असल्याचे आढळले होते. या शहनवाजचे जळगावात काय संबंध असावेत ? या तपासात मलिक पकडला होता. त्याने शहाजोगपणे आरोप नाकारला पण हॉटेल तिरुपतीमध्ये होणाऱ्या लैंगिक प्रकरणांची माहिती तपास अधिकारी तेव्हाचे अप्पर अधीक्षक दिलीप श्रीराव व प्रशिक्षणार्थी बाळासाहेब शेखर यांना दिली. या माहितीतून पुढे जळगावमधील कथित लैंगिक छळ प्रकरणांची चर्चा सुरु झाली.

दिलीप श्रीराव व बाळासाहेब शेखर यांनी लैंगिक छळ प्रकरणात ५०० महिला असू शकतात असा दावा केला. संपूर्ण देशच या दाव्याच्या नंतर हादरला. जळगाव पालिका बरखास्त करायला स्व. चौधरी व गुजराथी यांना कारण मिळाले. त्याचवेळी स्व. जोग यांची बदली झाली. नंतर आले पी. डी. जाधव. तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांचे जाधव विश्वासू होते. त्यांनी लैंगिक छळ प्रकरणाचे धागेदोरे तपासून त्यात गुंतलेल्या मुली वा महिला फक्त २५ असाव्यात असा दावा केला. याला कारणही असेच होते. ज्या मुली व महिलांची नावे होती ती केवळ विशेष नामे होती. बापाचे नाव, आडनाव व पत्तेही नव्हते. स्व. जोग असताना आकडा ५०० चा आणि जाधव आल्यावर आकडा फक्त २५ यावर गदारोळ उठला. सरकार प्रकरण दडपते आहे असा आरोप सुरु झाला. या वातावरणात विशेष तपास अधिकारी म्हणून जळगावला आले तेव्हाचे उपमहासंचालक स्व अरविंद इनामदार. त्यांना मदत करायला होते स्व. जोग आणि आयुक्त असलेल्या मीरा बोरवणकर.

इनामदार हे सुध्दा पवार यांचे विश्वासू होते. जळगाव लैंगिक छळ प्रकरणात पोलिसांनी रोजच्या पत्रकार परिषदा घेऊन जळगावमधील मुली-महिलांना संशयाच्या घेऱ्यात ओढले होते. हे प्रकरण लवकर निपटून गुन्हे दाखल करायची जबाबदारी इनामदार यांच्यावर होती. इनामदार, जोग व बोरवणकर पोलीस मुख्यालयातील आयपीमेसला मुक्कामी होते. तेथे इनामदार पहिल्यांदा पत्रकारांना भेटले. प्रसन्न मुद्रेतील इनामदारांनी सर्वांना 'काय देवा कसे आहात ?' असे वाचारले. त्यानंतर पत्रकार परिषद सुरु झाली. पुन्हा आकडे ५००/२५ भोवती फिरले. तेव्हा इनामदार म्हणाले, 'आज मुली व महिलांची संख्या मोजू नये. आपण तक्रारदार येतील तसे गुन्हे दाखल करु. गुन्हे दाखल होताना तपास योग्य प्रकारे करु. मी एसपी व इतरांना थोबाड बंद ठेवायला सांगितले आहे. थोबाड केल्यानेच ५ चे ५०० आणि ५०० चे २५ झाले. या पत्रकार परिषदेत मी बोललो नाही. कारण मी 'सकाळ' चा बातमीदार होतो आणि इनामदारांचा मला अगोदरच निरोप होता. तुमचा पेपर पवारसाहेबांचा आहे. आपण नंतर बोलू या !

पत्रकार परिषद संपल्यानंतर सायंकाळी इनामदार यांनी मला बोलावले. स्व. जोग, श्रीराव व शेखर यांच्यापैकी कोणी ५०० चा आकडा सांगितला या विषयी विचारणा केली. त्यांना माझा जबाब हवा होता. कारण ५०० च्या आकड्यावरुन विभागांतर्गत चौकशी लागणार होती. अर्थात, मी ५०० च्या आकड्यात नव्हतो. सर्व दैनिकांनी ५०० हा आकडा छापला होता. पण 'सकाळ' मध्ये आकडा ३०० चा होता. तो का आला ? याची स्वतंत्र कथा आहे. इनामदारांनी मला जबाबाचे सांगितले. मी म्हटले, 'सकाळ' मध्ये आकडा ३०० चा आहे. मी कसे काय ५०० सांगणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव घेऊ ? आम्ही आकडा ३०० का केला ? हे इनामदारांना सांगितले. जर ५०० आकडा छळ झालेल्या मुली वा महिलांचा असेल तर त्यांचा छळ करणारे संशयित किमान १००० पुरुष हवेत. तसे दिसत नाही. म्हणून आम्ही ३०० चा मध्य काढला. हे इनामदारांना सांगितले. त्यांनी तेथेच मला त्यांचा पेन भेट दिला. म्हणाले, 'तू पत्रकार असून तुला हे कळले. पण आमच्या अधिकाऱ्यांना हे लॉजिक कसे कळले नाही ?' अखेर माझा जबाब रद्द झाला.

लैंगिक छळ प्रकरणात तेव्हा काही नगरसेवक व इतर पुढारी संशयित होते. ज्यांना मास्टर माईंड म्हटले होते त्यांनी लैंगिक छळ हे मानसिक विकृतीतून केले का ? हा सुध्दा तपासाचा भाग होता. इनामदार मला म्हणाले, 'या दोघा आरोपींची मला मानसिक तपासणी करायची आहे. तुम्ही तशी बातमी तुमच्या दैनिकात देऊन आरोपींची मानसिक तपासणी करायचे सूचवा.' आता इनामदार म्हणताहेत म्हणून मी तशी बातमी केली. त्यात एका संघटनेचे नाव वापरले. मात्र त्या संघटनेला तसे सांगितले नाही. तेथे चूक झाली. दुसऱ्या दिवशी ती संघटना म्हणू लागली, 'दोघा संशयितांनी पूर्णतः शुध्दीवर व मानसिक परिपक्व अवस्थेत लैंगिक छळ केले आहेत. 'सकाळ' ने चुकीची बातमी दिली आहे.'  या संघटनेचे काही पदाधिकारी तेव्हाचे संपादक कांबळेंचे मित्र होते. विषय कांबळेंपर्यंत गेला. कांबळे जळगावला आले. कांबळे व इनामदार मित्र होते. इनामदारांनी जे घडले ते सांगून 'तिवारी यांनी मला तपासात मदत करायला बातमी दिली' हे स्वीकारले. कांबळेंचाही माझ्यावर विश्वास होता. अखेर प्रकरण थांबले.

इनामदार २८ दिवस जळगावला होते. त्यांनी लैंगिक छळ प्रकरणाचे ९ गुन्हे दाखल केले. त्यापैकी केवळ २ तक्रारदार मुली-महिला टिकल्या. इतर पुन्हा आल्याच नाहीत. ५०० चा आकडा २५ वरुन केवळ २ वर आला. जळगाव लैंगिक छळ प्रकरणाला अवास्तव प्रसिध्दी देऊन माध्यमांनी जळगावातील महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. एका कथित प्रकरणामुळे जळगाव बदनाम झाले.


ता.क. - लैंगिक छळ प्रकरणाचे वार्तांकन वास्तववादी केले म्हणून मला 'सकाळ' चा डॉ. ना. भि. परुळेकर पुरस्कार मिळाला. याच प्रकरणासाठी स्व. चौधरी व अरुण गुजराथी यांच्या हस्ते माझा सत्कार होणार होता. तो मी नाकारला. कारण, जळगावची बदनामी करणाऱ्या प्रकरणासाठी सत्कार नको, ही माझी भूमिका होती.

No comments:

Post a Comment