Tuesday 5 November 2019

बिभिषण, विदूर आणि संजय राऊत

राम-रावण युद्धाचे वर्णन करताना बिभिषण आणि पांडव-कौरव संघर्ष सांगताना विदूर ही पात्रे वगळी जात नाहीत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात भाजप-शिवसेना युतीतील विवादाची प्रकरणे लिहिताना संजय राऊत हे पात्र वगळता येणार नाही. बिभिषण, विदूर आणि संजय राऊत या तीनही पात्रात एक सुक्ष्म समान धागा आहे. तो म्हणजे, हे तिघे ज्या पक्षात असल्यागत वाटत होते, त्यांनी प्रत्यक्षात विरोधी गटांशी फितुरी केली. अर्थात, फितूर होणे हा वाक्प्रचार समर्थकांना चीड आणणारा ठरु शकतो. ते टाळण्यासाठी असेही म्हणता येईल की, रावणाच्या पक्षात राहून बिभिषण याने रामाशी, कौरवांच्या बाजूने असूनही विदूरने पांडवांशी आणि महायुतीत असूनही संजय राऊत यांनी महाआघाडीतील घटक पक्षांशी संधान साधले. संधान साधणे म्हणजे निश्चित केलेले लक्ष्य साधणे. शत्रू पक्षासोबत गुप्तपणे बैठका घेऊन कोणाला तरी बेसावध ठेऊन नवी युती किंवा आघाडी करणे. असे करणे हा कपट नितीचा भाग मानला जातो. कधी कधी कपट हे सकारात्मक कार्यासाठी असते. बहुतेक वेळा ते स्वहित आणि इतरांच्या अहितासाठी असते. संजय राऊत यांनी साधलेले संधान शिवसेनेच्या हितासाठी व महायुतीच्या अहितासाठी आहे.


विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती असलेल्या गटात संजय राऊत होते. आज ही महायुती मोडीत काढून संजय राऊत महायुती विरोधातील महाआघाडीतील घटक पक्षांशी हात मिळवणी करीत आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेससाठी संजय राऊत निश्चितपणे बिभिषण किंवा विदूरच्या भूमिकेत आहे. बिभिषण व विदूरनितीला तत्त्वाचा आधार दिला जातो. या दोघांनी अत्याचारित स्वपक्षाच्या विरोधात प्रतिपक्षाची म्हणजे न्यायाची बाजू धरली. रावणापेक्षा रामाचा पक्ष बिभिषणला आणि कौरवांपेक्षा पांडवांचा पक्ष विदुराला योग्य वाटला. अर्थात, बिभिषण व विदूर यांनी त्यांच्या न्यायोचित भूमिका या युध्दापूर्वी घेतल्या होत्या. बिभिषणाने रावणाशी आणि विदूराने अंध धृतराष्ट्रशी केलेला आपापल्या भुमिकांबद्दलचा संवाद म्हणूनच नैतिकतेचे मापदंड मानले जातात. या संवादावर बिभिषण नीती-विदूर नीती असे विपुल लेखन झाले आहे.

भाजप-शिवसेना महायुतीचा विवाद हा निवडणुकीनंतर म्हणजे युध्दानंतर निर्माण झाला आहे. सत्तेतील समान वाटणीचा सवता सुभा उभा राहिला आहे. या कपटाला रंग भरण्यासाठी संजय राऊत यांनी विरोधातील महाआघाडीशी संधान साधले आहे. ही महाआघाडी कोणती ? तर राज्यात आघाडी करुन सत्ता उपभोगताना ज्या काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही मुख्यमंत्रीपद दिले नाही. ही महाआघाडी कोणती ? तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावरील हक्क सोडताना मंत्रीपदांच्या संख्येचा आणि प्रभावी खात्यांचा सतत असमतोल जाणून बुजून निर्माण केला. ज्या आघाडीतील पक्षांनी सत्तेसाठी एकमेकांना वेठीस धरले (येथे ब्लैकमेल केले हा शब्दच योग्य ठरतो), ती मंडळी आज महायुतीतील शिवसेनेच्या समान हिस्सेदारीवर सहानुभूती दाखवत आहे. अशा स्थितीत महायुती फोडणारे शिवसेनेतील संजय राऊत हे बिभिषण व विदूरच्या रांगेतील पात्र ठरले आहे.

बिभिषण, विदूर आणि संजय राऊत यांच्यात जसा सुक्ष्म समान धागा हा शत्रूला फितूर होण्याचा आहे तसाच सुक्ष्म भेद हा लक्ष्य किंवा उद्दिष्ट साध्य करण्यात आहे. रामाला फितूर बिभिषणाला लंकेच्या राज्य प्राप्तीची अपेक्षा नव्हती. पांडवांना फितूर विदुराला हस्तिनापूरचे राज्य नको होते. संजय राऊत मात्र महायुतीतून फितूर होऊन विरोधकांशी संधान साधत असताना राजमुकूट तथा मुख्यमंत्रीपद शिवसेनेसाठी मागत आहेत. येथे बिभिषण आणि विदूर यांची भूमिका निःस्वार्थी दिसते तर संजय राऊत यांची भूमिका शिवसेनेसाठी स्वार्थी नक्कीच आहे.

बिभिषण वा विदूर यांच्या रांगेत जाण्याऐवजी संजय राऊत कृष्णशिष्टाईची भूमिकाही बजावू शकले असते. महायुतीतील विवादाला मतभेदांचे कंगोरे निर्माण करण्याऐवजी समन्वयाचा फुलोरा संजय राऊत फुलवू शकले असते. युतीची ३५ वर्षे यशस्वी वाटचाल सुरु ठेवणारे स्व. प्रमोद महाजन जनतेच्या लक्षात राहतात, मात्र 'होय मी युती मोडली' असे वारंवार सांगणारे नाकारले जातात, हा अलिकडचा इतिहास संजय राऊत यांनी लक्षात घ्यायला हवा होता.

No comments: