![]() |
पांढरा कांदा उत्पादकांची गर्दी |
कंपनीचे ६० वर प्रतिनिधी 'जैन ग्रामसेवक' च्या जबाबदारीतून शेतकऱ्यांना पांढरा कांदा उत्पादनासाठी प्रेरित करीत आहेत. ‘जैन फार्म फ्रेश कंपनी’ ने यासाठी ‘करार शेती’ पॅटर्न अवलंबिला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा, लागवड व संगोपन तंत्र आणि उत्पादन हाती आल्यानंतर त्याची ठरलेल्या किमान हमीभाव आणि वाढीव बाजार भाव असेल तर वाढीव भावाने खरेदीची शाश्वत हमी कंपनीने स्वीकारली आहे. गेली १९ वर्षे म्हणजे सन २००१ पासून कंपनी ही जबाबदारी निभावत आहे.
पांढरा कांदा हा निर्जलीकरणासाठी उपयुक्त मानला जातो. त्यातील पोषक घटक हे टीकाऊ आणि वापराच्यावेळी सहजपणे पुनर्स्थापित होतात. ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीने जळगाव येथे 'जैन व्हैली' परिसरात भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याचा आणि मसाले निर्मितीचा जगभरातील मोठा प्रकल्प उभारला आहे. यात पांढरा कांढा हे उत्पादन सर्वांत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीने पांढरा कांदा उत्पादकांची अनोखी चळवळ उभी केली आहे. शेती क्षेत्रात एखाद्या कंपनीच्या पुढाकाराने पीक पध्दतीत शेतकऱ्यांनी केलेल्या बदलाचे हे उत्तम उदाहरण आहे. शेत शिवारपर्यंत पोहचून कांदा उत्पादकांना सहाय्य व मार्गदर्शन करणाऱ्या प्रतिनिधींना ‘जैन ग्रामसेवक’ असे संबोधन देऊन त्यांची कार्यक्षम फळी कंपनीने उभी केली आहे. पांढरा कांदा उत्पादकांमध्ये कंपनीने निर्माण केलेला आत्मविश्वास आणि परस्परांवरील विश्वासाचे अतूट नाते सोमवारी पुरस्कार वितरण सोहळ्यात सहकुटुंब उपस्थित शेतकऱ्यांच्या गर्दीतून व संवादातून अनुभवता आले.
जैन उद्योग समुहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या महत्त्वाकांक्षेतून ‘जैन फार्म फ्रेश’ हा प्रकल्प उभारला गेला आहे. शेतकऱ्यांना नव्या पीक पद्धतीकडे नेणारे प्रशिक्षण, तंत्र, मार्गदर्शन देत त्यांच्या उत्पादनाला खरेदी करण्याची हमी देऊन उत्पादनावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्पही आपल्याच भूमित असावा या दूरदृष्टीतून आणि व्यापक हिताच्या उद्देशाने हा प्रकल्प कार्यरत आहे. सन २००१-०२ पासून शेतकऱ्यांशी पांढरा कांदा उत्पादन लागवड व उत्पादन खरेदीचे करार केले जात आहेत. पहिल्यावर्षी ४ जिल्ह्यातील, १० तालुक्यांमधील १०५ गावांतील ४७३ शेतकऱ्यांनी ४३७ एकरवर पांढरा कांदा लागवड केली होती. यासाठी कंपनीने प्रक्रियेसाठी उपयुक्त 'जेव्ही-१२' हे रब्बी हंगामासाठी सुधारित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले होते. जवळपास २,६१० मेट्रीक टन कांदा उत्पादन झाले. कंपनीने ३ रुपये ५० पैसे प्रती किलो दराने कांदा खरेदी केला. जेव्हा की, कंपनीन करारात नोंदलेला हमी भाव ३ रुपये होता. आज १९ वर्षांनी 'जेव्ही-१२' या कांदा लागवडीची चळवळ जवळपास ८ जिल्ह्यांमधील ३१ तालुक्यातील ३९३ गावांमधील २,४८९ शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहे. सन २०१५-१६ मध्ये शेतकऱ्यांनी सुमारे ४७,१७१ मेट्रीक टन कांदा कंपनीला पुरवठा केला. याच बरोबर कंपनीने पांढऱ्या कांद्याचे खरीप हंगामासाठी सुधारित बियाणे ‘जेव्ही-५’ हे सन २००६-०७ मध्ये निर्माण केले. त्याच्या लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. सन २०१८-१९ या वर्षात ‘जेव्ही-५’ या बियाण्याची लागवड ८ जिल्ह्यातील ३१ तालुक्यांमधील ४२४ गावांमधील २,९३३ शेतकऱ्यांनी ५,५०९ एकर क्षेत्रावर केली. त्यातून ४४,४२२ मेट्रीक टन कांदा कंपनीला पुरवला.
![]() |
स्व. कांताई पांढरा कांदा नवतंत्र उत्पादक पुरस्कारार्थी |
पांढरा कांदा उत्पादकांना प्रोत्साहित करण्यासाठी सन २००१ पासून तर २००४ पर्यंत ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीने नवतंत्र पुरस्कार देणे सुरु केले होते. सन २००५ मध्ये काही अडथळ्यांमुळे पुरस्कार देणे खंडीत झाले. सन २००५ मध्ये सौ. कांताई जैन या स्वर्गवासी झाल्या. त्यानंतर पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराचे नाव ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ असे करण्यात आले. त्यानंतरही पुरस्कार प्रदान सोहळा लांबत राहिला. अखेर १४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोमवारी पुरस्कार प्रदान सोहळा झाला. या अंतर्गत पुरस्कारार्थी शेतकऱ्याचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व त्याच्या सौभाग्यवतीस साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. शिवाय, प्रत्येक पुरस्कारार्थीला ११ हजार रुपये पुरस्काराची रक्कम देण्यात आली. गेल्या १४ वर्षांतील १४ उत्कृष्ट कांदा उत्पादकांना ज्येष्ठ साहित्यिक व कृषिरत्न ना. धों. महानोर, कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, सौ. शोभना जैन, अभय जैन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कंपनीतर्फे लक्षवेधी घोषणा करण्यात आली. ती म्हणजे, सन २०१९-२० पासून ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ हे दरवर्षी दिले जातील. दरवर्षी ३ शेतकऱ्यांची निवड होईल. पहिला पुरस्कार ३१ हजार, दुसरा २१ हजार आणि तिसरा ११ हजार रुपये तसेच सोबत स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि सौभाग्यवतींसाठी सौभाग्य लेणे स्वरूप असलेल्या या घोषणेचे उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
अशोक जैन यांची प्रांजळ भूमिका
जैन उद्योग समुह सध्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. समुहातील विविध प्रकल्पांसाठी खेळत्या भांडवलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अनेकांच्या देणी देण्यात विलंब होत आहे. याच विलंबाचा फटका पांढरा कांदा पुरवठादार शेतकऱ्यांनाही बसला. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे देणे थकले होते. मात्र आहे त्या स्थितीत जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना त्यांची देणी अदा केली गेली. अजून काहींची अंशता देणी थकीत आहेत. या विषयाचा उहापोह जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या कार्यक्रमात प्रांजळपणे केला. त्यांच्या या पारदर्शी व उत्स्फूर्त संवादामुळे उपस्थित शेतकरी भारावले. गेल्या २१ वर्षांमधील ऋणानुबंध अधिक घट्ट करुन गेले.
अशोक जैन म्हणाले, ‘शेतीसाठी उत्पादने निर्मिती करणे हा आपल्या उद्योगाचा मूळ हेतू आहे. अशावेळी शेती उत्पादनावरील प्रक्रिया व इतर पूरक उत्पादनांच्या निर्मितीत आपण विस्तार केला. शिवाय, विविध ठिकाणच्या सरकारी योजनात सहभागी होऊन तेथे गरजेनुसार शेतकऱ्यांना यंत्र-तंत्र याचाही पुरवठा करीत सेवा दिली. महाराष्ट्रासह तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातही अशी सेवा दिली. मात्र, विविध प्रकारच्या सरकारी व इतर संस्थाकडे २,६०० कोटी रुपयांची येणी थकली. लोकसभेसाठी निवडणूक आली. काही राज्यात सुद्धा निवडणुका झाल्या. सरकार बदलले, धोरणात बदल झाले. शिवाय, बँकांच्या कार्यपद्धतीत बदल झाले. दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी बँका कठोर झाल्या. त्यामुळे हातातील खेळते भांडवल बँकाच्या व्याज व कर्ज चुकविण्यात खर्ची पडले. अशा स्थितीत आमच्याकडून सर्वांची देणी विलंबित झाली. पण, कंपनी या सर्व अडचणींवर मात करुन बाहेर पडते आहे. यापूर्वी श्रद्धेय भवरलाल जैन हयात असताना २ वेळा अशाच अडचणीतून कंपनी यशस्वीपणे बाहेर निघाली आहे. जैन कुटुंब शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचा घटक मानते. जैन कुटुंबाची शेती आणि भूमिपुत्रांशी नाळ खूप आधीपासून जुळलेली आहे आणि हे ऋणानुबंध कायम दृढ होत राहतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही जळगावात होतो, आहोत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत राहू. पैसा देण्यात उशीर होतो आहे. मात्र, तो नक्कीच दिला जाईल. प्रत्येकाची पै न् पै दिली जाईल. फक्त आमच्यावर विश्वास कायम ठेवा आणि साथ सोबत कायम असू द्या.’ अशी भावनिक साद त्यांनी घातली.
मसाला पिके उत्पादनासाठी आवाहन
अशोक जैन हे शेतकऱ्यांसोबत मोकळेपणाने संवाद साधत असताना त्यांनी भविष्यातील पीक पद्धती बदलण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले. ते म्हणाले, ‘जैन उद्योग समुहाने सर्वांत मोठा मसाला निर्मिती प्रकल्प जळगावात सुरु केला आहे. या प्रकल्पासाठी जसा पांढरा कांदा लागतो त्याच पद्धतीने आता लाल मीरची, आले, हळद, धने लागणार आहेत. या शिवाय पांढरा व लाल पेरू, टमाटा आणि निर्यात योग्य केळी याचीही गरज निर्माण झाली आहे. प्रक्रिया प्रकल्पसाठी ४५ हजार टन मसाल्याचे पदार्थ (पांढरा कांदा वगळून, २० हजार टन ओली लाल मीरची, १० हजार टन ओले आले, १५ हजार टन ओली हळद, २ हजार टन कोरडे धने व ४८ हजार मेट्रीक टन फळे (३० हजार टन टमाटा, ५ हजार टन पांढरा पेरू व ३ हजार टन लाल पेरु, १० हजार टन निर्यातक्षम केळी) लागणार आहे. यासाठी कंपनी शेतकऱ्यांसोबत करार करणार आहे. ही संधी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करायला हवा.चालू वर्षीही जेव्ही- १२ व जेव्ही-५ या दोन्ही वाणांची तब्बल ५० हजार टन कांद्याची गरज आहे. यावरूनच कंपनीच्या उत्पादनक्षमतेची कल्पना येऊ शकते.’
‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि कंपनीवर दाखविलेला विश्वास यामुळे संपूर्ण कार्यक्रम वेगळ्या उंचीवर गेला. याचा अनुभव नंतर स्नेहभोजनस्थळी शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना आला. शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोग करणारी कंपनी अडचणीत असेल तर आपणही सामंजस्य दाखवून विश्वास ठेवायला हवा, असे बहुतांश शेतकरी बोलत होते. श्रद्धेय भवरलाल जैन यांना शेतकऱ्यांसोबत अपेक्षित ऋणानुबंध नव्या पिढीनेही अधिक घट्ट केल्याचा हा अनुभव जळगावकर म्हणून मलाही आनंद देणारा होता.
India is biggest onion flake exporter but majar business from mahua rajkot gujarat so
ReplyDeleteIf jain can promise 10 rs/kg onion rate to farmae then only white onIon crop area will expand because cost of production at farm leval is 6/kg or 55000/acre whereas red onion is universal