Monday, 7 October 2019

राष्ट्रवादी'चा मुक्ताईनगरात 'बाय'...

विधानसभेच्या मुक्ताईनगर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांची माघार हा विषय धक्कादायक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने ॲड. रोहिणी खडसेंना दिलेला हा 'बाय' (म्हणजे आम्ही नाही लढत, तुम्ही जा पुढे) आहे. ॲड. पाटील यांनी निवडणूक लढण्याला केलेला हा 'बाय बाय' त्यांचे पिताश्री स्व. प्रल्हादभाऊ पाटील यांच्या कार्यकाळातील काही संदर्भांची आठवण करुन देतो. महाराष्ट्र राज्य शिखर बँकेचे सलग २ टर्म अध्यक्षपद सांभाळण्याची संधी स्व. प्रल्हादभाऊ यांना मिळाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ही किमया साधली गेली. शिखर बँकेच्या मुख्यालयात अध्यक्षाच्या कॅबिनसमोर तेव्हाचे सहकार मंत्री स्व. शंकरराव कोल्हे भेटीची प्रतिक्षा करीत बसलेले असत असे चित्र तेव्हा अनेकांनी पाहिले आहे. स्व. प्रल्हादभाऊ जळगाव जिल्हा बँकेचे व सहकार क्षेत्रातील अनभिषीक्त नेते होते. ते असे पर्यंत एकनाथराव खडसे जिल्हा बँकेत संचालक होऊ शकले नाहीत. दुसरीकडे खडसे यांनीही स्व. प्रल्हादभाऊ यांना विधी मंडळात किंवा संसदेत निवडून जाऊ दिले नाही. स्व. प्रल्हादभाऊंचे हे स्वप्न त्यांचे ॲड. रवींद्र पाटील हे साध्य करु शकले नाहीत.

मावळत्या राज्य सरकारमध्ये सुरुवातीला १७ महिने मंत्री असताना खडसे यांनी जळगाव जिल्हा बँक पादाक्रांत केली. स्व. प्रल्हादभाऊ यांच्यासोबत काम करणाऱ्या बहुतांश संचालकांना खडसे यांनी बाजुला सारले. राज्य सरकार जसा 'ईडी' धाक दाखवून विरोधी नेत्यांना पक्षांतराला भाग पाडत आहे अगदी तोच फाॅर्म्युला खडसे यांनी वापरुन बँकेतील काही जुन्या फाईली दाखवून बहुकतेकांना बँकेच्या निवडणूक रिंगणातून बाजूला जाण्यास भाग पाडले. त्यातील संगणक घोटाळा नेहमी चर्चेत राहीला आहे. खडसे यांनी जिल्हा बँक ताब्यात घेऊन बँकेच्या अध्यक्षपदी कन्या ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांना बसविले. हा नवा इतिहास लिहीत असताना बँकेच्या संचालक मंडळातून ॲड. रवींद्र पाटील यांची गच्छंती झाली. 'आमच्या स्व. प्रल्हादभाऊंच्या रवीभय्याला सांभाळून घ्या' अशी विनंती अरुण गुजराथी यांनी खडसेंना केली होती. तरीही ॲड. पाटील यांना बँकेचे दार बंद झाले.

ही पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने खडसेंच्या कन्येला 'बाय' का दिला हे लक्षात येते.  ॲड. रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेचा 'थेट विरोध' नाही, असा संदेश दिला गेला. यामागे कारण एक कारण असू शकते की, अलिकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना 'ईडी'ची कथित नोटीस आल्यानंतर खडसे यांनी केलेली पवार यांची पाठराखण. दुसरे कारणही असेल की, गेले ३ महिने खडसे पवार यांच्या संपर्कात होते. हा उल्लेख पवार यांनीच केला आहे. तिसरेही कारण असावे की, मध्यंतरी बारामतीला जाऊन राहण्याची खडसेंनी जाहीर इच्छा प्रकट केली होती. चौथे कारण दाखविण्यासाठी आहे. ते म्हणजे, खडसे कन्येच्या विरोधात एकच सक्षम उमेदवार असावा म्हणून माघारी झाली. ही कारणे लक्षात घेता खडसेंच्या दुसऱ्या पिढीला राजकारणात येताना राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केलेला नाही, हा इतिहास लिहिला गेला आहे हे लक्षात घ्या. मनसेने जसा आदित्य ठाकरें समोर उमेदवार दिला नाही. तसा राष्ट्रवादी काँग्रेसनेने ॲड. रोहिणी खडसेंसमोर उमेदवार दिला नाही. अशा प्रकारे खेळलेली राजकीय चाल ही फेसबुक व व्हाट्सॲपवर स्वतःचा डाटा प्लान खर्ची घालून आपापसात भांडणाऱ्या कार्यकर्त्यांना कधीच समजत नाही.

मुक्ताईनगर मतदार संघात एकनाथराव खडसे यांचे पारंपरिक विरोधक शिवसेनेचे चंद्रकांत पाटील आहेत. विधान सभा निवडणुकीत दोघांचा जुना संघर्ष आहे. खडसे विरोधात 'पाटील' आडनावाचे बहुजन कार्ड यापूर्वी स्व. प्रल्हादराव, ॲड. रवींद्र पाटील व चंद्रकांत पाटील यांनी वापरले आहे. चंद्रकांत पाटील यांना गेल्या निवडणुकीत फारच कमी मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला. आताच्या निवडणुकीत ॲड. रोहिणी खडसे यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर म्हणून चंद्रकांत पाटील आहेतच. ॲड. रवींद्र पाटील यांची माघार वरकरणी ॲड. खडसे खेवलकर व पाटील यांच्यात सरळ लढत व्हावी हे दर्शवित असली तरी तसे आतून होणार नाही. ॲड. रवींद्र पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते शिवसेना बंडखोराचा 'उघडपणे' प्रचार करुच शकत नाहीत. कारण खडसे कोणाचा हिशेब कुठे चुकता करतील याचा नेम नाही. अर्थात, अंतर्गत राजकारण काहीही असले तरी ॲड. रवींद्र पाटील यांनी आज घेतलेल्या माघारीच्या बदल्यात भविष्यात जिल्हा बँकेचा दरवाजा उघडला गेला तर आश्चर्य वाटायला नको. ॲड. रोहिणी खडसेंना 'बाय' देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची ही खेळी म्हणूनच भन्नाट आहे.

No comments:

Post a Comment