“विधानसभेच्या जळगाव मतदार संघाची सन २०१४ मधील
निवडणूक सर्व समाज घटकांच्या पाठबळावर मी जिंकली होती. आता सन २०१९ ची निवडूक सर्वच समाजांच्या
भरघोस पाठबळावर जिंकणार. मी केवळ एका समाजाच्या
पाठिंब्यावर निवडून येत नाही. विविध समाज घटकातील मित्र, हितचिंतक आणि कार्यकर्ते यांच्या बळावर मी जिंकतो,” अशी प्रतिक्रिया जळगाव मतदार संघाचे
विद्यमान आमदार व निवडणूक रिंगणातील भाजपचे उमेदवार सुरेश दामू भोळे तथा राजूमामा यांनी व्यक्त
केली. विधानसभा
निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आमदार भोळे यांच्या आमदारकीच्या ५ वर्षांच्या आणि त्यांच्या पत्नी तथा महापौर सौ.
सीमा भोळे यांच्या १ वर्षांच्या कार्यकाळावर सातत्याने टीका केली आहे. भोळे यांना सोशल
मीडियातून ७ प्रश्नही विचारले होते. आरोप आणि त्या प्रश्नांबाबत आमदार भोळे
यांचीही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून भोळे
यांनी सविस्तर उत्तरे दिली.
प्रश्न -
मामा, तुमच्या ५ वर्षांच्या काळात विकास
कामे कमी आणि आरोपच जास्त झाले आहेत.
मामा - माझ्यावर आरोप करणे सोपे आहे, दिलीपभाऊ. कारण मी कोणालाही दुखाऊ
नये या हेतूने आक्रमक उत्तर देत नाही.
ऊठ-सूट खुलासे पण मी करीत नाही. माझ्यावर होणारे आरोप एकतर्फी आहेत. आमदार म्हणून व महानगर
पालीका म्हणून माझी बाजू काही ठराविक
व्यक्ति किंवा माध्यमे समजून घेत नाहीत. मी स्वतः सुध्दा उत्तर देण्याचे टाळतो.
प्रश्न – पण,
आरोपांना कधी तरी उत्तर द्यायाला हवे मामा.
मामा - भाऊ, कोणत्या आरोपाला उत्तर देणार ? जे काही काम मी करीत आहे ते सर्व जळगावकरांसमोर आहे. ज्या कामांना
उशीर होत आहे त्यात प्रासंगिक व तांत्रिक अडथळे आहेत. ते दूर करायला वेळ लागतोच. कामे रखडतात
हे खरे आहे. पण, कामे पुढे सुरु आहेत हे पण तीतकेच खरे आहे. भाऊ, कामांना उशीर होतो या आरोपाशिवाय दुसरा कोणता आरोप कोणी करु शकते का
? आमदार भोळे यांनी रुपया खाल्ला, भ्रष्टाचार केला असे कोणी म्हणू शकते का ? कारण ते मी
केलेले नाही. इतर
आरोपांना मी उत्तर देत नाही.
प्रश्न -
मामा, नाथाभाऊंनी तुमचे बोट पकडून
तुम्हाला राजकारणात आणले. तुम्हाला आमदार केले. पण तुम्ही त्यांना नंतर साथ दिली
नाही.
मामा - बरे झाले भाऊ हा प्रश्न विचारला.
नाथाभाऊंनी मला राजकारणात आणले हे सत्य आहे. ते माझे नेते आहेत. यापूर्वी होते आणि या पुढे ही
राहतील. नाथाभाऊंनी मला पक्षनिष्ठा पाळायला शिकवले. पक्षाचे आदेश मानायला
सांगितले. मी त्याप्रमाणेच वागतो आहे.
पक्षाचा आमदार असल्यामुळे पक्षाच्या विशिष्ट चौकटीत मी कार्यरत आहे. पक्ष देईल
तो आदेश मी मानत आहे. पूर्वी नाथाभाऊ पालकमंत्री होते, तेव्हा कामांसाठी त्यांच्याकडे जायचो. नंतर चंद्रकांत दादा व आता पक्षाने गिरीशभाऊंना
पालकमंत्री केले. त्यांच्याकडे कामांसाठी वारंवार जावे लागते. याचा अर्थ नाथाभाऊंना मी सोडले
असे नाही. नाथाभाऊंना मी सोडले नाही आणि सोडणार नाही. या निवडणुकीसाठी उमेदवारी
अर्ज भरण्यापूर्वी मी नाथाभाऊंची भेट घेऊन आशीर्वाद घेतला आहे.
प्रश्न -
मामा, गेल्या ५ वर्षांत तुम्ही
जळगावकरांच्या भल्याचे केलेले सर्वांत ठोस वा लक्षवेधी काम सांगा. छूटपूट उदाहरण
नको.
मामा - काय आहे दिलीपभाऊ मी केलेले काम
पाहायचे नाही असे ठरवले असेल तर कोणालाही माझे काम दिसणार नाही. घरकूल योजनेसाठी महानगर पालिकेने घेतलेल्या कर्जाचा बोजा मुख्यमंत्री व
गिरीशभाऊ यांच्या सहकार्यामुळे उतरवला गेला. हुडकोने महानगर पालिकेकडे काढलेले
४४४ कोटी रुपये कर्ज आणि व्याज याचे वनटाईम सेटलमेंट २५३ कोटी रुपयांमध्ये केले. ही रक्कम राज्य सरकारने दिली.
२५३ कोटी रुपयांपैकी निम्मा हिस्सा सरकारने दिला आहे. वन टाइम सेटल्मेंटच्या अटी नुसार
तुर्तास २५३ कोटी रपयांपैकी २५० कोटी रुपये सरकारने आणि ३ कोटी रुपये महानगर पालिकेने
भरली आहे. आता हुडकोच्या कर्जातून महानगर पालिका मुक्त झाली आहे. सरकारचे १२५ कोटी
रुपये आता बिना व्याजी दरमहिना भरावे लागतील. जिल्हा बँकेचे कर्जही पूर्णतः फेडले आहे. दोन्ही
कर्जातून मुक्त झाल्यामुळे महानगर पालिकेच्या हातात निधी येतो आहे. विकास कामे गतीने मार्गी लागतील.
कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा देऊ. दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्याचे वेतन ॲडव्हान्स
देणार आहोत. पेन्शनर लोकांची
देणी देत आहोत. असे अडथळे दूर होत आहेत.
प्रश्न -
मामा, सौ. सीमाताईंना महापौर करुन काय मिळविले
? तुम्ही पक्षावर दबाव आणून हे पद
घरात घेतले का ?
मामा - भाऊ, हा प्रश्न विचारला हे सुध्दा चांगले झाले. सौ. सीमा
भोळे या नगरसेवक व्हायला तयार नव्हत्या. लहान
स्वरुपात सामाजिक कार्य करावे, धार्मिक कार्यात सहभागी व्हावे हा तिचा
पींड आहे. मला सुध्दा घरात दुसरे पद नको हे मी आमच्या नेत्याना सांगत होतो. महानगर पालिकेत
जेव्हा भाजपला बहुमत मिळाले
तेव्हा पहिला महापौर कोण होणार ? यावर चर्चा
झाली. आमचा पद घ्यायला नकार होता.
तेव्हा गिरीशभाऊ म्हणाले, ६ महिन्यात लोकसभा आणि १ वर्षा नंतर विधानसभा निवडणूक आहे. भोळे
तुम्हाला पुन्हा निवडणूक लढवायची आहे. अशावेळी शहर विकासाचे विषय मार्गी लावायला सरकारकड़ून
निधी आणायला आमदार म्हणून पाठपुरावा व प्रयत्न करावा
लागेल. सौ. भोळे या महापौर झाल्यानंतर महानगर पालिकेकडून कामे करुन घ्या. अखेरीस आम्हाला
गिरीशभाऊंचा आदेश मानावा लागला.
प्रश्न -
सौ. सीमाताई भोळे यांची आज प्रतिक्रिया काय आहे ?
मामा - खरे सांगतो भाऊ, ज्या दिवशी तीचे महापौर म्हणून नाव
जाहीर झाले, त्याच दिवशी गिरीशभाऊंकडे महापौरपदाचा
राजीनामा देऊन ठेवला आहे. आज माझ्यावर काही थोड्या व विशिष्ट लोकांकडून होणारे एकतर्फी आरोप तिला
सहन होत नाही. ती म्हणते, तुम्ही राजकारण सोडा. आपण कोणाचा
रुपया खात नाही. उलट घरातून पैसा
खर्च करतो. तरी लोक आपल्याला बदनाम करतात. असे राजकारण नको. पण अशावेळी तिला मी समाजकारण समजावून सांगतो.
टीका करणाऱ्यांकडून प्रेरणा मिळते असे सांगतो.
प्रश्न -
लेवा भोर पंचायतने तुम्हाला पाठींबा दिला. असे केल्यामुळे तुमच्यावर लेवा पाटील
समाजाचा आमदार व उमेदवार हा शिक्का लागला.
मामा - भाऊ, मी अगोदर सांगितले की, मला सर्व समाजांचा पाठींबा आहे. मी सर्वांना घेऊन चालतो. लेवा भोर पंचायतकडे
पाठींबा मागायला मी कधीही गेलो नाही. त्यांनी मला स्वतःहून पाठींब्याचे पत्र
दिले. आपण स्वतः पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विचारुन घ्या.
प्रश्न - व्यापारी गाळ्यांच्या थकबाकी, दंड व नुतनिकरणाचा विषय प्रलंबित
आहे.
मामा - भाऊ, व्यापारी गाळे प्रकरणी तोडगे काढणे सुरु आहे. सन २०१४
च्या रेडीरेकनरनुसार भाडे बील दिले आहे.
आम्ही कायद्याचा अभ्यास करुन गाळ्यांच्या वापरात घसारा गृहीत धरुन आकारलेल्या
भाड्यात ३० टक्के सवलत दिलेली आहे.
यामुळे बिलांची रक्कम सुद्धा ३८ टक्के कमी झाली आहे. ही रक्कम व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधी
मंडळाने भरायला मान्य केले आहे. आता व्यापाऱ्यांनी या तोडग्यानुसार वागायला हवे. मोजके
व्यापारी या तोडग्याला विरोध करीत
असून इतरांना भाडे भरायला विरोध करीत आहेत. तरी सुद्धा माझ्या माहीती प्रमाणे ७० टक्के व्यापाऱ्यांनी बरीचशी रक्कम
भरायला सुरुवात सुद्धा केली आहे.
मी आपल्या मार्फत त्यांचे ही आभार व्यक्त करतो. इतर व्यापाऱ्यांनी बीले भरुन मनपाला
सहकार्य करुन आर्थिकदृष्टया सुदृढ करायला हवे.
प्रश्न -
शहर सफाईच्या ठेक्याविषयी अनेक तक्रारी आहेत. ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये होता.
त्याला काम का दिले ?
मामा - ठेकेदारला इतर महानगर पालिकांनी
ब्लॅकलिस्ट केल्याचा कोणताही पुरावा समोर आला नाही. शिवाय, मनपाने स्वतः विकत घेतलेल्या ७५ घंटगाड्या त्या ठेकेदाराला भाडे तत्वावर द्यायच्या
होत्या. एका अधिकाऱ्याने परस्पर करार करुन घंटागाड्या ठेकेदाराला मोफत दिल्या. आम्ही
त्या अधिकाऱ्याची बदली केली आहे. प्रश्न सोडवायचे
प्रयत्न करीत आहोत. त्यात ही येत्या काही दिवसात नक्की यश येऊन काम मार्गी लागेल. शहरातील
दैनंदिन सफाईचा प्रश्न सोडवायचे पूरेपुर प्रयत्न करीत आहोत. येत्या काही दिवसात नक्की यश येऊन
कामे मार्गी लागतील. असा विश्वास आहे.
प्रश्न –
मामा, तुम्ही गेल्या ५ वर्षांत नेमका किती निधी आणला ?
मामा – दिलीपभाऊ
नगर पालिका किंवा महानगर पालिका असताना पहिल्यांदा ५ वर्षांत ११७४ कोटी रुपये निधी
जळगाव साठी आणला. यात राज्य सरकारकडून मिळालेला निधी ७७९ कोटी रुपये असून उर्वरित
केंद्र सरकारच्या योजनांसाठीचा आहे. अमृत (पाणी योजना) २४९ कोटी, अमृत (भुयारी
गटार) १९१ कोटी, महामार्ग चौपदरीकरण ६९ कोटी, स्वच्छ भारत अभियान ३० कोटी असा ५३९
कोटी रुपये निधी केंद्र सरकारचा आहे. राज्य सरकारने मुलभूत गरजांसाठी १०० कोटी,
पोलीसांच्या सोसायटीसाठी ७० कोटी, पिंप्राळा रेल्वे उड्डानपूलसाठी ६० कोटी,
शिवाजीनगर रेल्वे उड्डानपूलसाठी ३५ कोटी, एमआयडीसाठी २८ कोटी, मुख्यमंत्री विशेष
निधी २५ कोटी, महावितरणसाठी १४ कोटी ३६ लाख, मेहरुण तलावसाठी ११ कोटी, धऱ्मदाय
आयुक्त कार्यालय इमारतसाठी ८ कोटी, सागरपार्कसाठी ६९ लाख पाळधी बायपास ते खोटोनगर महामार्ग
रुंदीकरण १५ कोटी. असा निधी मिळाला आहे.
(ताजा कलम - आमदार भोळे यांनी प्रश्नांची उत्तरे सविस्तर दिलेली असली तरी त्यांच्या कार्यकाळाविषयी जळगावकर नाराज असल्याचा ठपका कायम आहे. आमदारांविषयी जळगावकरांचा कौल दि. २१ ला ईव्हीएममध्ये बंद होईल.)