Sunday 13 October 2019

भाजपच्या फितूरांना फूस आणि रसद कोणाची ?


भाजपचे स्टार प्रचारक तथा भाजपचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव येथे रविवारी झालेल्या सभास्थळी जळगाव ग्रामीण मतदार संघातील शिवसेना उमेदवार तथा राज्यमंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे जळगाव जिल्ह्यातील सर्वेसर्वा तथा जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात 'खडाखडी' झाली असे वृत्त आहे. जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण ११ पैकी ७ मतदार संघात युती अंतर्गत भाजपचे आणि ४ मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या चौघांसमोर भाजपचे ४ 'फितूर' उमेदवारांनी प्रचारात आगळीक सुरु केली आहे. भाजपचे भगवे पट्टे गळ्यात घालून व मंत्री महाजन यांचा आशीर्वाद असल्याचे सांगत हे चौघे फितूर प्रचार करीत आहेत. त्यांच्यापैकी एक फितूर उमेदवार गुलाबराव पाटील यांच्यासमोर जळगाव ग्रामीण मतदार संघात आहे. हाच मुद्दा घेऊन गुलाबराव पाटील यांनी मोदींच्या सभास्थानी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे सभेपूर्वी वातावरण थोडे तापले. अर्थात, सभा संयोजक मंत्री महाजन यांनी गुलाबराव पाटील यांना टोलवून लावले.

विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आज रविवारी आटोपला. आठवड्याचा समारोप मोदींच्या सभेने झाला. गेल्या ८ दिवसात सर्वाधिक चर्चेत निवडणूक रिंगणातील भाजपचे फितूर उमेदवार राहीले. पक्षाने अधिकृत उमेवारी देण्याचे नाकारल्यानंतर जे उमेदवार निवडणूक रिंगणात असतात त्यांना 'बंडखोर' म्हटले जाते. मात्र, जे उमेदवार पक्षातील नेत्यांची फूस मिळवून मित्र किंवा युतीतील घटक पक्षाच्या अधिकृत उमेदवार विरोधात निवडणूक रिंगणात कायम राहतात त्यांना 'फितूर' म्हटले पाहिजे. अशांची बंडखोरी ही दिखाऊ असते मात्र आतून ते स्वतःच्या पक्षाशी व नेत्याशी निष्ठावंत असतात.

 


भाजपचे असे ४ फितूर उमेदवार शिवसेनेच्या ४ उमेदवारांना अडचणीत आणत आहेत. यात जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तथा राज्यमंत्री गुलाबराव पाटील विरोधात चंद्रशेखर अत्तरदे, पारोळा-एरंडोल मतदार संघात शिवसेनेचे आधिकृत उमेदवार विरोधात गोविंद शिरोळे, चोपडा मतदार संघात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. लताताई चंद्रकात सोनवणे विरोधात प्रभाकर सोनवणे आणि पाचोरा मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किशोर पाटील विरोधात अमोल शिंदे हे दौघे भाजपचे फितूर उमेदवार आहेत. या फितुरांना भाजप नेत्यांची फूस तर आहेच पण प्रचाराची रसद सुध्दा पुरवली जात आहे, असे आता उघडपणे दिसते आहे. गुलाबराव पाटील यांनी थेट माध्यमांच्या समोर हा मुद्दा मांडला. भाजपचे फितुर उमेदवार मंत्री महाजन यांचे फोटो प्रचार पत्रकात वापरत असल्याचे त्यांनी थेट म्हटले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे या फितुरांविषयी शिवसेना कार्याध्यक्षांनी माहिती देऊन योग्य त्या कार्यवाहीची अपेक्षा केली आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

फितुरांना भाजपचे नेते तथा जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन यांची फूस असल्याचा आरोप शिवसेनेचे कार्यकर्ते करीत आहेत. चोपडा मतदार संघातील भाजप फितूर प्रभाकर सोनवणे हे जिल्हा परिषदेत समाजकल्याण सभापती आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजप फितूर चंद्रशेखर आत्तरदे यांच्या पत्नी सौ. माधुरी जिल्हा परिषद सदस्य आहेत. सोनवणे व अत्तरदे हे दोघे मंत्री महाजन यांचे कट्टर समर्थक आहेत. पारोळ्यातील भाजप फितूर गोविंद शिरोळे हे माजी नगराध्यक्ष आहेत. शिरोळे व पाचोरा येथील भाजप फितूर अमोल शिंदे हे मंत्री महाजन यांचेच समर्थक आहेत. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार विरोधात फितुरी करणाऱ्यांवर भाजप आजपर्यंत काहीही कार्यवाही करु शकलेली नाही.

भाजपचे चौघे फितूर हे मंत्री महाजन यांचीच माणसे असल्याचा आरोप करुन आम्हीच युती धर्म का पाळावा का ? असा प्रश्न शिवसेनेचे पदाधिकारी विचारत आहेत. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही मतदार संघात भाजपच्या जागा असताना शिवसेनेने प्रामाणिकपणे युतीचा प्रचार केला, जळगाव मतदार संघ पूर्वीपासून शिवसेनेच्या हिश्शावर असूनही तो भाजपला दिला गेला, शिवाय जळगावमध्ये शिवसेनेचा फितूर वा बंडखोर नाही असेही मुद्दे मांडले जात आहेत. भाजपच्या ४ फितुरांचा परिणाम जळगाव शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांवर हमखास होईल, असे सांगितले जात आहे. 

सुरेश भोळे भाजपचे नव्हे लेवा पाटील समाजाचे उमेदवार

जळगाव मतदार संघात सुरेश भोळे यांना लेवा भोर पंचायत ठाया पाडळसे यांनी समाजाचा उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. म्हणजेच, भोळे हे केवळ लेवा पाटील समाजाचेच उमेदवार असल्याचे दर्शवले जात आहे. अशावेळी जळगावमधील बहुजन मराठा, कोळी, माळी, मुस्लिम, सिंधी, गुजर, मारवाडी, वाणी व मागास घटकाने फक्त लेवा समाजाचा शिक्का असलेल्या उमेदवाराच्या मागे जायचे का ? याचा विचार करावा असे आवाहन शिवसेना नेत्यांनी केले आहे.

(मुक्ताईनगर मतदार संघात भाजप उमेदवार रोहिणीताई खडसे खेवलकर विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील हे बंडखोर तथा राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार आहेत. यावर शिवसेना काही बोलत नाही. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जाहीरपणे पुरस्कृत उमेदवार म्हटलेले असल्यामुळे चंद्रकांत पाटील हे सध्या शिवसेनेचे बंडखोर आणि फितूर अशा दोन्ही प्रकारात बसत नाहीत.)

संदर्भ - खडाखडीचे वृत्त

https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-bandkhori-gulabrao-patil-girish-mahajan-223310

No comments:

Post a Comment