Thursday 3 October 2019

नाथाभाऊ - 'शल्य' ते 'शल्यचिकित्सा'

विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये मुक्ताईनगर मतदार संघात एकनाथराव खडसे तथा नाथाभाऊ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शक्यतो असणार नाहीत. बहुधा त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी आमदारकीचा वारसा नक्कीच चालवणार. आज सायंकाळपर्यंत या विषयावर पडदा पडलेला असेल.

जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात स्वकर्तृत्वाच्या अहंकारातून आत्मघात करुन घेणारे दुसरे उदाहरण नाथाभाऊ यांचे आहे. पहिले उदाहरण, सुरेशदादा जैन यांचे आहे. अमर्याद सत्तेचा वापर सुरेशदादांनी वेगळ्या पद्धतीने केला. अखेर, घरकुल घोटाळ्याच्या आरोपात सुरेशदादांना मागील ४ वर्षे कारागृहात काढावी लागली. तेव्हा राज्यात भाजपच्या नेतृत्वातील सत्ता होती. तरीही नाथाभाऊ यांना मंत्रीपदाविना राहावे लागले. विधानसभेच्या सन २०१९ च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. घरकुल घोटाळ्यात आरोपी ठरल्यामुळे सुरेशदादा रिंगणातून बाहेर आहेत. या निवडणुकीच्या प्रक्रियेतून नाथाभाऊंना भाजपने सक्तीने बाहेर काढले आहे.

नाथाभाऊंच्या या अवस्थेमागे त्यांनी मनात कुरवाळलेले शल्य आणि वर्तणुकीतून दर्शविलेले शल्य या दोन्ही भूमिका कारणीभूत आहेत. गेल्या ५ वर्षांत पक्षाचा नेता म्हणून राजकारणाचे सारथ्य करताना नाथाभाऊंनी नेहमी महाभारतातील 'शल्य' ची भूमिका निभावली. गेली ४ वर्षे नाथाभाऊंना मंत्रीपदापासून वंचित ठेवले गेले. या काळात नाथाभाऊंनी १०० वेळा जाहीरपणे प्रश्न विचारला, 'माझा काय गुन्हा ?' या प्रश्नाचे 'शल्य' (मनाला बोचणारा सल किंवा मनाला टोचणारे दुःख) जाहीर करता-करता नाथाभाऊ केव्हा महाभारतातील 'शल्य' (कर्णाच्या रथाचे सारथ्य करताना कर्णालाच घालून पाडून बोलणारा सहकारी) कधी झाले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. पक्षासोबत राहून पक्ष नेतृत्वाचा (येथे मुख्यमंत्री हेच नेते) मानभंग विधी मंडळात आणि सभागृहाच्याबाहेर आपण सतत करीत आहोत, हे नाथाभाऊंनी जाणवून घेतले नाही. अखेर नाथाभाऊंच्या मनातील आणि वागणुकीतील 'शल्य' साठी भाजपने 'शल्यचिकित्सा' केली. विधानसभेसाठी थेट नाथाभाऊंना उमेदवारीच नाकारली. पक्षाने निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात अशा जागी सोडले आहे की, निर्णय काय घ्यावा ? हा पेच खडसे कुटुंबाच्या समोर आहे. येथे समर्थकांची भूमिका ही केवळ बघ्याचीच असेल.

नाथाभाऊंच्या या अवस्थेवर त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत आणि नाथाभाऊ ज्या लेवा पाटील समाजातील आहेत, त्या समाजाची मातृसंस्था लेवा भोर पंचायतने राजकीय क्षेत्राला इशारे दिले आहे. या दोन्ही प्रतिक्रिया अनावश्यक आहे. उलटपक्षी नाथाभाऊंची अप्रतिष्ठा करणाऱ्या आहेत. नाथाभाऊंनी गेल्या ४० वर्षांत भाजप वाढवला असा दावा करुन आजच्या घडीला पक्ष त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या ४० वर्षांत नाथाभाऊंनी पक्षाच्या छत्रछायेत उपभोगलेल्या सत्तेच्या पदांकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल ? जेव्हा-जेव्हा सत्ता प्राप्तीसाठी नाथाभाऊंनी पक्षाचे सारथ्य केले तेव्हा तेव्हा वजनदार राजकीय पदे स्वतः आणि कुटुंबातील सदस्यांनी उपभोगली. लेवा भोर पंचायत हे नाकारणार आहे का ? जरा राजकिय इतिहासात डोकावून पाहा. शिवसेना भाजप युतीची पहिली सत्ता आली तेव्हा नाथाभाऊ वजनदार मंत्री होते. पक्ष सत्तेत नव्हता तेव्हा नाथाभाऊ भाजप या पक्षामुळे विरोधी पक्षनेता होते. या पदावर असताना नाथाभाऊ यांचा मानभंग शरद पवार यांनी 'तोडीपानी करणारा विरोधीपक्ष नेता' असा शेलका आरोप लावून केला होता.

विरोधी पक्षनेतेपदी असताना नाथाभाऊंनी सुनबाई श्रीमती रक्षा खडसे यांना लोकसभेत खासदार केले. यासाठी पक्षाची उमेदवारी ऐनवेळी कापल्याचे 'शल्य' हरिभाऊ जावळे यांना दिले. सन २०१४ मध्ये भाजप नेतृत्वातील सरकार सत्तेवर आले तेव्हा नाथाभाऊ मंत्रिमंडळात १२ खात्यांचे मंत्रीपद बाळगून क्रमांक २ चे नेते होते. मंत्रीपदाचे वलय अवघे १७ महिने असताना मंत्रीपदावर असलेल्या नाथाभाऊंच्या समोर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी (यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य नेते) माना झुकवल्या. जिल्हा बँकेत नाथाभाऊंच्या कन्या सौ. रोहिणी खडसे-खेवलकर अध्यक्ष झाल्या. जिल्हा दूध संघात पत्नी सौ. मंदाताई खडसे अध्यक्ष झाल्या. पुढे त्या महानंद डेअरीच्या अध्यक्षही झाल्या. संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी सत्तेची ४ पदे (आमदार, खासदार, सहकार संस्थांची २ पदे) बाळगणारे एकमेव व्हीव्हीआयपी खडसे कुटूंब होते. हे स्वातंत्र्य पक्षाने दिले नव्हते का ? या प्रश्नाचे उत्तर आज कांगावा करणाऱ्या समर्थक व लेवा भोर पंचायतने द्यायला हवे. 

जळगाव जिल्ह्यातून हरिभाऊ जावळे (रावेर) व सुरेश भोळे (जळगाव) हे २ आमदार लेवा पाटील समाजाचे आहे. या दोघांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली, हे लेवा भोर पंचायतचे समाधान करणारे नाही का ? मुक्ताईनगर मतदार संघातूनही खडसे कुटुंबातूनच उमेदवार मिळू शकतो. अशावेळी भाजप या राष्ट्रीय पक्षावर दबाव टाकून नाथाभाऊंनाच उमेदवारी द्या अशी खुजेपणाची मागणी लेवा भोर पंचायत कशी करु शकते ? खडसे, जावळे व भोळे हे केवळ लेवा पाटील म्हणून निवडून येतात असे लेवा भोर पंचायतला वाटत असेल तर इतर बहुजन, वंचित व अल्प संख्यांक यांनी यावेळी वेगळा वेगळा विचार
करावा का ? यावरही लेवा भोर पंचायतच्या कुटुंब प्रमुखांनी पत्रकार परिषद घ्यावी. स्व. डाॅ. गुणवंतराव सरोदे हे २ वेळा आमदार होते. १ वेळा खासदार झाले. त्यांची उमेदवारी कोणामुळे कापली गेली ? तेव्हा कधी लेवा भोर पंचायत बोलल्याचे आठवत नाही. या जिल्ह्यातून लेवा पाटील समाजाचे स्व. वाय. एस. महाजन, स्व. मधुकरराव चौधरी, स्व. जे. टी. महाजन, स्व.गुणवंतराव सरोदे यांनीही संपूर्ण समाजाचे नेतृत्व केले. त्यांच्यावरही काही वेळा राजकिय अन्याय झाले, पण लेवा भोर पंचायत त्यांच्यासाठी काही भूमिका घेऊन उभी राहिली होती, असा काही संदर्भ आठवत नाही.

महाभारताच्या युध्दात २ जणांनी रथाचे सारथ्य केले. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य कृष्णाने केले. कृष्ण स्वतः मथुरा आणि द्वारकेचा राजा होता. कर्णाच्या रथाचे सारथ्य शल्य याने केले. शल्य स्वतः मद्रदेशाचा राजा होता. कृष्णाने सारथ्य करताना अर्जुनाच्या सल्लागाराची भूमिका निभावली. शल्य याने सारथ्य करताना नेहमी कर्णाचा मानभंग केला. आजच्या भाषेत सांगायचे तर पक्षात राहून पक्षनेतृत्वाला शिव्या घातल्या. शल्य कर्णाचा रथ हाकत होता. रथाचे एक चाक कुरुक्षेत्रावरील रक्ताच्या चिखलात रुतले. असे होण्यामागे दोष सारथी शल्यचा होता. रथाला सुखरुप पुढे नेणे ही जबाबदारी शल्यची होती. पण, शल्यला कर्णाचा मानभंग करुन अर्जुनाच्या हस्ते त्याचा मृत्यू घडवायचा होता. येथ पर्यंत महाभारतातील हे  संदर्भ एकीकडे कृष्ण आणि अर्जुनाच्या रुपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांना लागू होतात. जेव्हा-जेव्हा गरज भासली तेव्हा मित्रवत उत्तम सारथी होण्याची संधी गिरीश महाजन यांनी निभावली. दुसरीकडे कर्ण व शल्य हा संदर्भ नाथाभाऊ व फडणवीस यांना लागू होतात. जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा नाथाभाऊंनी फडणवीस यांच्या मानभंगाची संधी साधली. निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात मात्र कर्णाची शिकार करण्यासाठी प्रवृत्त शल्यचा 'गेम' पक्षाने उलटला. विधानसभेची उमेदवारी पक्षाने नाथाभाऊंना नाकारुन 'शल्यची शल्यचिकिसा' केली. नाथाभाऊ यांनी ओढवून घेतलेला हाच आत्मघात आहे. स्वःतच निर्माण केलेल्या परिस्थितीचे ते स्वतः बळी आहेत.

नाथाभाऊ यांनी पक्षाचे सारथ्य करताना सरकार व पर्यायाने पक्षनेतृत्वाचा मानभंग कधी-कधी कसा-कसा केला त्याची काही बोलकी उदाहरणे खालील प्रमाणे आहेत.

दि. ४ ऑगस्ट २०१७
जळगाव - "राज्यभरातील जमीन संपादित करण्यासाठी सरकारने नोटिफिकेशन काढले. हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांच्या घेतल्या. परंतु, त्या मोकळ्या केल्या. असे मोकळे केलेले किती भूखंड आहेत हे मी सभागृहात विचारतोय. पण त्याचे उत्तर सरकार देऊ शकत नाहीत. मला ही माहिती सभागृहात सहा-सहा महिने मिळत नाही. माझी विनंती आहे की, आपल्या माध्यमातून ही माहिती मला पुढच्या आठवड्यात मंगळवार-बुधवारी मिळेल का ? नाहीतर हे पण अधिवेशन गेले. एक-एक वर्ष भांडून-भांडून मिळत नसेल तर माहिती शासन का दडवते ? काय लपवते ?  काय असे आहे की ते मला माहिती देऊ शकत नाहीत ? त्या प्रकरणात घोटाळे झाल्याची शंका असल्यामुळे ही माहिती सभागृहात येत नाही, असा माझा आरोप आहे.
दि. १२ जानेवारी २०१८
रावेर - "राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ शकलेले नाही. मध्यस्थ, दलाल आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. शेतकऱ्यांनी सरकारच्या भरवशावर राहू नये. आता त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, शेतकऱ्यांच्या हक्काची कंपनी स्थापन करावी. बारामतीमध्ये शरद पवार यांनी कृषिक्षेत्रात संधोशन करून बदल घडवले. मलाही हल्ली बारामतीमध्ये जाऊन राहावे असे वाटते. माझी आणि पवारांची जुनी मैत्री असून पवार यांनी कृषिमंत्रीपदावर केलेल्या कामाचे मी नेहमीच कौतुक केले आहे." 
दि.२७ जानेवारी २०१८
बोदवड - "ज्यांच्यासाठी झाड लावले, लाठ्या खाल्ल्या, काठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलो आज तोच माणूस उन्हात उभा आहे. माझ्यावर झालेल्या आरोपात तथ्य आहे की नाही हे सरकारने जनतेला सांगायला हवे."
दि. १६ फेब्रुवारी २०१८
धुळे - "वैद्यकीय महाविद्यालय आणल्याने प्रश्न सुटत नाही. खान्देशच्या विकासाचा अनुषेश मोठा असून, तो दूर करण्यासाठी आवश्यक प्रयत्न होताना दिसत नाही. जलसिंचनाचे खूप मोठे काम अपूर्ण राहिले असून, ते पूर्ण झाले पाहिजे."
दि. ६ मार्च २०१८
मुंबई - "माझ्यावर अनेक आरोप झाले ज्याचे तथ्य शून्य आहे. दोषी असेल तर त्याला फाशी द्या. पण बेछूट आरोप झाल्यानंतर चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोप करणाऱ्यांवर काय कार्यवाही केली गेली हे सांगावे. माझ्यावर राजकिय उद्देशाने तथ्यहिन आरोप केले गेले. सगळ्या आरोपांची चौकशी झाली. त्यात काहीच निघाले नाही. माझ्यावर लागोपाठ चौकश्या झाल्या आहेत. एका आरोपात तथ्य निघाले नाही. ज्यांनी हे आरोप केले त्यांच्यावर काय कार्यवाही केली ? तथ्य आढळले नसेल ते आरोप करणाऱ्यांवर काय कार्यवाही होते ?" 
दि. १८ जुलै २०१८
नागपूर - "हे सरकार बाजार समित्यांच्या विरोधात आहे. बाजार समित्यांकडे उत्पन्नाचे साधन नाही. बाजार समित्या बंद पडल्या तर स्पर्धा संपेल आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.
दि. १६ सप्टेंबर २०१८
रावेर - "काँग्रेसच्या काळात दणका मारताच कामे व्हायची. आता आपलेच सरकार असूनही कामे होत नाहीत. रस्ते खराब झाले असून जनता आमच्याकडे विचारणा करते. सरकार काही करत नसेल तर आता आपण श्रमदानाने कामे करू. यासाठी मी हाती घमेले घेतो. हरिभाऊ आपण फावडे घ्यावे. आपण श्रमदान करून रस्ते सुधारू."
दि. ३१ ऑक्टोबर २०१८
नंदुरबार - “मला राजकारणात आणि समाजात येऊन ४० वर्ष झाली. या ४० वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही, एकही गुन्हा माझ्या नावावर दाखल झालेला नाही. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले नाहीत. भाजप सत्तेवर यावी म्हणून रक्ताचे पाणी केले, कष्ट केले पण सत्ता मिळताच मला मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. माझे काय चुकले ? डोक्यावरची टोपी मी फिरवतो परंतु राजकारणात कधी टोपी फिरवणार नाही. अच्छे दिन हमारे भी आयेंगे.” 
दि. २६ नोव्हेंबर २०१८
मुंबई - "पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. गावेच्या गावे स्थलांतरित होण्याची भीती आहे. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे पाण्याचा प्रश्न वेळेत सोडवण्यात अपयश येत असून तोंड लपवून पळायची वेळ आमच्यावर येत आहे. पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे. सरकारने आमच्या लोकांचा जीव वाचवावा."
दि. २ जुलै २०१९
मुंबई - "मी वडिलोपार्जित श्रीमंत आहे. माझा जावईही परदेशात असतो. माझा नातूही बॉर्न एनआरआय आहे. मी काही मी भुक्कड नाही. ४० वर्षांत मी एकही निवडणूक हरलेलो नाही. २८८ आमदारांपैकी एक सगळ्यांत भ्रष्ट आमदार म्हणून मी इथे उभा आहे. एकाही आमदाराने माझ्यावर आरोप केलेला नव्हता. एका बाहेरच्या माणसाने आरोप केला. पहिला आरोप, दाऊदच्या बायकोबरोबर मी बोललो असा संबंध जोडला गेला. एका हॅकरने हा दावा केला. जे पाच नंबर त्याने दाखवले ते माझ्यापेक्षा जास्त वरिष्ठ लोकांचे होते. दाऊदची बायको दाऊदला सोडून माझ्याशी का बोलते हे मला आजही समजलेाही. भंगाळेचे काय झाले, तो गेला कुठे. तो हॅकर कुठे गेला. तो केवळ माझ्यावर आरोपच करायला जन्म घेतला होता का ? तो जिवंत आहे की मेला हे मला माहित नाही."
दि. १ सप्टेंबर २०१९
मुंबई - "भाजपमध्ये प्रवेश करणारे नेते कुणी साधुसंत नसून त्यांना सत्तेची ऊब हवी म्हणूनच हे सर्व नेते भाजपमध्ये येत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे, ते अशा नेत्यांना धुवून घेतात." 

नाथाभाऊंची ही वक्तव्ये गेल्या २-३ वर्षांतील आहेत. पक्षाने नाथाभाऊंना मंत्रीपद सोडायला सांगितले आणि नंतर पुन्हा मंत्रीपद दिले नाही, हे शल्य त्यांच्या मनात आहे. त्याचा जाब विचारण्याच्या जागा विधी मंडळ सभागृह किंवा समाजात होणारे जाहीर कार्यक्रम कधीही नव्हते. पक्षातच वेळोवेळी वरिष्ठांशी बोलून विषय संपवायला हवा होता. बऱ्याचवेळा नाथाभाऊंचे मौन अनभवायला यायचे पण कुठेतरी काही तरी असे घडायचे की, नाथाभाऊंना मनातील शल्य टोचायचे आणि ते स्वतः शल्याच्या भूमिकेत जायचे. शेवटी पक्षाने पक्षाला हवी तशी शल्यचिकित्सा करुन टाकली आहे. नाथाभाऊंना बारामती कितीही आवडत असली तरी तेथे राहायला ते जाणार नाहीत, हा माझा ३० वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव सांगतो. रोहिणीताईंना निवडणुकीसाठी आधीच शुभेच्छा देऊन ठवतो. (नाथाभाऊ जेव्हा-जेव्हा पक्ष नेतृत्वाच्या विरोधात बोलत तेव्हा-तेव्हा मी माझ्या मित्रांना सांगत असे, नाथाभाऊंना पक्ष उमेदवारी देणार नाही. आताही मला वाटते नाथाभाऊ भाजप सोडणार नाहीत.)

(ताजा कलम - विश्वसनीय मित्राने दिलेली माहिती - भाजपने नाथाभाऊंना किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी द्यायची नाही असे ठरविले होते. वेळप्रसंगी चंद्रकांत पाटील यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्याची तयारी केली होती. पक्षाचा हा डाव लक्षात आल्यामुळेच नाथाभाऊंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता त्यांचा अर्ज आहे म्हणूनच रोहिणी खडसे-खेवलकर यांना पक्षाने उमेदवारी दिली.)

1 comment:

  1. हे सगळी "शल्य" विधानं नाथाभाउंवर आरोपासापेक्ष घेण्यात आलेल्या राजीनाम्यानंतरची आहेत. आणी हे त्याच्या जिव्हारी लागणं साहजिकच होते. आणी नेतृत्वाला त्यांच्याशी दृष्यादृष्य स्पर्धेची कायमच भीती वाटत असणार आणी त्यांच्यावर एकामागे एक अशा आरोपांचा मारा झाला आणी विजनवास सदृष्य अशी दुर्दैवी अवस्था त्यांच्यावर आली. पण एव्हढंमात्र नक्की भाउंना बुद्धीबळाचा खेळ खेळता नाही आला आणी आता कदाचित खूप उशीर झालाय.
    -सुनील.

    ReplyDelete