![]() |
स्पार्क बूट एमआरपी ९९९ रुपये |
जळगाव शहरात सध्या मान्सून धमाकाअंतर्गत भरपूर सेल सुरु आहेत.५० टक्के डिस्काऊंट किंवा २ विकत घ्या ३ फ्रि घेऊन जा असे बोर्ड लागले आहेत. आपण जेव्हा कोणतीही वस्तू विकत घेतो तेव्हा तिची एमआरपी पाहतो. 'जीएसटी' आल्यानंतर कोणतीही वस्तू भारतभरच्या बाजारात एकाच किंमतीत मिळतील असे सांगितले गेले. पण आज असे खरेच होते आहे का ? याचे उत्तर नाही हेच आहे. जेव्हा २ किंवा ३ वस्तू क्लब पैकेजिंग करुन सवलतीच्या किंमतीत विकल्याचा दावा केला जातो, तेव्हा त्या ३ वस्तुंची मूळ एमआरपी कमी झालेली असते. याचाच अर्थ उत्पादक, होलसेलर वा विक्रेता स्वतःच्या नफा किंवा कमिशनमध्ये कपात करतो. तरीही विक्रेता ती वस्तू विकतो. म्हणजेच एमआरपी कमी केली जाते. याचा दुसरा अर्थ एमआरपी ही उत्पादन आणि वितरण खर्चासह किती तरी पट फुगवलेली असते. बाजारपेठेतील मंदीचा एमआरपी हाच खरा झोल व घोळ आहे. सध्या ४ चाकी वाहनांच्या किंमती दीड ते २ लाखांनी कमी केल्या जात आहेत. याचा दुसरा अर्थ हाच की, उत्पादक ते वितरक यांच्या कमिशनची टक्केवारी भरमसाठ वाढवलेली आहे.
![]() |
स्पार्क बूट ॲमेझॉन प्राईज ७४९ रुपये |
आता एमआरपी आणि अॉनलाईन विक्रीतला घोळ व झोल पाहू. जळगाव येथे लाकडी गणपती भागात बुटांचे एक होलसेलर आहेत. त्यांचेच रिटेल विक्रीचे शॉप जवळ आहे. मॉर्निंग वॉकसाठी स्पार्क कंपनीचे बूट मी त्या शॉपमध्ये पाहिले. त्यावर एमआरपी होती ९९९ रुपये. विक्रेता होलसेलर सोबत किरकोळ विक्रेता आहे. तो म्हणाला, बुटाची किंमत ९९९ रुपये आहे. यात १४९ रुपये डिस्काऊंट मिळेल. तुम्हाला बूट ८५० रुपयात पडेल. अॉफर आकर्षक होती. मला वाटले लगेच किंमत चुकवावी. पण मी थांबलो. म्हणालो, तुम्ही ८५० रुपये किंमत होलसेलर म्हणून घेता आहेत की रिटेलर म्हणून ? तर त्याचे उत्तर होते, मला ज्या किंमतीत आले त्यावर ५० रुपये घेऊन मी विकतो आहे. म्हणजे त्या ९९९ रुपयांच्या बुटाची मूळ किंमत होती ८०० रुपये. उत्पादकापासून तर रिटेलरपर्यंत बूट गेल्यानंतर ग्राहक चुकवत होता, जादा १५० रुपये. हे १५० रुपये बाजारपेठेत नफा किंवा कमिशन स्वरुपात आहेत. मी शॉपमधून बूट घेतला नाही. त्याच बुटाचा शोध ॲमेझॉन अॉनलाईन शॉपवर सुरु केला. तेथून मी बूट खरेदी केला. तेथे १० दिवसात बूट परतीची हमी मला मिळाली. माझ्या घरी बूट द्यायला येणारा डिलीव्हरी बॉय परत घेऊन जाईल अशी ती हमी आहे.
शॉपमध्ये पाहिलेला स्पार्क कंपनीचा तो बूट मी ॲमेझॉनवर शोधला. एमआरपी ९९९ रुपये खोडून किंमत होती ७४९ रुपये. म्हणजेच जळगावमध्ये होलसेलर देत असलेल्या ८५० रुपयांपेक्षा १०० रुपये किंमत कमी होती. आला का लक्षात एमआरपीचा घोळ आणि झोल ? ॲमेझॉनवर १०० रुपये कमी किंमत पाहून मी अजून मोहात पडलो. अॉर्डर नोंदवली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी ॲमेझॉनवर चेक केले. तेव्हा किंमत होती ८४० रुपये. १०० रुपये वाढ असली तरी जळगावच्या होलसेलरपेक्षा १० रुपये कमीच होते. मी थोडा नाराज झालो. पण अॉर्डर नोंदवली नाही. यानंतर २ दिवसांनी पुन्हा ॲमेझॉन पाहिले. त्याच बुटाची किंमत होती ७४९ रुपये. यावेळी मी अॉर्डर नोंदवली.
![]() |
ॲमेझॉनवर दोन दिवसात बदलणारी विक्री किंमत |
टीप - ही पोस्ट तयार करताना ॲमेझॉनवर बुटाची किंमत पाहिली तर ती होती ८९० रुपये !!
वैधानिक सूचना - पोस्ट वाचल्यानंतर ॲमेझॉन अमेरिकन कंपनी आहे. तिच्या माध्यमातून खरेदी करताना भारतीय पैसा देशाबाहेर जातो, ॲमेझॉनमुळे दुकाने बंद होऊन रोजगार जातो अशी विषयांतर करणारी प्रतिक्रिया कृपया टाकू नये. हा विषय मार्केटींगचा आहे. येथे केवळ ग्राहक लाभ याच विषयावर फोकस आहे.
आदरणीय सर, MRP चे अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण केले आहे. 'जागो ग्राहक जागो'
ReplyDeleteधन्यवाद
Delete