Sunday 1 September 2019

अश्वत्थामा नाथाभाऊ, आपण जिंकणार !

संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेच्या मुल्यांकनात इतरांपेक्षा कितीतरी पुढे असलेले नेते एकनाथराव खडसे तथा नाथाभाऊ यांचा आज वाढदिवस. नाथाभाऊंना दीर्घायुष्यासह मनोवांच्छित यश प्राप्त व्हावे ही मनःपूर्वक शुभेच्छा.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकार कार्यरत असताना नाथाभाऊ त्यात मंत्रीपदी नाहीत. निवडणुका जिंकण्याचे कौशल्य आणि सामर्थ्य अंगी असताना सत्तेत सहभागाचा नाथाभाऊंचा हक्क हिरावला गेला आहे. कथित आरोपांचे दोष लावून नाथाभाऊंचे प्रभावलय नष्ट करण्याचा प्रयत्न स्वकियांनी केला आहे. हेच शल्य मनांत बाळगून गेली साडेतीन वर्षे नाथाभाऊ आपली दिनचर्या पुढे रेटत आहेत.

नाथाभाऊंच्या आजच्या व्यक्तिमत्त्वात महाभारतातील धनुर्विद्येचे सर्वोत्तम गुरु द्रोणाचार्य यांचे पुत्र अश्वत्थामा याचे रुप असल्यासारखे जाणवते. त्याने पित्याकडून धनुर्विद्या आत्मसात केली. गुरु पित्याने अश्वत्थामाला धनुर्विद्येची सर्व रहस्ये सांगितली. दिव्य अस्त्र, अग्नी अस्त्र, वरूण अस्त्र, पर्जन्यास्त्र, वायव्यास्त्र, ब्रम्हास्त्र, नारायणास्त्र, ब्रह्मास्त्र आदी अस्त्रे अश्वत्थामाने सिद्ध केली होती. अश्वत्थामा देखील द्रोणाचार्य, भीष्म, परशुराम यांच्या तोडीचा धनुर्धर होता. कृप, अर्जुन आणि कर्ण हे त्याच्याहून श्रेष्ठ नव्हते. अश्वत्थामाच्या ठायी असलेल्या ब्रह्मतेज, वीरता, धैर्य, तितिक्षा, शस्त्रज्ञान, नीतिज्ञान, बुद्धिमत्ता यांच्याबद्दल कोणाचेही दुमत नव्हते. दोन्ही पक्षातील महारथी त्याच्या शक्ती ओळखून होते.

नाथाभाऊंचे व्यक्तिमत्वही असेच आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपिनाथराव मुंडे हे नाथाभाऊंचे राजकारणातील सहपाठी होते. बहुधा हे दोघेही भाऊंच्या गुरुबंधु स्थानी होते. स्व. महाजन, स्व. मुंडे व नाथाभाऊ यांनी पक्षाचा विस्तार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केला. राजकीय लढवय्याला लागणारी सारी क्षात्र कौशल्ये नाथाभाऊंच्या ठायी होती आणि आहेत. जर-तर च्या भाषेत लिहिता येईल की, स्व. महाजन व स्व. मुंडे हे जर हयात असते तर नाथाभाऊ आज खान्देश शिरोमणी म्हणून राज्य शासनाचे नेतृत्व करीत असते. नाथाभाऊंच्या या नेतृत्व कौशल्याची स्तुती स्वकीय करतातच पण विरोधकही तारीफ करतात.

अश्वत्थामा व नाथाभाऊ या दोघांच्या कपाळी भळभळणारी जखम आहे. अश्वत्थामाच्या कपाळावरचा श्रीमणी कृष्णाने हिरावला होता. कौरवांकडून लढणारे गुरु द्रोणाचार्य यांनी शस्त्रे खाली ठेवावित म्हणून कृष्ण, धर्मराज यांनी दिशाभूल करणारी अफवा पसरवली. ती अफवा होती 'अश्वत्थामा मेला'. अश्वत्थामा मेल्याचे वृत्त धर्मराजाच्या तोंडून ऐकल्यानंतर द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवल्यानंतर धृष्टद्युम्नने त्यांचा वध केला. परंतु अश्वत्थामा हत्ती मेला की गुरु पुत्र मेला हे धर्मराजाने चलाखीने सांगितले नाही. असेच काहीसे नाथाभाऊ बाबत घडले. भाऊंच्या कार्यपध्दती विषयी लागोपाठ अनेक आक्षेपांची मालिका सुरु झाली. पक्षातील बरेच व बाहेरचे काही अशा कृष्ण, धर्मराज सारख्या राजकीय मंडळींचा त्यात सहभाग होता. धृष्टद्युम्नसारखा प्यादा वापरून नाथाभाऊंच्या विषयी संशय बळावणारी स्थिती निर्माण झाली. परंतु आरोप खरे की खोटे याचा उलगडा चलाखीने टाळला गेला. वडीलांच्या हत्येचे षडयंत्र कळल्यानंतर अश्वत्थामा बेभान झाला. त्याने पांडवांवर ब्रह्मास्र सोडले. या ब्रह्मास्त्राचा वापर केला म्हणून अश्वत्थामाचा श्रीमणी कृष्णाने काढून घेतला. तेव्हा अश्वत्थामा द्रोणाचार्यांच्या मृत्यूचा व अफवेचा जाब विचारु शकला नाही. विचारला असता तरी तेव्हा कृष्णाने स्वतःला धर्म व न्यायाच्या बाजूने असल्याचे म्हटले असते.

अफवा वा कथित प्रकरणांचे धूके निर्माण करुन नाथाभाऊंचे सत्तेतील स्थान हिरावून घेतले गेले. कथित प्रकरणे निर्माण करणाऱ्यांनी साडे तीन वर्षांत एकही आरोप वा आक्षेप सिद्ध केला नाही. पण नाथाभाऊंचे सत्तापद काही परत दिले गेले नाही. कथित विषयांवरुन बदनामीची भळभळणारी जखम घेऊन आजही नाथाभाऊ आपल्या समर्थक, हितचिंतक, कार्यकर्ते यांना प्रश्न विचारतात, 'माझा दोष काय ?'. अर्थात, त्याचे उत्तर भारतीय जनता पक्षातील दुढ्ढाचार्य (ज्यांचे लोकांनी ऐकावे असे महनिय) यांच्याकडे नाही.

अस्वस्थ असलेला अश्वत्थामा आजही जंगल, डोंगर, दऱ्यांत दिसतो असे आदिम संस्कृतीचे लोक म्हणतात. वैफल्यग्रस्थ अश्वत्थामाने नंतर काही चुका केल्या. मात्र, नाथाभाऊंनी अनुभव, संयम आणि बहुतेक वेळा मौन बाळगून राजकीय चुका टाळल्या आहेत. काही वेळा पक्षातील कारभारींना शाब्दीक चिमटे, बोचकारे घेतले आहेत. नाथाभाऊंचे वेगळेपण यात आहे. आगामी काळात नाथाभाऊ भारतीय जनता पक्षाच्या सैन्यदलात सेनापतीच्या जागी निश्चितपणे असतील हा विश्वास आहे. हरहमेशा जिंकण्याची शक्ती परमेश्वर नाथाभाऊंना देईल अशीच आज प्रार्थना करु या !

2 comments: