Thursday 29 August 2019

मराठा मंडळ* आणि राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे भारतीय जनता पक्षावर आणि विरोधकांवर टीका करताना इतिहासातील मोजक्या संदर्भांचा खोचकपणे उल्लेख करतात. उदाहरण द्यायचे तर मनोहर जोशी हे पहिले ब्राह्मण मुख्यमंत्रीपदी असताना त्यांचा उल्लेख पवार यांनी श्रीमंत मनोहरपंत असा केला होता. जोशींना श्रीमंत पंत म्हणताना पवार यांना पेशव्यांना संबोधून होणारे श्रीमंत व छत्रपतींचे कारभारी पंत प्रतिनिधी या पदाची आठवण करुन द्यायची होती. जोशी हे शिवसेना प्रमुख यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले होते. एक प्रकारे ते बाळासाहेबांचे प्रतिनिधी होते. शिवाय, ब्राह्मण असल्याने त्यांच्या रुपात श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांची पेशवाई अवतरली असे दर्शवायचा पवार यांचा हेतू होता.

यानंतर देवेंद्र फडणवीस हे दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे भाजप केंद्रीय नेत्यांनी छत्रपतींचे वारस संभाजीराव यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली. वास्तविक पवार यांनी पक्षिय राजकारणात पूर्वी अभयसिंह राजे भोसले यांचा आणि अलिकडे उदयन राजे भोसले यांचा वापर खुबीने केला आहेच. तेव्हा मराठा मंडळात छत्रपती असे कोणीही म्हणाले नव्हते. मात्र भाजपने छत्रपतींच्या वारसांना सोबत घेताच पवार यांनी खोचक शैलीत उल्लेख केलाच. पवार म्हणाले, पूर्वी छत्रपती पेशवे नेमत आणि पेशवे फडणवीस नेमत. आता फडणवीस छत्रपतींना नेमत आहेत. हा उल्लेख करीत पवार पुन्हा पेशवाईकडे गेले. पवारांनी मध्यंतरी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेतली. तीत छगन भुजबळांच्या शिरावर घातलेली पुणेरी पगडी हटवून फुलेंचे पागोटे घातले. असे करताना पवार यांना जाणून बुजून पेशवाईची पगडी हटवली हाच संदेश द्यायाचा होता.

वरील तीनही उदाहरणे ही पवार यांना बामणी मुख्यमंत्र्यांचा काळ हा पेशवाई म्हणून बिंबवायचा असतो हेच ठळकपणे दर्शवून देतात. महाराष्ट्रावर छत्रपतींच्या सातार व कोल्हापूर या दोन घराण्यांचे वर्चस्व (वारणा तहानंतला) असतानाही पेशवाई का अवतरली ? याचा अभ्यास बारामती पुरस्कृत संशोधक कधीही करीत नाहीत. कारण छत्रपती घरण्यातील वारस शाहू महाराज यांच्या कार्यकाळापासून मराठा व मराठी सत्तेत अनेक आडवळणे आहेत. त्याची चर्चा कधीही कोणत्याही व्यासपीठावर होत नाही. जुना अभ्यास वाचला तर पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था छत्रपती शाहू, महाराणी ताराबाई आणि छत्रपती राजाराम यांच्या काळातील मराठा मंडळ* गत असल्याचे भासते.

गंमत बघा छत्रपती शाहू हे मराठा राज्याचे वारस म्हणून महाराणी ताराबाई व नातू राजाराम यांच्याशी भांडत होते. अर्थात, मुद्दा होता छत्रपतींच्या खऱ्या वारसाचा. पवार यांना काँग्रेसमध्ये युवराज राहुल यांच्या माता सोनिया गांधी यांच्याशी भांडावे लागले. अर्थात, मुद्दा होता, सोनियांचे विदेशीपणाचा. छत्रपती शाहू व महाराणी ताराबाई यांच्या भांडणात मराठा राज्य खिळखीळे झाले. इसवी सन १७१३ च्या काळात वतनदारी वाढीस लागली होती. वतनदार आपल्या वतनात मनमानी करत व वेळ प्रसंगी स्वराज्याची साथ सोडत. या सर्वांना एकत्र आणून अंमल कसा करायचा व झालेच तर राज्य कसे वाढवायचे, सुरक्षित करायचे हे आव्हान छत्रपती शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ या दोघांसमोर होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या अष्टप्रधान व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. प्रतिनिधी, पेशवा एका पक्षात तर सरसेनापती, न्यायाधिश दुसऱ्या पक्षात होते. इसवी सन १९९९मध्ये पवार, पी. ए. संगमा व तारिक अन्वर (तेव्हा माध्यमात उल्लेख होता, अमर, अकबर व ॲन्थनी) यांनी सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा उचलला. त्यानंतर या तिघांचे काँग्रेसमधून निष्कासन झाले. तिघांनी मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापला. अशावेळी कोणते सरदार, वतनदार व जहागिरदार कोणाच्या गळाला लागतील ? याची अनिश्चितता होती. सोलापूरचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपली सुभेदारी निश्चित करताना भरपूर वेळ घेतला होता.

छत्रपती शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी अष्टप्रधान व्यवस्था आणायचा प्रयत्न केला. पण ती घडी पुन्हा नीट बसविता आली नाही. जुने सुभेदार, सरदार व वतनदार पेशवे बाळाजीला जुमानत नव्हते. अशा स्थितीत मराठा राज्याचा खजिना रिकामा होऊन संस्थानिक झालेले सुभेदार व इतर धन संपन्न होत होते. संस्थान वाढवायला आपापसात लढत होते. अशावेळी मराठा राज्य एकसंध राहावे म्हणून  छत्रपती व पेशवे यांनी अष्टप्रधानातील लोकांना सुभे वाटून दिले. नवी वतनदारी पद्धत अमलात आणली. या पध्दतीत छत्रपती शाहूंना राजा मानून वार्षिक महसूल द्यायाचा होता. बाकी वतनदार त्यांचा कारभार मनमानी करु शकत होते. म्हणजेच मी व माझे वतन सांभाळत केवळ छत्रपतींचे वर्चस्व मान्य करायचे होते. वतन सांभाळणारा दुबळा ठरला व दुसरा कोणी प्रबळ झाला तर तो नवा वतनदार होत असे. याच कारभाराला 'मराठा मंडळ'* असे म्हटले गेले होते.

आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार यांच्या नेतृत्वात आलेले सर्व प्रमुख नेते बघा. ती मंडळी तेव्हा आपापल्या भागाचे वतनदार होते. सत्ता आणि मत्ता यात भागिदार होऊन वतनातील त्यांची मनमानी कायम राहणार होती. ही मनमानी तेथील साखर कारखाने, जिल्हा बँका, दूध संघ, सुतगितणी अशा सहकार क्षेत्रात होतीच. शिवाय, मंत्रीपद मिळाले तर काँग्रेसवर कुरघोडीची संधी होती. पवार यांच्या सोबत ज्या वतनदारांनी तेव्हा मनमानी केली तेच वतनदार आज चौकशांच्या फेऱ्यात आहेत. अशा चौकशीतून जो काका वाचवू शकेल त्याच्याकडे पुतणे धावत आहेत. पेशव्यांच्या घरातही काका रघुनाथरावने पेशवा नारायणरावचे काय केले होते ? हे फक्त येथे आठवावे.

मराठा मंडळ व्यवस्था निर्माण करुन छत्रपती व पेशव्यांनी संधी साधू वतनदारांना अभय व अमिष असे दोन्ही दिले. काही इतिहासकारांचा मते ही सर्वांत मोठी चूक होती. कारण त्यामुळे सर्व सरदार आपआपल्या सुभ्यात वाट्टेल ते करायचे व नंतर पुढे इतर सुभेदारांच्या प्रांताता घुसखोरी करायचे. आता इसवी सन १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुभेदारांच्या कामकाजाचा आढावा घ्या. हे सरदारही आपापसात भांडतच होते. कुरघोडी करीत होते. पवार हे श्रध्दास्थान असले तरी सुभेदारीत रस्सीखेच होतीच. छत्रपतींविषयी निष्ठा असली तरी भोसले, शिंदे, भट, दाभाडे, मोहिते हे एकमेकांवर कुरघोडी करीत असत. जेव्हा अखेरीस या राजकारणाचा छत्रपती शाहुंवर ताण निर्माण झाला तेव्हा त्यांनी सांगोला करार (दोन याद्या) करुन पेशव्यांना दौलतीचे प्रमुख केले. कालांतराने महाराणी ताराबाई यांनीही असाच करार करुन दिला. पर्यायाने पेशवे राज्याचे कारभारी होऊन वतनदार इकडे तिकडे पळत राहिले.

*मराठा मंडळ हा शब्द जात वा समाज वाचक नाही. छत्रपती शाहू यांच्या काळात राज्य व्यवस्थापनासाठी निर्माण केलेली ती व्यवस्था होती.

संदर्भ -

1) http://peshwekalinitihas.blogspot.com/2013/03/?m=1

2) https://www.maayboli.com/node/2310

No comments:

Post a Comment