Thursday 22 August 2019

'तुला काय व्हायचे, हे पाल्यास विचारा'

अनीश सहस्त्रबुध्दे यांचा पालकांना सल्ला

 'गप्पा इंडियाशी' या अभिनव उपक्रमात अनीश सहस्त्रबुध्दे (सोलापूर) यांना ऐकण्याची संधी मिळाली. आशा फौंडेशन आणि रोटरी क्लब वेस्ट यांनी संयुक्तपणे 'गप्पा इंडियाशी' हा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे निवेदन आणि गप्पा असा उपक्रम सुरु केला आहे. यात दरमहा एका मान्यवराला आमंत्रित केले जात आहे. नेहमीच्या कार्यक्रमांच्या चौकटीतून बाहेर पडून आशा फौंडेशन सोबत 'गप्पा इंडियाशी' या उपक्रमाला प्रायोजित केल्याबद्दल रोटरी क्लब वेस्टच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. रोटरीने अजूनही काही पारंपरिक चौकटी मोडायला हव्यात. कारण चौकटी त्याच पण चेहरे केवळ बदलले याचा चौकटबद्ध प्रवास रोटरी भवनच्या भिंतीवरच लावला आहे.


अनीश सहस्त्रबुद्धे कोण आहेत ? हे अगोदर पाहू. वयाची अवघी ३० शी पार करणारा हा युवक हॉटेल मैनेजमेंटचा अभ्यासक्रम शिकलेला उत्तम शेफ आणि रेस्टॉरंट चेनचा ओनर आहे. गैलरी व गल्ली क्रिकेट खेळत पंचगिरीची परीक्षा देऊन क्रिकेटचा पंच झालेला युवक आहे. इतरांना मार्ग दाखवणारा समुपदेशक आहे. कार्यक्रमांचे आयोजन, संयोजन व सूत्रसंचालन करणारा इव्हेंट मैनेजर आहे. व्यावसायिकांचा सल्लागार, तरुणांचा प्रशिक्षक आहे. अशा या अष्टावधानी पंचासोबत 'करियर इन क्रिकेट' या विषयावर गप्पा करीत असताना आयुष्यातील अनेक गोष्टींच्या लहान सहान टीप्स अनीश यांनी दिल्या. मोजून २१ मिनिटे अनीश यांनी प्रारंभीचे निवेदन केले.

कागदाचा चेंडू आणि लेखन पैडची बैट घेऊन मी गैलरीत ४ तास क्रिकेट खेळत होतो. मी अभ्यासात फारसा हुशार नव्हतो. गुणवत्ता वगैरे असलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत कधीच नव्हतो, हे आवर्जून सांगत असताना अनीश यांनी पाल्यांना खेळू द्या आणि केवळ अभ्यासातील गुणवत्ता हिच हुशारी व कौशल्ये मोजण्याची पट्टी समजू नका हे ठळकपणे सांगितले.

हॉटेल मैनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना कधीतरी पंचगिरीची परीक्षा जाहिर झाली. मी आईकडे परीक्षा शुल्क १५० रुपये मागितले. तिने प्रश्नांची सरबत्ती न करता मला दिले. आईला वाटले होते, ते अक्कल खाती खर्च आहेत. पण मी या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. हा तपशील स्पष्ट करताना अनीश यांनी लक्षात आणून दिले की, करियरचे पुस्तकी शिक्षण घेताना आवडीच्या व छंदाच्या क्षेत्रातील परीक्षांना सामोरे जा. पाल्य जर स्वतः ठरवून काही करीत असेल तर पालकांनी त्याला सपोर्ट करा. प्रश्नांची सरबत्ती करीत नाउमेद करु नका. पालकाला वाटत असेल पैसा वाया जाणार तरी तसे बोलून पाल्यास दुखाऊ नका. पाल्याने सुध्दा आपल्या आवडीच्या क्षेत्रात नेहमी सर्वोत्तम स्थान मिळवायचा प्रयत्न करा.

पंचगिरीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पंच म्हणून काम करण्याची संधी महिलांच्या क्रिकेट सामन्यात मिळाली. तो सामना बरेच शिकवून गेला. या सामन्यातील महिला खेळाडूंचे तपशिल अनीश यांनी सांगितले. पण त्यांनी एक मुद्दा आवर्जून स्पष्ट केला. तो म्हणजे, मी आज प्रोफेश्नल पंच आहे. त्या प्रोफेशनची काही नैतिक बंधने माझ्यावर आहे. मी आवांतर तपशील सांगू शकतो पण त्यातील व्यक्तिंची नावे सांगणार नाही. ती कोणीही सांगू नये. व्यावसायिकता, व्यापार, नोकरी वा सेवा क्षेत्र यात काम करणाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण व अनुकरणीय सल्ला आहे. अघळपघळ संवादात किंवा अती विश्वासात घेण्याच्या नादात आपण दिवसभरात अनेकांची नावे घेऊन वेगवेगळ्या चर्चा करीत असतो. तेव्हा व्यावसायिक नैतिकतेला आपण विसरतो, हा मुद्दा अनीश यांनी सोप्या भाषेतj स्पष्ट केला. अनीश पुढे म्हणाले, मी या पहिल्या सामन्यात पंचगिरी करताना मला केवळ २५ रुपये मानधन मिळाले. पण मला क्रिकेटचा पंच झाल्याचा आनंद किती तरी मोठा होता. सुख हे कधी कधी पैशांत नव्हे तर आत्मिक समाधान व आनंदात मोजायला हवे, हेच अनीश यांनी सूचविले.

पंचगिरी सुरु होऊन जवळपास १५ वर्षांनी मला बीसीसीआयच्या सामन्यात संधी मिळाली. मैदानावर गेल्यानंतर माझ्यासमोर भारतीय क्रिकेटमधील मान्यवर खेळाडू आले. अर्थातच त्यांच्या मोठेपणाचा प्रभाव माझ्यावर होता. प्रत्यक्ष सामन्यात अपील करताना मान्यवर खेळाडू माझ्यासमोर येऊन ओरडून दबाव आणायचे. मी तेव्हा लटपटत होतो. पण माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्याने सांगितले की, खेळाडूंचे कपडे व नंबर पाहा. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू नको. तरच तू पंचाच्या कोट व अधिकाराचा तटस्थपणे निर्णय देऊ शकशील. अनीश यांनी सांगितलेला हा अनुभव सर्वच क्षेत्रांसाठी लागू आहे. प्रत्येक क्षेत्रात अनुभवी, बुजूर्ग व मोठ्या व्यक्तिमत्वाची माणसे असतात. त्यांच्या समोर टिकून राहताना धाडस हवेच. आपला निर्णय आपणच घेण्याचा खंबीरपणा हवाच. तटस्थ न्याय द्यायचा तर समोरच्याची ओळख विसरायला हवी. अनीश यांनी हे सोप्या भाषेत सांगितले.

क्रिकेटच्या खेळात गर्दीने भरलेले स्टेडीयम, तेथील गोंगाट, तेथील जयजयकारच्या घोषणा याकडे खेळाडूने पाहायचे नसते. त्याला सर्व लक्ष धावपट्टी, चेंडू, बैट, स्टंप व बाऊंडरी यावरच ठेवावे लागते. जो या गर्दीच्या प्रेमात पडतो, तो खेळातून बाहेर पडतो, असा इशारा देत अनीश यांनी प्रत्येक क्षेत्रातील जुजबी लोकप्रियता वा अल्पकालीन स्तुती प्रियतेच्या मोहात न अडकण्याचा सल्ला दिला. अशी माणसे स्वमग्न लवकर होतात आणि करियर स्वतःच संपवतात हे अनीश सहज बोलून गैले.

क्रिकेटचे सामने पुण्यात असले की मला सोलापूर ते पुणे जाणे-येणे करावे लागायचे. सोलापुरातील हॉटेल व्यवसाय सांभाळून मी रात्री प्रवास करुन पुण्यात पोहचायचो. वेळप्रसंगी ग्राऊंडमन्सच्या खोलीत थांबायचो. तेथे फ्रेश व्हायचो. सकाळी लवकर तयार होऊन खेळपट्टी तयार करणे शिकायचो. दिवसभर पंचगिरी करुन पुन्हा रात्री सोलापुरात परत यायचो. असा सर्व खर्च १६०० ते १७०० व्हायचा. मला पंच म्हणून मानधन मिळायचे ५०० रुपये. पण मी त्या ५०० रुपयात आवडणारे काम करायला मिळते आहे याचा आनंद शोधायचो आणि नवे शिकायचो, असे अनीश म्हणाले. नवे काहीही शिकताना व नवे करियर घडवताना कठोर परिश्रम हवेत. सतत धावायची तयारी हवी. आहे त्या परिस्थितीला स्वीकारायला हवे. प्रत्येक क्षणाला तत्परता हवी. नवे शिकायचे असेल तर अनुभवी माणसे जोडायला हवी. असे शिक्षण घेताना पैशांत मिळणारा कमी अधिक मोबदला यापेक्षा समाधान व आनंद महत्त्वाचा असतो असे न कळत अनीश सांगून गेले.

घरातून मिळालेल्या संस्कारांचा उल्लेख आवर्जून करीत अनीश म्हणाले, माझी गणपती व संत गजानन महाराज यांच्यावर नितांत श्रध्दा आहे. भारताने क्रिकेट मैच जिंकावी म्हणून मी टीव्ही समोर गणपती असा ठेवायचो की स्क्रिनला त्याची सोंड चिकटलेली असे. अर्थात, हे सांगताना अनीश यांनी इतरांप्रती असलेली श्रध्दा व आदर हाच विषय अधोरेखीत केला. ते पुढे असेही म्हणाले की, मी संस्कार, मूल्ये आणि माझे निर्धारित लक्ष्य यापासून कधीही दूर गेलो नाही.

अनीश यांच्या निवेदनातून मार्मिक सल्ला पालकांसाठी दिला गेला. ते म्हणाले, आपल्या पाल्याने काय करावे ? असा सल्ला आपण कौन्सिलर किंवा मित्रांना विचारतो. आपण पाल्यास विश्वासात घेऊन त्यालाच थेट विचारत नाही, तुला काय व्हायचे ? ज्या दिवशी पालक आपल्या पाल्यांना विचारतील, तुला काय व्हायचे तेव्हा पासून गल्लीबोळात उत्तम खेळाडू, व्यावसायिक, उद्योजक तयार होतील. पालकाची मानसिकता बदलली की, सारे काही बदलेल. अनीश यांनी मांडलेला हा मुद्दा स्पष्ट करण्याची गरज नाही. पाल्याचे करियर घडवण्याचा जास्त ताण पालक घेतात हा सर्वानुभव आहे. यात बदलाची भरपूर संधी असल्याचे अनीश सहस्त्रबुद्धे यांनी सहजपणे लक्षात आणले.

अनीश सहस्त्रबुद्धे यांनी नंतर क्रिकेटमधील करियर संबंधी गप्पा केल्या. त्यात जळगावची युवा पीढी उत्स्फूर्तपणे सहभागी झाली. हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगला.

धन्यवाद, आशा फौंडेशन व रोटरी क्लब वेस्ट !!

3 comments:

  1. लेक मस्त आहे सर

    ReplyDelete
  2. पालकांना योग्य मार्गदर्शन

    ReplyDelete
  3. it's nice to be in touch with anis sir....

    ReplyDelete