Sunday 11 August 2019

गिरीशभाऊ तुम्हारा चुक्याच !

कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदत कार्यात स्वतः सहभागी होऊनही मोबाईल सेल्फी आणि व्हीडीओमुळे ना. गिरीशभाऊ महाजन भयंकर टीकेचे धनी ठरले आहेत. ना. भाऊंचे योग्य की अयोग्य अशा द्विधा मनःस्थितीत मी स्वतः होतो. मंत्र्याने पूरस्थितीची पाहाणी करायला हवी, आपदग्रस्तांना भेटायला हवे, मदत कार्यात लक्ष घालायला हवे, या गोष्टी योग्य वाटत होत्या. पण हे करीत असताना सेल्फी व व्हीडीओचा घोळ टाळता आला असता.

गिरीशभाऊ उत्साही आणि धडाडीने काम करणारे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. विरोधी पक्षातून फूटून निघणाऱ्यांचे आधारस्तंभ आहेत. उद्भवलेल्या संकटाचे मोचक आहेत. गुजर पाटील या बहुजन समाजाचे नेते आहेत. अशा व्यक्तिमत्वाचा सेल्फी आणि व्हीडीओ उथळपणे सोशल मीडियात प्रसारित होणे हे कडवट प्रतिक्रियांचे कारण नक्कीच आहे. 

गिरीशभाऊ, तुम्ही जामनेरमध्ये बुलेट पळवता, त्याचे आम्हाला कौतुक आहे. तुम्ही टपरीवर उभे राहून पान खाता, ते आम्ही डोळे भरुन पाहतो. रथाच्या किंवा इतर मिरवणुकीत तुम्ही लेझीम खेळतात तेव्हा आमच ऊर भरुन येतो. तुम्ही पक्षाचा विजय झाला की ढोल ताशांवर नाचतात तेव्हा आम्हाला तुमच्या स्वच्छंदीपणाचा हेवा वाटतो. लहान मुलांच्या शाळेत तुम्ही कमरेला पिस्तूल लावून भाषण देता तेव्हा आम्ही डोळे भरुन पिस्तुल पाहतो. तुम्ही हायवेवर बंद पडलेला ट्रक ड्राव्हर म्हणून बाजुला करता तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो. हायवेवर अपघात झालेला पाहून तुम्ही जखमींना उचलून रुग्णवाहिकेत टाकतात तेव्हा आम्हीही संवेदनशिल होतो. तुम्ही हातात पिस्तुल घेऊन बिबट्याला शोधतात तेव्हा आम्ही जाम खूश होतो. आरक्षण, मोर्चे, उपोषण अशा असंतोषाला तुम्ही सामोरे जाता तेव्हा आम्हाला तुम्ही खूप भारी वाटतात. वारीत सहभागी झाल्यानंतर तुमच्या कपाळी अबीर बुक्का शोभतो. महाआरोग्य अभियानात काही गैरसोयी असतानाही शेकडो रुग्णांना दवापाणी करतात तेव्हा आम्हाला समाधान मिळते. हे सारे कर्म पाहाता पुढाकार घेऊन झटपट काम करणे वा उरकणे हा तुमचा स्वभाव गुण आहे.

कोल्हापूर व सांगली परिसरात आलेला महापूर ही आकस्मिक उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती आहे. चार दिवस पुराचे पाणी गल्लीबोळात थैमान घालते आहे आणि वरून मुसळधार सुरुच आहे, असा अनुभव यापूर्वी फारसा कुठेही नव्हता. महापूराचे पाणी वाढत असताना जवळपास सर्वच राजकीय पक्ष आपापल्या निवडणूकपूर्व यांत्रांमध्ये व्यस्त होते. प्रशासनही बेसावध होते. नंतर मात्र सर्वच मंडळी महापूराकडे धावली. अशा आपत्तीत बचाव कार्य प्रारंभ होण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो दिला गेला. या वेळेत विरोधकांना त्यांच्या काळातील आपत्ती आणि मदत कार्याचे साक्षात्कार होऊ लागले. मुख्यमंत्र्याची जात, पालकमंत्रीची बेफिकरी आणि तुमचा प्रसिध्दी स्टंटपणा असे विषय उफाळून आले. त्यात सेल्फी व व्हीडीओचा नादानपणे केलेला प्रसार हा व्यक्तिशः तुमच्या अंगलगट आला.

तुम्ही स्वतः लाईफ जैकेट घालून व पुराच्या पाण्यात उतरुन बचाव कार्यात सहभागी होणे आवश्यक नव्हते. तरी तुम्ही तसे केले. कधीकधी लोकप्रतिनिधी इतरांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी थेट कृतीत सहभागी होतात. कारगिल, सियाचीन भागात सिमेवरील सैनिकांना पंतप्रधान वा संरक्षणमंत्र्यांनी भेटायला जाणे हा तसाच नियमित सरावाचा भाग आहे. सन १९९२ मध्ये नौदलाच्या प्रात्यक्षिकवेळी तत्कालिन संरक्षणमंत्री शरद पवार यांनीही दोन जहाजातील क्रेनसारख्या ट्रॉलीचा वापर करुन समुद्री साहस पूर्ण केले होते. तेव्हा पवार यांचे माध्यमांनी प्रचंड कौतुक केले होते. राष्ट्रपती पदाचा काळ संपत असताना प्रतिभाताईंनी सुखोई या लढाऊ विमानातून प्रवास केला होता. वाढत्या वयाचा विचार करता, ताईंचे ते धाडसी होते. तरीही या दोन्ही उदाहरणांची तुलना तुमच्या पुरातील उडीशी करता येणार नाही.

पुरातील बचाव कार्याचा सेल्फी काढणे आणि व्हीडीओ प्रसारित करणे हा तुमच्या पंटरांचा उतावळेपणा आणि उथळपणा आहेच. माझे व्यक्तिगत मत आहे की, गिरीशभाऊ तुम्हारा चुक्याच ! पण हे सांगत असताना मला याचेही भान आहे की, तुम्ही राजीनामा वगैरे द्यावा असे मी म्हणणार नाही. कारण, मी जामनेर मतदार संघातील मतदार नाही आणि मी तुम्हाला मत दिलेले नाही. तुम्हाला पायउतार करायचेच असेल तर ते मुख्यमंत्री करतील वा जामनेरचे मतदार करतील. माझ्या टीकेच्या पुंगीला विचारतो कोण ? काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा माहौल असताना एकाही बुजूर्ग पुढारी वा लेखणी बहाद्दरांना भाजपच्या स्वबळावरील बहुमताचा छाती ठोक अंदाज आला नव्हता, हे शाश्वत सत्य आहे. आपणच निर्माण केलेला प्रपोगंडा सत्य मानून व तेच जनतेचे मत समजून वृत्तांकने करणाऱ्यांना मतदारांनी सणसणीत चपराक दिली आहे. अशा मानसिक पराभवाला इव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणे हा अंधश्रध्देगत उतारा आहे.

अशाही स्थितीत, गिरीशभाऊ तुम्हारा चुक्याच ! हे व्यक्तिशः आणि थेट सांगण्याचे धाडस माझ्यात आहे. बाकी सोशल मीडियात ट्रोल करणारे पंटर किंवा कंपू याचा विचार मी करीत नाही आणि अशांना भीकही घालत नाही ! यापुढे जाऊन गिरीशभाऊ तुम्ही चंद्रावरुन उडी मारा, पण त्याचा सेल्फी वा व्हीडीओ काढून सोशल मीडियात प्रसारित करताना पंटरगिरी होणार नाही याची काळजी घ्याच !... तुम्हारा चुक्याच असे पुन्हा म्हणायला वेळ हाती नाही !!!

No comments:

Post a Comment