Monday 29 July 2019

सोशल मीडियातील रुग्णांचे प्रकार

सोशल मीडियाचे पर्याय असलेल्या फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स ॲप गृपमध्ये शेअरिंग करणाऱ्या काही मोजक्या सदस्यांना ४ वेगवेगळे आजार बळावल्याचे अनुभवाला येते. हे आजार शाब्दीक स्वरुपातील पोटशूळ, पोटदूखी, अजीर्ण आणि उलट्या या प्रकारातील आहेत. या आजारांची लक्षणे फारच साधी असतात. फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स ॲप गृपमध्ये एखाद्या विषयी चांगल्या लेखनाची पोस्ट शेअर केली, की वरील चारही आजारातील रुग्ण सदस्यांची बोटे विरोधासाठी भराभरा किपैडवर चालू पडतात. अमूक व्यक्ती विषयी चांगले लिहिलेच कसे ? या प्रश्नाची अस्वस्थता घेऊन मग पक्ष, समाज, जात आणि नंतर व्यक्तिगत घसरणाऱ्या प्रतिक्रिया सुरु होतात. नुसत्या एक मेसेजने नाही भागले की, मेसेजची मालिका सुरु होते. भाषा हळूहळू अगदीच कुजकट पातळीवर जाते. मग संबंध नसलेल्या घटनांचा, व्यक्तिंचा उल्लेख सुरु होतो. काही उत्साही रुग्ण आपणच लिहिलेल्या पोस्टवर स्वतःच हास्याचे इमोजी टाकतात. असे करणे म्हणजे आजार बोटापासून मेंदूपर्यंत भयंकर बळावल्याचे लक्षण मानावे. अशा लक्षणांचे ४ आजार पुढील प्रमाणे आहेत.

पोटशूळ (सिलिक) - पोटात शूळ म्हणजे दुखणे हे लक्षण त्याच्या नावावरून उघडच आहे खरे, परंतु वैद्यशास्त्रात हे फक्त काही रोगांचे एक लक्षण मानले जाते. त्यास स्वतंत्र रोग मानीत नाहीत. व्यवहारात लोक असा अर्थ करतात की, अजीर्णामुळे किंवा थंडीमुळे जे पोट दुखते तो पोटशूळ. पण पोटशूळ नेहमी याच कारणामुळे होतो असे नाही.

सोशल मीडियात पोटशूळ हा एखाद्या विषयी चांगले केलेले लेखन किंवा चांगले वाक्य वाचून उठतो. समोरच्याने चांगले लेखन ज्याच्याविषयी केले आहे, त्या व्यक्तीचा चांगूलपणा हा नालायकपणा कसा आहे  हे सांगेपर्यत शूळ थांबत नाही. असा आजार असलेल्या एखाद्या रुग्णाने वाईट प्रतिक्रिया दिली की इतर रुग्ण अंगठे, बोट, इमोजी दाखवून आपणासही पोटशूळ झाल्याचे दर्शवतात.

पोटदुखी - कधीकधी पोटदुखीसाठी अन्नघटकांची ॲलर्जी, अपचन कारणीभूत ठरते. अंडी, मासे, गाईचे दूध, शेंगदाणा, काजू, सोयाबीन हे काही ॲलर्जीकारक सर्वसामान्य घटक आहेत. यामध्ये पोटदुखीबरोबर गॅस, उलट्या, जुलाब, अंगावर पुरळ येऊन खाज येणे आणि काही त्रास संभवतात.

सोशल मीडियात पोटदुखी हा कायमचा आजार आहे. व्यक्ती, समाज, पक्ष यांच्याविषयी पारंपरिक द्वेष, राग, संताप व्यक्त करताना हा आजार जडतो. तो १२ महिने गुणिले २४ तास असतो. आजारी व्यक्ति ही नेहमी स्वतःला जगाचा फौजदार समजून कोणत्याही विषयावर भाष्य करताना दिसते. अशी व्यक्ती स्वतःला सर्वधर्मी, सहिष्णू, पुरोगामी, समाजवादी समजून घेते. तसे ठासून सांगायला काही राष्ट्रपुरुषांची नावे घेते. त्यांच्यादृष्टीने समोर विरोधातील मंडळी असहिष्णू, प्रतिगामी, जात वा धर्मवादी असते. अशा लोकांचा तुच्छतेने उल्लेख करताना केवळ २ शब्द पूरे असतात. एक तर त्यांना मनुवादी किंवा संघवादी म्हटले जाते.

अजीर्ण (अपचन) - पचनशक्ती कमी झाल्यामुळे म्हणजेच मंदाग्नीमुळे खाल्लेल्या आहाराचे ज्यावेळी व्यवस्थित पचन होत नाही, अशावेळी खाल्लेले अन्न अर्धवट पचलेल्या अवस्थेत राहिल्यामुळे ज्या तक्रारी होतात, त्या विकारास अजीर्ण असे म्हटले जाते. नेहमीचा समतोल आहार सोडून विषम पद्धतीचा आहार घेतल्यामुळे तसेच आहाराचे नियमन सांभाळता वारंवार खात राहिल्यामुळे अजीर्ण होत असते. अतिप्रमाणात पाणी पिणे, नित्य सवयीचा नसलेला आहार घेणे, पचायला अतिजड, अतिउष्ण आहार सेवन करणे, अशुद्ध पाणी पिण्यामुळे तसेच दिवसा झोपणे, रात्री जागरण, वेगधारण आदी कारणांमुळे अजीर्ण होऊ शकते. याचबरोबर कोणत्याही कारणाने चिंता, शोक, भय, क्रोध, दुःख आदी मानसिक तणावामुळेही अजीर्ण होऊ शकते.

सोशल मीडियावर हे लक्षण गमतीशीर असते. इतरांचा एखादा मेसेज अजीर्ण होण्याचा त्रास देतो. रुग्णाला दुसऱ्याचा १ मेसेज अजीर्ण होतो. पण रुग्ण जेव्हा ५/५० मेसेज टाकतो किंवा फॉर्वर्डेड मेसेज टाकतो तेव्हा ते इतरांना अजीर्ण होतात, हे रुग्णाला कळत नाही. तो झपाटल्यागत मोबाईलचा कि बोर्ड बदडून काढत धपाधपा मेसेज टाकतच असतो. अशावेळी इतरांनी गप्प बसावे. रुग्ण स्वतःच नंतर गप्प होतो.

उलटी (अपचन) - पचनसंस्थेत जठरामधील क्रिया मंदावली किंवा जठराच्या आतल्या आवरणाचा दाह झाला तर त्यातले अन्न बाहेर टाकण्याची क्रिया होते. जठरातले अन्न पुढे आतड्यात जाण्यास काही अडथळा आला तरी उलटी होते. उलटी होण्याची नुसती भावना असेल तर तिला मळमळ म्हणतात. कोणी याला कोरडी उलटी म्हणतात. उलटी होते तेव्हा जठरात अन्न असेल तसे पडते. जठरात अन्न नसेल तर केवळ पाझरलेले पाचकरस उलटून पडतात. याला पित्ताची उलटी असेही म्हणतात.

सोशल मीडियावर उलट्या काढणे हा गमतीशीर प्रकार आहे. एकाला अजीर्ण होऊन तो उलटी काढायला लागला की त्याच्या शिशारी वा दुर्गंधीने दुसऱ्या समविचारींना संसर्ग होऊन ते सुध्दा उलट्या काढतात. याला शाब्दीक गरळ ओकणे असेही म्हणतात.

सोशल मीडियावर फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स ॲप गृपमध्ये वरील आजाराचे २/४ रुग्ण असतात. ते स्वतःला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पाईक समजतात. आपण कसाही शाब्दीक आजार प्रकट करु शकतो आणि तसा हक्क असल्याचा त्यांचा समज असतो. पण इतरांनी दुसऱ्याविषयी चांगले लिहू नये अशी स्व मर्यादीत वा स्व मग्न अभिव्यक्त होण्याची या रुग्णांची मानसिकता असते. अशा रुग्णांना ओळखून त्यांच्या संसर्गापासून दूर राहणे हाच उत्तम उपाय असल्याचे वैद्यकशास्त्र सांगते.

(सोशल मीडियातील या ४ आजारांवर श्री. दिलीप तिवारी यांनी अनुभवाधारित लेखन केले आहे. यावर प्रतिक्रियांचे स्वागत आहे. ती देत असताना वरील लक्षणे प्रकट होणार नाहीत, याची काळजी रुग्णांनी घ्यावी. या उप्परही कोणी रुग्ण सरसावलाच तर शांत बसणे हा उपाय सांगितला आहेच.)

No comments:

Post a Comment