Saturday 20 July 2019

दोष कोणाला लावणार ?

जळगाव येथील खान्देश सेंट्रल मॉल मधील बीग बाजार मॉल बंद करण्यात आला. व्यवस्थापनाने ३ महिन्यांचे वेतन अगाऊ देऊन मॉलची टाळेबंदी केली. २०० च्या आसपास पुरुष व महिलांचे रोजगार हिरावले गेले. जळगावमध्ये सर्व प्रथम मॉल कल्चर घेऊन आलेल्या विशाल मॉलनेही वर्षा-दीडवर्षांत जळगाव सोडले. तेव्हाही १०० वर जणांचा रोजगार गेला. यापूर्वी ब्लो प्लास्ट कंपनी गेली. कामगार बेकार झाले. रेमंड कंपनीने उत्पादने कमी केली. तेव्हा जळगावमधील कामगार असंतोषाचा भडका उडाला. अशा इतरही घटना आहेत. एकूण परिणाम काय, तर कंपनी बंद आणि कामगार बेरोजगार. या सर्व घटनांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे, जळगावमधील कामगार वा कर्मचारी असंतोषाचा.या घटना घडल्या तेव्हा फेसबूक व व्हाट्स ॲप ही समाज माध्यमे अस्तित्वात नव्हती. म्हणून कंपनीचे काय घडले आणि कसे घडले ? हे फारसे चर्चेत येत नसे. आता कोणत्याही घटनेची पहिली बातमी वा दृश्ये सोशल मीडियात आली की, दुसरी बाजू आपोआप आरोपी वा संशयित ठरते. तसे घडू लागले की खुलासे विचारणारे अनेक सोशल जस्टीस छड्या घेऊन उभे राहतात. ते न्याय देणारे भाष्यही करु लागतात.

वरील लेखनाचा संदर्भ हा कालच्या कामगार असंतोषाच्या घटनेकडे आहे. जैन फार्म फ्रेश या जैन उद्योग समुहातील कंपनीने ५० वर हंगामी कामगारांचे काम थांबविले. काम थांबविल्याच्या अस्वस्थतेतून काही जणांनी कंपनीच्या गेटवर असंतोष व्यक्त केला. अशावेळी जे घडते, तेच तेथे घडले. व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांशी वाद आणि मग आमचे थकीत वेतन द्या ही मागणी. व्यवस्थापनाने लगेच वेतन देऊन विवाद टाळला. नेहमी प्रमाणे सोशल मीडियात हा विषय आला.

कोणत्याही कामगाराची नोकरी थांबविली जाणे हा अपघातच असतो. रोजी रोटीला प्रश्न चिन्ह लागते. तसे होऊ नये. मात्र आज जवळपास सर्वच क्षेत्रात करारावर किंवा हंगामी कामगार किंवा कार्यालयिन कर्मचारी भरती केली जाते. अवघ्या ११ महिन्यांचे करार केले जातात. गरज नसेल तेव्हा करार लवकर थांबविले जातात.

कोणत्याही प्रसिध्दी माध्यमात काम करणारे ९० टक्के कर्मचारी अशाच करारावर काम करतात. माध्यमांचे बहुतेक संपादक, व्यवस्थापक वा प्रतिनिधी हे अवघ्या ३ वर्षांच्या करारावर नेमले जातात. माध्यमांचे तालुका बातमीदार यांना मानधन आहे की वेतन हे सांगता येत नाही. जेव्हा माध्यमाच्या मालकाला वाटेल तेव्हा बदल्या केल्या जातात किंवा ऐच्छिक सेवानिवृत्तीच्या स्किममध्ये माणसांना घरी पाठवले जाते. तीन-चार माध्यम संस्था वगळल्या तर दरमहा वेतन कधी होते आणि महिन्यांचे दिवस किती ? हा प्रश्न संबंधिताना खासगीत विचारावा.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमातील सेवा वा नोकरी विषयीचा हा असंतोष कधीही चव्हाट्यावर येत नाही. याचे कारण वृत्तपत्र छपाई हा व्यवसाय नव्हे तर उद्योग असून त्यालाही कामगार कायदे लागू आहेत. तेथे संपादकापासून तर वॉचमन हे हंगामी वा करारावरील कामगारच आहेत.

आता मुद्दा हाच आहे की, औद्योगिक क्षेत्रात असलेला करार वा हंगामी कामगार होणे हा व्यक्तिनिहाय ऐच्छिक मामला आहे. करार संपणार वा हंगाम संपणार हे ठरलेले असते. कधी तो निश्चित काळात संपतो वा संपवला जातो.  हा व्यवस्थेचा भाग आहे. तेथे बळजोरी किंवा अन्याय असेल तर कामगार उपायुक्त आणि कामगार न्यायलये ही तक्रार करण्याची पर्यायी व्यवस्था आहे. याचा सारासार विचार करता, हंगामी कामगारांचे काम थांबविणे आणि कामगारांचा असंतोष हे नियमित व नैसर्गिक आहे. हे घडत असताना जळगावमधील कामगार क्षेत्र अधिक अस्वस्थ आणि आक्रमक करायचे की अडचणींवर मात करणारे सकारात्मक पर्याय तपासायचे हा विवेकाचा भाग आहे. जी माध्यमे ९० टक्के हंगामी व करारावरील कामगारांवरच चालतात त्यांनी याचा विचार करायला हवा.

जैन उद्योग समूह अडखळलेला आहे. कर्मचाऱ्यांचे २ महिन्यांचे वेतन थकलेले आहे. व्यवस्थापनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. परिस्थिती पूर्वत व्हायला वेळ लागणार हे नक्की. अशा काळात हंगामी कामगारांना तूर्त काम नाही हे सांगणे, हा सुध्दा सामाजिक गुन्हा असल्याचे चित्र निर्माण केले जाणे धोक्याचे आहे. जळगावमधील काही नामांकित व्यापारी प्रतिष्ठाने आज व्यवसाय गुंडाळायच्या मार्गावर आहेत. सूवर्ण व्यवसाय, कापड विक्री व्यवसायातील शोरुम विक्रीला आहेत. अशातून कामगारांची बेरोजगारी ही समस्या अधिक वाढेल. अशा समस्येतील असंतोषाच्या वृत्तांकनाला कसे हाताळायचे हा माध्यमांसाठी विवेकाचा भाग आहे.

बीग बाजारमध्ये पूर्वी कामाला असलेले आणि एमबीए केलेले काही युवक आज हॉटेल व्यवसायात वेटर म्हणून काम करताना दिसतात. व्यवस्थापक म्हणून काम केलेल्या तरुणी सुपर शॉपमध्ये सेल्फ अटेंडंट म्हणून काम करताना दिसतात. धोक्याचा इशारा तर पुढेच आहे. मनपाच्या २१ संकुलातील २१०० व्यापारी-दुकानदार यांच्यावरही अनिश्चितेची टांगती तलवार आहे. जर व्यापारी गाळ्यांचे थकित भाडे व नव्याने खुल्या पध्दतीने लिलाव असा काही विषय झाला तर बरेच जण व्यवसाय गुंडाळतील. बेरोजगारी मोठे संकट उद्भवू शकते.

जैन फार्म फ्रेशमधील हंगामी कामगारांचे काम बंद केल्याविषयी सहानुभूती नक्कीच आहे. कंपनीने पुढील गरजेच्या काळात काम देण्याचे मान्य केले आहे. येथे अजून एक मुद्दा आहे. तो म्हणजे, जैन उद्योग समुहात आजही ७ हजारांवर कामगार, कर्मचारी धीर बाळगून काम करीत आहेत. व्यवस्थापन अडचणीतून बाहेर निघायचा प्रयत्न करते आहे. धीर धरुन असलेल्या कामगारांना अस्वस्थ करायचे असेल तर ५०/६० कामगारांचा असंतोष भडकावणे फार अवघड नाही. पण यातून मिळणार काय ? नोकरी सोड किंवा आंदोलन करा हा सल्ला देणे सोपे असते. पुढे काय हा प्रश्न कायम राहतो. अशावेळी कंपनीचा गेल्या अर्धशतकातील इतिहास लक्षात घ्यायाला.  उद्योग बंद झाला नाही. तो विस्तारला. कोणाचे देणे कंपनीने बुडवले नाही. महत्त्वाचे म्हणजे मालक असलेले चारही जैन बंधू जळगावात पाय रोवून उभे आहेत. मग प्रश्न उरतोच मग दोष कोणाला लावणार ? यावर उत्तर एकच संयम हवा आणि धीरही धरायला हवा.

(टीप - हा लेख कामगार असंतोष आणि नंतरचा परिणाम याच हेतूने लिहिला आहे. त्यामुळे प्रतिक्रिया या परिस्थितीवर भाष्य करणारी हवी. लेखकाला व्यक्तिगत शहाजोग सल्ला देणारी असू नये.)

No comments:

Post a Comment