Wednesday, 19 June 2019

बाजार समितीतील नियोजित व्यापारी संकुलास विरोधाचे गौडबंगाल

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील व्यापारी संघटन गेले १५ दिवस नियोजित व्यापारी संकुलाच्या बांधकाम विषयावरुन चर्चेत आहे. या प्रकरणाकडे सामान्य जळगावकरांनी अद्यापही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. बहुधा कारण असावे की, हा वाद बाजार समिती, व्यापारी आणि नियोजित संकुलाचे बांधकाम करणारे विकासक यांच्यात असावा. या ३ घटकांमध्ये शेतकरी, तेथील हमाल-मापाडी व कर्मचारी सक्रिय दिसत नाहीत. या ३ घटकांच्या भल्यासाठी व्यापारी संघटनेने कृती केली आहे, असे सुद्धा काहीही दिसत नाही. मात्र, जागृत जनमंचचे श्री. शिवराम पाटील यांनी बाजार समिती पदाधिकारी व व्यापाऱ्यांचे काही प्रतिनिधी यांच्याशी केलेल्या चर्चेच्या ध्वनी व चित्रफिती सोशल मीडियातून प्रसारित झाल्यानंतर नियोजित संकुलाचा विषय सामान्य जळगावकरांपर्यंत पोहचला. नियोजित संकुलास विरोध करताना बाजार समितीतील व्यापारी संघटनने बंद पुकारुन शेतकरी, हमाल-मापाडी व कर्मचाऱ्यांना वेठीस धरलेले आहे, असे दिसते. अशा स्थितीत बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुलास विरोधाचे गौडबंगाल काय आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे.

Tuesday, 11 June 2019

जळगाव मधील व्यापाऱ्यांची 'चित भी मेरी और पट भी मेरी'

जळगावकर नागरिक जरा लक्ष द्या. शहरात नागरिक म्हणून राहायचे असेल तर तुम्हाला मनपाचा मालमत्ता कर व पाणी पट्टी भरावी लागेल. भलेही रस्ते, गटारी, पाणी, पथदीप, स्वच्छता आदी सुविधा मनपा देणार नाही. तरीही करवसुलीच्या नोटीसा नागरिकांच्या घरादारांवर चिटकवल्या जातील. पण तुम्ही जर जळगावात कशाचेही व्यापारी (बेपारी) असाल तर तुम्ही मनपा किंवा इतर संस्था यांचे भाडे, कर असे काहीही थकवू शकतात. तुम्ही व्यापारी म्हणून कधी एका नेत्याकडे तर गरज पाहून दुसऱ्याकडे जावू शकतात. बरे नेतेही एवढेच रिकामे की, नागरिकांचे भले करण्याऐवजी व्यापारी हिताचेच काम करणार. जळगावमधील व्यापारी स्वतःच्या लाभासाठी पुढाऱ्यांना कसे वापरतात याची ३ ठळक उदाहरणे समोर आहेत. एकात भाजपच्या नेत्यांनी, दुसऱ्यात शिवसेनेच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेतली आहे. तिसऱ्या प्रकरणात व्यापाऱ्यांच्या मदतीने पोलिसांची वरकमाई सुरु आहे.