Thursday 9 May 2019

इंदिरा व राजीव यांनी ओढवून घेतलेले मृत्यू ...

१७ व्या लोकसभा निवडणूक प्रचारात सोनिया, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी गांधी घराण्यातील स्व. इंदिरा आणि स्व. राजीव हे देशासाठी शहीद झाल्याचा वारंवार उल्लेख केला आहे. इंदिरा या पंतप्रधानपदी असताना २ शिख अंगरक्षकांकडून दि. ३१ आक्टोबर १९८४ ला निवासस्थानी मारल्या गेल्या. राजीव हे माजी पंतप्रधान असताना तामीळ टायगर्स (एलटीटीइ) या श्रीलंकास्थित दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात दि. २१ मे १९९१ ला श्रीपेरंबदूर येथे मारले गेले. इंदिरा व राजीव यांच्या या घातपाती मृत्यूमागे त्यांनी घेतलेले निर्णय आणि कृती याचे गुंतागुंतीचे संदर्भ आहेत. देशहितापेक्षा त्यामागे व्यक्तिगत पद-प्रतिष्ठा, कळीचे राजकारण आणि विरोधकांवर मात करणे हिच प्रमुख कारणे आहेत.

इंदिरा यांनी अमृतसरच्या सूवर्णमंदिरात सैन्यदल घुसवून खलिस्तान मागणारा दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवाले याला संपविले होते. भिंद्रनवाले याला संत मानणारा मोठा शिख समुदाय तेव्हा पंजाबात अस्तित्वात होता. राजीव गांधी यांनी श्रीलंकेतील सिंहली व तामीळ यांच्या वंशभेद संघर्षात श्रीलंका सरकारच्या विनंती वरून शांतीसेना मध्यस्थीसाठी पाठविली होती. ही सेना श्रीलंकेतील तामीळ वंशाच्या दहशतवादींना शरण यायला सांगत होती. वास्तवात हे तामीळी भारतातील तामीळ वंशाचे होते. त्यामुळे श्रीलंकेतील तामीळ दहशतवादी संघटनांसोबत भारतीय शांतीसेनेचा संघर्ष भारतातील तामीळी जनसमुदायाला नाराज करीत होता. एका अर्थाने इंदिरा व राजीव यांनी घरातच हितशत्रू निर्माण केले होते.

इंदिरा या देशासाठी शहिद झाल्या असा दावा आताचे गांधी कुटुंबिय करतात. मात्र खलिस्तानवादी तथाकथित भिंद्रनवाले, सैन्य दलाची अॉपरेशन ब्लू स्टार मोहिम, स्व. ग्यानी झैल सिंग यांचे विघातक सल्ले, संजय यांचा एककल्लीपणा, इंदिराजींची हत्या, राजीव यांचे पंतप्रधान होणे आणि काँग्रेस नेता सज्जन कुमारने घडविलेले शिख हत्याकांड हा घटनाक्रम समजून घेतला तर इंदिराजींनी स्वतःच्या मृत्यूचा सापळा स्वतःच रचला असे दिसते. तेथे देशासाठी शहीद होणे ही पवित्र संकल्पना दुर्दैवाने बाजूला ठेवावी लागते. तशीच बाब राजीव यांचे बाबतही आहे. प्रभाकरना शस्त्रे देणे, तामीळींना सहानुभुती दाखविणे, नंतर पलटी मारून श्रीलंका सरकारचे ऐकणे, शांतीसेना पाठविणे ही कारणे यामागे आहेत.

भिंद्रनवाले हा दहशतवादी तथा संत निर्माण करण्यामागे स्वतः इंदिरा, त्यांचे पुत्र संजय आणि ग्यानी झैलसिंग यांनी रचलले कारस्थान होते. सन १९८० च्या दशकात पंजाबमध्ये अकाली दलाचे वर्चस्व वाढले होते. त्यांचे वर्चस्व इंदिरा यांना येनकेन प्रकारे संपवायचे होते. आताच्या टोकाच्या भाषेत अकालीमुक्त पंजाब करायचा होता. त्यामुळे अकालीसमोर उभे राहायला भिंद्रनवाले हे पात्र ग्यानी झैलसिंग व दरबारा सिंह यांनी संजय यांच्या समोर आणले.

या संदर्भातील विश्वासार्ह तपशील दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांच्या ‘बियोंड द लाइंस एन ऑटोबायोग्राफी’ मध्ये आहेत. पुस्तकात नोंद आहे की, संजय यांना वाटायचे की, अकाली दलचे तेव्हाचे संत हरचरण सिंह लोंगोवाल यांच्यासमोर जर्नेल सिंह याला संत भिंद्रनवाले म्हणून उभे करता येईल. पुस्तकात असाही तपशील आहे की, काँग्रेस नेता कमलनाथ यांनी मान्य केले होते की भिंद्रनवाले यांना काँग्रेसकडून पैशांची मदत होत असे.

ग्यानी झैलसिंग हे तेव्हा इंदिरा यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळात गृहमंत्री होते. पंजाबविषयी तेच इंदिरा यांना सल्ले देत. ग्यानी झैल सिंग व संजय यांचे गूळपीठ होते. पण १९८० मध्येच विमान अपघातात संजय यांचा खेळ आटोपला. इंदिरा या कुटुंबात एकाकी झाल्या. दुसरीकडे पंजाबात भिंद्रनवालेचे उपद्रव वाढत होते. ग्यानी झैल सिंग भिंद्रनवालेला पाठबळ देत होते. १९८२ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक आली. अशावेळी इंदिरा यांना राष्ट्रपतीपदी आपला विश्वासूच नव्हे तर सांगकाम्या हवा होता. तेव्हा इंदिरा यांना आपली कोणतीही तळी उचलणारे ग्यानी झैल सिंग जवळचे वाटत होते. इंदिरा व स्व. संजय यांच्यासमोर पूर्णतः लाचारीने केलेल्या कामाचे फळ म्हणून ग्यानी झैल सिंग यांना राष्ट्रपतीपद मिळाले.

या दरम्यान भिंद्रनवालेने पंजाबात सत्ता व मग्रुरीचा नवा खेळ सुरु केला होता. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर ताबा बसवून तेथूनच तो घातपाती योजना राबवित होता. राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्यामुळे भिंद्रनवालेला अटक न करता संरक्षण मिळत होते. नंतर-नंतर भिंद्रनवाले ग्यानी झैल सिंग व इंदिरा यांना न जुमानत भारतीय कायद्यांना आव्हान देत होता. पोलिसांकडे जरी हत्यार असेल तरी माझे रक्षकच ते उत्तमपणे चालवू शकतात असे उघडपणे भिंद्रनवाले म्हणत असे. अखेर १९८४ मध्ये इंदिरा यांनी सैन्यदलाचा वापर करुन अॉपरेशन ब्लूस्टार मोहिम राबवून भिंद्रनवालेला ठार मारले. ही कारवाई झाल्यानंतर ग्यानी झैल सिंगने आपल्या शिख समुदायाची सहानुभूती मिळवायला नाटक केले. त्यांनी सुवर्ण मंदिरला भेट दिली. इंदिरा व त्यांच्यात खटका येथेच पडला.

या मोहिमेच्या अवघ्या ४ महिन्यांनी अॉपरेशन ब्लू स्टार कारवाईचा बदला म्हणून शिख अंगरक्षक बेअंत सिंहने स्व. इंदिराजींवर पिस्तुलने २ गोळ्या झाडल्या आणि दुसरा अंगरक्षक सतवंत सिंलने ॲटोमैटीक रायबलने २५ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात इंदिरा ठार झाल्या. या हत्येनंतर पंतप्रधानपदी स्व. राजीव यांना तेव्हाचे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनी बसविले. इंदिरा यांनी सर्वोच्चपदावर बसवल्याबद्दल ग्यानी झैल सिंग यांनी आपली निष्ठा गांधी कुटुंबाप्रति या कृतीतून सिध्द केली. अर्थात, ग्यानी झैल सिंगवर काँग्रेस नेते अरुण नेहरुंचा विश्वास नव्हता. राजीव यांचा शपथविधी उपराष्ट्रपतींनी करावा असे घाटत होते. ग्यानी झैल सिंग यांचे शिख असणे हिच संशयाची जागा होती. तरीही कोणत्याही सभागृहाचे नेते नसलेले व राजकारणाचा अनुभव नसलेले राजीव पंतप्रधानपदी बसवले गेले. राजीव यांनी पंतप्रधानपदावर बसताच वक्तव्य केले की, 'इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा देशात काही दंगली झाल्या. आम्हाला माहिती आहे की जनतेच्या मनात किती रोष होता. काही दिवस असे वाटले की संपूर्ण भारत हलतोय. एखादा मोठा वृक्ष उन्मळून पडला तर जमीन थोडी हादरतेच.' अर्थातच, या वक्तव्यात  राजीव यांनी शिख हत्याकांडाचे अप्रत्यक्ष समर्थन केले होते. येथूनच राजीव आणि ग्यानी झैल सिंग यांच्यात खटका पडला.

दिल्लीतही शिख हत्याकांड सुरु होते. यात काँग्रेस नेता सज्जन कुमारचा सहभाग होता. जसे सत्तेचे संरक्षण स्व. संजय यांनी भिंद्रनवाले याला दिले होते तसेच संरक्षण स्व. राजीव यांनी सज्जन कुमारला दिले होते. मात्र तब्बल ३४ वर्षानंतर न्यायालयात सज्जन कुमारवर ५ शिखांच्या हत्येचा आरोप सिध्द झाल्यामुळे त्याला जन्मठेप सुनावली गेली आहे. दिल्ली हायकोर्टाने निकाल देताना म्हटले, '१९४७ मध्ये फाळणी झाली तेव्हा नरसंहार झाला होता. ३७ वर्षांनंतर अशीच एक घटना पुन्हा घडली. आरोपींना राजकीय संरक्षणाचा फायदा मिळाला आणि ते न्यायालयातील खटले टाळत राहिले.' शिख हत्याकांडाचा तपशील 'व्हेन ए ट्री शॉक देहली' पुस्तकात लेखक हरविंदर सिंग फुल्का यांनी दिला आहे. या पुस्तकात शिख हत्याकांडासाठी ठरवून केलेल्या दंगलीची भीषणता, त्यात झालेली पडझड आणि आप्तस्वकीयांचे दु:ख आणि राजकारण्यांच्या बरोबर पोलिसांचे संगनमत अशा अनेक गोष्टींचे तपशीलवार वर्णन आहे. राजीव यांच्या हयातीत अकाली दलाचे नेते संत हरचरण सिंह लोंगोवाल यांचीही १९८५ मध्ये हत्या झाली.

राजीव यांच्या हत्येचे कटही असेच परस्परांवरील अती विश्वासातून उलगडतात. श्रीलंकेत १९७२ पासून तेथील बहुजन बौध्द धर्मिय सिंहली व तामीळी यांच्यात संघर्ष होता. सरकार सिंहलींच्या बाजूने होते. तामीळींचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता.  तेथील तामीळींविषयी भारतीय तामीळींना सहानुभूती होती. श्रीलंकेतील तामीळींचा नेता वेल्लुपिल्लई प्रभाकरन होता. तामीळी टायगर्सला राजीव नेतृत्वातील भारत सरकार शस्त्रे, दारूगोळा, प्रशिक्षण, तंत्र, कपडे, औषधे याची मदत करीत होते. इंडीया टुडेचे पत्रकार शेखर गुप्ता यांनी हा तपशील सविस्तर दिला आहे.

श्रीलंकेचे विभाजन दोन राष्ट्रात व्हावे म्हणजे सिंहलींचे वेगळे आणि तामीळींचे वेगळे अशी प्रभाकरनची मागणी होती. मात्र श्रीलंका सरकारने राजीव यांच्याकडे सैन्यबळ सहकार्याची १९८७ मध्ये मदत मागितली. आता गोची राजीव यांची होती. कारण प्रभाकरनचे भूत आपणच उभे केले होते. त्याला आंजारणे गोंजारणे आवश्यक होते.

यासंदर्भात निना गोपाल यांच्या  'द ॲसेसिनेशन अॉफ राजीव गांधी' पुस्तकात महत्त्वपूर्ण तपशील आहेत. एक संदर्भ असा धक्कादायक आहे की, जुले १९८७ मध्ये दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये एलटीटीईचा म्होरक्या प्रभाकरन स्थानबध्द होता. त्याला राजीव यांच्या भेटीला आणले. तेथे लहानगा राहुल होता. राजीव व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जयवर्धने यांच्यात शांतीसेनेच्या संदर्भात चर्चा झाली होती. श्रीलंकेत तामीळींचे संरक्षण होईल असे आश्वासन जयवर्धने यांनी दिले होते. त्यामुळे राजीव यांनी प्रभाकरनला शस्त्रे ठेवा असे सांगितले. हे सांगताना दोघांमधील विश्वासाचे प्रतिक म्हणून स्वतःचे बुलेटप्रुफ जैकेट प्रभाकरनला दिले. भारतीय सैन्यदलाच्या घोळक्यात असलेला प्रभाकरन तेव्हा शस्त्रसंधीला व शरणागतीला मजबुरीने तयार झाला होता. अर्थात, यामागे गोम अशीही होती की, तामीळींच्या संरक्षण व हक्कासाठी लढणाऱ्या प्रभाकरनला राजीव सरकार पडद्यामागून मदत करीत होते. प्रभाकरनचा जुजबी होकार घेऊन राजीव श्रीलंकेत गेले व शांतीसैन्य पाठवायचा करार करुन आले. येथेच प्रभाकरनचा खटका पडला.

शांतीसैना श्रीलंकेत गेली. एलटीटीइचे काही दहशतवादी शरण आले. परंतु श्रीलंका सरकार तामीळींचे पुनर्वसन करण्याकडे लक्ष देत नव्हती. शिवाय, शांतीसेना एलटीटीइ विरोधकांना मदत करते असे म्हणून प्रभाकरनने शरण येणे थांबावले. तेथे शांतीसेना व दहशतवाद्यांमध्ये घातपात सुरु झाले. शेकडो (१२०० वर) भारतीय सैनिक दुसऱ्या देशासाठी मारले गेले. भारतात तामीळनाडूसह इतर राज्यातून मागणी येत होती, शांतीसेना परत बोलवा. याच काळात १९८९ मध्ये लोकसभा निवडणूक होऊन राजीव पराभूत झाले. स्व. व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले. त्यांनी शांतीसेना परत बोलावली. पुढीलवर्षी राजीव यांनी जाहिरपणे शांतीसेना पाठवल्याचे समर्थन करुन श्रीलंकेला तुटू देणार नाही असे म्हटले. एलटीटीइचा खटका येथे पडला. त्यानंतर वर्षभरात राजीव यांची हत्या झाली.

श्रीलंकेतील तामीळींचा प्रश्न १९७६ पासून होता. तेव्हा पंतप्रधान इंदिरा होत्या. विदेशमंत्री स्व. पी. व्ही. नरसिंह राव होते. ते स्वतः दक्षिणेतील आंध्रचे होते. श्रीलंकेतील तामीळींविषयी त्यांना सहानुभूती होती. राव यांनी श्रीलंकेच्या विषयावर भूतानमध्ये मध्यस्थता बैठक घेतली. ती निष्पळ ठरली. पण तेथून तामीळी टायगर्सला भारताकडून मदत देणे सुरु झाले. यामागे एक कारण होते, श्रीलंका अमेरिकेचा मित्र होता व भारत सोव्हिएट रशियाचा मित्र होता. आंतर राष्ट्रीय शित युध्दात दहशतवादाला खतपाणी हे सूत्र होते. भारताने बांगलादेशात हेच केले होते. पाकिस्तान खलिस्तानवाद्यांना मदत करीत होता. श्रीलंकेतील फुटीरवाद्यांच्या ४ गटांना भारताची फूस व मदत होती.

अशा प्रकारे इंदिरा यांनी वाढवलेले भिंद्रनवाले यांचे आणि राजीव यांनी बाळगलेले प्रभाकरन यांचे भूत त्यांच्याच मानगुटावर बसले. इंदिरा व राजीव यांचा देशाच्या कामी मृत्यू आलेला नाही. भिंद्रनवाले खलिस्तान मागत होता. त्याला शस्त्रे व संरक्षण इंदिरा यांनी दिले. प्रभाकरन तामीळींसाठी श्रीलंकेचे विभाजन मागत होता. त्याला शस्त्रे व संरक्षण राजीव यांनी दिले. यात थेट भारताचा लाभ नव्हताच. इंदिरा व राजीव यांनी जे पेरले त्याची फळे त्यांना मिळाली.

काँग्रेस नेत्यांची अशीही चुंबाचुंबी

अलिकडे पंजाबमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे काही आमदार खलिस्तान समर्थकांच्या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत 'खलिस्तान जिंदाबाद' म्हटले गेले असा दावा पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी केला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, खलिस्तान समर्थकांच्या बैठकीस काँग्रेसचे आमदार इंद्रजीत जीरा, रमनजीत सिकी यांच्यासह कांग्रेस नेते जगदीश सिंह जिंदा उपस्थित होते. अशाच पध्दतीने पंजाबमधील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेले माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू यांनी मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंग यांच्या दौरा न करण्याच्या सूचनेचा अवमान करुन पाकिस्तान दौरा केला. सिध्दूने तेथे मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टर माइंडचा निकटवर्ती गुर्गे आणि खालिस्तानी समर्थक गोपाल चावला यांची भेट घेऊन फोटो काढले. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत सुध्दा पंजाबमध्ये काँग्रेस सोबतच्या महागठबंधनमध्ये खलिस्तान समर्थक सहभागी असल्याचा आरोप केला जातोय.

No comments:

Post a Comment