Thursday 30 May 2019

बिनबुडाच्या २ टूम !!!

जळगाव शहराच्या व जिल्ह्याच्या राजकारणात २ टूम सध्या सोडल्या जात आहेत. कोणताही आगापिछा नसलेल्या या टुमांमुळे निव्वळ करमणूक होत आहे. पहिली टूम आहे ती भाजप-शिवसेना युती अंतर्गत जळगाव शहराच्या आमदारपदाची जागा शिवसेनेकडे जाणार. ही टूम निव्वळ गप्पा झोडणाऱ्यांनी सोडलेली आहे. जळगाव शहराचे विद्यमान आमदार सुरेश भोळे तथा राजूमामा हे भाजपचे आहेत. जळगाव मनपात भाजपचे संख्याबळ शिवसेनेच्या ४ पट (५७) आहे. महापौरपदी भाजपच्या सीमा भोळे आहेत. लोकसभा निवडणुकीत जळगावकरांनी भाजपला जवळपास ७१ हजारांवर मताधिक्य दिले आहे. भाजपला पूरक असलेल्या सद्यस्थितीत जर जळगाव शहर आमदाराची जागा भाजपने शिवसेनेसाठी सोडली तर भाजपच्या पुढाऱ्यांना मूर्खात काढले जाईल. अजून एक बाब स्पष्ट करायला हवी. ती म्हणजे शहर आमदाराची जागा भाजपकडेच राहिल आणि उमेदवार सुध्दा बदलला जाणार नाही.एक कळीचा प्रश्न असाही आहे की, आजच्या स्थितीत जळगाव शहर आमदारपदासाठी शिवसेनेकडे उमेदवार आहे कोण ? ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांचे नाव बरेच मागे पडले आहे. सध्या समोर जे ताट वाढून ठेवले आहे ते ध्यानात घेऊन जैन यांनी कोणतीही निवडणूक लढवावी अशी स्थिती नाही. घरकूल घोटाळा प्रकरण निकाल तोंडावर आहे. इतर घोटाळ्यांच्या चौकशीसाठी औरंगाबाद खंडपीठ सक्रीय आहे. अशावेळी जैन यांनी उध्दव ठाकरेंकडे जागा मागायची तर कोणासाठी ? शिवसेनेत पक्षाशी निष्ठावंत उमेदवार आहे तरी कोण ? हा कळीचा मुद्दा आहे. याचा सारासार विचार करता जळगाव शहराची जागा शिवसेनेला जाणे ही निव्वळ लोणकढी टूम ठरणार आहे.

दुसरी टूम सोडली जाते आहे, ती म्हणजे ना. गिरीश महाजन हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची. प्रश्न असा आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष काय करणार ? अशी कोणती संधी फडणवीस यांच्यासाठी निर्माण केली जात आहे की, त्यांचे मुख्यमंत्रीपद काढून ते महाजन यांना दिले जाईल ?  यावर काही तर्कबाज घोळके म्हणत आहेत की, फडणवीस यांना केंद्र सरकारमध्ये घेतील. असा तर्क करणे ही सुध्दा लोणकढी टूमच. कारण लोकसभेत भाजपचेच ३०३ खासदार निवडून आले आहेत. त्यात बरीच अनुभवी मंडळी आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे व संजय धोत्रे हे मंत्री आहे. शिवाय रामदास आठवले, अरविंद सावंत हे सुध्दा कोट्यातून मंत्री आहेत.

फडणवीस यांनी वेळोवेळी संधी व साथसंगत दिल्यामुळे महाजन स्वतःची ओळख संकटमोचक म्हणून निर्माण करु शकले आहेत. फडणवीस आणि महाजन यांच्यात उत्तम समन्वय आहे. गरजेची कोणतीही स्थिती नसताना मुख्यमंत्री पदाच्या रांगेत महाजन यांचे नाव आणून पायावर धोंडा मारुन घेण्याचा प्रकार उताविळ मंडळी करीत आहेत. अशा उताविळपणातूनच एकनाथराव खडसे यांचे नुकसान झाले, हे विसरता कामा नये. फडणवीस मुख्यमंत्रीपदावर बसले तेव्हा खडसे समर्थक त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणत टूम सोडत होते. प्रत्यक्षात घडले काय तर, खडसेंचे अस्तित्वच पक्षानेही हिरावून घेतले. सत्तेच्या प्रवाहात पुन्हा खडसे दिसले नाहीत. तरी ही पक्ष निवडणुका जिंकतोय. गेल्या साडे चार वर्षांत भाजप जिप, मनपा, पालिका आणि आता लोकसभेच्या निवडणुका जिंकतो आहे. केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र ही घोषणा तूर्त उपयुक्त ठरली आहे. अशा स्थितीत फडणवीस यांना केंद्रात घेऊन महाराष्ट्रावरील पकड ढीली करायला भाजप नेतृत्व अपरिपक्व आहे का ? म्हणूनच महाजन हे मुख्यमंत्री होणार ही लोणकढी थाप मारणारे मूर्ख असावेत वा त्यांना भाजपतील कार्यपध्दती माहिती नसावी.

1 comment:

  1. तार्किक विषय मांडला आहे तिवारीजी मात्र राजकारण मध्ये अश्या प्रकारचे वक्तव्य किंवा प्रसंग येणे स्वाभाविक आहे ज्याच्या वरून प्रत्येक जण स्वतः च्या स्थानाची चाचपणी घेत असतो मात्र एवढे नक्की कि सध्याच्या राजकारण मध्ये जो काम करेल तो टिकेल।

    ReplyDelete