Tuesday 28 May 2019

गठ्ठा मतदान सिध्दांत मोडीत !

लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालाचे विश्लेषण वेगवेगळे गृहितक मांडून त्यातून निघणाऱ्या निष्कर्षावर केले जाते आहे. यात एक निष्कर्ष असाही आहे की, जात-पात आणि समाजच्या गठ्ठा मतदानावर विजयी होण्याचा पूर्वीचा सिध्दांत मोडीत निघाला आहे. याच सिध्दांताच्या बळावर सत्तेत हिस्सेदारी मागणाऱ्या काही बहुचर्चित नेत्यांना मतदारांनी कसे पराभूत केले, या विषयावर काही उदाहरणांसह मी लिहिले आहे. परंतु लोकसभेच्या ५४३ जागांचा एकत्रित निकाल, झालेले मतदान, भाजपला ३०३ जागांसाठी मिळालेले मतदान याच्या टक्केवारीची पडताळणी करताना लक्षात येते की, संपूर्ण भारतातील मतदारांनी जात-पात व समाज याच्या गठ्ठा मतदानाचा संकुचित विचार बाजूला सारुन भाजपने मांडलेल्या राष्ट्रवादाच्या मुद्द्याला समर्थनषदेणारे मतदान केले आहे. अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या तळागाळातील मतदाराने व्यक्तिगत लाभ वा फायदा याच्याशी संबंधित आमिषे, लांगुलचालन, लोभ बाजूला सारुन आपले 'एक' मत भारतासाठी दिलेले आहे.

एकत्रित निकालाचा जर विचार केला तर एकूण झालेल्या सरासरी ६५% मतदानापैकी भाजपच्या ३०३ जागांना सरासरी ३७.६% मतदान मिळालेले आहे. त्यातुलनेत विरोधक मात्र २२ ते ३०% च्या आतच आहेत. भाजपने २२४ जागा या झालेल्या सरासरी ६० ते ७०% मतदानातील ५०% वर मतदान मिळवून जिंकल्या आहेत. सक्षम राजकीय पक्ष, स्पष्ट बहुमत आणि राष्ट्रवाद या ३ मुद्द्यांवर भारतीय मतदार भाजपच्या बाजूने एकवटलेला दिसतो. २२ पुढारी असलेल्या विरोधकांना मतदारांची बदललेली हिच मानसिकता ओळखता आलेली नाही. भाजपने मात्र मतदान केंद्र आणि मतदार यादीचे प्रत्येक पान याची जबाबदारी शेवटच्या कार्यकर्त्यावर सोपवून विरोधकांना धोबीपछाड डाव टाकून भुईसपाट केले आहे. ही तयारी करताना गठ्ठा मतदान सिध्दांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी डोक्यातून पहिल्यांदा बाहेर काढला. आपल्या विचारसरणीच्या पूरक मतदान करुन घेण्यावरच लक्ष देण्यात आले.

एकूण झालेल्या मतदानापैकी भाजपला राज्यनिहाय मिळालेले मतदान डोळे विस्फारून टाकते. राज्यनिहाय भाजपला मिळालेले मतदान असे - हिमाचल प्रदेश ६०%, गुजरात ६२.१%, उत्तराखंड ६१.१%, राजस्थान ५८.२%, मध्यप्रदेश ५८%, आरुणाचल प्रदेश ५७.९%, हरियाणा ५७.८%, दिल्ली ५६.३%, कर्नाटक ५१.८%, छत्तीसगड ५०.२%, त्रिपुरा ४८.९ टक्के, उत्तर प्रदेश ४९.४%, पश्चिम बंगाल ४०.२ टक्के. महाराष्ट्रात भाजप निम्म्या जागा लढला. त्यामुळे भाजपची मतदानाची टक्केवारी २७.५ आहे. भाजप आणि शिवसेना मिळून ती ४९% पर्यंत जाते.

आता प्रश्न असा पडतो की, एकूण झालेल्या मतदानापैकी भाजपला भरभरुन मतदार करणारा हा मतदार समाजातील कोणत्या जात-पात वा धर्माचा आहे ? कोणत्या पारंपरिक गठ्ठा मतदारातून तो बाजूला झाला आहे ? याचेच उत्तर भारतीय समाजमनात जागृत होणाऱ्या राष्ट्रवादाची जाणिव करुन देते. भाजप आणि त्यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला अनुसूचित जाती (एसटी)-जमाती (एस्सी), इतर मागास (ओबीसी) सोबत सवर्ण हिंदू या घटकांनी प्रचंड मतदान केले आहे. यातही मतदान देणाऱ्या घटकांच्या टक्केवारीचा क्रम हा ओबीसी आणि एसटी, एस्सी असा आहे. आपल्या नेहमीच्या जात-पात यात न अडकणाऱ्या या गठ्ठा मतदाराने भाजपच्या कोणत्याही जाती-पातीच्या वा समाजाच्या उमेदवाराला निवडून दिले आहे.

मतदानाच्या टक्केवारीचे शास्त्रीय विवरण आयएएनएस-सीवोटर या संस्थेने केले आहे. एनडीएला ४६.१% ओबीसीने, ४३.२% एसटीने आणि ३९.५%  एससीने मतदान केले आहे. अशीच टक्केवारी काँग्रेस नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) तथा महागठबंधनची सुध्दा अभ्यासण्यात आली आहे. यूपीएला ३०.१% एसटीने, २९.८%  एससीने व २५.४% ओबीसीने मतदान केले आहे. धार्मिकतेच्या आधारावर मतांचा विचार केला तर सवर्ण हिंदू घटकांनी एनडीएला ५१.६% मतदान केले आहे.  यातुलनेत यूपीएला ४०.८% मुस्लिम मतदारांनी मत दिले. एनडीएला केवळ २३% मुस्लिम मतदान मिळाले. एनडीएला ४५.७% ख्रिस्ती व ३८.२% शिख मतदारांनी मतदान केले. यूपीएला २८% शिख व २७.८% ख्रिस्ती मतदारांनी मतदान केले.

महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ३४% मराठा समाज आहे. गेल्या वर्षभरात मराठा समाजाने मराठा  क्रांती मोर्चा माध्यमातून केंद्र व राज्यातील भाजप नेतृत्वातील सरकार विरोधात मोठे संघटन निर्माण केले होते. याशिवाय महाराष्ट्रातील ओबीसी वर्गातही चलबिचल आहे, मुस्लिम समाज भाजपपासून दूर आहे असेही चित्र दिसत होते. प्रत्यक्षात महाराष्ट्रात एनडीएला ४९% मतदान झाल्याचे दिसते. म्हणजेच सरकारवर असंतोष असलेल्या मराठा समाजाचेही १८ ते २०% मतदान यूपीएला गेल्याचे दिसते. येथे मराठा समाजाचा गठ्ठा मतदानाचा सिध्दांत मोडीत निघाला. सरकार विषयी मराठा समाजात असलेला असंतोष यूपीए स्वतःकडे वळवू शकली नाही. बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भुषण पुरस्कार आणि मराठा आरक्षणाची स्वतंत्र टक्केवारीचा न्यायालयात न टीकणारा मुद्दा हे विषय सुध्दा मराठा समाजाने बाजूला सारून एनडीएला मतदान केले. मुंबईजवळ छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारणे आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सवलती या सरकारी निर्णयांचा प्रभाव समाजावर पडला.

लोकसभा निवडणूक निकालात मुस्लिम समाजाचे मतदानही राष्ट्रवादाच्या बाजूने झुकलेले दिसते. एकूण ५४३ जागांमध्ये २७ मुस्लिम खासदार आहेत. यात भाजपच्या ३०३ जागांमध्ये एकमेव मुस्लिम खासदार आहे. मग भाजपसह एनडीए व यूपीएला मुस्लिमांनी मतदान कसे केले आहे ? हा प्रश्न पडतो. सन २०१४ च्या निवडणुकीत २३ मुस्लिम खासदार होते. यावेळी ४ जागा वाढून २७ खासदार झाले.  सन १९८० मध्ये ४९ मुस्लिम खासदार जिंकले होते. भारतातील मुस्लिम लोकसंख्या १४% मानली तर संसदेत किमान ७६ खासदार निवडून आले पाहिजेत. जवळपास ८० मतदार संघात मुस्लिम लोकसंख्या २०% टक्के आहे. यातील ५८ मतदार संघात भाजपसह इतर पक्षांचे हिंदू खासदार जिंकले आहेत. याचे सर्वांत ठळक उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशात एकूण ८० पैकी ६२ जागा भाजपने जिंकल्या. उत्तरप्रदेशात भाजपने एकही मुस्लिम उमेदवारास निवडणूक रिंगणात उतरवले नाही. म्हणजेच राष्ट्रवाद हा मुद्दा महत्त्वाचा ठरवून भाजपने ७० वर्षे जुना मुस्लिम गठ्ठा मतदानाचा सिध्दांत मोडून टाकला आहे. याचा निष्कर्ष हाच की, २०% मुस्लिम असलेल्या ८० पैकी ३६ मतदार संघात भाजपचे उमेदवार जिंकले आहेत.

लेखासाठी संदर्भ -

https://www.indiatoday.in/india-today-insight/story/lok-sabha-election-muslim-votebank-bjp-congress-1535453-2019-05-27

https://indianexpress.com/article/india/maharashtra-anger-real-but-maratha-voters-did-not-look-to-rout-sena-bjp-5747492/

https://hindi.timesnownews.com/india/article/lok-sabha-election-results-2019-sc-st-obc-and-upper-caste-voters-give-more-votes-for-ndaians-c-voter-survey/426054

https://m.economictimes.com/news/elections/lok-sabha/india/heres-how-bjp-earned-massive-mandate-explained-in-numbers/articleshow/69529857.cms

No comments:

Post a Comment