Saturday 18 May 2019

बोलती बंद ... पेपरवाल्यांची ... !!!

पंतप्रधानपदी १८१७ दिवस आरुढ झालेल्या (माणसाचे घोड्यावर बसणे या अर्थाने) नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. १७ मे २०१९ ला पहिली आणि शेवटची प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये मोदींनी ५२ मिनिटे हजेरी लावली. पण पत्रकारांच्या प्रश्नाला भाजप अध्यक्ष अमितशहा यांनी उत्तरे दिली. पत्रकार परिषदेत मोदींचे मौन हे दुसऱ्यादिवशी माध्यमांमध्ये टीकेचा विषय ठरेल हे अपेक्षित होते. अर्थात, शुक्रवारपासून लाईव्ह मीडिया व सोशल मीडियात मोदींना लक्ष केले गेले. सोशल मीडियात मोदी भक्त बैकफूटवर गेले.मात्र, छापिल माध्यमे ही बातमी कशी लावणार याची मला उत्सुकता होती. मराठी दैनिकांकडून भाजप विरोधात काही वेगळे लावले जाईल अथवा केले जाईल याची अपेक्षा नाही. भाजपच्या किती कोटींच्या वा लाखांच्या जाहिराती मिळाल्या, त्या संपूर्ण दैनिक गृपला आहेत का ? याचा पाठपुरावा जेथे मालक मंडळी स्वतः करतात तेथे मोदींच्या मौनावर काही वेगळे करण्याचे धाडस आताची कारकून छाप संपादक मंडळी करतील ही अपेक्षा नव्हती.

मोदींनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ठरवून मुलाखती देणे सुरु केले होते. तेव्हा मराठीतील बड्या दैनिकांचे मालक मोदींसोबत मुलाखत घेतल्याचे फोटो शेअर करायला लागले. काही दैनिकांचे संपादक अशा बातम्या प्राधान्याने व्हायरल करीत होते. खरे तर मोदीची अशी निवडणूक प्रचाराची मुलाखत आम्ही घेणार नाही आणि लावणार सुध्दा नाही अशी बातमी कोणी केली असती तर माध्यमाची निर्भयता आणि निःपक्षपातीपणा ठळक झाला असता.

अशाही स्थितीत 'द टेलिग्राफ' ने मोदींच्या मौनी प्रेस कॉन्फरन्सचे वस्तुनिष्ठ आणि दृश्यात्मक कव्हरेज शुक्रवार, दि. १८ मे च्या पहिल्या पानावर केले. मोदीविषयीच्या या बातमीची मांडणी ज्या संपादक, रात्रपाळीचा संपादक व पेज आॕपरेटरने केली असेल त्याला मी साष्ठांग दंडवत घालतो. अशी कल्पकता मराठी दैनिकांचे मालक व संपादक दाखवूच शकत नाहीत. मोदी तब्बल ५२ मिनीटे काहीही बोलले नाहीत. पंतप्रधान पत्रकारांसमोर मौन बसतो हे शब्दांमध्ये पाल्हाळीक न लिहिता 'द टेलिग्राफ' ने आशयाची मांडणीच अशी केली की 'जबाब नही'. प्रत्येक

पूर्ण मेन फिचर कोरे आहे. मध्यभागी मोदीच्या मिनीटानुसार टीपलेल्या भावमुद्रा आहेत. फोटोखाली केवळ वेळ दिली. हेडींग आहे 'नो हॉर्न' चिन्हाचे. म्हणजे विना गोंगाटाचे. मोदी ५२ मिनीटे विना गोंगाट (प्रचार सभांमधील आरोप-प्रत्यारोपाची पार्वभूमी पाहून) बसून राहिले, ही बातमी 'द टेलिग्राफने' दृश्यात्मक परिणाम साधून दिली. कोणाचे निधन झाले तर पहिले पान कोरे देणे वा अंक फक्त काळ्या रंगात छापणे हा प्रयोग पूर्वी झाला आहे. पण पंतप्रधानाविषयी शब्दाविना प्रेस कॉन्फरन्सचे एवढे सूचक व परिणामकारक बातमी स्वरुपात प्रेझेंटेशन एकमेव 'द टेलिग्राफ' ने केले आहे. 'ट टेलिग्राफ'ने बातमीखाली टीप टाकली आहे - 'मोदी काही बोलले नाही म्हणून जागा कोरी सोडली आहे. जेव्हा ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलतील तेव्हा ही जागा भरु'. माध्यमाने कानफटात हाणायची असते ती अशी.

मोदींचे मौन स्वतः स्विकारलेले होते. माध्यमे जाहिरात वा पेड आशय घेऊन मौन स्वीकारताता. अशावेळी  'द टेलिग्राफ' ने कोरे मेनफिचर देऊन इतर पेपरवल्यांची बोलती बंद केली ... !!!

No comments:

Post a Comment