Thursday 16 May 2019

गिरीशभाऊ, बदलाचे वारे ओळखा ...

भारताच्या संसदीय राजकारणात विचार आणि विखार यात प्रचंड परिवर्तन करणाऱ्या लोकसभा  निवडणूक २०१९ ची प्रक्रिया अंतिम चरणात आहे. देशाशी संबंधित राष्ट्रवाद, समाजवाद आणि समानता या ३ विषयांवर २ टोकांच्या विचारात मतदारांची विभागणी झाली आहे. पाश्चात्य मासिक टाईम्सने भारताची विभागणी करणारे नेता असे संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. हिंदुत्त्व आणि भगवा रंग याच्या भोवती राष्ट्रवाद व समाजवादाची भूमिका मोदींनी घेतली आहे. दुसरीकडे समाजवाद-समानता आणि एकता या विषयांच्या भोवती विरोधकांनी केवळ आणि केवळ मोदी विरोधाचे कडबोळे तयार केले आहे. कडबोळे एवढ्याचसाठी म्हटले आहे की, प्रत्येक राज्यातील प्रादेशिक सुभेदाराने आपापला हिस्सा कायम ठेऊन मोदी विरोध सुरु ठेवला आहे. अशा वातावरणात लोकसभा निवडणुकीचे निकाल मोदींसाठी फारसे चांगले असणार नाहीत, असा दावा आता विरोधक करीत आहेत. भाजपच्या संभावित टेकूवाल्या सत्तेवर नेतृत्वाचा पर्याय म्हणून नितीन गडकरींच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. देशाच्या राजकारणात पितामह राजकारणी असलेले शरद पवार यांच्यासारखा विरोधकही नेतृत्व बदलात गडकरींच्या नावाचा उल्लेख करीत आहे. बदलाचे हे वारे सध्या तरी दिल्लीकडे वाहते आहे. मोदींच्या नावावर भाजपने खासदारांच्या साध्या बहुमताचा आकडा २८७ पार केला तर सारेच प्रश्न बाजूला पडतील. पण, मोदी टाळून काही विषय आला तर विरोधकांकडून गडकरी चर्चेत आहेतच. गरज पडेल तेव्हा संघ परिवार गडकरींना पसंती देतो याचा अनुभव २ वेळा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना आला आहे.

जळगाव जिल्ह्यात सध्या आणि जामनेर, जळगाव, धुळे, नाशिकमार्गे विविध निवडणुका जिंकून खान्देशचे नेते झालेले वैद्यकिय शिक्षणमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही जागा जिंकण्याची जबाबदारी महाजन यांनी शिरावर घेतली आहे. बहुधा तसे घडेल सुद्धा. पण, महाजन यांची प्रतिमा अशा विजयांमुळे केवळ निवडणूक जिंकणारा नेता अशी झालेली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर सत्ता व्यवस्थापन लोकाभिमूख करायचे असते, ज्यांनी मतदान केले त्यांच्यासाठी किमान विकासाचे नियोजन करायचे असते याचा ताळमेळ महाजन यांच्याकडून अजून तरी घातला गेलेला नाही. फार उदाहरणे देण्याची गरज नाही. जळगाव मनपात ७५ पैकी ५७ भाजपचे नगरसेवक मतदारांनी निवडून दिले. ३६५ दिवसात जळगाव बदलून दाखवेल अशी घोषणा (अमित शहा यांच्या भाषेत जुमला) महाजन यांनी केली आहे. जवळपास २०० वर दिवस निघून गेले आहेत. जळगावचे प्रश्न आहे तेथेच आहेत. जळगावसाठी आणलेल्या १०० कोटींच्या कामाचे नियोजन झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले २५ कोटी खर्चाचा घोळ आहे. ही उदाहरणे सत्तेचे लोकाभिमुख व्यवस्थापन व विकास कामांचे नियोजन याची मुळीच नाहीत. निवडणुका जिंकल्या पण मतदारांची झोली खालीच अशी अवस्था आहे. वैद्यकिय शिक्षणमंत्री म्हणून जळगावात मेडीकल हब मार्गी लागले आहे. पण जलसंपदामंत्री म्हणून महाजन यांनी जिल्ह्यास काय दिले हा प्रश्न निरुत्तरीत आहे. आज जामनेर तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणी पुरवठा होता आहे. पाडळसे प्रकल्पासारखे रेंगाळलेले किती प्रकल्प कागदावर आहेत, हेही तपासायला हवे.


महाजन आज महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वातील सरकारमधील क्रमांक २ चे मंत्री आहेत. सरकारवर जेथे संकट तेथे महाजन हे सध्याचे चित्र आहे. पण महाजन यांनी आश्वासने देऊन थांबविलेल्या असंतोषातून पुढे कोणता विधायक मार्ग निघाला हे समोर आलेले नाही. जळगावमधील महामार्ग विस्तार व समांतर रस्ते प्रकरणी केलेले उपोषण आंदोलन मागे घेण्यासाठी महाजन यांनी लक्ष घातले. तेव्हा थातूर-मातूर आश्वासने दिली. गेल्या ३ महिन्यांत त्यावर निविदा-फेरनिविदा असा घोळ सुरू राहिला. सरकारी अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा वचक नसला की असे होते. महाजन यांच्याबाबत बदलाचे वारे सुरु होते ते याच ठिकाणहून.

मध्यंतरी महाजनांनी शरद पवार यांची राजकिय खोड काढत म्हटले होते की, पक्षाने सांगितले तर बारामती जिंकू. खरे आहे म्हणा, महाजन यांची ओळख निवडणूक जिंकणारा नेता अशीच झाली आहे. पण, महाजन बारामती जिंकण्याऐवजी जामनेरला किंवा जळगावला बारामती करण्याचे जाहीर आव्हान का देत नाहीत ? बारामतीची उभारणी हे शरद पवार यांच्या ७० वर्षांच्या दूरदृष्टीचे व परिश्रमाचे फलित आहे. तेथे जात-पात, बंडले याच्या भरवशावर पवार कुटुंबाला हरविणे शक्य नाहीच. बारामतीमधील मतदारांवर पवार कुटुंबाची भानामती आहे, हे मान्य करावेच लागेल.

दिल्लीत मोदींची सत्ता आली तरी, भाजपअंतर्गत नेतृत्व बदल होऊन सत्ता आली तरी किंवा विरोधकांची सत्ता आली तरी विधानसभेपूर्वी मुख्यमंत्री बदलचा विषय चर्चेत येईल. क्रमांक २ वर गिरीशभाऊ असले तरी सत्तेचा सोपान चढायला इतर काही बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. अशा निकषात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे गिरीशभाऊंपेक्षा उजवे ठरतात. आता असलेला क्रमांक २ हा दुय्यम ठरतो. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत तळ ठोकून पवार कुटुंबाला जेरीस आणले. शरद पवार यांनी इव्हीएमला दोष लावत सुप्रियाताईंच्या पराभवाची शक्यता (जी कधीही घडणार नाही) व्यक्त केली. त्यामुळे मोदी-शहा यांना एक वेगळा मेसेज चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पक्ष स्तरावर बदलाचे वारे त्याच दिशेने वाहू शकतात.

लोकसभा निवडणूक निकाल पुढील आठवड्यात लागेल. मोदींचे परत येणे किंवा मोदींचा बदल अथवा भाजपचे पायउतार होणे याचा कौल आला असेल. नंतर अवघ्या ६ महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येतील. मोदींच्या भवितव्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे ६ महिने अवलंबून असतील. केंद्रातील कोणताही बदल हा महाराष्ट्रातील विधानसभेचे वारे बदलवणारा असेल. फडणवीस-महाजन यांची मैत्री आहे आणि सख्यही आहे. आज महाजन क्रमांक २ वर आहेत. भविष्यात क्रमांक १ वर काही बदल झाला तर क्रमांक २ वरील महाजन क्रमांक १ वर येणार का ? याचा विचार करणे आवश्यक आहे. महाजन यांची अशी पदोन्नती व्हावी हे जळगावकर आणि खान्देशवासी म्हणून सुखद असेल. आनंद देणारे असेल. पण तरीही दुसरा प्रश्न पडतोच, तो म्हणजे क्रमांक १ बदलला की त्यांनतरची क्रमवारी सुद्धा कधी-कधी ढासळून जाते. याचा अनुभव दिल्लीच्या राजकारणात नेहमी येतो. महाजन यांच्या बाबतीत हीच शक्यता जास्त वाटते. म्हणूनच गिरीशभाऊ, बदलाचे वारे ओळखा ... असे म्हणावे लागते. बदल हा कार्यपद्धतीसह पुढील रणनितीत सुद्धा हवा. कोणताही पक्ष वर्षानुर्षे चालतो. निवडणुका जिंकणारे वा निवडणुका हरविणारे सुद्धा पक्षात असतात. फक्त त्यांचे मनातील बदलणारे वारे वेळीच ओळखता आले पाहिजे.

सरते शेवटी गिराशभाऊंना, एक विनंती करायला हवी. ती म्हणजे, भाऊ, तुम्ही साडेचार वर्षांत जळगाव जिल्ह्याच्या विकासासंदर्भात एकही बैठक तुमच्या स्वतःच्या पुढाकारात घेतली नाही. शिवाय, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत खान्देशच्या विकासाची एखादी बैठक झालेली नाही. बघा जरा या दृष्टीने काही करता आले तर ...

आपणास वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा ... पुढील वर्षाच्या शुभेच्छा सत्ता असताना देता याव्यात ही मतदारांकडे प्रार्थना ...

1 comment:

  1. वास्तव,समर्पक,प्रासंगिक,तटस्थ.....शुभचिंतकाच मत.

    ReplyDelete