लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हीडीओ' हा प्रचाराचा नवा डीजीटल पैटर्न जन्माला घातला. केंद्रात ५ वर्षे सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदी सरकारच्या उलट्यापालट्या मत-मतांतरे, धोरणे आणि टीव्ही, चित्रपट माध्यमात गाजावाजा केलेल्या योजनांचा सरकारी प्रचार आणि वास्तव याची उलटतपासणी करणारे व्हीडीओ राज ठाकरेंनी सादर केले. जळगाव जिल्ह्यातही सरकारच्या अशाच गाजावाजा केलेल्या पंतप्रधान कौशल विकास योजने (PMKVY) च्या लाभार्थी म्हणून ज्याचा व्हीडीओ टीव्ही वरील जाहिरातीत वापरला त्याला ४ वर्षांत योजनेतील प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रच दिलेले नाही. 'लाव रे तो व्हीडीओ' ची जळगावीची आवृत्ती समजून घेऊ...
केंद्र सरकारच्या योजनेविषयीची आणि गजेंद्र खडके यांच्या प्रतिक्रियेची जाहिरात ...
मिळालेल्या माहितीनुसार सन २०१५ मध्ये मोदी सरकारने प्रधानमंत्री कौशल विकास योजना जाहीर केली. यात १० वी किंवा १२ वीतून शाळाबाह्य झालेल्या युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी दिली जाणार होती. सन २०२० पर्यंत देशभरातून १ कोटी युवकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार होते. या योजनेत जळगाव येथे सन २०१५ मध्ये पॉली हाऊस उभारणी संदर्भातील प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार होते. त्याद्वारे युवकांना इतर लाभ मिळतील असे सांगितले होते.
जळगाव येथील गजेंद्र खडके या प्रशिक्षणात सहभागी झाले. त्यांनी प्रशिक्षण पूर्त केले. हे प्रशिक्षण सुरु असताना एका चैनलला बोलावून प्रशिक्षण सुरु असताना, समन्वयकाची प्रतिक्रिया आणि गजेंद्र खडके यांची प्रतिक्रिया याचे व्हीडीओ केले गेले. त्याची एक छान जाहिरात तयार करुन ती मुंबई दूरदर्शनवर काही काळ दाखवली गेली. मात्र नंतर ४ वर्षे उलटूनही गजेंद्र खडके यांना प्रमाणपत्र दिले गेले नाही. तुमच्या आधारचा क्रमांक जुळत नाही असे सांगून टाळले गेले. दुसरीकडे संबंधित समन्वयक व चैनलने गजेंद्र खडके यांच्याशी पुन्हा संपर्क करुन तुमची यशकथा करु असे म्हटले. तेव्हा गजेंद्र खडके म्हणाले, अहो मला प्रमाणपत्र दिले नाही. मला पॉली हाऊससाठी कर्ज नाही. मला कोणतेही काम नाही. मग माझी यशकथा काय आणि कशी तयार करणार ?? हे वास्तव ऐकून संबंधितांनी गरेंद्र खडके यांना संपर्क करणे बंद केले.
मोदी सरकारचा पॉली हाऊस योजनेसंदर्भातील व्हीडीओ उपलब्ध आहे. त्यात गजेंद्र खडकेही सरकारची भलावण करतात. आता योजनेविषयी गजेंद्र खडके जी व्यथा मांडतात ती आॉडीओ स्वरुपात उपलब्ध आहे. जळगावमधील १ मंत्री, २ खासदार व ७ आमदार आपल्या सरकारच्या फसलेल्या या विषयावर काही बोलतील ? नाहीतर आहेच 'लाव रे तो व्हीडीओ'. गजेंद्र खडकेंचा संपर्क क्रमांक उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment