Monday, 6 May 2019

'बुकमार्क' गनीभाई मेमन ...

जळगावच्या सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातून मोठ्ठे प्रभावलय निर्माण करणारे मित्र गनीभाई मेमन यांचा आज वाढदिवस. त्यांच्या सहवासात आलेल्या आंबट-गोड अनुभवांविषयी लिहिण्याची आज खरी संधी. गनीभाई, हे जळगावच्या सामाजिक क्षेत्रात 'बुकमार्क' सारखे आहेत असे मला वाटते. पुस्तकाची पाने अनेक असतात. वाचन करताना ती मागे पुढे उलटवली जातात. आपण कोणत्या पानापर्यंत पोहचलो हे लक्षात ठेवण्यासाठी बुकमार्क वापरावे लागते. बुकमार्क पानांना वेगळे करीत असले तरी ते दोन पानांमधील मध्यस्थाच्या भूमिकेत असते. बुकमार्क म्हणजे पुस्तक नसले तरीळ दोऱ्याने बांधलेले बुकमार्क पुस्तकातील कोणत्याही पानांपर्यंत पोहचू शकते.

गनीभाई, हा माणूस बुकमार्क सारखा आहे याचे स्पष्टीकरण हेच की, गनिभाईचे पहिले अस्तित्व म्हणजे रोटरी. या संघटनच्या माध्यमातून नानाविध प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम घेताना गनीभाई दिसतात. यातूनच गनीभाई आणि रोटरी हे अविभाज्य घटक ठरले आहेत. गनीभाईचे दुसरे अस्तित्व म्हणजे रेडक्रॉस हे संघटन. रक्तातून जसे हिमोग्लोबीन वेगळे करता येत नाही अगदी तसेच गनीभाईला रेडक्रॉसमधून बाजूला करता येत नाही. गनीभाई हे जळगावमधील सामाजिक क्षेत्रात लिलया वावरतात. हा माणूस रेल्वे यंत्रणेच्या समितीवर, औद्योगिक समितीवर, व्यापारी महामंडळावर, जिल्हा रुग्णालयाच्या समितीवर, शाळेच्या समितीत पदाधिकारी आहेत. जळगावात असा 'बहुमुखी' माणूस विरळाच असावा. स्वतःच्या सामाजिक कार्याचे क्षेत्र विस्तारलेले असताना गनीभाई हे इतर सामाजिक संस्थांसाठी बुकमार्क सारखे कार्य करतात. इतरांचे कार्यक्रम स्वतंत्र असले तरी तेथे सूत्रसंचालक, समन्वयक, सूत्रधार, तज्ज्ञ अशा भूमिकेत गनीभाई असतात.

गनीभाईंचे वत्त्कृत्व आणि संभाषण कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि मराठी या भाषांमधून ते सहज संवाद करु शकतात. म्हणूनच असा बहुमुखी सूत्रसंचालक अनेकांना हवा असतो. गनीभाई बऱ्याचवेळा सूत्रसंचलन करताना वक्त्याच्याही भूमिकेत जातात. त्यामुळे त्यांचा संवाद हा कार्यक्रमाची रंगत आणि वेळही वाढवतो. अर्थात, गनीभाई मध्यंतरी समुपदेशक किंवा व्यक्तिमत्त्व विकास सल्लागाराच्या भूमिकेतही गेले होते. त्यांनी यूट्युबर आपल्या संबोधनाच्या काही चलफित प्रदर्शितही केल्या आहेत. ते स्वतःला प्रेरक (एनस्पारस) म्हणवून घेतात. व्यक्ती म्हणून गाठीला असलेला विविध क्षेत्रातला अनुभव लक्षात घेता गनीभाई बहुतांश कार्यक्रमांमध्ये कोणत्यातरी भूभिकेत नक्कीच दिसतात.

गनीभाईंशी माझी मैत्री कैरी-आंब्यागत आंबट-गोड आहे. खान्देश सकाळ या दैनिकाच्या सहयोगी संपादकपदी माझी नियुक्ती झाल्यानंतर रोटरी तर्फे मला पहिले व्यासपिठ गनीभाईंनी उपलब्ध करुन दिले. माझ्या सामाजिक अस्तित्वाच्या अल्बममध्ये पहिले छायाचित्र रोटरीचेच आहे. अर्थात, गनीभाईंच्या एका सार्वजनिक वक्तव्यातून गैरसमज करुन घेण्याचा काळ सुध्दा त्यावेळी निर्माण झाला होता. परंतु सहृदयी मित्र श्री. नितीनभाई रेदासानी व श्री. अनिल जोशी यांच्या मध्यस्थीमुळे मैत्रीचा जोड घट्ट झाला आणि त्या काळातील चर्चेतून अनेक बाबी शिकवून गेला. गनीभाईंचे पिताश्री माजीद मेमन यांनी एकदा त्यांच्या बंगल्यावर नेऊन त्यांच्या संग्रहालयाचा खजिना दाखवला. तेव्हा मेमन कुटुंबाचा जवळून परियच झाला. सिध्दीका आणि आयेशा तेव्हा लहानग्या होत्या. आज सिध्दीका डॉक्टर आहे. ती सुध्दा फेसबुकवर अधुन-मधून लिहित असते.

गनीभाईंशी सहमतीचे अनेक गोड प्रसंग आहेत. त्यात सच्चर समितीच्या अहवालावर घडवून आणलेले चर्चासत्र हे न विसरता येणारे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गनीभाईंनी केले होते. कर निर्धारण मूल्य कमी करण्यासाठी मनपाकडे व्यापारी महामंडळासह केलेला पाठपुरावा आहे. महिलांसाठी घेतलेल्या तेजस्विनी, गोदावरी पुरस्कार योजनांमध्ये गनीभाई परिक्षक राहीले. महिलादिन कार्यक्रमाच्या आयोजनात ते सतत सक्रिय होते. असे अनेक लहान-मोठे गोड प्रसंग आहेत.

काही आंबट प्रसंगही आहेत. अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रम, समांतर रस्ते विषयी चर्चा, रेडक्रॉस कार्यपध्दती असे काही विषय. वादाच्या अशावेळी आम्ही दोघांनी परस्परांशी बोलून प्रसंगी मी एकट्यानेच एकतर्फी भांडून मतभेद मिटवले आहेत. काहीवेळा मी टोकाचा वागलो आहे पण गनीभाईंनी नेहमीच एक पाऊल पुढे भूमिका घेत मला समजावून घेत सामावून घेतले आहे. गनीभाई गुणाने मीठासारखे आहेत. खाण्याच्या सर्वच पदार्थात मीठ नसते पण बहुतेक पदार्थात असते. ज्या पदार्थात मीठ हवे, त्यात ते नसेल तर अळणी किंवा बेचव वाटते. अगदी तसेच गनीभाई समाजिक क्षेत्रात मीठागत आहेत ... चव आणणाऱ्या माणसागत ...

गनीभाई, वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा !!!

No comments:

Post a Comment